हासनचे असहनीय बोल

विवेक मराठी    17-May-2019
Total Views |

  विश्वचि माझे घर’ मानून संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाचा विचार करतो, त्या हिंदू धर्माला दहशतीचा वापर करण्याची गरज भासत नाही. दहशतवादाचे विश्वरूप जगाने पाहिले आहे आणि हिंदू सहिष्णुतेचेही. त्यामुळे केवळ राजकारणासाठी अशा प्रकारचे लेबल लावून संपूर्ण जगासमोर हिंदू धर्माला कमीपणा आणण्याचा प्रयत्न ‘हासन’वर्गीयांनी करू नये.


एक अष्टपैलू अभिनेता आणि वेगळ्या धाटणीचे सायफाय चित्रपट तयार करणारा निर्माता-दिग्दर्शक ही कमल हासन यांची मनोरंजन क्षेत्रातील ओळख. त्यांचे चित्रपट आवडणारा मोठा वर्ग केवळ दक्षिण भारतातच नव्हे, तर देशभर आहे. 2013मध्ये प्रदर्शित झालेला त्यांचा चित्रपट ‘विश्वरूपम्’ अनेकांना आठवत असेल. कमल हासन यांनी दिग्दर्शित केलेला आणि त्यांची महत्त्वाची भूमिका असलेला हा चित्रपट मुस्लीम दहशतवादावर आधारलेला होता. पण चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच त्यावर बंदी आणण्याची मागणी करण्यात आली. या चित्रपटामुळे मुस्लीम समाजाच्या भावना दुखावल्या जातील असे रुदन करत अनेक मुस्लीम संघटनांनी या चित्रपटाविरोधात निदर्शने सुरू केली होती. तत्कालीन जयललिता सरकारनेही ‘विश्वरूपम्’च्या प्रदर्शनावर बंदी आणली होती. त्यानंतर कमल हासन यांनी न्यायालयात धाव घेतली. पंधरा दिवसांनंतर तामिळनाडू उच्च न्यायालयाने चित्रपटावरील बंदी उठवली. देशभरात आणि परदेशातही अनेक चित्रपटगृहांत या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. 2018मध्ये आपल्या राजकीय पदार्पणाच्या वातावरणनिर्मितीसाठी कमल हसन यांनी ‘विश्वरूपम’चा दुसरा भागही प्रदर्शित केला. इतके तपशिलात सांगायचा मुद्दा हा की मुस्लीम दहशतवादावर चित्रपट बनवणार्‍या आणि त्याचा प्रत्यक्षही अनुभव घेणार्‍या या महानुभवांचा ‘दहशतवाद’ या संकल्पनेबाबत आताच इतका गोंधळ का उडाला असावा? ‘हिंदू दहशतवाद’ किंवा ‘हिंदू दहशतवादी’ या अस्तित्वातच नसलेल्या गोष्टीसाठी इतिहासात गोडसेपर्यंत पोहोचण्याची गरज त्यांना का वाटली असावी?   

यात दोन मुद्द्यांचा विचार करावा लागेल. पहिला म्हणजे जाणीवपूर्वक निर्माण केलेला हिंदू दहशतवादाचा बागुलबुवा आणि नथुराम गोडसेंवरून वारंवार केले जाणारे राजकारण. गेल्या महिन्यात ईस्टरच्या दिवशी श्रीलंकेत तेथील चर्चेसना लक्ष्य करून 8 बाँबस्फोट घडवण्यात आले होते. या स्फोटांमागे मुस्लीम मूलतत्त्ववादी गट असल्याचे स्पष्ट झालेले आहे. खरे तर जगभरात कुठे ना कुठे मुस्लीम मूलतत्त्ववादी गटांकडून अशा प्रकारचे बाँबस्फोट, हल्ले होत असतात. परंतु काहीही झाले तरी त्याला मुस्लीम दहशतवाद म्हणायचे नाही, त्याला धार्मिक लेबल लावायचे नाही ही आपल्याकडची तथाकथित सेक्युलर मानसिकता. पण ही मानसिकता जपणार्‍यांच्या डोक्यावरून ‘हिंदू दहशतवाद’ नावाचे भूत मात्र उतरत नाही. लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान तर ते वारंवार थयथयाट करताना दिसले. कारण भाजपा सरकारच्या विरोधात दंड थोपटून उभ्या राहिलेल्या विरोधकांकडे गेल्या पाच वर्षांतील विकासाविरुद्ध बोलायला फारसे मुद्देच हातात नाहीत. मग काय, गेल्या पाच वर्षांत देशात कशी असहिष्णुता पसरली आहे, लोकांची कशी मुस्कटदाबी केली जात आहे, देशात कसे असुरक्षित वातावरण आहे, असे भास अनेक तथाकथित बुद्धिवंत, विचारवंत, कलाकार यांना होऊ लागले. देशात अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर इतके निर्बंध असल्याचा दावा करणारेच त्याविरोधात मुक्तपणे आरोप करत आहेत. या तथाकथित सेक्युलर कंपूत चित्रपटसृष्टी ते राजकारण असा तामिळनाडूच्या परंपरेला शोभेल असा प्रवास करणार्‍या कमल हासन यांचाही समावेश झाला असल्यास आश्चर्य नाही.

तामिळनाडूतील अर्वाकुरीची येथील प्रचारसभेत बोलताना कमल हासन यांनी “नथुराम गोडसे हे पहिले हिंदू दहशतवादी आहेत” असे विधान केले. गेल्या वर्षीच हासन यांनी मक्कल निधी मय्यम या पक्षाची स्थापना केली होती. या लोकसभा निवडणुकीत हासन यांनी तामिळनाडूतील 37 आणि पुदुचेरीतील एका जागेवर उमेदवार उभे केले आहेत. ही निवडणूक त्यांचे आणि त्यांच्या पक्षाचे राजकीय भवितव्य ठरवण्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहेच, त्याहीपेक्षा कोणत्याही प्रादेशिक पक्षाप्रमाणे त्यांचे स्वारस्य राज्यातील राजकारणामध्ये आहे. अर्वाकुरीची येथे झालेली प्रचारसभा 19 मे रोजी होणार्‍या विधानसभा पोटनिवडणुकीसाठी होती. हा भाग मुस्लीमबहुल असल्याने आणि समोर म. गांधींचा पुतळा पाहिल्यावर असे काही विधान करण्याचा मोह त्यांना आवरला नसावा.

नथुराम गोडसेंचे नाव घेऊन संघ आणि पर्यायाने भाजपा यांच्यावर हल्ला करण्याचे राजकारण विरोधी पक्षांनी वारंवार केले. पण त्याचा उलटाच परिणाम घडत असल्याचे लक्षात येऊन काँग्रेसने तो प्रकार थांबवला. एकतर नथुराम गोडसे हिंदुत्ववादी असला, तरी कोणत्याही संघटनेशी त्याचा संबंध नव्हता. त्याने म. गांधींची हत्या करण्याचे समर्थन संघ आणि भाजपाही करत नाही. तो अपराधी होता आणि त्याची शिक्षाही त्याला मिळाली. पण त्याला दहशतवादी म्हणावे असे कोणते कृत्य त्याने केले होते? त्यानेे सार्वजनिक ठिकाणी हल्ले करून मोठ्या संख्येने भारतीय लोकांना किंवा मुस्लिमांना मारले होते का? तशा प्रकारची षडयंत्रे रचल्याचे काही पुरावे आहेत का? मग हासन यांनी त्याला कोणत्या आधारावर दहशतवादी ठरवले? नथुराम गोडसेला हिंदू दहशतवादी म्हणताना हिंदू दहशतवादाचे अस्तित्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न हासन यांनी केला आणि तेच सगळ्यात दुर्दैवी आहे.

मानवी उत्क्रांती आणि धर्म यांचा आतापर्यंतचा इतिहास लक्षात घेतला, तर लक्षात येईल की मुस्लीम, ख्रिश्चन, ज्यू यांसारखे एकेश्वरवादी धर्म नेहमीच आक्रमक राहिले. मात्र बहुईश्वरवादी हिंदू धर्माने कायम सहिष्णुता जपली. स्वधर्मप्रसार, स्वर्गप्राप्ती हेच अंतिम ध्येय ठरवून त्यासाठी जिहाद करण्याची, अन्य धर्मींयांना काफिर मानून त्यांना नष्ट करण्याची शिकवण ज्या धर्मांत आहे, त्यांना दहशतवादाचा आधार घ्यावा लागतो. पण जो ‘हे विश्वचि माझे घर’ मानून संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाचा विचार करतो, त्या हिंदू धर्माला दहशतीचा वापर करण्याची गरज भासत नाही. दहशतवादाचे विश्वरूप जगाने पाहिले आहे आणि हिंदू सहिष्णुतेचेही. त्यामुळे केवळ राजकारणासाठी अशा प्रकारचे लेबल लावून संपूर्ण जगासमोर हिंदू धर्माला कमीपणा आणण्याचा प्रयत्न ‘हासन’वर्गीयांनी करू नये.