फिरुनी जायचे तिथे?

विवेक मराठी    13-May-2019
Total Views |

जगण्याच्या वाटा वयानुसार वळतात, वय बदलले तरी मन, शरीर, भावना, बुध्दी या चिरतरुणच असतात. आयुष्याच्या उत्तरार्धात आपल्या अनुभवाच्या आठवणी ह्या सोबत करत असतात. तारूण्याची आठवण करून देत असतात. आपल्या अस्तित्वाची, खऱ्या अस्तित्वाची जाणीव करून घ्यायची हीच ती वेळ.

माझ्यासारखा प्रत्येकाचाच अनुभव असेल. विशेषत: घराबाहेर पडणाऱ्यांचा! कित्येक वर्षं घराबाहेर राहून काही करणाऱ्यांचा! हा अनुभव तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, कारण मी त्यातून शिकले. एकदा बाहेर पडायचं ठरलं की मग तळयात-मळयात नाही. कारण अधिकाराने बाहेर पडलेले आपण पुन्हा नव्याने अधिकारावर आलेल्यावर दडपणही आणतो. तुलना करू लागतो. इतरांना सांगू लागतो, ''मी चाललो. आता कळेल तुम्हाला किंमत.'' यामुळे नवा मग दोन अधिकारात तुलना करू लागतो. असं करण्यापेक्षा नव्यांना घेऊ दे ना त्यांच्या पध्दतीने निर्णय! तुम्ही तिथे असताना वेगळं चित्र असेल, नसताना वेगळं! जर तुम्ही इतकी वर्षं व्यक्तिसापेक्षता जपली असेल, तर तुम्ही गेल्यावर तुम्ही जिथे 25-30 वर्षं होतात, त्याचं स्वरूप बदलेल. तुम्ही जर कामावर जास्त निष्ठा असली पाहिजे, असा विचार दिला तर तुम्ही बाहेर पडलात तरी नव्या गोष्टी नव्या पध्दतीने होतील, पण सगळं उस्कटलेलं असणार नाही. जरी सगळं उस्कटलेलं असलं तरी फिरून जायचं तिथे? कसे जाणार? तुमच्या वयाने तुम्हाला बाहेर पडायचंच असं सांगितलंय.

हा अनुभव मी कसा घेतला? प्रत्येकानेच आठवू या. कधी एकदा बाहेर पडतेय असं वाटून निवृत्त झाला असाल, तर समजायचं - तुमचं काम तुम्ही रेटलं, मनापासून नाही केलं, करू दिलं, कंटाळून गेला होतात. बापरे! काय करायचं बाहेर पडल्यावर? असा विचार केला नसेल, तर मग आठवणी येतील नि रिकामपणही. पण आता बाहेर पडायला काही वर्षं राहिलीत तर घेऊ दे निर्णय दुसऱ्याला. नंतर येणाऱ्याला, मी लागलाच तर फक्त अनुभवाचा शब्द देईन. असं होतं का? मला आठवतंय, माझा जेव्हा असा माझ्या नोकरीच्या ठिकाणचा शेवटचा दिवस होता, तेव्हा सहज तशीच वर्गावर गेले. तास घेतले. कुणीतरी म्हणालं, ''आज इतकी वर्षं सही करत आलेल्या मस्टरवर शेवटची सही! हो ना! मला माहितेय. कधीतरी शेवटची सही करावीच लागणार ना!'' मी मनालाही व इतरांनाही बजावलं. खुर्चीतून उठताना फार जड गेलं नाही. तरी वाईट वाटलंच. ज्याचा आधार मला 30-32 वर्षं होता, जिथे मी इतके वर्षं रोज येत होते, ते एकदम देऊन टाकण्याची सवय आधीच केली होती.छान बाहेर पडले. हे काही साधुसंतपण नाही. पण मनाला बजावलं, समजावलं नि त्यामुळे सोपं गेलं.

घरचा दुसरा दिवस. शाळेची घंटा झाली. एकदम पायांना लगबग झाली. पहिला तास नाही आज! असंही मनात आलं. मग शांत झाले. वाटलं, 'मुलांना आठवण येत असेल? की मला मुलांची आठवण येतेय?' खरं तर असं होतं. आलेल्या समस्यांत, अपयशाच्या वेळी, खचून गेले तेव्हा मुलांनीच आधार दिला होता. लक्षात आलं, अशी वेळ येईल तेव्हा कुणाचा आधार हे मला शोधायचंय. आता इतका वेळ बोलायचं नाही, सवय कशी जाणार एकदम! तीही केली होती. तरी कुणी आलं की तोंड बडबडायला लागलं. 'फुकटचे सल्ले', 'आदर्शवाद' सगळं बाहेर येऊ लागलं. तेव्हाच स्वत:ला पुन्हा थोपटलं नि मग हळूहळू सवय झाली की, नव्या गोष्टी करण्यात स्वत:ला बांधून घेतलं. त्या विश्वातून बाहेर पडण्याचं तसं कळलं होतंच लोकांना! कोणीतरी पेन्शनर असोसिएशनचा फॉर्म घेऊन आलं. ''आता नाव नोंदवा लगेच. येत जा. करतो आम्ही काहीबाही..'' मी मनात हसले. म्हणाले, ''जगण्याच्या वाटा वयानुसार कशा वळतात, नाही!'' चला, काही हरकत नाही. आता नवं मित्रमंडळ होणार म्हणून सोपस्कार केले. 'फिरत इथे यायचं' ठरवलं. आयुष्याचा उत्तरार्ध ना!

घरातही नव्या चवीचे पदार्थ खायची सवय ठेवली. 'कसं करायचं सांग बाई' असं बोलायची सवय केली. 'काय करू या! कार्यक्रम कसा करायचा तुझ्या मनात आहे!' असं सहज विचारू लागले. छान वाटू लागले. वाक्यच बदलली सगळी. वय बदललं, पण छान वाटलं. पांढऱ्या केसांकडे फारसं लक्षही गेलं नाही. 'आजी' झाल्यावर मस्त वाटलंय. आयुष्याचा राउंड घ्यायला फारसा वेळ लागला नाही.

विचार करू लागले. पूर्वी मी क्वचित माझ्याबरोबर असायचे. जाणवतंय, वय झालं हे छानच झालं. स्वत:बरोबर राहायला मला खूप वेळ मिळतोय. केवढा स्पॅन आहे आयुष्याचा! आपण वर्षं (जगलेली) गुणिले दिवस कधी करतच नाही. अठ्ठावन वर्षं मानली, तर 21170 दिवस मी जगले. काय काय ठळक घडलं जगण्यात? असं आपलं प्रत्येकाचंच जगणं. आधी चालायला शिकावं लागतं. मग वेगाने आपण धावू लागतो. पुन्हा गाडी सावकाश होते. आपल्या अस्तित्वाची, खऱ्या अस्तित्वाची जाणीव करून घ्यायची हीच वेळ. काय आवश्यक आहे नि काय नाही, गरजा किती नि जमवलं किती, आपल्यात आणखी किती एनर्जी आहे (मन, शरीर, भावना, बुध्दी यांची)? आपण योग्य वापर करू या.

वाटू लागलं, वृध्दत्व आधी मनात नि मग शरीरावर ते दिसू लागतं. 'मला नाही होत आता' असं घोकलं की बसून राहावं लागतं. 'जमेल तेवढं करणारच' म्हटलं की उठून करायची प्रेरणा मिळते. आपल्या ठिकगणी काय चांगलं आहे हे पुढच्या पिढीने ओळखलेलं आहे, त्याची त्यांना गरज आहे. 'तुम्ही असलात जरी नुसतं, तरी मला मोकळं वाटतं' अशा शब्दांतून ते व्यक्त होतं. घरातले रितीरिवाज (परंपरेने चालत आलेले), परंपरा याकडे आपण या वयात कसे बघतो? सुरू ठेवणं वा बंद करणं याविषयी आपली मतं आपण पुढच्या पिढीवर लादतो का? आपल्या आग्रही-दुराग्रहीपणाचाही कुटुंब विचार करतं. आधीची पिढीही कधी कधी करते. मग आपणही पुढच्या पिढीला ते दिलं पाहिजे. एखादी नव्वदीतली स्त्रीही खूप सुधारक विचार करते. माझ्या गाठीला तो अनुभव असेल, तर मलाही आग्रही राहून चालणार नाही. माझ्या आधीच्या पिढीतील अशा स्त्रीने जर कालसुसंगत विचार करून 65-70 वर्षांची दरी भरून काढली असेल तर लक्षात ठेवावं की, विचाराने तरुण असणं जगण्याला तारुण्य देतं. उदाहरण द्यायचा मोह होतोय. मी तरुण असताना नव्या घरात आल्यावर नव्वदीतल्या माझ्या आजेसासूबाई मला म्हणाल्या, ''हे बघ, तू नोकरीची आहेस हो! दर वेळी रजा काढणं तुला जमणार नाही. ते योग्यही नाही. जे बंद पडलंय ते पुन्हा सुरू करू नकोस. तुझ्या ठिकाणी राहून वेळेचा विचार करून जे करता येईल ते कर. इथे येऊन करावं लागेल असं काही करावं वाटत नाही. शेवटी सगळे सोपस्कार हो!'' मला नवल वाटलं. या वयातही त्या किती सुधारक होत्या. सगळयाचा सारासार विचार निदान या वयात तरी करता यावा.

पूर्वी जे करता आलं नाही, याची खंत या वयाला टोचते. देवदेव, पूर्जा-अर्चा करण्याची जबाबदारी नकळत आपल्यावर येते. तीर्थयात्रा, जपजाप्य सुरू होतं. वेळ चांगला जाईल असं वाटत असतं. सवय नसल्यानं सगळया गोष्टी औपचारिक घडतात. कदाचित मनाला रिझवण्याचा हा नवा मार्ग. तो कसा चालायचा हे आपण ठरवायचं.

रेणू दांडेकर

8828786875