क्रांतदर्शी

विवेक मराठी    05-Apr-2019
Total Views |

डॉ. हेडगेवारांचा जन्म चैत्र शुध्द प्रतिपदेला, म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी झाला. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अर्पण केलेली ही शब्दसुमने...

क्वॉन्टम मेकॅनिक्सचा किंवा फिजिक्सचा जन्म 1925 साली युरोपमध्ये झाला. 1925 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जन्म भारतात झाला. या दोन घटनांचा परस्पर काही संबंध आहे का? उत्तर असे की, शून्य संबंध आहे. हे जरी खरे असले, तरी विश्वसंचालकाच्या मनात काय असावे? क्वॉन्टम फिजिक्स म्हणजे वेदान्ताने जी सत्ये शोधून काढली, ती वैज्ञानिकदृष्टया सिध्द करणे आहे. आणि संघ म्हणजे वेदान्त प्रत्यक्ष जीवनात कसा जगायचा, याची प्रयोगशाळा आहे.

 

सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील विवेकचे  फेसबुक पेज like करावे....

https://www.facebook.com/VivekSaptahik/

फिजिक्समधील 1925 सालची वैज्ञानिक क्रांतीची घटना आहे. तिथून ज्या साखळी प्रतिक्रिया सुरू झाल्या, त्या थांबण्याची चिन्ह नाहीत आणि त्याचा परिणाम ज्याच्यावर झालेला नाही, असा माणूस शोधून काढणे अवघड आहे. मानवी समाजाची उलथापालथ क्वॉन्टम फिजिक्सने केलेली आहे.

डॉ. हेडगेवार यांनी 1925 साली आपल्या काही सहकाऱ्यांना घेऊन संघ सुरू केला. ही भारताच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक जीवनातील महान क्रांतिकारक घटना होती. डॉक्टर हेडगेवार सोडले, तर या सर्व क्षेत्रांमध्ये जे परिवर्तन घडवून आणायचे आहे, त्याची थोडीशीदेखील कल्पना त्यांच्या बरोबर असणाऱ्यांना संघ स्थापन करताना होती, असे म्हणता येणार नाही. डॉक्टरांना जी क्रांती घडवून आणायची होती ती व्यवस्था परिवर्तनाची नाही, संस्थाजीवन परिवर्तनाची नाही, राजकीय परिवर्तनाची नाही, धर्मचक्र परिवर्तनाची नाही, त्यांना क्रांती घडवून आणायची होती, व्यक्तीमध्ये.

व्यक्ती ही शरीर, मन, बुध्दी, व आत्मा याचा समुच्चय असतो. क्वॉन्टम विज्ञानाच्या भाषेत सांगायचे, तर आपले शरीर म्हणजे अब्ज अब्ज मूलकणांचा समुच्चय असतो आणि हे सर्व मूलकण परस्परांशी संलग्न असतात. एक काय करतो ते दुसऱ्याला माहीत असते. जाणिवेने ते प्रत्येकाशी जोडलेले असतात. हे जे व्यक्तीचे शरीर आहे आणि त्याच्या मध्ये जे मन आहे, बुध्दी आहे आणि जे आत्मतत्त्व आहे, ते त्याच्या शुध्द स्वरूपात, मूळ स्वरूपात विकसित झाले पाहिजे. मूळ स्वरूपात ते सर्व शुध्दच असते, त्याला कोणतेही विकार नसतात.

डॉ. हेडगेवारांनी त्याची एक प्रयोगशाळा सुरू केली. आत्मबोध करून घ्या, मी कोण आहे याची ओळख करून घ्या. ही ओळख झाली की आपोआपच या विश्वात मी एकाकी नाही, मी समाजात आहे आणि समष्टीत आहे, याची अनुभूती यायला लागते, आपपरभाव संपतो. हे विश्वची माझे घर, ही भावना तयार होते.

डॉ. हेडगेवारांनी अशी व्यक्ती घडविण्याची कार्यशाळा - म्हणजे संघ सुरू केला. क्वॉन्टम विज्ञानाने वैज्ञानिक परिभाषेत आणि प्रयोगशाळेत प्रयोग करून सिध्दान्त मांडले की, मूलकणांचे गुणधर्म सर्व ठिकाणी सारखे असतात. अमेरिकेतील मूलकण आणि भारतातील मूलकण यांचे गुणधर्म वेगवेगळे नसतात. ते सारख्याच नियमांनी बांधलेले असतात. त्यांचा व्यवहारदेखील सर्वच ठिकाणी एकसारखा असतो. आणि आपण सर्व म्हणजे सर्व स्थूलसृष्टी ही या मूलकणांचीच असते.

हे जर विज्ञान असेल, तर माणसाने वैज्ञानिक होणे म्हणजे समष्टीचा विचार करणे होय. हा माझा, तो परका, हा वेगळया धर्माचा, मी वेगळया धर्माचा, तो वेगळया वंशाचा मी वेगळया वंशाचा, या भेदांना वैज्ञानिक विश्वात काही स्थान नाही.

आपल्या प्राचीन ऋषींनी स्वतःवर प्रयोग करून मी म्हणजेच ब्रह्मांड आणि माझ्यातच ब्रह्मांड सूक्ष्म रूपाने असते, याची अनुभूती घेतली. मी ब्रह्म आहे, तूही ब्रह्म आहेस आणि सर्व ब्रह्म आहे, ही आपली सिध्दान्तत्रयी आहे. ती जगावी लागते.

डॉ. हेडगेवारांचे क्रांतदर्शी कार्य, हे आपले प्राचीन आत्मविज्ञान कसे जगायचे? हे शिकविणारे आहे. हिचेच दुसरे नाव मानवता असे आहे. ती भारताने स्वतः जगून, जगाला द्यायची आहे. विज्ञान आणि भारतीय आत्मज्ञान हातात हात घालून चालते करायचे आहे. ही करणारी एक निर्णायक शक्ती डॉ. हेडगेवारांनी स्वयंभूपणे उभी राहत जाईल, अशी एक कार्यपध्दती दिली. भारतमातेच्या अशा या महान सुपुत्रास विनम्र प्रणाम!

vivekedit@gmail.com