ममता बॅनर्जींची कुटील खेळी 

विवेक मराठी    18-May-2019
Total Views |


 कोलकाता शहरात 14 मे रोजी संध्याकाळी एक दुर्दैवी घटना घडली. ती घटना आणि त्यानंतरचे त्याचे पडसाद यांच्यामुळे बंगालच्या शैक्षणिक क्षेत्राचे जनक आणि खरोखरीच पंडित असलेल्या ईश्वरचंद्र यांनी त्यांच्या वचनात उल्लेखलेल्या मनुष्याच्या विवेकबुद्धी आणि आत्मज्ञान या गुणांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. हो, पं. ईश्वरचंद्र विद्यासागर किंवा त्यांचा पुतळा या घटनेच्या केंद्रस्थानी आहे. 

-पार्था रॉय 
8828283740

सर्व प्राणिमात्रात मनुष्य हा सर्वश्रेष्ठ मानला जातो; कारण त्याला विवेकबुद्धी आणि आत्मज्ञान असते. : पं. ईश्वरचंद्र विद्यासागर. 
कोलकाता किंवा कलकत्ता : आनंदाचे शहर. कोणीतरी या शहराविषयी म्हटलेच आहे की, ‘यू कॅन लव्ह ऑर हेट धिस सिटी, बट कान्ट इग्नोर धिस सिटी.’(तुम्ही या शहरावर प्रेम करू शकता किंवा त्याचा द्वेष करू शकता; परंतु तुम्ही त्याकडे दुर्लक्ष नाही करू शकत.) अशा या शहरात 14 मे रोजी संध्याकाळी एक दुर्दैवी घटना घडली. ती घटना आणि त्यानंतरचे त्याचे पडसाद यांच्यामुळे बंगालच्या शैक्षणिक क्षेत्राचे जनक आणि खरोखरीच पंडित असलेल्या ईश्वरचंद्र यांनी त्यांच्या वचनात उल्लेखलेल्या मनुष्याच्या विवेकबुद्धी आणि आत्मज्ञान या गुणांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. हो, पं. ईश्वरचंद्र विद्यासागर किंवा त्यांचा पुतळा या घटनेच्या केंद्रस्थानी आहे. 
काय होती ही घटना. सर्वांनाच माहितेय की सध्या 17 व्या लोकसभा निवडणुकीचा अखेरचा टप्पा सुरू आहे. यावर्षी ही निवडणूक 7 टप्प्यात घेण्यात आली असून त्याचे 6 टप्प्पे पूर्ण झाले आहेत. अखेरचा टप्पा रविवारी होईल. 
प. बंगालमधील भाजपाने 14 मे रोजी सायंकाळी 4 वाजता शहरात एका महारॅलीचे आयोजन केले होते. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा या महारॅलीसाठी आले होते. हा कार्यक्रम पूर्वनियोजित असल्याने संबंधित अधिकार्‍यांकडून परवानगी घेण्यात आली होती. भाजपाच्या राज्यातील नेतृत्वाने पद्धतशीरपणे रॅलीची आखणी केली होती, जेणेकरून दक्षिण आणि उत्तर कोलकाता असे दोन्ही भाग त्यात समाविष्ट होतील. याबाबतीत एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की कोलकातामध्ये दोन लोकसभा मतदारसंघ आहे. एक उत्तर आणि दुसरा दक्षिण. 
सध्याच्या राजकीय परिस्थितीचा जर तुम्हाला थोडा जरी अंदाज असेल कर तुमच्या लक्षात येईल की त्याला राष्ट्रवादाचा गंध आहे. सध्या तोच संपूर्ण देशभर पसरलेला आहे. प. बंगालही त्यापासून दूर नाही. संपूर्ण प. बंगाल राज्य मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसच्या गुंडांच्या आणि पोलिसांच्या दहशतीने भयग्रस्त आहे. तरीही बंगालच्या हृदयाचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला एकच वाक्य ऐकू येईल, ‘‘भारत माता की जय’’. आता बंगाली बांधवांनाही ‘सब का साथ, सब का विकास’ या मोहिमेत सहभागी व्हायचे आहे. श्री रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, नेताजी सुभाष, रिशी अरबिंदो, गुरुदेव रबिंद्रनाथ, हुतात्मा खुदीराम, डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी या सर्व बंगालच्या भूमीतील महापुरुषांनी सिद्ध केले आहे की, ‘‘बंगाल आज जो विचार करतात, तो उद्या भारत करतो.’’
सगळ्यांनाच माहीत आहे की मतदानातही बंगाल नेहमी पहिल्या क्रमांकावर असतो. आणि यावेळीसुद्धा ममता बॅनर्जी पुरस्कृत तृणमूल काँग्रेसचे गुंड आणि पोलीस यांच्याद्वारे धमक्या, खोट्या केसेस, घरांची आणि मालमत्तेची जाळपोळ, लूट, बलात्कार आणि हत्या असा अनेक प्रकारे सुरू असलेला छळ सहन करूनही लोक आपला मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी मोठ्या संख्येने घराबाहेर पडले. काही ठिकाणी लोकांना जेव्हा हे सहन करण्याच्या पलीकडचे वाटले, तेव्हा त्यांनी त्याचा निषेध केला, प्रतिकार केला आणि त्यात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ममता बॅनर्जींची डोकेदुखी वाढली. त्यांना वस्तुस्थितीची जाणीव झाली आणि पुढच्या संकटाची कल्पनाही आली. 
हे सगळं विषयांतर होत असलं तरी घटना नीट समजून घेण्यासाठी या प्रस्तावनेची गरज होती. 
मी आधीच म्हटल्यानुसार महारॅली किंवा रोड शोे पूर्वनियोजित असल्याने तो व्यवस्थित आणि शांततेत सुरू होता. या रोड शोला लोक मोठ्या संख्येने जमले होते. (इतकी की सर्वत्र केवळ डोकीच दिसत होती.) जय श्रीराम, भारत माता की जय, वंदे मातरम अशा उत्स्फूर्त घोषणा लोक देत होते. राष्ट्रीय अध्यक्षही अतिशय आनंदात होते. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या, हात हलवणार्‍या आणि जयघोष करणार्‍या लोकांच्या दिशेने ते फुले भिरकावत होते. त्याबदल्यात कोलकत्याचे लोकही अमितजींकडे फुले फेकत होते. 
पण, हे कोलकाता आहे आणि घाणेरडे राजकारण करणार्‍यांची ही नगरी आहे. त्यामुळे बॅनर्जी यांनी आधीच एक कट रचला होता. रॅलीच्या आधी भाजपा कार्यकर्त्यांनी रस्त्यांवर सर्वत्र होर्डिंग्ज, फ्लेक्स, बॅनर्स लावले होते. राजकीय कार्यक्रमांसाठी ते गरजेचेच असते. पण रॅलीपूर्वीच तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी आणि राज्य सरकार पुरस्कृत पोलिसांनी कोणतेही कारण न देता सर्व फ्लेक्स आणि बॅनर्स नष्ट केले. जणू काही त्यादिवशीच्या रॅलीसाठी त्यांनी संदेशच सोडला होता. 
आता मुख्य घटना काय होती ते जाणून घेऊया. 
रॅलीने दक्षिण कोलकाता शांततापूर्वक पार केला आणि मध्य/उत्तर क्षेत्रात प्रवेश केला. याठिकाणी तृणमूलच्या गुंडांनी भाजपा कार्यकर्त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी स्वत:वर ताबा ठेवून या डिवचण्याचा प्रतिबंध केला. संध्याकाळच्या वेळी सूर्य अस्तास जात होता. रॅलीमधील अमित शहा यांची गाडी प्रसिद्ध कॉलेज रोडवर आली. या गाडीत शहा यांच्यासह कोलकात्याच्या दोन्ही मतदारसंघातील भाजपा उमेदवार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष, बंगाल निवडणूक समितीचे अध्यक्ष मुकुल रॉय आणि राष्ट्रीय सुरक्षा रक्षक होते. जेव्हा ही गाडी कलकत्ता विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर आली, अचानक काही कथित महाविद्यालयीन विद्यार्थी (यातील बहुतेक जण चाळिीशी पार केलेले होते) काही घोषणाफलक आणि काळे निशाण हातात घेऊन, ‘परत जा, परत जा’ अशा आक्रमक घोषणा देत, आपल्या पंतप्रधांनांचे नाव घेऊन अपशब्द वापरत रॅलीत घुसले. थोड्या वेळाने त्यांनी रॅलीवर दगडफेक करायला सुरुवात केली. त्यात अनेक भाजपा कार्यकर्ते जखमी झाले. दरम्यान पोलिसांनी त्या कथित तृणमूल पक्षीय विद्यार्थ्यांना अतिशय अनौपचारिक पद्धतीने थांबवण्याचा दिखावा केला. पण ते आवरत नव्हते. मग भाजपाचे नेते त्यांच्या कार्यकर्त्यांना शांत करण्यासाठी आणि अमित शहा यांचे संरक्षण करण्यासाठी पुढे सरसावले आणि त्यांना त्या जागेपासून दूर घेऊन गेले. आश्चर्य म्हणजे पोलिसांनीही त्या दगडफेक करणार्‍यांना कोणताही अडथळा न आणता त्यांचे काम करू दिले. 
थोड्याच वेळात कोलकाता विद्यापीठापासून काही अंतरावर असणार्‍या विद्यासागर महाविद्यालयासमोर दुसरी घटना घडली. मला वाटतं बहुतेक मुख्य प्रसारमाध्यमांनी या घटनेचे प्रक्षेपण केले. विद्यासागर महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर मोठा जमाव जमल्याची, ते मोटरसायकली जाळत असल्याची सगळ्यात कहर म्हणजे काही समाजकंटक पं. ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची विटंबना करत असल्याची ही दृष्ये होती. 


 
त्याच संध्याकाळी माझ्या वॉटस् अ‍ॅप इनबॉक्समध्ये संदेश असलेला एक व्हिडीओ आला होता. या वायरल झालेल्या व्हिडीओमध्ये भाजपाच्या काही गुंडांनी अमित शहा यांच्या रोड शोमध्ये पं. ईश्वरचंद्र पंडित यांच्या पुतळ्याची मोडतोड केल्याचे म्हटले होते. मी वेळ न दवडता विद्यासागर महाविद्यालयाच्या जवळ राहणार्‍या माझ्या एका जवळच्या सहकार्‍याला फोन लावला. तो म्हणाला की तो त्यावेळी तेथेच उपस्थित होता आणि त्या घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार होता. मी त्याला तपशील विचारला. त्याच्या म्हणण्यानुसार, तो आणि त्याचे काही मित्र रस्त्याच्या पलीकडे उभे राहून रॅलीची वाट पाहत होते. त्यांच्याबरोबरच अन्य नागरिकही रॅली पाहण्यासाठी थांबले होते. विद्यासागर महाविद्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार (लोखंडी) आतून कुलुप लावून बंद केलेले होते. जेव्हा रॅली कॉलेजसमोर आली तेव्हा अचानक कॉलेजच्या छतावरून रॅलीच्या दिशेने दगडफेक सुरू झाली. त्यात अनेक भाजपा कार्यकर्ते जखमी झाले. तेव्हा काही भाजपा समर्थक मुख्य प्रवेशद्वाराच्या दिशेने धावले आणि ते ओलांडण्याचा प्रयत्न केला. काहींनी प्रवेशद्वाराला धक्के मारले. पण पक्षाच्या मुख्य नेत्यांनी शांतपणे परिस्थिती हाताळली आणि त्यांच्या समर्थकांना आवरण्यात त्यांना यश आले. दरम्यान काही नागरिक घाबरून पळून गेले. माझ्या सहकार्‍याने पुढे सांगितले की, त्या जागी काही गुंड दिसले, त्यांपैकी काहींनी लुंगी (सर्वसाधारणपणे बंगालमधील मुस्लीम पुरुष परिधान करतात) नेसली होती. त्यांनी मोटारसायकली जाळल्या आणि अचानक पळून जायला लागले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यावेळी घटनास्थळी अनेक पोलीस कर्मचारी होते, पण त्यांनी मौन धारण केलं होतं. त्यानंतर माझ्या मित्राने कॉलेजच्या आतून मोठा गोंधळ ऐकला. पण त्याने दुर्लक्ष केले आणि तो घरी निघून आला. 
थोड्या वेळात, विकत घेतलेल्या माध्यमांद्वारे चुकीचा संदेश आगीप्रमाणे पसरवला जात असल्याचे मी पाहिले. ‘भाजपाने बंगालच्या ऐतिहासिक वारशाला धक्का लावला. जर ते बंगालमध्ये सत्तेत आले, तर ते बंगालचे सर्वच ऐतिहासिक वारसे नष्ट करून टाकतील’ असा तो संदेश होता. एका व्हिडीओद्वारे तो प्रसारित केला जात होता. त्या व्हिडिओत दाखवण्यात आले होते की, काही लोक विद्यापीठात प्रवेश करत आहेत. त्यानंतर काहीजण विद्यासागर यांच्या पुतळ्याचा तुकडा घेऊन बाहेर आले आणि त्यांनी त्याची विटंबना केली. हे सर्व भाजपा समर्थकांनी केलं आहे हे सिद्ध करण्याची वृत्तनिवेदकांची धडपड चालली होती. 
घटनेच्या दोनच तासांनंतर ममता बॅनर्जी आपल्या नकाश्रूंसह समोर आल्या आणि त्यांनी त्या घटनेसाठी भाजपाला दुषणे देणे सुरू केले. माध्यमांसमोर त्यांनी पुतळ्याचे तुकडे गोळा केले. नंतर त्यांनी खोट्या मलमपट्ट्या केलेले दोन जखमी विद्यार्थी समोर आणले. आणि मग त्यांनी भाजपाला धमकी दिली की निकालानंतर इंचाइंचाचा बदला त्या घेणार आहेत. 
आता सत्य जाणून घेण्यासाठी आपल्या काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील.
मी याआधीच एका प्रत्यक्षदर्शीचा अनुभव सांगितला आहे. असं मानलं की तो भाजपा समर्थक आहे. त्यामुळे थोडावेळा त्याकडे दुर्लक्ष करू आणि वस्तुस्थिती काय होती हे शोधण्याचा प्रयत्न करू. 
1) बिकाऊ माध्यमांनी जो व्हिडीओ प्रसारित केला होता, त्यात काही लोक कॅम्पसमध्ये शिरल्याचे दाखवले आहे. मात्र नंतर एका वर्गातून पुतळ्याचा तुकडा घेऊन बाहेर आलेले आणि त्याची विटंबना करणारे लोक वेगळेच होते. मग कॉलेजमध्ये शिरणार्‍या त्या लोकांचा व्हिडीओ कुठे आहे? उत्तर नाही. ते लोक कुठे गेले? उत्तर नाही. आता वस्तुस्थिती आणि विद्यासागर महाविद्यालयाची रचना पाहूया. मी आधी म्हटलं त्याप्रमाणे मुख्य प्रवेशद्वार आतून कुलुपबंद हाते. त्यानंतर एक लाकडी प्रवेशद्वार आहे आणि तेसुद्धा कुलुप लावून बंद केलेले होते. त्यापुढे एका काचेच्या केबिनमध्ये तो पुतळा होता आणि तेथेही कुलुप लावलेले होते. आता मला सांगा भाजपा समर्थकांनी प्रथम लोखंडी प्रवेशद्वार पार केले, नंतर लाकडी गेटही ओलांडला आणि मग काच फोडून पुतळा बाहेर आणला. आणि तोपर्यंत  तृणमूलच्या कोणत्याच कार्यकर्त्याने त्याचे चित्रिकरण केले नाही... हे हास्यास्पद नाही का? उत्तर नाही. 
2) पुतळ्याच्यामागेच सीसीटीव्ही कॅमेरा आहे? त्याचे फुटेज कुठे आहे? नसेल तर का नाही? कोणाच्या फायद्यासाठी? उत्तर नाही. कॉलेज व्यवस्थापनानेही दोन दिवसांनी जाहीर केले की, तो सीसीटीव्ही कॅमेरा काम करत नव्हता. म्हणजे लक्षात आलंच असेल तुमच्या. 
3) एवढी सगळी प्रसारमाध्यमे, तृणमूलने विकत घेतलेली आणि न घेतलेलीही, रॅलीचे लाईव्ह चित्रिकरण दाखवत होते. मग असा काही प्रकार त्यादरम्यान घडला तर त्याचे लाईव्ह चित्रिकरण कोणीच का दाखवले नाही? पुन्हा मोठा प्रश्न, पण उत्तर नाही. 
आणि आता शेवटचा प्रश्न ममता बॅनर्जी यांच्यासाठी. घटनेनंतर पोलिसांनी कॅम्पसमध्ये प्रवेश केला, त्यानंतर तासाभरात शिक्षणमंत्री तेथे पोहोचले, आणि त्यानंतर एका तासाने मुख्यमंत्री तेथे पोहोचल्या आणि त्यांनी पुतळ्याचे तुकडे एकएक करून गोळा केले आणि एका जागी ठेवले. हे सर्व त्यांनी माध्यमांसमोर केले आणि त्यानंतर भाजपाला दोष द्यायला सुरुवात केली. माझा प्रश्न असा आहे. जर पोलीस तेथे आधी आले असतील, तर त्यांनी ती जागा मोकळी का केली नसेल? हे विचित्र आहे, पण त्यालाही उत्तर नसणार. 
आशा आहे की हे तार्किकदृष्ट्या स्पष्ट आहे की तृणमूल समर्थकांनी स्वत:च पुतळ्याची मोडतोड केली, बाहेर येऊन त्याची विटंबना केली आणि त्याचा व्हिडीओ बनवला. 
जेणेकरून ममता बॅनर्जी सगळ्यांना काही काळासाठी आणि काहींना सर्वकाळासाठी मूर्ख बनवू शकतील. पण सगळ्यांना सर्वकाळासाठी मूर्ख बनवणे त्यांना शक्य नाही. आता संपूर्ण देशाला तुमच्या या कुटील राजकारणाबाबत माहीत आहे. आता तुम्ही निवडणूक जिंकण्यासाठी देशाच्या ऐतिहासिक वारशाला धक्का पोहोचवण्याची खेळी सुरू केली आहे.
अनुवाद : सपना कदम-आचरेकर