घटनात्मक मूल्ये कशी रुजतील?

विवेक मराठी    14-May-2019
Total Views |

 

  घटनात्मक जीवनमूल्यांसंबंधी सखोल चिंतन करणाऱ्या या लेखमालेचा हा शेवटचा भाग. समाजात घटनात्मक मूल्यभाव रूजण्यासाठी लोकांचा नैतिक स्तर वाढविणे, त्यांची विचार करण्याची व प्रश्न समजावून घेण्याची क्षमता वाढविणे, स्वहितापेक्षा समाजहिताचा विचार करायला लोकांना प्रवृत्त करणे याकरिता विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे.

भारताने राज्यघटनेचा स्वीकार करून सत्तर वर्षे व्हायला आली असली व तीन पिढया घटना राबविली जात असली, तरी आपल्या समाजात घटनात्मक मूल्ये रुजली आहेत असे म्हणता येणार नाही. समाजातील व्यक्तींना किंवा समाजघटकांना त्यांच्या फायद्याच्या वेळी घटनेची आठवण येते व त्यातील कर्तव्यभाव विसरला जातो. जोवर समाजात घटनेतील कर्तव्यभाव रुजणार नाही, तोवर समाजात घटनात्मक मूल्ये रुजली असे म्हणता येणार नाही. त्यामुळे समाजात हा घटनात्मक मूल्यभाव कसा रुजेल याचा विचार करावा लागेल. त्यासाठी लोकांचा नैतिक स्तर वाढविणे, त्यांची विचार करण्याची व प्रश्न समजावून घेण्याची क्षमता वाढविणे व स्वहितापेक्षा समाजहिताचा विचार करायला लोकांना प्रवृत्त करणे याकरिता विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. अनेक धार्मिक व आध्यात्मिक संत, गुरू किंवा ग्रंथ यांचा स्वयंप्रेरणेने प्रचार करणारे कार्यकर्ते असतात. परंतु घटनात्मक मूल्ये रुजविण्यासाठी अशी स्वयंस्फूर्त व्यासपीठे पुरेशा प्रमाणात कार्यरत झालेली नाहीत. ती निर्माण होण्याची गरज आहे. याचे कारण पारंपरिक धार्मिक प्रचार करणाऱ्या संस्था व्यक्तिगत नैतिकतेला व नीतिनियमांना महत्त्व देतात, तर घटनात्मक मूल्ये ही सार्वजनिक नीतिमत्तेला महत्त्व देतात. याचा अर्थ व्यक्तिगत नीतिमत्ता महत्त्वाची नसते असा नाही. पण या दोन्ही नीतिमत्ता एकमेकाशी सुसंगत असतात, तेव्हा त्या एकमेकांना पूरक ठरतात; पण त्या जेव्हा परस्पर विसंगत बनतात, त्या वेळी घटनात्मक मूल्यांनाच प्राथमिकता देणे भाग असते. त्यामुळे श्रुती, स्मृती, शरियत, बायबल किंवा अन्य कोणताही धर्मग्रंथ असो, त्यातील नियम, रूढी, परंपरा या घटनात्मक मूल्यांच्या विरोधी बनतात त्या वेळी त्यात बदल करण्यासाठी कायदे करावे लागतात.

ज्याप्रमाणे धार्मिक परंपरा किंवा नियम हे अपरिवर्तनीय आहेत अशी त्यांच्या भक्तांची श्रध्दा असते, तशी ती घटनेला अनुसरून केलेल्या कायद्याबद्दल नसते. *प्रादेशिक अखंडता व राष्ट्रीय एकात्मतेच्या चौकटीत व्यक्तीचे स्वातंत्र्य, शोषणमुक्त व समतायुक्त समाज निर्माण करणे हे घटनेचे उद्दिष्ट आहे. काळानुसार या सर्व कल्पना प्रगत होत जातात. कोणतीही पिढी आपल्या पुढच्या पिढयांना आपल्या कल्पनात बांधून ठेवू शकत नाही. त्यामुळे काळानुसार त्यात बदल झाला पाहिजे असे म्हणण्याचा सर्वांना अधिकार आहे. परंतु तो अधिकार वापरण्याची काही पथ्ये आहेत. ही पथ्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीच नमूद केली आहेत.*

आपल्या सामाजिक व आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी रक्तरंजित मार्ग न वापरता किंवा कायदेभंगासारखे अराजकाकडे नेणारे मार्ग न वापरता सांविधानिक मार्गाचीच कास धरली पाहिजे आणि माणूस कितीही मोठा असला तरी व्यक्तिपूजक होऊ नये, त्या व्यक्तीविषयी कृतज्ञता व्यक्त करावी, पण त्यासाठी देशहिताचा बळी देऊ नये आणि आपले स्वातंत्र्य त्याच्या चरणी अर्पू नये, असे त्यांनी आवर्जून सांगितले. त्यामुळे देशात जो बदल घडवायचा असेल, तर त्यासाठी लोकजागृती करून सांविधानिक मार्गाने घडविता येईल, असे आश्वासक वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. संविधानावरची श्रध्दा म्हणजे एखाद्या विशिष्ट पुस्तकावरची श्रध्दा नसून त्यात अभिप्रेत असलेल्या मूल्यांवरची श्रध्दा व सांविधानिक मार्गानेच बदलत्या परिस्थितीनुसार त्यातील तरतुदींमध्ये बदल घडविण्याचा सामाजिक विश्वास कायम ठेवण्याची श्रध्दा.

आजची घटनात्मक राज्यव्यवस्था आपल्या परंपरेला अपरिचित असली, तरी ज्या आत्मतत्त्वावर लोकशाहीची संस्कृती उभी आहे, ते आत्मतत्त्व आपल्या समाजाच्या हाडीमाशी रुजलेले आहे. ते तत्त्व म्हणजे सर्व प्रकारच्या बाजू ऐकून त्यातून मध्यममार्ग काढण्याचे सहमतीचे तत्त्व. प्राचीन काळात भारतात अनेक गणराज्ये होती व ती या सहमतीच्या तत्त्वाच्या आधारेच चालत होती. गावागावात असलेली जात पंचायत हेही सहमतीने निर्णय घेण्याचे उत्तम उदाहरण होते. याच्या जोडीला एखादा विचार परकीय आहे म्हणून टाकून न देता त्यातील उपयोगी भाग कोणता आहे व आपल्या परिस्थितीला तो अनुकूल करून कसा घेता येईल, हाही आपल्या समाजाचा स्वभाव आहे. आपण जेव्हा जेव्हा हा स्वभाव सोडला, तेव्हा आपले अध:पतन झाले. आपल्या सुदैवाने भारतीय राज्यघटनेने तो स्वभाव पुनरुज्जीवित केला आहे. तोच आधार घेऊन पुढे जावे लागणार आहे. त्यासाठी प्रादेशिक अखंडता व राष्ट्रीय एकात्मता यांचे रक्षण, सामाजिक सुधारणा व समाजातील न्यायभावना व व्यवस्थात्मक संतुलन कायम ठेवण्यासाठी आवश्यक ते निरोगी संस्थाजीवन उभे करणे या त्रिसूत्रीच्या आधारे जनजागृती करणे गरजेचे आहे.

*लोकशाहीमधे घटनात्मक आधारावर लोकांचे एक समूहमन तयार होत असते. ते समूहमन अधिकाधिक प्रगल्भ होण्याची गरज आहे. मध्ययुगीन काळात भक्ती संप्रदायाने असे समूहमन घडविले होते. याच समूहमनाचा उपयोग करून भारतात लोकशाही मूल्ये रुजविता येतील, असा विचार न्या. रानडे यांनी मांडला होता. 'स्पिरच्युलाइज, इक्वलाइज, ह्युमनाइज' अशा शब्दात त्यांनी नव्या परिवर्तनाची त्रिसूत्री मांडली होती.* यापैकी घटनेत नमूद केलेल्या स्वरूपातील 'इक्वलाइज व ह्युमनाइज' ही तत्त्वे युरोपीय विचारमंथनातून आलेली आहेत. पण ही दोन्ही तत्त्वे टिकायची असतील, तर त्यासाठी या दोन तत्त्वांच्या प्रकाशात समाजाचे अध्यात्मीकरण करण्याची आवश्यकता आहे व हा विशुध्द भारतीय दृष्टीकोन आहे. या तिन्हींची सांगड म्हणजे घटनात्मक जीवनमूल्ये भारतीय जनमानसात रुजविण्याची चळवळ.

kdilip54@gmail.com