''संघ कुणाचाही विरोधक नाही'' - सुहासराव हिरेमठ

विवेक मराठी    11-May-2019
Total Views |

 

सा. विवेक गेले काही वर्षे विविध जिल्ह्यांमधील संघकार्य शब्दबध्द करत आहे. याच मालिकेतील पुढचा टप्पा म्हणजे संघसरिता नगर हा ग्रंथ होय. नगर जिल्हा हा कधीकाळी समाजवादी आणि काँग्रेसचा बालेकिल्ला होता मात्र संघ स्वयंसेवकांनी आपल्या परिश्रमांनी लाल  नगर भगवा झाला. या साऱ्या प्रवासाला शब्दातून साकार करण्याचा प्रयत्न सा. विवेकने नगर जिल्हातील जेष्ठ कार्यकर्त्यांच्या मदतीने साकार करण्याचा प्रयत्न झाला. त्याला पुर्ण विराम मिळाला 4 मे रोजी  सांयकाळी नगर येथील सहकार भवन सभागृहात. सुमारे 700 व्यक्तींच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा झाला. सकाळी नगरचे ग्रामदैवत विशाल गणेश मंदिरात मान्यवराच्या उपस्थितीत संघसरिता नगर या ग्रंथाचे व परिसवेध या पुस्तकाचे पुजन करण्यात आले.

  ''संघ हिंदू समाजाचे संघटन करतो. त्यामुळे संघ कोणाचाही विरोधक नाही. उलट जे स्वत:ला संघाचे विरोधक समजतात, ते संघाचे प्रचारक असतात. संघाच्या प्रचारकापेक्षाही ते जास्त काम करतात. संघाचा सामान्य स्वयंसेवक असामान्य काम करतो, याचा विरोधक अनुभव घेत असतात. राष्ट्र प्रथम, समाज प्रथम ही भावना स्वयंसेवकांच्या मनात जागवण्याचे काम संघ करतो आणि ती वृत्ती होईल याकडे लक्ष संघ देतो. छत्रपती शिवरायांचे अधुरे स्वप्न, हिंदू समाजाचे साम्राज्य निर्माण करण्याची प्रेरणा आणि भक्तिभाव जागवण्याचे काम संघ करतो. याच भक्तिभावाचे दर्शन नगर जिल्ह्यात होते. अनेक स्वयंसेवक, अनेक पिढया संघकामात समर्पित झाल्या. या समर्पित व्यक्तींचे स्मरण करत आपल्याला पुढची वाटचाल करायची आहे आणि भारतमातेला परमवैभवास नेऊ या''असे उद्गार रा.स्व. संघाचे अखिल भारतीय कार्यकारणी सदस्य मा. सुहासराव हिरेमठ यांनी काढले. सा. विवेकने प्रकाशित केलेल्या 'संघसरिता नगर' या ग्रंथाच्या व रवींद्र (राजाभाऊ ) मुळे यांनी लिहिलेल्या 'परीसवेध' या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्ती प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर प. महाराष्ट्र प्रांत संघचालक नाना जाधव, नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे, नगरचे महापौर बाबासाहेब वाकळे, सा. विवेकचे महेश पोहनेरकर आणि परीसवेध या पुस्तकाचे लेखक रवींद्र मुळे उपस्थित होते.

भारतमाता पूजनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. सा. विवेकचे सहकार्यकारी संपादक रवींद्र गोळे यांनी 'संघसरिता नगर' या ग्रंथाची माहिती दिली. ते म्हणाले, ''नगर जिल्ह्यातील संघकाम हे 73 वर्षे जुने असून अनेक पिढया संघविचाराने पुनित झाल्या आहेत. सर्वसमावेशक संघ अशी ओळख असलेल्या नगरच्या संघकार्यकर्त्यांनी असंख्य विपदांचा सामना करत संघकाम केले. त्यांचा संघर्ष, समन्वय, त्याग यांचा इतिहास म्हणजे हा ग्रंथ होय. एकूण सहा विभागांचा आणि चारशे तीस पानांचा हा ग्रंथ असून भविष्याची वाटचाल नक्की करण्यासाठी त्याचा उपयोग होईल.''

'परीसवेध' या पुस्तकाचे लेखक रवींद्र मुळे यांनी पुस्तक लिखाणामागची प्रेरणा मांडताना सांगितले, ''या पुस्तकाची पहिली आवृत्ती भय्याजी जोशींच्या हस्ते प्रकाशित झाली, तेव्हा भय्याजी म्हणाले, संघसरिता बह रही है। या संघसरिताला विकसित करणारे भगीरथ म्हणजे हे संघस्वयंसेवक होय. या मंडळींनी केलेल्या पुण्यकर्माचा गौरव करणे, स्मरण करणे म्हणजे परीसवेध पुस्तक होय. या संघभगीरथांनी वैचारिक आणि जमिनीवरचा संघर्ष करत संघ वाढवला. उपेक्षा, अपमान सहन करत त्यांनी संघ वाढवला, त्याचे नित्य स्मरण ही आपली जबाबदारी आहे, म्हणून हा लेखनप्रपंच होय.''

या प्रकाशन सोहळयाच्या निमित्ताने मार्गदर्शन करताना नाना जाधव म्हणाले, ''हिंदू समाजाच्या उत्थानासाठी डॉक्टर हेडगेवारांनी संघ स्थापन केला. आत्मविस्मृती दूर करून वैभवसंपन्न हिंदू समाज निर्माणात सहचिंतन हा महत्त्वाचा आधार आहे. डॉक्टरजींनी संघविचाराचे वाहक निर्माण केले आणि वेगवेगळया ठिकाणी पाठवले. त्यापैकी बाबूराव मोरे नगरला आले आणि संघकाम सुरू झाले. त्याला 73 वर्षे झाली. नगर जिल्ह्यातील संघकाम विविधतापूर्ण आहे. संघर्ष आणि विरोधातून नगरचे संघकाम तावून सुलाखून निघाले आहे, सर्वसमावेशक आहे, म्हणूनच नगर जिल्ह्यात संघ खूप खोलवर रुजला.''

नगर जिल्ह्यातील स्वयंसेवकाच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा पार पडला. या प्रकाशन कार्यक्रमापूर्वी परीसवेध या पुस्तकात ज्या साठ संघकार्यकर्त्याचा परिचय करून देण्यात आला, त्यांच्या कुटुंबीयासमवेत गप्पा आणि चहापानाचा छोटेखानी कार्यक्रम झाला. त्यात सुहासराव हिरेमठ, नाना जाधव यांनी उपस्थितांशी संवाद साधला. राजा गटणे यांनी या देखण्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.