घराणेशाहीला घरघर

विवेक मराठी    13-May-2019
Total Views |

*** देविदास देशपांडे***

 यंदाची निवडणूक आगळीवेगळी राहिली असून राजकीय घराणेशाही संपुष्टात आणण्याचा निर्धार लोकांमध्ये दिसून आला आहे. लोकशाहीप्रधान देशात घराणेशाही चांगली नाही. लोकशाही आणि घराणेशाही कधीच एकत्र नांदू शकत नाही, हे हळूहळू का होईना, लोकांना जाणवू लागले आहे. आपण विशिष्ट घराण्यात जन्मल्यामुळे आपल्याला साहजिकच राजकीय वारसा मिळायला हवा, ही मानसिकता रुजूनही अनेक वर्षे झाली. त्या मानसिकतेला आलेली दुष्फळे आज आपल्याला यादवीच्या आणि सुंदोपसुंदीच्या रूपाने पाहायला मिळत आहे.

सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीचे जवळपास सगळे मतदान पार पडले आहे. या निवडणुकीत कोणतीही लाट नाही आणि कोणताही महत्त्वाचा मुद्दा नाही, असे अनेक निरीक्षकांनी म्हटले आहे. लाट नाही आणि मुद्दा नाही, या वाक्यांचा प्रत्यक्षातला अर्थ 'सरकारविरोधात फारशी नाराजी नाही' असा होतो. मतदानाच्या बहुतेक टप्प्यांतील मतदानाची आकडेवारीही याच निष्कर्षाला पुष्टी देते. सर्वसाधारणपणे 55 ते 60 टक्क्यांच्या दरम्यान मतदान झाले आहे आणि हे प्रमाण स्थैर्याच्या बाजूने असल्याचे मानले जाते. मात्र राजकीय वातावरणात या मतदानातून एक सुप्त संदेशही दिला गेला आहे आणि त्याची दखल एकत्रितरीत्या फारशी घेतली गेली नाही, ती म्हणजे घराणेशाहीला लागलेली घरघर.

यंदाची निवडणूक आगळीवेगळी राहिली असून राजकीय घराणेशाही संपुष्टात आणण्याचा निर्धार लोकांमध्ये दिसून आला आहे. लोकशाहीप्रधान देशात घराणेशाही चांगली नाही. लोकशाही आणि घराणेशाही कधीच एकत्र नांदू शकत नाही, हे हळूहळू का होईना, लोकांना जाणवू लागले आहे. आपण विशिष्ट घराण्यात जन्मल्यामुळे आपल्याला साहजिकच राजकीय वारसा मिळायला हवा, ही मानसिकता रुजूनही अनेक वर्षे झाली. त्या मानसिकतेला आलेली दुष्फळे आज आपल्याला यादवीच्या आणि सुंदोपसुंदीच्या रूपाने पाहायला मिळत आहे.

याचे उत्तम उदाहरण म्हणजे देशातील पहिली घराणेशाही आणि ती म्हणजे काँग्रेस. राजकीय नेतृत्व हा आपला जन्मजात अधिकार असल्याचे गांधी कुटुंबाला वाटत आले आहे. म्हणूनच अमेरिकेतील बर्कले विद्यापीठातील एका कार्यक्रमात राहुल गांधी यांनी घराणेशाहीचे समर्थन केले होते. भारतात प्रत्येक राजकीय पक्षात घराणेशाही आहे, इतकेच नाही, तर बॉलीवूडमध्येही घराणेशाहीच चालते असे त्यांनी म्हटले होते. त्याचे पुढचे पाऊल म्हणजे सर्वत्र अपयश आल्यानंतर त्यांनी आपल्या बहिणीला पक्षात आणले आणि थेट सरचिटणीस केले. प्रियंका गांधी यांना पूर्व उत्तर प्रदेशाची जबाबदारी देण्यात आली.

आपण ज्यांना प्रादेशिक पक्ष म्हणतो, त्यातील बहुतेक पक्ष एका-एका घराण्यावरच आधारित आहेत. अर्थात त्यांनी काँगे्रसचे केलेले अनुकरण हेच त्यांच्या घराणेशाहीला कारण होते. स्वत:चा वारसदार नेमणे ही खरी काँग्रेसची परंपरा. थेट जवाहरलाल नेहरू यांच्यापासूनच वारसादाराचे राजकारण सुरू झाले. इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी ते राहुल गांधी असा काँग्रेसमध्ये प्रवाह राहिला आहे. इंदिरा गांधींनी आधी संजय गांधी यांना आपला उत्तराधिकारी म्हणून पुढे आणले. त्यांच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांनी राजीव गांधींना ती गादी सोपविली. अन्य पक्षांच्या नेत्यांनी त्यांचीच री ओढली. बिजू पटनाईक-नवीन पटनाईक,  एन.टी. रामाराव-चंद्राबाबू नायडू, बाळासाहेब ठाकरे-उध्दव ठाकरे-आदित्य ठाकरे, शंकरराव चव्हाण-अशोक चव्हाण, करुणानिधी-स्टॅलिन, फारुक अब्दुल्ला-उमर अब्दुल्ला अशी कितीतरी उदाहरणे देता येतील.

याच घराण्यांच्या पुढील पिढीत सुंदोपसुंदी सुरू झाली आहे. यातील काही घराण्यांमध्ये तर वारशावरून भयंकर संघर्ष झाला. उदा. रामाराव आणि चंद्राबाबू नायडू. राजकीय कुटुंबांमध्ये जेव्हा सत्तेचे अनेक दावेदार असतात, तेव्हा कलह होतो आणि कुटुंब दुभंगते, हेच या सर्व उदाहरणांतून दिसून येते. त्यातून त्या त्या पक्षांना नुकसानही सोसावे लागले आहे. करुणानिधींच्या हयातीतच अळगिरी या ज्येष्ठ पुत्राने असहकार पुकारल्यामुळे द्रमुकने तमिळनाडू विधानसभा निवडणूक गमावली होती, हा ताजा इतिहास आहे.

आणि त्याला कारणीभूत ठरली आहे ती राजकारणाची बदललेली हवा. जनतेला घराणेशाही नको, तर प्रामाणिकपणा हवा आहे. त्यातूनच नव्या चेहऱ्यांना व नव्या नेतृत्वाला वाव मिळत आहे. त्रिपुरातील बिप्लब देब यांच्या यशातून हेच सूचित केले.

आपण महाराष्ट्रापासून सुरुवात केली, तर राज्यातील राजकारणात सर्वात मोठे घराणे असलेल्या पवार कुटुंबात काय झाले, ते सर्वांना माहीत आहे. आज पवार यांच्याएवढा प्रदीर्घ राजकीय अनुभव असणारे नेते अगदी हाताच्या बोटावर मोजण्याएवढे असतील. त्यांच्यानंतरचे नेते म्हणून माजी उपमुख्यमंत्री व पवारांचे पुतणे अजित पवार आणि मुलगी सुप्रिया सुळे यांच्यातील संघर्ष लपलेला नाही. पवार यांचे राजकीय वारसदार कोण? हा प्रश्न वारंवार डोके काढतो. म्हणूनच पवार यांचा वारसदार कोण असेल, हे काळच ठरवेल, असे सुप्रिया सुळे यांनी तीन वर्षांपूर्वी सांगितले होते.


कुटुंबातील याच वादामुळे शरद पवार यांना यंदा अनेक कोलांटउडया माराव्या लागल्या. त्यांनी आधी माढयातून निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले. नंतर अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ निवडणूक लढविणार नाहीत, असे पवारांनी जाहीर केले. नंतर पार्थ पवार यांच्या उमेदवारीसाठी त्यांच्यावर दबाव आला. पार्थने निवडणूक लढवावी, अशी अजित यांची इच्छा होती. त्यावरून पवार कुटुंबातील संबंध तुटेपर्यंत ताणले गेले होते. तेवढयात माढयात पराभव होण्याचा सुगावा पवार यांना लागला आणि पार्थ यांच्या उमेदवारीचे निमित्त करून त्यांनी माघार घेतली. मात्र आज परिस्थिती अशी आहे, की पवार घराणे लढवत असलेल्या दोन्ही जागा गमावण्याची चर्चा सुरू आहे आणि पवार कुटुंबाच्या राजकीय भवितव्याची चर्चा जोर धरत आहे.

कर्नाटकातील नाटक

जे महाराष्ट्रात पवारांच्या बाबतीत, तेच कर्नाटकात गौडा कुटुंबात घडले. तिथे सहकारी पक्ष काँग्रेसच्या धमकावण्यांना आणि कुरघोडयांना कंटाळलेल्या कुमारस्वामींना घरातील कलागतीने त्रस्त केले आहे. याला कारण ठरला धर्मनिरपेक्ष जनता दलाचे (जेडीएस) प्रमुख आणि माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांच्या दोन नातवांमधील संघर्ष! पक्षाचे एक आमदार जी.टी. देवेगौडा यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे या संघर्षाला वाचा फुटली होती. 'ते (देवेगौडा यांची मुले) वेगवेगळे राहतात. कुमारस्वामी आणि त्यांचे कुटुंब व एच.डी. रेवण्णा आणि त्यांचे कुटुंब वेगळे आहेत. ते एक कुटुंब म्हणून काम करत नाहीत' असे जी.टी. देवेगौडा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते.

पवार कुटुंबाप्रमाणेच एच.डी. रेवण्णा यांच्या मुलाने निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यामुळे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी आणि त्यांचे भाऊ रेवण्णा यांच्यातील अंतर वाढले आहे. रेवण्णा यांचे चिरंजीव प्रज्वल यांनी आठ वर्षांपूर्वी राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी ते नुकतेच महाविद्यालयीय शिक्षण संपवून बाहेर पडले होते. आपले आजोबा देवेगौडा यांच्यावर त्यांची भिस्त होती. मात्र थेट निवडणुकीच्या मैदानात उतरण्यापूर्वी त्यांना आपला मतदारवर्ग निर्माण करावा लागेल आणि पक्षकार्य करावे लागेल, असे त्यांना सांगण्यात आले.

तेव्हा प्रज्वल यांनी हसन जिल्ह्यातील होळनरसिपुरा या मतदारसंघाला आपले केंद्र बनविले आणि पक्षाचे कार्य करण्यास सुरुवात केली. पक्षाच्या सक्रिय कार्यकर्त्यांची युवक शाखा त्यांनी तयार केली. त्यामुळे योग्य वेळ येताच आपल्याला उमेदवारी देण्यात येईल, याबद्दल त्यांना भरवसा होता. मात्र 2018 विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी न देता पक्षाचे सरचिटणीस करण्यात आले. अखेर 2019च्या लोकसभा निवडणुकीत आपला हसन मतदारसंघ प्रज्वल यांच्यासाठी रिकामा करू, असे देवेगौडा यांनी जाहीर केले. त्या वेळी असे ठरविण्यात आले होते, की देवेगौडा हे हसनऐवजी मंडया येथून निवडणूक लढवतील आणि हसनची जागा प्रज्वल यांना मिळेल. या संबंधात देवेगौडा यांनी या वर्षी जानेवारीत औपचारिक घोषणा केली होती.

या घोषणेला काही आठवडे उलटल्यांतर कुमारस्वामींचे चिरंजीव निखिल गौडा यांचा एक चित्रपट 'सीताराम कल्याण' आला. यातून शेतकऱ्यांचा रक्षणकर्ता म्हणून निखिल यांची प्रतिमा पुढे आणण्यात आली. मंडया येथील लोकांना हा चित्रपट पाहण्यासाठी मोफत तिकिटे वाटण्यात आली. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये निखिल गौडा यांनी मंडयातील पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधला. लोकसभा निवडणुका लढविण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मोठा दबाव असल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले होते.

मार्च महिन्यात निखिल यांनी मंडया मतदारसंघातून काँग्रेस-जेडीएस युतीचा उमेदवार म्हणून निवडणूक लढविणार असल्याचे औपचारिकपणे जाहीर केले. एच.डी. रेवण्णा आणि प्रज्वल यांना हे अजिबात खपले नाही, कारण प्रज्वल यांना उमेदवारी मिळण्यासाठी आठ वर्षे काम करावे लागले होते आणि दुसरीकडे, राजकारणात कोणताही अनुभव नसलेल्या निखिल यांना थेट तिकीट देण्यात येणार होते. अखेर निखिल यांच्यासाठी मंडयाची जागा सोडावी लागलेल्या देवेगौडा यांना तुमकूर येथून निवडणूक लढवावी लागली आणि प्रज्वल याला हासनची उमेदवारी देण्यात आली. मात्र गौडा परिवारातील कोणत्याही उमेदवाराच्या प्रचारात काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाग घेतला नाही आणि लोकांकडूनही त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे या तिन्ही जागांच्या निकालाबाबत आता शंका आहेत.


यादवी बिहारमधील आणि उत्तर प्रदेशातील

बिहारमध्येही असेच एक नाटय उलगडत होते. हे नाटय बिहारच्या राजकारणात गेल्या तीन दशकांपासून दबदबा राखून असलेल्या लालूप्रसाद यादव यांच्या घरात रंगले. त्याचे अंक अजूनही चालू आहेत. लालूप्रसादांना सात मुली आणि दोन मुले मिळून नऊ  मुले. बिहारसहित उत्तर भारतातील बहुतेक राज्यांमध्ये पुरुषप्रधान मानसिकता पाहायला मिळते. पुरोगामी आणि धर्मनिरपेक्ष राजकारणाचे खंदे समर्थक मानले जाणारे लालूप्रसादही त्या मानसिकतेला अपवाद नाहीत. त्यांच्या सात मुलींपैकी केवळ एक - थोरली मुलगी मिसा भारती राजकारणात आहेत आणि खासदार आहेत. अन्य मुलींची लग्ने झाली असून त्या आपापल्या संसारात सुखी आहेत. त्यामुळे तेजप्रताप यादव आणि तेजस्वी यादव या त्यांच्या दोन मुलांवर त्यांचा राजकीय वारसा सांभाळण्याची जबाबदारी आली आहे. लालूप्रसादांच्या घरात जी यादवी माजली आहे, ती या दोन भावांमध्येच.

तेजप्रताप आणि तेजस्वी या दोघांमध्ये दीर्घकाळापासून सुरू असलेल्या संघर्षाचा भडका उडाला असून दोन्ही भाऊ एकमेकांविरोधात उभे आहेत. तेजप्रताप हे थोरले, तर तेजस्वी हे धाकटे. शिवाय तेजप्रताप हे अधिक शिकलेले, तर तेजस्वी यांचे शिक्षण केवळ नववीपर्यंत झालेले. तेजस्वी यांना क्रिकेटपटू व्हायचे होते, म्हणून त्यांनी शिक्षण अर्धवट सोडले. मात्र तेजस्वी हे अधिक हुशार आहेत, असे म्हणतात. त्यामुळे लालूंनी त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न केला. यामुळे तेजप्रतापांचा अहं दुखावला. दोन वर्षांपूर्वी 27 ऑॅगस्ट रोजी पाटण्यातील गांधी मैदान येथे झालेल्या सभेत तेजस्वी यांनी आपण कृष्ण असून मोठे भाऊ तेजप्रताप यांचे सारथी बनण्याची घोषणा केली होती. मात्र नंतर तेजस्वी यांनी संघटनात्मक निर्णय घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे तेजप्रताप हे त्यांच्यावर नाराज आहेत, असे सांगण्यात येते

लोकसभा निवडणुकीत तेजस्वी यांनी तिकीट वाटपाची सूत्रे आपल्या हाती ठेवली. त्यामुळे तेजप्रताप संतप्त होणे स्वाभाविक होते. काही दिवसांआधी त्यांनी राष्ट्रीय जनता दलापासून वेगळे होण्याची भाषा केली होती. त्या वेळी लालूप्रसादांनी व राबडीदेवी यांनी त्यांची समजूत घातली. त्यामुळे तेजप्रताप यांनी काही काळ माघार घेतली. मात्र आता पुन्हा त्यांनी डोके वर काढले आहे. राजदपासून वेगळे होऊन त्यांनी लालू-राबडी मोर्चा नावाची आघाडी उघडली. इतकेच नव्हे, तर बिहारमधील सर्व 40 जागांवर आपले उमेदवार उभे करण्याची घोषणा केली. मात्र या वेळी लालूंनी त्यांना धमकी देऊन गप्प केले. अखेर आपले उमेदवार उभे न करण्याचे तेजप्रताप यांनी मान्य केले.

लालूप्रसाद हे सध्या राजेंद्र इन्स्टिटयूट्स ऑॅफ मेडिकल सायन्सेस (रिम्स) येथे उपचार घेत आहेत. त्यांना चारा गैरव्यवहारप्रकरणी शिक्षा झाली आहे. आपल्या दोन मुलांमध्ये बेबनाव झाल्यामुळे ते त्रस्त आहेत.

बिहारमधील राजकीय पंडितांच्या मते, तेजस्वी हे आक्रमक असल्यामुळे लालूप्रसाद यांनी राजकीय वारस म्हणून त्यांची निवड केली. त्या तुलनेत तेजप्रताप हे मवाळ आहेत. पाटण्यात त्यांचे स्वत:चे मोटरबाइकचे शोरूम आहे. कृष्णाचे भक्त अशी त्यांची प्रतिमा आहे. त्यांना महागडया कारची हौस आहे आणि त्यांना राजकारणात रस नव्हता, बिहार विधानसभा निवडणुकीच्या काही दिवस आधीपर्यंत ते राजदच्या बैठकीतही भागही घेत नसत. मात्र लालूप्रसाद आणि राबडीदेवीं दोघांच्या आग्रहावरून ते राजकारणात आले.

बिहारमध्ये सध्या संयुक्त जनता दलाचे सरकार असून मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी विधानसभा निवडणूक राजदबरोबर लढली होती. नितीशकुमार यांच्या मंत्रीमंडळात तेजप्रताप हे आरोग्यमंत्री होते, तर तेजस्वी यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले होते. मात्र लालू आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या हस्तक्षेपाला वैतागून त्यांनी भाजपाशी घरोबा केला. आता लालूप्रसादांच्या कुटुंबातील या कलहामुळे एका राजकीय प्रतिसर््पध्याचा आपोआप बंदोबस्त होणे हे त्यांच्या पथ्यावर पडणारे आहे.

पवार कुटुंबासारखा तुंबळ संघर्षाला सामोरे जाणारा आणखी एक नेता म्हणजे समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंह यादव. उत्तर प्रदेशात सपमध्ये यादवीचा पहिला भाग विधानसभा निवडणुकीच्या वेळेस पाहायला मिळायला होता. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात यादवीचा दुसरा भाग पाहायला मिळत आहे. पूर्वीच्या भागात वडील आणि मुलगा यांचा संघर्ष दिसला होता, तर आता भाऊबंदकीचे प्रयोग दिसताहेत एवढाच काय तो फरक.

मुलायम यांच्या हातून त्यांचे चिरंजीव अखिलेश यांनी पाहता पाहता पक्षाची सूत्रे हिसकावून घेतली होती. पक्षामध्ये अमरसिंह यांची ढवळाढवळ होत असल्याचे कारण देऊन अखिलेश यांनी 2016मध्ये बंड केले होते. अखिलेश आणि शिवपाल यांच्यातील त्या वादातून पक्षाचे दोन तुकडे झाले. या दोन्ही तुकडयांनी मुलायमसिंह हेच आमचे नेते आहेत, असे जाहीर केले ही वेगळीच गंमत! अखिलेश यांनी स्वत:ला पक्षाध्यक्ष म्हणून राज्याभिषेकही करवून घेतला.

असे असले, तरी ते पक्षप्रमुख होताच पक्षातील (म्हणजेच यादव कुटुंबातील) भाऊबंदकी उफाळून वर आली होती. मुलायमसिंह यादव यांचे बंधू शिवपाल यादव यांनी स्वत:चा वेगळा पक्ष काढला, तर त्यांचे आणखी एक बंधू रामगोपाल यांनी अखिलेशची साथ द्यायचे ठरविले. शिवपाल यांनी प्रगतिशील समाजवादी पक्ष काढून सपाला नेस्तनाबूत करण्याचा विडाच उचलला होता. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी तो निश्चय पूर्ण करण्याचा प्रयत्न नव्याने सुरू केला. मुलायमसिंह यांचा मैनपुरी हा मतदारसंघ वगळता सर्वत्र आपले उमेदवार उभे करण्याची घोषणा त्यांनी केली. इतकेच नव्हे, तर फिरोझाबादमध्ये रामगोपाल यांचे चिरंजीव अक्षय यांच्या विरोधात स्वत: मैदानात उतरण्याची घोषणा केली. अखिलेश यांची पत्नी डिंपल यादव यांच्या कन्नोज आणि पुतण्या धर्मेंद्र यादव यांच्या बदायूं मतदारसंघातूनही शिवपाल यांनी उमेदवार उभे केले.

दुसरीकडे मुलायमसिंह यादव यांची दुसरी सून अपर्णा यादव यांनाही उमेदवारी हवी होती. ती त्यांना मिळाली नाही, त्यामुळे त्याही नाराज आहेत. अपर्णा यादव अखिलेशचा सावत्र भाऊ प्रतीक यादवच्या पत्नी आहेत. त्यांनी 2017ची विधानसभा निवडणूक लखनऊ कँट मतदारसंघातून लढविली होती. मुलायमसिंह, अखिलेश आणि त्यांची पत्नी डिंपल यादव या सर्वांनी अपर्णा यांच्या निवडणूक प्रचारात भाग घेतला होता. तरीही त्यांचा पराभव झाला होता.

समाजवादी पक्षातील अंतर्गत वादाचे प्रमाण एवढे मोठे आहे, की मैनपुरीतून मुलायमसिंहांची उमेदवारी जाहीर झाल्यावर तेथील पक्षाची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करावी लागली, कारण तेथील कार्यकर्ते तेजप्रताप यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर आले होते. रामगोपाल यादव यांचा पुतळा जाळण्यापर्यंत त्यांची मजल गेली.

उत्तर प्रदेशात यादव कुटुंबाचा उल्लेख राज्याच्या राजकारणातील पहिले कुटुंब असा केला जातो. गेल्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या लाटेत बहुजन समाज पक्षाचा एकही उमेदवार निवडून आला नाही, काँग्रेसचे केवळ सोनिया गांधी आणि राहुल गांधी निवडून आले, तर सपाचे पाच खासदार निवडून आले. ते पाचही जण यादव कुटुंबातीलच होते. आता अस्तित्व टिकविण्यासाठी या पक्षाने बसपशी युती केली आहे आणि तरीही पक्षाला यशाची खात्री नाही.


चौटाला कुटुंबाचा कलह

उत्तर प्रदेशाला लागून असलेल्या हरियाणातही भाऊबंदकीचा हा अध्याय सुरू आहे. तेथे भारतीय लोकदल पक्षाच्या (आयएनएलडीच्या) चौटाला कुटुंबात भांडण लागले असून तेथे तर पक्षाचे नेते असलेल्या आजोबांना आपल्या नातवाचीच हकालपट्टी करण्याची वेळ आली.

ओमप्रकाश चौटाला हे आयएनएलडी पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी आपले नातू व हिस्सार मतदारसंघाचे खासदार दुष्यंतसिंग यांना पक्षातून काढून टाकले. त्यांच्याबरोबर दिग्विजयसिंग यांचेही पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व काढून घेण्यात आहे. दुष्यंत यांना आयएनएलडीच्या संसदीय मंडळाच्या नेतेपदावरूनही काढून टाकण्यात आले.

''दुष्यंत आणि दिग्विजय हे दोघेही आपल्या कुटुंबाचा भाग आहेत. त्यामुळे हा निर्णय घेणे सोपे नव्हते. मात्र आपण नेहमीच देवीलाल यांच्या मूल्यांचे पालन केले असून त्यांच्यासाठी कुटुंबापेक्षा पक्ष मोठा होता'' असे चौटाला यांनी त्या वेळी म्हटले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून दुष्यंत चौटाला यांनी जननायक जनता पक्ष (जेजेपी) काढला. या घराण्यातील वितुष्ट एवढे, की कप-बशी हे आमचे चिन्ह असल्यामुळे आयएनएलडीने आपल्या कार्यकर्त्यांना कप-बशीतून चहा पिऊ दिला नाही, असा आरोप दुष्यंतसिंह यांनी केला होता.

जम्मू-काश्मीरपासून तमिळनाडूपर्यंत बहुतांश राज्यांमध्ये हीच परिस्थिती आहे. अब्दुल्ला कुटुंब, भजनलाल व बन्सीलाल परिवार, ओडिशातील पटनाईक कुटुंब, आंध्र प्रदेशातील नायडू परिवार, तामिळनाडूतील करुणानिधीचे वंशज अशी सगळी मंडळी केवळ आपल्या जन्मजात वारशाच्या आधारावर लोकांकडे मतांची याचना करत आहेत. हेच लोक लोकशाही वाचविण्याची आणि राज्यघटना वाचविण्याची भाषा बोलत आहेत, ही तर आणखी गंमतच. याच घराण्यांमध्ये अंतर्गत वादांनीही उसळी घेतली असून त्यातूनच त्यांचा पाडाव होणार आहे. चंद्राबाबू आणि शरद पवार यांच्यासारख्यांना या पराभवाची चाहूल लागली आहे, म्हणूनच की काय, त्यांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर खापर फोडण्यास सुरुवातही केली आहे.

ही त्यांची कोल्हेकुई म्हणता येईल, पण एक प्रकारे घराणेशाहीला घरघर लागल्याचेच हे सुचिन्ह आहे!

- देविदास देशपांडे

8796752107