कांगचेनजुंगावर महाराष्ट्राची विजयपताका

विवेक मराठी    16-May-2019
Total Views |

 

कांगचेनजुंगा शिखर सर करून पुण्याच्या गिरीप्रेमी संस्थेने महाराष्ट्राच्या गिर्यारोहण क्षेत्रात एक नवा अध्याय घडवला आहे. कांगचेनजुंगा शिखर भले एव्हरेस्टपेक्षा उंचीने कमी असेल, पण चढाईसाठी कठीणच समजलं जातं. या वर्षी, शिखराकडे जाणारा रूट खुला करण्याची जबाबदारी गिरीप्रेमीच्या चमूने स्वीकारली आणि 15 मे 2019 रोजी, पहाटे साडेपाच ते सहाच्या दरम्यान सर्व दहा सदस्यांनी हे शिखर सर केलं.

वर्षभर ‘मोहीम महाराष्ट्राची’ असा हॅशटॅग सोशल मीडियावर मिरवणारी, गिरीप्रेमी संस्थेची माउंट कांगचेनजुंगा मोहीम 15 मे 2019 रोजी सफल झाली. भारतीय वेळेनुसार सकाळी सहा वाजता, सर्व दहा सदस्यांनी कांगचेनजुंगा शिखर सर केलं आणि सह्याद्रीची दगडी छाती पुन्हा एकदा अभिमानाने भरून आली. सर्वात मोठी नागरी मोहीम असं ज्या मोहिमेचं वर्णन केलं गेलं, ते कांगचेनजुंगा शिखर सर करून पुण्याच्या गिरीप्रेमी संस्थेने महाराष्ट्राच्या गिर्यारोहण क्षेत्रात एक नवा अध्याय घडवला आहे. 2012 साली गिरीप्रेमीने हा अभूतपूर्व अध्याय लिहायला सुरुवात केली. माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च उंचीचं शिखर (8,850 मीटर्स - 29,029 फूट) संस्थेने 2012-13 साली पादाक्रांत केलं. एव्हरेस्ट शिखर हे प्रत्येक गिर्यारोहकाचं स्वप्न असतं. गिरीप्रेमींच्या टीमबरोबर हे स्वप्न उराशी बाळगतानाच, मोहिमेचे नेते उमेश झिरपे यांनी हिमालयातली आठ हजार मीटर्स  उंचीवरील शिखरं सर करण्याचा धाडसी मनोदय व्यक्त केला.

एव्हरेस्टच्या यशस्वी चढाईनंतर 2013 साली जगातील चौथ्या क्रमांकाचं 8516 मीटर्स अर्थात 27,940 फुटांचं माउंट ल्होत्से सर केलं. लागोपाठ 2014 साली जगातलं पाचव्या क्रमांकाचं 8,485 मीटर्स उंचीचं माउंट मकालू हे शिखर संस्थेच्या टीमने सर केलं. 27,838 फूट उंचीच्या शिखरावर नेलेल्या या मोहिमेतून गिरीप्रेमी संस्थेने नागरी मोहिमांचा जणू धडाका लावला. यानंतर दोनच वर्षांनी 2016 साली जगातलं सहाव्या क्रमांकाचं ‘चो ओयू’ हे 8,188 मीटर्स (26,864 फूट) उंचीचं शिखर सर करून आठ हजार मीटर्सवरील उंचीची शिखरं सर करण्याचा सातत्यपूर्ण उपक्रम सुरूच ठेवला. 2016 साली या मोहिमेनंतर लगेच, माउंट धौलगिरी या 8,167 मीटर्स (26,795 फूट) उंचीच्या जगातल्या सातव्या क्रमांकाच्या शिखराला गवसणी घालण्याचं सातत्य गिरीप्रेमींनी राखलं. 2017 साली माउंट मनालसू या 8,163 मीटर्स (26,781 फूट) उंच असलेल्या जगातल्या आठव्या क्रमांच्या उंच शिखरावर चढाई करतानाच पुढचं मोठं ध्येय नजरेसमोर ठेवलं होत. ते ध्येय होतं जगातल्या तिसर्‍या क्रमांकाच्या शिखरावर चढाई करण्याचं.

अतिशय लहरी हवामान असलेल्या, तरीही नयनरम्य आणि नैसर्गिक संपत्तीने समृद्ध असलेल्या भारताच्या सिक्कीम राज्याच्या  ‘कांगचेनजुंगा हिमाल’ या भागात पाच शिखर समूहांमध्ये विस्तारलेल्या माउंट कांगचेनजुंगा या 8,586 मीटर्स (28,169 फूट) उंचीच्या शिखरावर नागरी मोहीम न्यायची हे ध्येय नजरेसमोर ठेवून कामाला लागलेल्या गिरीप्रेमी संस्थेने या नागरी मोहिमेचं नेतृत्व अर्थातच ज्येष्ठ अनुभवी गिर्यारोहक उमेश झिरपे यांच्याकडे सोपवलं. 1955 साली पहिल्यांदा सर केलं गेलेलं भारताचं हे सर्वोच्च शिखर जगभरातल्या गिर्यारोहकांना कायम खुणावत आलंय. इथे चढाई करताना गिर्यारोहणातल्या ज्ञानाचा, अनुभवाचा आणि शारीरिक क्षमतेचा अगदी कस लागतो. आठ हजार मीटर्स पार केल्यावर होणारी दमछाक इथे पाचवीला पूजलेली असतेच, तसंच समुद्रसपाटीवरच्या लोकांचा ह्या उंचीवर लागणारा शारीरिक कस हा चढाईची गणितं बदलवणारा ठरतो. या भागात कधीही बदलणारा मौसम, पडणारा बर्फ आणि पाऊस, उठणारी हिमवादळं, घसरत जाणारं तापमान या सगळ्याला तोंड देत चढाईच्या वेळा साधणं हा अनुभवाचा भाग असतो. उमेश झिरपेंसारख्या हिमालयात मुरब्बी असलेल्या कप्तानाचा अनुभव नेमका ह्याच टप्प्यावर उपयोगी पडणं ही या मोहिमेची जमेची बाजू होती. भारत सरकारने 2000 सालापासून, सिक्कीम भागातून कांगचेनजुंगाकडे जाणारा मार्ग पर्यावरणाच्या होणार्‍या हानीमुळे बंद केल्याने, नेपाळमार्गेच या शिखराकडे जाण्याखेरीज पर्याय उपलब्ध नाही. एकतीस मार्च रोजी पुण्याहून निघालेली टीम पुढील साठ दिवसांसाठी नेपाळ काठमांडू येथे पोहोचली. सहा एप्रिलला काठमांडूत गुढीपाडव्याला गुढी उभारून चमूने मोहिमेच्या प्रवासाला सुरुवात केली.

काठमांडूहून भद्रापूरला पोहोचलेल्या टीमचा कांगचेनजुंगाच्या बेस कॅम्पसाठी प्रवास सुरू होत नाही, तर धुवांधार पावसाला  सुरुवात झाली. भद्रापूर हापूखोला असा रस्त्याचा प्रवास पूर्ण करून आलेल्या टीमने पाऊस थांबल्यावर चार दिवसांनी ट्रेकिंगला सुरुवात केली. खेमबांग हा पहिला टप्पा पार करून दहा एप्रिलला टीम याम्फूदिनला पोहोचली. कांगचेनजुंगाच्या रस्त्यावरचं शेवटचं मानवी वस्तीचं ठिकाण असलेलं याम्फूदिन गाव शेर्पाचं गाव म्हणूनही ओळखलं जात. या टप्प्यावर टीमने विश्रांती घेतलीच, तसंच या मोहिमेअंतर्गत पर्यावरण उपक्रमासाठी काही अत्यावश्यक नमुने व माहिती गोळा केली. 11 एप्रिलला याम्फूदिनहून तोरेंताँन हा दमछाक करणारा ट्रेक टीमने पार पाडला. हिमालयातल्या टेकड्या आणि त्यांच्या चढणी अतिशय दमछाक घडवणार्‍या असतात. अशा खडतर भागात, लहरी निसर्गाशी जुळवून घेत 17 एप्रिलला टीम कांगचेनजुंगाच्या पायथ्याशी - अर्थात बेस कॅम्पला पोहोचली. तुफान बर्फवृष्टी, जोरदार वारं, काही फूट बर्फातला खडतर मार्ग अनुभवलेल्या ह्या टीमला कांगचेनजुंगा दृष्टिपथात आलं होतं. या टप्प्यानंतर टीमने पुढील मोहीम आखलेल्या टप्प्यांमध्ये पार पाडण्यासाठीच्या प्रवासाला सुरुवात करून कॅम्प दोन हा 6,200 मीटर्सवरचा टप्पा गाठला. हा प्रवास अतिशय आव्हानात्मक होता. कारण सातत्याने हँगिंग ग्लेशिअर्स आणि रॉकफॉल होत असलेल्या भागातून वाटचाल करायची होती. हिमालयात अशा उंचीवर निसर्ग खडतरच असतो आणि हवामानही निव्वळ लहरी असतं. कधीही ते बदलून सभोवतीचं चित्र बदललं जातं. टीमने कॅम्प दोनहून कॅम्प तीनकडे सरकताना हाच अनुभव घेतला. जोरदार वारं आणि वातावरणाचे बदलते रागरंग पाहून ठरवलेल्या ठिकाणाच्या अवघ्या दोनशे मीटर्स अंतरावरून टीमला कॅम्प दोनकडे परत फिरावं लागलं. कुठल्याही खडतर मोहिमेअगोदर, अशा भागांमधून केलेलं वास्तव्य उंचीवरील वातावरणाशी जुळवून घ्यायला उपयोगी ठरतं. अशा वेळी आधीचे दिवस हवामानाशी जुळवून घ्यायला कामी आले, असं वाटतं.

ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांच्या अनुभवी मार्गदर्शनाखाली विवेक शिवदे, आशिष माने, रुपेश खोपडे, किरण साळस्तेकर, प्रसाद जोशी, भूषण हर्षे, जितेंद्र गवारे, आनंद माळी, क्रिष्णा ढोकळे आणि डॉक्टर सुमीत मंडाले या सदस्यांनी कांगचेनजुंगाला गवसणी घातली.

 

 


जोरदार वारं, सातत्याने होणारी बर्फवृष्टी, घसरत जाणारं तापमान अशा कठीण परिस्थितीत आठवडाभर काढल्यावर निसर्ग नामक लहरी महंमद निवळला आणि टीमने आपली पुढची कृती ठरवली. शेर्पांना इथल्या निसर्गाचा जन्मजात अनुभव असतो. त्यांच्याशी सल्लामसलत करून केलेल्या आखणीप्रमाणे टीम कॅम्प दोन आणि तीनकरता पुढे सरकली. सुदैवाने हवामानाने तितका त्रास दिला नाही आणि ठरल्याप्रमाणे टीम कॅम्प चार ह्या शेवटच्या टप्प्यात पोहोचली. टीमने 13-14ला शिखराच्या दिशेने कूच करायचं ठरलं होतं. म्हणतात ना, चरप िीेिेीशी रपव ॠेव वळीिेीशी.. ते इथे ींशरा िीेिेीशी रपव ुशरींहशी वळीिेीशी असं होत होतं. पुन्हा एकदा हवामान खराब झालं आणि टीमला शिखराकडे न जाता परत फिरावं लागलं. शिखरचढाई कॅम्प चार आणि शिखरमाथा कॅम्प चार हा अतिशय कठीण चढाईचा भाग पार पाडायला साधारण चोवीस ते अठ्ठावीस तास लागतात. तेरा तारखेला हवामान निवळतंय असं जाणवल्यावर उमेश झिरपेंच्या अनुभवाने आणि शेर्पांच्या अनुमानानुसार बांधलेल्या ठोकताळ्यांनुसार टीमने चौदा तारखेला दुपारी शिखर चढाईला सुरुवात केली. कांगचेनजुंगा शिखर भले एव्हरेस्टपेक्षा उंचीने कमी असेल, पण चढाईसाठी कठीणच समजलं जात. शेवटच्या टप्प्यात होणारी दमछाक आणि लागणारा कस याचं वर्णन शब्दात होणं कठीणच. या वर्षी, शिखराकडे जाणारा रूट खुला करण्याची जबाबदारी गिरीप्रेमीच्या चमूने स्वीकारली आणि पंधरा मे 2019 रोजी, पहाटे साडेपाच ते सहाच्या दरम्यान सर्व दहा सदस्यांनी हे शिखर सर केलं.

गिरीप्रेमीच्या टीमने शिखर सर केल्यावर झालेला जल्लोश अवर्णनीय असाच म्हणावा लागेल. गिरीप्रेमी टीमच्या पाठोपाठ जगभरातून आलेल्या 29 जणांच्या इतर टीम्सना हा रूट खुला करून देण्याचं आव्हान महाराष्ट्राच्या मावळ्यांनी पेललं आणि बेस कॅम्पवर या सर्वाना कौशल्याने मार्गदर्शन करणार्‍या उमेश झिरपेंच्या यशात आणखी एक तुरा खोचला गेला. कांगचेनजुंगा शिखर सर झालं.

हिमालयातल्या मोहिमा आटोपून परत येतानाच अनेक अपघात होत असतात. म्हणूनच योग्य ती काळजी घेत गिरीप्रेमीचे विजयी मावळे काठमांडूत परत येऊन, शिखर सर केल्याची योग्य नोंदणी पूर्ण करून जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पुण्यात येणं अपेक्षित आहे. या यशस्वी चढाईनंतर महाराष्ट्राच्या गिर्यारोहण वर्तुळात अतिशय आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. माउंटन स्पोर्ट्स अकादमीच्या नंदू चव्हाणांच्या मते “गिर्यारोहणाकडे सकारात्मक साहसी खेळ म्हणून पाहण्याची दृष्टी वाढलीय. वयाची पन्नाशी पार केलेला उमेश झिरपेंसारखा लीडर फिटनेस आणि पॉझिटिव्हिटीचा संदेश कृतीतून देतोय” ह्या नंदूच्या विधानाला खरंच अर्थ आहे. 1988 साली याच शिखरावर नेलेल्या पहिल्या नागरी मोहिमेतले सदस्य असलेले ज्येष्ठ गिर्यारोहक वसंत वसंत लिमयेंनी गिरीप्रेमीच्या चमूचं खास अभिनंदन केलंय. लिमयेंनी आवर्जून नमूद केलं की पूर्वी गिर्यारोहणाच्या नागरी मोहिमा नसायच्या, कारण बहुतांश मोहिमा मिलिटरीच्या कामाचा भाग म्हणून आखल्या जायच्या. त्यामुळे भारतीय गिर्यारोहकांना संधी कमीच उपलब्ध असायच्या. पण या क्षेत्रात परदेशी लोकांनी आणलेल्या बदलामुळे भारतीय गिर्यारोहण क्षेत्राने कात टाकली आणि नागरी मोहिमा शक्य होऊ लागल्या. या शिखराशी लिमयेंच्या अनेक आठवणी जोडल्या आहेत. 1988 साली त्यांच्या टीमला, लहरी हवामानामुळे शिखरापासून अवघ्या पाचशे मीटर्स अंतरावरून परत फिरावं लागलं होतं आणि त्यांच्या टीमची मोठी हानी झाली होती. उमेश नियोजन कौशल्यात दादा आहेच. गिर्यारोहण ही ठरावीक वयोगटाचीच मक्तेदारी नसून फिटनेस कायम ठेवल्यास पन्नाशी उलटून गेल्यावरही तरुण गिर्यारोहकांना आपल्या अनुभवाचा फायदा करून देता येतो आणि नवीन आव्हानं स्वीकारता येतात, याचं उदाहरण म्हणून उमेशकडे पाहता येईल, या विधानाकडे लक्षपूर्वक पाहिलं तर सहज जाणवेल की गिरीप्रेमी संस्थेने प्रत्येक मोहिमेत नवीन गिर्यारोहकांना संधी दिली आहे. उमेश झिरपेंच्या अनुभवी मार्गदर्शनाखाली विवेक शिवदे, आशिष माने, रुपेश खोपडे, किरण साळस्तेकर, प्रसाद जोशी, भूषण हर्षे, जितेंद्र गवारे, आनंद माळी, क्रिष्णा ढोकळे आणि डॉक्टर सुमीत मंडाले या सदस्यांनी कांगचेनजुंगाला गवसणी घातलीय. स्थानिक पर्यावरणात होणारे परिणाम, दुष्परिणाम, बदल यांच्या नोंदी या मोहिमेदरम्यान करण्यात आल्या आहेत. त्यांवर आणि नवीन मोहिमेवर महाराष्ट्राची ही पोलादी मनगटं पुढे काम करतीलच. त्यांना शुभेच्छा.

‘साहसे श्री प्रतिवसति’ अर्थात Success lies in courage हेच खरं. थ्री चिअर्स फॉर गिरीप्रेमी, हिप हिप हुर्रे.