सोमनाथ मंदिराच्या जीर्णोध्दाराचा यक्षप्रश्न

विवेक मराठी    18-May-2019
Total Views |

 ***मधू देवळेकर***

 हिंदुस्थान स्वतंत्र झाल्यानंतर लगेचच हिंदूंच्या स्वाभिमानाचे प्रतीक असलेल्या, सौराष्ट्र वेरावळ येथील सोमनाथ मंदिराचे पुनर्निमाण व ज्योतिर्लिंगाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली; परंतु मंदिराच्या जीर्णोध्दाराच्या निमित्ताने सेक्युलॅरिझम हा हिंदू धर्माबाबत कसा भेदभाव करतो हे दिसून आले.

 

 गुजरातमधील काठियावाड येथील समुद्रकिनाऱ्यावर सुप्रसिध्द सोमनाथ मंदिर आहे. पूर्वी हे स्थान 'प्रभासक्षेत्र' या नावाने ओळखले जात असे. या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने आपली लीला आटोपती घेतली होती, असे मानले जाते. येथील ज्योतिर्लिंगाची लोकप्रिय कथा पुराणांमध्ये दिली आहे.

हिंदुस्थान स्वतंत्र झाल्यानंतर लगेचच हिंदूंच्या स्वाभिमानाचे प्रतीक असलेल्या, सौराष्ट्र वेरावळ येथील सोमनाथ मंदिराचे पुनर्निमाण व ज्योतिर्लिंगाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली; परंतु अयोध्येतील राममंदिराचा प्रश्न गेली कित्येक वर्षे पडून आहे. काँग्रेसने व तथाकथित धर्मनिरपेक्ष लोकांनी या प्रश्नाला राजकीय प्रश्न बनवून हिंदू जनतेच्या श्रध्देवर फार मोठा आघात केला आहे. सोमनाथ मंदिराचा व त्याच्या पुनर्निर्माणाचा इतिहास फार माहितीपूर्ण आणि प्रेरणादायक आहे.

'माय कंट्री माय लाइफ' या आपल्या आत्मचरित्रात्मक पुस्तकात भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी लिहितात - अयोध्येच्या राममंदिराशी संबंधित चळवळ योग्य दृष्टीकोनातून समजून घेण्यासाठी दुसऱ्या एका महत्त्वाच्या मंदिराच्या, म्हणजे प्रभासपट्टण येथील सौराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्यावरील सोमनाथ मंदिराच्या पुनर्निमाणाच्या स्वतंत्र भारतामध्ये झालेल्या प्रयत्नांचा इतिहास ज्ञात करून घ्यायला हवा. आपल्या देशाच्या पौराणिक व ऐतिहासिक वारशाविषयी अनभिज्ञ असणाऱ्या लोकांनी समुद्रकिनाऱ्यावरील या मंदिराशी आपल्या देशाचे किती विजय निगडित आहेत, हे जाणून घ्यायला पाहिजे.

सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाविषयी समकालीन व नावाजलेले पत्रकार दुर्गादास यांनी ‘India from Curzon to Nehru and After’ या पुस्तकामध्ये या संबंधात माहिती दिली आहे -

ते लिहितात, राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद व पंतप्रधान पं. नेहरू या दोघांनी महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यलढयात भाग घेऊन हालअपेष्टा सहन केल्या. ते गौरवाचेदेखील भागीदार झाले. त्रयस्थ निरीक्षकाला या दोघांमध्ये सतत चाललेला संघर्ष जाणवत असे. सुदैवाने हा संघर्ष जनतेसमोर उघड झाला नाही.

दि. 11 मे 1951 रोजी राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांनी सोमनाथ मंदिराच्या नवीन वास्तूच्या उद्घाटनप्रसंगी प्रेरणादायक भाषण केले. भाषणात ते म्हणाले की, ''आपल्या संस्कृतीशी निगडित भौतिक प्रतीके आक्रमकांकडून उद्ध्वस्त करण्यात आली, मात्र जनतेच्या मनामधील संस्कृती व श्रध्दा याविषयीचे प्रेम कोणतेही सैन्य, शस्त्रे व राजा नष्ट करू शकले नाहीत. आजतागायत हे धागे टिकून आहेत. हे बंध जोपर्यंत आहेत, तोपर्यंत आपली संस्कृती टिकून राहील. या संस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्याची शतकांपासूनची आस जेव्हा आम जनतेच्या हृदयामध्ये वाढीस लागली, तेव्हा त्याचा परिणाम म्हणून सोमनाथाची प्राणप्रतिष्ठा केली गेली. सोमनाथ हे प्राचीन भारताच्या आर्थिक व आध्यात्मिक समृध्दीचे प्रतीक आहे. सोमनाथ मंदिराचे पुनर्निर्माण तोपर्यंत पूर्ण होणार नाही, जोपर्यंत भारताला गतकाळातील समृध्दी प्राप्त होत नाही.''

या भाषणाची सरकारी माध्यमांकडून पाहिजे तशी दखल घेतली गेली नाही. त्यांच्या अधिकृत प्रसारणामध्ये व आवृत्त्यांमध्येसुध्दा भाषण प्रकाशित झाले नाही.

नेहरू, राजेंद्रप्रसाद यांच्याकडे जुन्या रूढींचे पुनरुज्जीवनवादी म्हणून पाहत होते, हे दिल्लीमधील अनेक जाणकार लोकांपासून लपून राहिलेले नव्हते. 1930च्या मध्यावर जेव्हा राजेंद्रप्रसाद यांनी वल्लभभाई पटेल, सी. राजगोपालाचारी व कृपलानी यांच्यासह नेहरूंच्या समाजवादी गटापासून फारकत घेतली, तेव्हा नेहरू व राजेंद्रप्रसाद यांच्यामधील संघर्षास सुरुवात झाली. 1950मध्ये राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद सोमनाथ मंदिराच्या जीर्णोध्दाराच्या व पुनर्बांधणीच्या धार्मिक सोहळयात सहभागी झाले, तेव्हा या संघर्षाची धार अधिकच तीव्र झाली. नेहरूंनी सोमनाथ मंदिरासंबंधी कार्यक्रमांना जाणे नाकारले. निधर्मी देशाच्या प्रमुखाने या प्रकारच्या 'धार्मिक पुनरुज्जीवनाच्या' कार्यक्रमांमध्ये सहभागी होणे योग्य नाही, अशी त्यांची भूमिका होती. राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद हे पंतप्रधान नेहरूंशी सहमत नव्हते. 'सोमनाथ म्हणजे आक्रमकांना केलेल्या राष्ट्रीय विरोधाचे प्रतीकच होय' याकडे त्यांनी लक्ष वेधले. ''माझा माझ्या धर्मावर विश्वास आहे आणि मी स्वत:ला त्यापासून अलग करू शकत नाही'' असे ते म्हणाले.

अशा प्रकारे, लक्षावधी लोकांच्या भक्तीमुळे, सरदार पटेलांच्या निश्चयामुळे, गांधीजींच्या आशीर्वादामुळे आणि के.एम. मुन्शी यांच्या अविश्रांत परिश्रमांमुळे सोमनाथ मंदिराच्या भव्य वास्तूचे पुनर्निर्माण झाले. दरम्यान नेहरूंची प्राचीन धार्मिक स्थळांविषयीची दृष्टी बदलली व त्यांनी सांची येथील बुध्द यात्रेकरूंच्या केंद्रासाठी जमीन दान दिली व सारनाथ (वाराणसी) येथील बुध्द स्थळाच्या पुनर्बांधणीसाठी अनुदानाची तरतूद केली.

यानंतर अनेक वर्षांनी के.एम. मुन्शी यांनी नेहरूंच्या सेक्युलरवादावर टीका करताना लिहिले आहे, 'नेहरूंच्या सेक्युलरवादामुळे धर्मविरोधी शक्तींना मानवाधिकाराच्या नावाखाली बळी दिले गेले. नागरिकांमधील बहुसंख्याक वर्गाच्या धार्मिकतेवर लांछन लावले गेले. मात्र अल्पसंख्य वर्ग या लांछनापासून सुरक्षित राहिला व आपल्या अवाजवी मागण्या मान्य करून घेण्यात यशस्वी झाला. सत्तेमधील राजकारण्यांनी बहुसंख्याकांविषयी विक्षिप्तपणाची भूमिका घेतली. या भूमिकेमध्ये अल्पसंख्य समाजाच्या धार्मिक व सामाजिक भावनांकडे उदारपणे पाहिले गेले, मात्र बहुसंख्य समाजाच्या धार्मिक व सामाजिक भावनांना सहजच जातीयवादी व प्रतिक्रियावादी अशी विशेषणे लावण्यात आली. सोमनाथ मंदिराच्या जीर्णोध्दाराच्या निमित्ताने सेक्युलॅरिझम हा हिंदू धर्माबाबत कसा भेदभाव करतो हे दिसून आले. राजकारण्यांच्या या विक्षिप्त भूमिकेमुळे बहुसंख्य समाजामध्ये नैराश्याची भावना निर्माण होत आहे. सेक्युलॅरिझम या शब्दाचा गैरवापर असाच चालू राहिला, आहे. जेव्हा दोन धर्मांच्या गटांमध्ये संघर्ष निर्माण झाला, तेव्हा न्याय-अन्यायाचा विचार न करता बहुसंख्य समाजावर दोषारोप केले गेले. जर बनारस, मथुरा व हृषीकेश यासारखी आपली पारंपरिक धर्मस्थळे औद्योगिक क्षेत्रांमध्ये रूपांतरित झाली, तर आपल्या पारंपरिक सहिष्णुतावादाचे झरेदेखील आटून जातील.'

इतिहास

जगप्रसिध्द इतिहासकार विल डयूरां 'द ओरिएंटल हेरिटेज' या त्याच्या पुस्तकात लिहितो - गझनीचा महंमद जिहादच्या नावाखाली भारतामध्ये घुसला, त्याचा उद्देश केवळ लूट करण्याचा होता. भीमनगर येथील बेसावध हिंदूंची त्याने कत्तल केली, मंदिरे लुटली व उद्ध्वस्त केली व शतकानुशतके संचित केलेली संपत्ती एकत्रित करून घेऊन गेला. लूट व कत्तल करणे याबाबत त्याने त्याच्या सैनिकांना पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. आपल्या राज्यांमध्ये जाताना तो दर वर्षी अधिकाधिक धनवान होऊन जात असे. इतिहासाला आजवर माहीत असलेल्या धनवान सत्ताधीशांमध्ये हा कदाचितसर्वात जास्त धनवान सत्ताधीश होता. कधीकधी तो विनाश केलेल्या शहरांमधील रहिवाशांना मारत नसे, त्यांना गुलाम म्हणून वापरण्यासाठी पकडून नेत असे.'

स्वा. सावरकर त्यांच्या 'सहा सोनेरी पाने' या पुस्तकात लिहितात - इ.स. 1026मध्ये गझनीच्या सुलतान महंमदाने सौराष्ट्रातील सोमनाथ मंदिरावरील सर्वात अधिक गाजलेली स्वारी केली. त्या वेळी तेथे राज्य करीत असलेला राजा भीम तेथून पळून गेला. महंमदाच्या संघटित मुसलमानी सैन्याशी तोंड देण्यास हिंदूंचे कोणतेही शस्त्रसज्ज व व्यूहबध्द असे सैन्य अस्तित्वातच उरले नाही. अशा बिकट प्रसंगीही सोमनाथच्या पुजारी मंडळाने पुढाकार घेऊन मंदिराच्या संरक्षणासाठी आवाहन केले. त्याला प्रतिसाद देऊन सहस्रावधी हिंदू धावून आले. ते निर्भेळ धर्मयुध्द होते. ते सहस्रावधी हिंदू म्हणजे व्यूहबध्द रणशिक्षित सैनिक नव्हते. तो आयत्या वेळी एकवटलेला हिंदू धर्मवीरांचा एक समुदाय होता. तरीही जिवावर उदार होऊन महंमदाच्या संघटित नि कसलेल्या मुस्लीम सैन्याशी अहोरात्र झुंजला. देवालयाच्या संरक्षणार्थ पन्नास हजार हिंदू ठार झाले. कोणीही जीव वाचविण्यासाठी धर्मांतरित झाला नाही.'

इ.स. 1782-83मध्ये महादजी शिंदे यांनी लाहोर येथून महमूद शाह अब्दाली याचा पराभव करून चांदीचे तीन दरवाजे सोमनाथ मंदिरामध्ये आणले. हे दरवाजे सोमनाथ मंदिरामधून काढून नेले होते असे मानले जात असे. मात्र हे दरवाजे सोमनाथ मंदिरामध्ये लावून घेण्यास त्या वेळचे मंदिराचे पुजारी व बडोदा संस्थानाचे तत्कालीन अधिपती गायकवाड यांनी नकार दिला. त्यामुळे हे दरवाजे महादजी शिंदे यांनी त्यांच्या संस्थानांमधील उज्जैन येथील महांकालेश्वर मंदिर व गोपाळ मंदिर येथे बसविले.

महादेवशास्त्री जोशी यांनी संपादित केलेल्या पुणे येथील भारतीय संस्कृती कोशात अहिल्याबाई होळकरांनी केलेल्या बांधकामाची यादी आहे. त्यामध्ये सोमनाथ येथेदेखील अहिल्याबाई होळकरांनी काही बांधकाम केल्याचा उल्लेख आहे.

असा हा सोमनाथ मंदिरासंबंधीचा प्राचीन व स्वातंत्र्यानंतरचा इतिहास आहे.

माजी आमदार

26496070, 9819331071

mydeolekar@yahoo.com