पाकिस्तानाच्या सुफी दर्ग्यांत का होतात बाँबस्फोट?

विवेक मराठी    18-May-2019
Total Views |

  ऐन रमजान महिन्यात लाहोर शहर बाँबस्फोटाने हादरले आहे.  प्रसिध्द दाता दरबार सुफी दर्ग्या कट्टरपंथीयांनी हा बाँबस्फोट  घडवून आणला. धार्मिक श्रध्दांबरोबरतच संगीत कला तत्त्वज्ञानाचे केंद्र म्हणून हा दर्गा प्रसिध्द आहे. ज्ञानाची-कलेची ही सगळी समृध्द अशी परंपरा नष्ट करणे हे कट्टरपंथीय इस्लामचे पहिले उद्दीष्ट आहे.

बुधवार दिनांक 8 मे रोजी पाकिस्तानातील लाहोरच्या सुप्रसिध्द दाता दरबार सुफी दर्ग्यात कट्टरपंथीयांनी बाँबस्फोट केले. त्यात दहा जण मृत्युमुखी पडले असून 20 जण गंभीर जखमी झाले आहेत. हा हल्ला तालिबान्यांनी केला आहे. तशी त्यांनी कबुलीही दिली आहे. हे तेच तालिबानी आहेत, ज्यांनी अफगाणिस्तानातील बामियानातील सर्वात मोठया प्राचीन बुध्द मूर्ती मिसाइल्स लावून उडवल्या होत्या. हेच कट्टरपंथी तालिबान आता पाकिस्तानातील सुफी संप्रदायाच्या विविध श्रध्दास्थानांवर हल्ले करत आहेत.

याच ठिकाणी यापूर्वीही आयसिस या कट्टरपंथीय गटाने 2010मध्ये आत्मघातकी हल्ला केला होता. त्यात 50 जण ठार झाले होते.

अकराव्या शतकातील सुफी संत अबुल हसन अली हुजविरी, जे दाता गंज बक्ष या नावाने ओळखले जातात, यांचा हा दर्गा आहे. दक्षिण आशियातील सर्वात मोठा दर्गा म्हणून ही जागा प्रसिध्द आहे. 'दाता दरबार' या लोकप्रिय नावाने हा दर्गा ओळखला जातो. भारतातील सर्वात प्रसिध्द अजमेरचे सूफी संत ख्वाजा मोईनोद्दीन चिश्ती यांनीसुध्दा या दाता दरबारमध्ये दाता गंज बक्ष यांच्या कबरीपुढे माथा टेकवला होता. त्यांचे आशीर्वाद घेतले होते. अगदी आत्ताआत्तापर्यंत नवाज शरीफ, इमरान खानपर्यंतचे पंतप्रधान इथे माथा टेकवत आले आहेत.

या दर्ग्यात कव्वाली महोत्सव भरवला जातो. जगभरातील कव्वाल इथे आपली हजेरी लावणे प्रतिष्ठेचे समजतात. इथे संगीत परंपरा मोठया निष्ठेने जतन केली जाते. या परिसरातील कव्वाली गायनाची एक वेगळी शैली आहे. शास्त्रीय संगीताचा पाया असलेली ही कव्वाली आज फारच थोडया गायकांनी आत्मसात केली आहे. भारतातील हैदराबादचे कव्वाल या शास्त्रीय परंपरेत गातात.  

या सुफी संतांबाबत आणखी एक मुद्दा इतरांपेक्षा वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. दाता गंज बक्ष यांनी 'कश्फुल महजूब' या नावाचा  ग्रंथ लिहिला. सूफी प्राचीन तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ अरबी भाषेत उपलब्ध होते. हा फारसी भाषेतील सूफी तत्त्वज्ञानाचा पहिलाच ग्रंथ होय. म्हणून याला अतोनात महत्त्व आहे. मोगल दरबाराची अधिकृत राजभाषा फारसी होती. मोठ-मोठया विद्वानांना चर्चा करण्यासाठी सगळयात जुना फारसी ग्रंथ म्हणून हाच उपयोगी पडत आला आहे. सम्राट अकबराने तर केवळ तत्त्वचर्चा करण्यासाठी वेगळी इमारत बांधली होती. तिथे हा ग्रंथ सन्मानाने प्रतिस्थापित करण्यात आला होता. पाश्चात्त्य विद्वान निकलसन यांनी 1914 मध्ये या ग्रंथाचा इंग्रजीत अनुवाद प्रसिध्द केला. पुढे रशियन अभ्यासक झोकोसिस्की यांनी 1920मध्ये याची रशियन आवृत्ती सिध्द केली. या ग्रंथात सूफी साधनेच्या श्रध्दा, तत्त्वे, पहिल्या युगापासून ते समकालीन सूफींची संक्षिप्त चरित्रे यांचा समावेश आहे. विभिन्न सूफी संप्रदाय आणि त्यांच्याशी संबंधीत साधकांची परिस्थिती, सूफींचे नियम, त्यांची प्रगतिस्थळे आणि पारिभाषिक शब्दावलींचे विवेचन या ग्रंथात समाविष्ट आहे. (सूफी तत्त्वज्ञान : स्वरूप आणि चिंतन, लेखक-डॉ. मुहम्मद आजम, पद्मगंधा प्रकाशन, पुणे. पृ. 346)

 सुफी  कट्टरपंथीयांच्या रडारवर

इथले संगीत व सूफी तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ हा कट्टरपंथी इस्लामी अतिरेक्यांना सगळयात खटकणारा मुद्दा आहे. त्यामुळेच या दर्ग्यावर हल्ले केले जातात. या दर्ग्यात ज्याप्रमाणे कव्वाल्यांमधून संगीताचे जतन केले जाते, तसेच इथे मोठे ग्रांथालय आहे. त्या ग्रांथालयात तत्त्वज्ञानविषयक जुने-पुराणे विविध ग्रंथ सांभाळून ठेवले आहेत.

धार्मिक श्रध्दांबरोबरतच संगीत कला तत्त्वज्ञानाचे केंद्र म्हणून हा दर्गा प्रसिध्द आहे. ज्ञानाची-कलेची ही सगळी समृध्द अशी परंपरा नष्ट करणे हे कट्टरपंथीय इस्लामचे पहिले उद्दीष्ट आहे. भारतात शेकडो वर्षे मंदिरे-शिल्पकला-ग्रंथ यांच्यावर हल्ले होत गेले. इस्लामधील सुफी हेसुध्दा कट्टरपंथीयांच्या रडारवर आलेले आहेत. त्यांच्यावर कठोर हल्ले केले जात आहेत. आणि नेमकी हीच जागतिक चिंतेची बाब आहे.

जगभरात विविध देशांतील तत्त्वज्ञान, कला, शिल्प, संगीत याबाबत एक मोठया प्रमाणावर जनजागृती होताना दिसत आहे. जगभरचे संशोधक-अभ्यासक आपल्या आपल्या देशाच्या सीमा ओलांडून इतर देशांतील अशा बाबींचा अभ्यास करताना दिसून येत आहेत. अभ्यासकांप्रमाणे जगभरचे पर्यटकही अशा धार्मिक श्रध्दा ठिकाणांना आवर्जून भेट देतात. तेथील परंपरा, श्रध्दा समजून घेतात. तत्त्वज्ञानाची तोंडओळख करून घेतात. युरोपमध्ये अशा पर्यटनासाठी मोठया प्रमाणात सामान्य लोक उत्सुक आहेत.

जेव्हा दाता दरबार दर्ग्यावर हल्ला होतो, तेव्हा त्याची वेदना जगभर उमटते, त्याचे कारण हेच आहे. जगभरच्या सामान्य श्रध्दाळू रसिक कलावंत वर्गाला अशा ठिकाणांबाबत आस्था वाटत असते. भौतिक प्रगती साधलेला एक बऱ्यापैकी मध्यमवर्ग आता अशा बाबींकडे वळला आहे. त्यासाठी तो पर्यटक म्हणून जगभर फिरतो आहे. त्याला जगभरातील कला, संस्कृती, धार्मिक समजुती डोळसपणे समजून घेण्यात रस आहे. त्याचा नव्याने अन्वयार्थ लावण्यात आपली बुध्दी तो खर्च करू पाहतो.

तालिबानी वृत्तीचा नायनाट झाला पाहिजे

पाकिस्तानात यापूर्वी कराचीचे कव्वाल अमजद साबरी यांची हत्या करण्यात आली, शाहबाज कलंदर दर्ग्यात बाँबस्फोट करण्यात आले आणि आता दाता दरबार दर्ग्यात बाँबस्फोट झाले. याचा आपण कडाडून निषेध क्केला पाहिजे. या तालिबानी वृत्तीचा नायनाट केला गेला पाहिजे.

पाकिस्तानात संगीतावर मोठे हल्ले होत आहेत. यामुळे संगीतकार, गायक, रसिक, वादक कलाकार हे भयभीत, चिंताग्रास्त झाले आहेत. पाकिस्तानातील संगीतावरील हल्ल्यांचा विषय घेऊन जवाद शरीफ नावाच्या तरुणाने 'इंडस ब्लूज' नावाचा एक सुंदर माहितीपट तयार केला. सध्या विविध जागतिक चित्रपट महोत्सवात तो दाखवला जात आहे. त्याला कैक पुरस्कारही मिळाले आहेत. सिंधू नदीच्या खोऱ्यात जुनीपुराणी वाद्ये कशी संपुष्टात येत चालली आहेत, वादकांना किमान प्रतिष्ठा तर सोडाच, खायलाही मिळायची मारामार आहे, शिवाय त्यांच्यावर हल्ले होत आहेत, वाद्ये जाळून टाकली जात आहेत. सध्या आख्ख्या पाकिस्तानात एकच सारंगी वादक जिवंत शिल्लक राहिला आहे. अशा 24 दुर्मीळ वाद्यांपैकी 9 वाद्यांचा वेध या माहितीपटात घेतला आहे.

दाता दरबार दर्ग्यावरील हल्ला हा भारतीयांसाठी चिंतेचा विषय यामुळे आहे की सूफी तत्त्वज्ञान, संगीत, मोगल स्थापत्य या सगळया गोष्टी, ज्यावर हे हल्ले होत आहेत, हे सगळे आपल्याशी निगडित आहे - नव्हे, आपल्यात पूर्णपणे मिसळून गेले आहे. इतकेच नव्हे, तर आपल्या संस्कृतीचे, परंपरेचे ते एक अभिन्न असे अंग बनून आहे. त्यामुळे हा हल्ला स्वाभाविकच आपल्यावरचाच हल्ला असतो.

कराचीमधील सिंधी संस्कृती, पंजाबातील संस्कृती या भारतापासून वेगळया काढताच येत नाहीत, हे कट्टरपंथीय इस्लामचे खरे दुखणे आहे. ज्या भारतीयांबद्दल ते द्वेष करतात, त्या भारतीय परंपरेची पाळेमुळे या प्रदेशातील इस्लाममध्ये खोल रुजलेली आहेत. ती उपटून कशी काढणार?

जगाला असे वाटत होते की इस्लामने भारतावर आक्रमण केले आणि येथील कित्येक लोकांना धर्मांतर करायला लावून मुसलमान के ले. वरवर हे खरेही आहे. जगात इंडोनेशियाच्या खालोखाल मुस्लीम लोकसंख्या भारतात आहे. इतके इतर लोक बाहेरून येणे शक्यच नाही. तेव्हा भारतातील मुसलमान हे मूळचे इथलेच आहेत. आता हळूहळू काळावर मात करून या प्रदेशातील इस्लामवरच येथील समृध्द संस्कृती, परंपरा यांचा प्रभाव पडल्याच्या खुणा स्पष्ट दिसत आहेत. त्यांना नष्ट करता येणे शक्य नाही, हे कट्टरंपंथीयांनी ओळखले पाहिजे. भारत आता सार्वभौम प्रजासत्ताक लोकशाही देश आहे. आधुनिक देश आहे. येथे आता मध्ययुगीन कालखंडातील धर्मांधपणा शक्य नाही. पण पाकिस्तानसारखा देश, जो गेली 7 दशके  चाचपडतच आहे, तेथे हे हल्ले अजून चालूच आहेत. हडप्पा, मोहेंजदरो यासारख्या प्रचीन संस्कृतीची ओळख सांगणारी शहरे या भागात सापडली. सिंधू नदीचा, समृध्द संस्कृतीचा हा प्रदेश. कट्टरपंथीयांना येथील खाणाखुणा नष्ट करण्याची दुष्टबुध्दी होते आहे.

केवळ भारतातीलच नव्हे, तर जगभरच्या पत्रकारांनी, लेखकांनी या हल्ल्यांचा कडक निषेध केला आहे. 

श्रीकांत उमरीकर

9422878575

जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद.