'कापूस' - भारतातील कॉटनॉमी

विवेक मराठी    11-May-2019
Total Views |

***प्रा. डॉ. नरेंद्र पाठक***

 कापूस उद्योगाचं बीज म्हणजे सरकी. कापसाइतकंच सरकीलाही महत्त्व आहे. सरकीचा उपयोग प्राण्यांसाठी खाद्यपदार्थ (प्रोटीनयुक्त आहार), तेलनिर्मिती यासाठीही होतो. या सर्व परिप्रेक्ष्यात कापूस उद्योगाचं अर्थकारण, कापूस उद्योग, शेती, उत्पादन, कापूस प्रक्रिया या सर्व मुद्दयांचं विवेचन राजीव जोशी यांनी खऱ्या अर्थाने 'अर्थपूर्ण' केलं आहे.

'एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे'... 'जगाच्या पाठीवर' या चित्रपटातील हे गीत आपण सगळयांनी अनेक वेळा ऐकलं आहे. राजा परांजपे हातमागाच्या यंत्रावर बसून वस्त्र विणत हे गाणं म्हणत आहेत आणि या गाण्यातील पुढील ओळी आपल्याला अंतर्मुख करून जातात. त्या ओळी अशा -

'पांघरसी जरि, असला कपडा

येसी उघडा, जासी उघडा,

कपडयासाठी करिसी नाटक, तीन प्रवेशाचे.....'

या गीताचा चित्रपटातील संदर्भ जरी वेगळा असला, तरी उपरोक्त तीन ओळी माणूस आणि वस्त्र यांचं नातं किती जवळचं आहे, हे सांगून जातात. नवजात अर्भकाच्या लंगोटापासून ते थेट मृत्युशय्येवरील देहावर घातलेल्या पांढऱ्या वस्त्रापर्यंत 'कापड' आपली सोबत करतं, रक्षणं करतं, लाज राखतं. मुख्य गरजांपैकी 'वस्त्र' ही मुख्य गरज.... पण आपण रोज परिधान करत असलेल्या कापडाविषयी कुतूहल म्हणून, अभ्यास म्हणून, उत्सुकता म्हणून कधी काही चिंतन केलंय  का? बहुधा नसेलच. या कापडाचा संपूर्ण इतिहास अत्यंत सोप्या आणि अभ्यासपूर्ण पध्दतीने,  राजीव जोशी यांनी नुकत्याच प्रकाशित झालेल्या 'कापूस' या त्यांच्या पुस्तकातून वाचकांसाठी लिहिला आहे. 'कापूस - सरकीपासून सुतापर्यंत' हे राजीव जोशी यांचं पुस्तक राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलं आहे.

कापडाचा प्रारंभ सरकीपासून होतो. सरकी जमिनीत पेरण्यापासून ते थेट मॉलमधील वातानुकूलित काचेच्या कपाडातील आपलं लक्ष वेधून घेणाऱ्या सुंदर शर्टिंग, सूटिंग, साडया, ड्रेस मटेइअियल.... इत्यादीपर्यंतचा हा सगळा प्रवास राजीव जोशींनी छोटया छोटया 24 प्रकरणांमधून लिहिलेला आहे. हे पुस्तक वाचताना सरकीची पेरणी, औषध फवारणी, वेचणी, बोंड, लांब धाग्याचा कापूस, बीटी कापूस, कापडाचं वर्गीकरण, कापसावरील प्रक्रिया, जिनिंग, प्रेसिंग अशा कापूस उद्योगातील अनेक शब्दांचा आपल्याला परिचय होतो. टप्प्याटप्प्याने कापसाची कथा पुढे पुढे सरकत जाते आणि आपल्याला राष्ट्रीय व जागतिक बाजारपेठेपर्यंत घेऊन जाते. हे सगळं वाचत असताना आपला अर्थशास्त्राचा आणि कृषीशास्त्राचा अभ्यास अगदी सहज होऊन जातो. अर्थशास्त्र आणि कृषीबरोबरचं कापसाचा प्राचीन, अर्वाचीन इतिहासही वाचला जातो. हा इतिहास वाचताना महाभारत, उपनिषद, वेद, ऋग्वेदातील अभ्यासपूर्ण संदर्भही वाचायला मिळतात आणि ग्रीस, इजिप्त, चीन, ब्राझिल, अमेरिका या देशांतील कापूस कथा आणि जागतिक स्तरावरील कापून उद्योगाचं अर्थकारणही अभ्यासलं जातं. शरीर झाकण्यासाठी प्रारंभी मानवाने 12000 ते 10000 वर्षांपूर्वी तागाच्या धाग्याचा शोध लावला इथपासून या कापसाच्या गोष्टीचा प्रारंभ होतो आणि धाग्याच्या व कापडाच्या क्षेत्रात भारत चीनशी आंतरराष्ट्रीय पातळीवर कसा समर्थपणे सामना करू शकेल, इथे कापसाची गोष्ट समाप्त होते.

कापूस उद्योगाचं बीज म्हणजे सरकी. कापसाइतकंच सरकीलाही महत्त्व आहे. सरकीचा उपयोग प्राण्यांसाठी खाद्यपदार्थ (प्रोटीनयुक्त आहार), तेलनिर्मिती यासाठीही होतो. या सर्व परिप्रेक्ष्यात कापूस उद्योगाचं अर्थकारण, कापूस उद्योग, शेती, उत्पादन, कापूस प्रक्रिया या सर्व मुद्दयांचं विवेचन राजीव जोशी यांनी खऱ्या अर्थाने 'अर्थपूर्ण' केलं आहे. महाराष्ट्र शासनातील कृषी मंत्रालयाने या कापूस उद्योगाकडे आणि कापूस शेती व्यवसायाकडे कशा दृष्टीने पाहावं आणि बळीराजास - पर्यायाने महाराष्ट्र राज्याला सुगीचे दिवस कसे येतील, असा जणू कानमंत्रच या पुस्तकातून दिला गेला आहे.

कृषी विभागास दिशा देणारं पुस्तक म्हणूनही या पुस्तकाचं महत्त्व आहे. खरं तरं भारत हा कापड निर्यात करणारा देश होता. औद्योगिक क्रांतीनंतर ब्रिटनमधील कापड उद्योग वाढत गेला. त्यानंतर ब्रिटिशांनी भारतातून कापडाऐवजी कापूस आयात करायला सुरुवात केली. त्याच सुमारास मुंबईतही कापड व कापूस उद्योग भरभराटीस आला. मुंबई हे व्यापारी केंद्र होतंच, त्यात मुंबईतील गिरणगाव हे 'कॉटन हब' म्हणून तयार झालं. एक मोठा कामगारवर्ग कोकणातून, घाटावरून मुंबईत स्थानांतरित झाला. त्या वेळेपासूनच खादी ग्रामोद्योग आणि महात्मा गांधीजींची खादी चळवळ फोफावली. हा सगळा धावता इतिहास या पुस्तकात ओघवत्या शब्दात मांडला गेलेला आहे. मोहेंजदडोपासूनच कापून आणि कापड उद्योगाची जाण होती. भारताने विविध देशांना कापूस निर्यात करावा म्हणून भारतात कापसाच्या विविध जातींची लागवड होत असे. आजही जागतिक स्तरावर विचार केला, तर जगातील एकूण कापूस उत्पादनाच्या 25 टक्के उत्पादन भारतात होतं. मात्र आजही भारतातील  तमाम शेतकरी, जमीन आणि पर्यावरण याचा एकत्रित विचार केला तर कापूस उत्पादनाच्या भारताच्या संपूर्ण क्षमता वापरल्या जात नाहीत असं लक्षात येतं. या कळीच्या मुद्दयाकडे लेखक राजीव जोशी यांनी वाचकांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर या उद्योगातील बालकामगार आणि महिला कामगार या विषयीही चिंतन करण्यात आलं आहे. कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी आणि अर्थशास्त्राचे विद्यार्थी यांच्यासाठी हे पुस्तक म्हणजे अभ्यासपूर्ण संशोधनात्मक प्रबंधच आहे असं म्हणावयास हरकत नाही.

पुस्तकाच्या प्रारंभी 'पेर्ते व्हा' हे लेखकाचं मनोगत आहे. हे वेगळया विषयावरचं पुस्तक लेखकाला का लिहावसं वाटलं, हे सांगत असताना राजीव जोशी यांनी त्यांच्या बालपणातील खान्देशमधील विविध संदर्भ दिले आहेत. काळया मातीमधून आलेली, बहिणाबाईंची 'बिना कपाशीनं उले, त्याले बोंड म्हणू नही' ही कविता शाळेच्या पुस्तकातून शिकलेला हा लेखक पुढे मुंबईत येऊन कापूस महामंडळात नोकरीला लागतो. पुढे निवृत्तही होतो, पण सरकी, बोडं, कपाशी, कापूस या शब्दांनी लेखकाची साथ सोडलेली नसते. लहानपणी जळगावच्या कॉटन मार्केटमधील कापसाची गाठी, कापसाच्या बैलगाडया, आणि कापूस महामंडळातील 'कापूस' या अस्वस्थ करणाऱ्या कडू-गोड आठवणी, अनुभव यामधून राजीव जोशींची 'कापूस कथा' आकार घेते आणि एक अभ्यासपूर्ण, संदर्भ ग्रंथ म्हणता येईल असं पुस्तक जन्माला येत. मुळात राजीव जोशी प्रतिभासंपन्न कवी आणि रसास्वादी गृहस्थ. प्रतिभेचा संवदेनशील स्पर्श असणाऱ्या व्यक्तीने 'कापूस' या विषयावरचं एका वेगळया वाटेवर जाणारं अर्थशास्त्रीय संदर्भात पुस्तक लिहिणं हेच कौतुकास्पद आहे. या पुस्तकात आकडेवारीचे तक्ते आहेत, पेरणीपासून कापड उद्योगापर्यंतच्या प्रवासाची कहाणी सांगणारी रंगीत छायाचित्रं आहेत, सामाजिक, आर्थिक, राजकीय, पौराणिक अशा विविध अंगांनी विवेचन करणारं हे पुस्तक प्रत्येक विद्यापीठासाठी संग्राहय असं संदर्भ पुस्तक आहे.

 

पुस्तक ः कापूस - सरकीपासून सुतापर्यंत...

लेखक - राजीव जोशी

प्रकाशक - राजहंस प्रकाशन, पुणे.

पृष्ठसंख्या - 168 - मूल्य 250 रुपये.