तळमळीचा कार्यकर्ता हरपला!

विवेक मराठी    05-Apr-2019
Total Views |

प्राध्यापक भालचंद्र विष्णू कोल्हटकर यांच्या निधनाने पुण्यातील एक ध्येयनिष्ठ, संघसमर्पित आणि तळमळीचा कार्यकर्ता हरपला असेच म्हटले पाहिजे. भालजी याच नावाने पुण्याच्या संघवर्तुळात ते परिचित होते. शाखा हा त्यांचा श्वास होता आणि शाखा फुलाव्यात यासाठी जे जे करता येईल ते त्यांनी अखेरपर्यंत केले. शिक्षणाने ते अभियंता होते, व्यवसायाने महाविद्यालयात प्राध्यापक होते; पण त्या पलीकडे जाऊन ते एक हरहुन्नरी संघकार्यकर्ते होते. मध्य पुण्यातील अनेक शाखांचे ते आधार होते आणि काही शाखा तर त्यांनी सुरू केल्या होत्या. असा हाडाचा कार्यकर्ता आता निधन पावला आहे.

संघाच्या कार्यरचनेत असंख्य कार्यकर्ते निरलसपणे नि तितक्याच सहजपणे काम करीत असतात. भालजी अशाच कार्यकर्त्यांपैकी होते. शाखेला मुख्यशिक्षक, कार्यवाह असे पदाधिकारी असले, तरीही भालजींचा एक प्रभाव त्या शाखेच्या कार्यक्रमांवर दिसे. याचे मुख्य कारण असे होते की सर्व गोष्टी चोख व्हाव्यात अशीच त्यांची इच्छा असे आणि तसा त्यांचा आग्रहही असे. व्यवस्थापनाच्या भाषेत ज्याला अधिकाराविनाही प्रभाव म्हणतात, त्याचे भालजी हे एक उदाहरण होते. दैनंदिन शाखा असो किंवा शाखेचे उत्सव असोत किंवा शाखेचे अन्य उपक्रम असोत, त्यात नियोजन आणि मुख्य म्हणजे अंमलबजावणी याविषयी ते अतिशय सजग असत आणि अन्य स्वयंसेवकांनीदेखील तसेच असावे अशी त्यांची अपेक्षा असे. अर्थात ही अपेक्षा निष्क्रिय किंवा सल्ल्यापुरती नसे. ते स्वत: त्यासाठी मेहनत घेत असत. म्हणजे पद्य कोणते निवडावे येथपासून वक्त्यांचा परिचय कसा असावा येथपर्यंत नवख्या कार्यकर्त्यांना त्यांचे मार्गदर्शन मिळत असे. मात्र भालजींचे विशेष हे यापेक्षा आणखी अनेक होते.

एक म्हणजे ते ह.ना. आपटे यांच्यापासून नाथमाधव, गोनीदा यांच्यापर्यंत अनेकांनी लिहिलेल्या कथांचे कथाकथन करीत असत आणि अर्थातच प्रामुख्याने शिवकाल हा त्या सगळयाचा गाभा असे. शिशु आणि बाल स्वयंसेवक ते कथाकथन ऐकताना रंगून जात आणि कथेतील पात्रे त्या स्वयंसेवकांना भुरळ घालत असत. कथाकथन करताना भालजी जेवढे रंगून जात, तेवढेच समोरचे ऐकणारे रंगून जात. शाखेतील काही पिढया भालजींचे हे कथाकथन ऐकत मोठया झाल्या असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. परंतु स्वत: अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक असणारे भालजी कथाकथन करताना लहानांमध्ये लहान होत, तेच भालजी शाखेची जी गंगाजळी व्यवस्था म्हणून ओळखली जाते, ते काम करताना आपली ती भूमिकादेखील चोख पार पाडीत असत. स्वयंसेवकांच्या घरी जाऊन गंगाजळी गोळा करण्यासाठी त्यांनी कितीतरी शनिवार-रविवार खर्ची घातले. याबरोबरच त्यांचा आणखी एक विशेष म्हणजे त्यांनी काढलेल्या सहली. ते आडमार्गाच्या सहली काढत आणि डोंगरदऱ्यांतून आणि किल्ल्यांवरून भ्रमण करीत असत. अर्थताच एकटे नव्हे, कधी तीन-चार जण बरोबर असत, कधी पंचवीस-तीस जणही असत. अशा सहली आव्हानात्मक असतात. पण पक्के नियोजन आणि ठाम निश्चय या बळावर भालजींनी कितीतरी जणांना दुर्गभ्रमण घडवून आणले. शिवाय तेथील भूगोल आणि इतिहासही भालजींचा पक्का असल्याने त्यांच्यासह जाणाऱ्यांना जणू शिवकाळात गेल्याचा अनुभव येई. दुर्गभ्रमण करून आले की आपल्या खास सवयीनुसार भालजी त्या सगळया सहलीचे रसभरीत वर्णन लिहून काढीत आणि त्यात चक्क स्वत: हाताने काढलेले नकाशेदेखील अंतर्भूत असत. स्वाभाविकच पुन्हा कोणाला जायची इच्छा झाली आणि भालजी बरोबर नसले, तरी मार्ग कोणता निवडायचा हे सांगणारा दस्तऐवज तयार असायचा. अशी किती तरी सहलवर्णने भालजींनी लिहून ठेवली आहेत आणि तो महत्त्वाचा दस्तऐवज अक्षर स्वरूपात आला, तर आताच्या संघातीलच नव्हे, तर इतर वाचकांनादेखील त्याचा लाभ होईल यात शंका नाही

काही वर्षांपूर्वी भालजींना तोंडाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले आणि एकामागून एक शस्त्रक्रिया कराव्या लागल्याने बोलण्यावर आणि खाण्यावर निर्बंध आले. भालजी वास्तविक माउथऑॅर्गनसह काही वाद्ये वाजवत असत आणि कथाकथन हा त्यांचा आवडीचा छंद होता. परंतु कर्करोगावरील उपचारांनी या सगळयावर निर्बंध आणले. वास्तविक हे तोंडाचीच नव्हे, तर आयुष्याचीदेखील चव घालवून ते नीरस करणारे असते. परंतु भालजींनी बचेंगे तो और भी लढेंगे या दत्ताजी शिंद्यांच्या बाण्याला साजेसे आपले आयुष्य व्यतीत केले. बोलण्यावर निर्बंध आल्यावर त्यांनी हातात लेखणी धरली. सरसंघचालकांचे थोडक्यात जीवनपरिचय त्यांनी लिहून काढले, वेगवेगळया प्रचारकांची माहिती संकलित केली, प्रश्नमंजुषा रचल्या. संघातील पद्यांची हस्तलिखिते तयार केली. एका अर्थाने त्यांनी आपल्या लेखणीलाच आपली वाणी बनविले असे म्हटले पाहिजे. घरातून बाहेर पडणे अशक्य झाल्यावर घराजवळ भरणाऱ्या शाखेच्या प्रार्थनेच्या वेळेला ते घराच्या खिडकीपाशी येऊन उभे राहत. अशी संघनिष्ठा लादून किंवा सांगून येत नसते. ती धमन्यांतूनच वाहावी लागते.

भालजींनी सगळया भूमिका पार पाडल्या आणि काही पिढयांवर संघशाखेत संस्कार घडविले. स्वत: अभियंते असल्याने 1983मध्ये तळजाई येथे संघाचे महाराष्ट्र प्रांताचे जे भव्य शिबिर झाले, त्या शिबिराच्या आखणीची जबाबदारी भालजींवरदेखील होती. ती त्यांनी पार पाडलीच, मात्र एका अर्थाने त्यांनी आपल्या आयुष्याची आखणीही तितक्याच योग्य पध्दतीने केली होती असेच म्हणावे लागेल.

- राहुल गोखले

 9822828899