श्रमदानातून पाणीप्रश्न सोडविणारे वरोती खुर्द

विवेक मराठी    20-May-2019
Total Views |


पुणे जिल्ह्यातील अत्यंत दुर्गम व डोंगराळ अशा वेल्हे तालुक्यातील पासली खोर्‍यामध्ये वेळवंडी नदीच्या उगमापासून काही अंतरावर वरोती खुर्द हे छोटे गाव वसलेले आहे. वेल्हे तालुका हा पुणे जिल्ह्यातील तेरा तालुक्यांपैकी सर्वात मागास व अविकसित तालुका आहे. तालुक्यातील पश्चिमेकडील डोंगराळ भागात तोरणा व राजगड या किल्ल्यांच्या परिसरात संपर्काचे कोणतेही साधन नाही. या भागात अद्याप कोणत्याही मोबाइल फोनला रेंज नाही. देशभरात सध्या फाईव्ह जीची चर्चा चालू झाली आहे, अनेक ठिकाणी फोर जी आणि थ्री जी मोठ्या प्रमाणात उपलब्धही झाले आहे. परंतु हा भाग मात्र अद्यापही टू जीसाठी झगडतो आहे. या भागातील दळणवळणाचे एकमेव साधन म्हणजे मुक्कामी एसटीच आहे. त्याही मोजक्याच गावांपर्यंत जातात. वरोती खुर्द गावात गेल्या 20 वर्षांहून अधिक काळापासून येणारी मुक्कामी एसटी सध्या गेल्या वर्षापासून बंद आहे. कारण काय, तर संख्येअभावी एसटी महामंडळाला ही फेरी परवडत नाही. गावातील तरुण वर्ग मोठ्या संख्येने रोजगारासाठी पुण्या-मुंबईत स्थलांतरित झालेला आहे. एकूण 55 कुटुंबे असलेल्या या गावातील घरटी एक पुरुष माणूस शहराकडे स्थलांतरित झालेला आहे. गावात फक्त स्थलांतरित पुरुषांच्या कुटुंबातील वृद्ध माणसे, बायका व मुले असतात.

वेल्ह्यामध्ये पावसाळ्यात सरासरी 2000 ते 2500 मि.ली. पाऊस पडतो आणि तरीही उन्हाळ्यात डोंगराळ भागातील वरोतीसारख्या अनेक गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई भासत असते. दुर्दैव म्हणजे ही परिस्थिती वर्षानुवर्षे बदलत नाही. म्हणूनच शासनाची वाट न पाहता जी गावे स्वतः पाणीप्रश्न सोडविण्यासाठी धडपड करायला पुढे येत आहेत, अशा भोर व वेल्हे तालुक्यातील गावांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका ज्ञान प्रबोधिनीने घेतली आहे.

पाणीप्रश्नाची पार्श्वभूमी

कोलंबी ग्रामपंचायतीमधील वरोती खुर्द, कोलंबी, वरोती बुद्रुक व नाळवट या चार गावांसाठीची संयुक्त नळपाणी योजना सुमारे 25 वर्षांपूर्वी झाली. कोलंबी गावाच्या विहिरीतून या योजनेसाठी पाणी घेण्यात आले. सुमार दर्जाची असणारी ही नळपाणी योजना सुरुवातीला जेमतेम काही वर्षे चालली व नंतर बंद पडली. पुन्हा काही वर्षांनी गावासाठी नळपाणी दुरुस्तीचा काही शासकीय निधी आला, त्यातून ती कशीबशी चालू झाली. दरम्यानच्या काळात वाढलेल्या लोकसंख्येला हे पाणी अपुरे पडू लागले. त्यामुळे वरोती खुर्द आणि कोलंबी गावांना आळीपाळीने थोडाथोडा वेळ पाणी सोडले जाते. हा पाणीपुरवठा डिसेंबर अखेरपर्यंतच पुरतो. जानेवारीपासून आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा केला जातो. यामुळे या दोन्ही गावांना कसेबसे मार्च अखेरपर्यंत पाणी पुरते. गावातील एकमेव सरकारी विहिरीचे पाणी जानेवारीत संक्रांतीपासून कमीकमी व्हायला सुरुवात होते व होळीच्या आसपास मार्च महिन्यात पूर्णपणे आटते. मार्चनंतर मात्र पाण्याची भयाण परिस्थिती असते. एप्रिल व मे हे उन्हाळ्यातील दोन महिने पाण्यासाठी पायपीट सुरू होते. माणसांच्या बरोबरीने जनावरांसाठीही पाणी आवश्यक असल्यामुळे मिळेल तिथून आणि मिळेल त्या गुणवत्तेचे पाणी आणावे लागते. गावापासून दीड-दोन किलोमीटर अंतरावर असणार्‍या वेळवंडी नदीतून पाणी आणण्यात जवळपास संपूर्ण दिवस खर्ची घालावा लागत असे.

नदीपात्रातील विहिरीचा पर्याय

उन्हाळ्यात नदीपात्रात ज्या ठिकाणी छोटा झरा असतो, त्यास स्थानिक भाषेत डवरा म्हटले जाते. अशा डवर्‍याच्या जागी मोठी विहीर घेण्याचे गावाने ठरविले. यासाठी गावाने माजी सरपंच विलास गांडले यांच्या पुढाकाराने सुरुवातीला पाचशे रुपयांची घरटी वर्गणी गोळा केली. विहिरीच्या जागेची मशीनद्वारे स्वच्छता केली व भूसुरुंग उडवून मे 2015मध्ये कामास सुरुवात केली. शहरात मोलमजुरीचे काम करून पैसे मिळविणार्‍या निवडक अकरा जणांकडून प्रत्येकी एक हजार रुपये वर्गणी काढली. परंतु एकूण सर्व कामाच्या दृष्टीने हे सर्व पैसे अगदीच तुटपुंजे होते. त्यामुळे ग्रामस्थांनी ज्ञान प्रबोधिनीचे कार्यकर्ते अजित देशपांडे यांच्याशी संपर्क साधला व विहिरीचे काम शेवटापर्यंत नेण्यासाठी मदत मागितली. प्रबोधिनी ही मुळात शैक्षणिक संस्था असल्याने प्रबोधिनीने थेट आर्थिक मदतीचे आश्वासन न देता मदत उभी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

दरम्यानच्या काळात प्रबोधिनीने या सर्व कामाचे अंदाजपत्रक बनविले. विहीर पुरेशी रुंद करणे व खोल करणे, तसेच विहिरीभोवती संरक्षक कठडा बांधून पाणी काढण्यासाठी रहाट बसविणे या सर्वांसाठी एकूण सुमारे नऊ लाख रुपयांचा खर्च येणार होता. प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी असणार्‍या प्रमोदराव सडोलीकर यांनी त्यांच्या दहावीच्या बॅचतर्फे जास्तीत जास्त निधी जमविण्याची तयारी दर्शविली. अतिरिक्त निधीसाठी रोटरी क्लबच्या काही सदस्यांशी संपर्क साधून त्यांच्याबरोबर प्रबोधिनीत बैठक घडवून आणली. माजी विद्यार्थी सुनील जगताप, अजित कानेटकर व प्रमोद सडोलीकर यांनी वरोती खुर्द गावाला प्रत्यक्ष भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली व लगेचच निधी संकलनाला सुरुवात केली. 14 माजी विद्यार्थ्यांची एकूण 3 लाख रुपये वर्गणी जमली. यातून विहिरीच्या खोदकामाचा मोठा टप्पा मे 2016मध्ये पूर्ण करता आला. तरीही खोदकाम पूर्ण झाले नाही, कारण विहिरीत मोठ्या प्रमाणावर पाणी साठत होते. पाणी पुन्हा पुन्हा उपसून सुरुंग लावले जात होते. त्यामुळे वेळ लागत होता.

विहीर बांधकामाचा अंतिम टप्पा

विहिरीच्या एकूण कामासाठी ग्रामस्थांची श्रमदानाची मोलाची साथ असली, तरी उपलब्ध असणारा निधी पुरणारा नाही हे एकीकडे लक्षात येत होते. दुसरीकडे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी ग्रामस्थांचा रेटा होता. सुदैवाने पर्सिस्टंट फाउंडेशनची आर्थिक मदत वेळेवर मिळाली आणि उर्वरित काम मार्गी लागले. त्यातून वर्ष 2017मध्ये एप्रिल व मे महिन्यात विहिरीचे खोदकाम पूर्ण करण्यात आले. आता या विहिरीची खोली 33 फूट व रुंदी 30 फूट इतकी झाली आहे. या विहिरीची पाणी साठवण क्षमता आता तब्बल साडेसहा लाख लीटर इतकी झाली आहे. खोदकाम पूर्ण झाल्यावर लगोलग संरक्षक कठडा बांधण्याचे कामही 2018च्या उन्हाळ्यात करण्यात आले. पाणी काढण्यासाठी रहाटही बसविण्यात आले. अलीकडेच पर्सिस्टंट फाउंडेशनच्या अध्यक्षा सोनाली देशपांडे यांच्या हस्ते या विहिरीचे उद्घाटन करण्यात आले. आता यंदाच्या उन्हाळ्यात सर्वत्र दुष्काळाची चर्चा चालू असली, तरी या गावात मात्र आत्ता मे महिन्यात पुरेसे पाणी उपलब्ध आहे, हे विशेष नमूद करण्यासारखे आहे.

विहीर बांधकाम करीत असलेल्या जागेचे बक्षीसपत्र शासनाच्या नावे करण्यासाठी मधल्या टप्प्यात मोठा पाठपुरावा करण्यात आला. मूळ जमीनमालक विश्वास केळकर यांनी कोणतीही खळखळ न करता बक्षीसपत्र देऊ केले. प्रत्यक्ष शासन दरबारी नोंदणीसाठीच बराच पाठपुरावा करावा लागला. अखेरीस विहिरीच्या दोन गुंठे जागेचे शासनाच्या नावे बक्षीसपत्र झाले. यामुळे ही विहीर आता खर्‍या अर्थाने सार्वजनिक व प्रत्यक्षात शासनाच्या मालकीची असणार आहे.

ग्रामस्थांचा पुढाकार व त्याला मिळालेली शहरवासीयांची साथ यातून या विहिरीचे बांधकाम आता जवळपास पूर्ण झालेले आहे. सुप्रसिद्ध जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा यांनी मे 2016मध्ये प्रबोधिनीच्या वेल्हे तालुक्यातील पाणीविषयक कामांना भेट दिली. त्यात त्यांनी वरोतीच्या चालू असणार्‍या विहिरीच्या कामासही भेट दिली. विहिरीतील दगडांचा प्रकार, त्यामध्ये असणार्‍या चिरा/भेगा याविषयी डॉ. राजेंद्रसिंह यांच्या अभ्यासानुसार, वरोती खुर्दमधील या विहिरीला कधीही पाणी कमी पडणार नाही असा त्यांनी निर्वाळा दिला. त्यांनी ग्रामस्थांची एक छोटी बैठकही घेतली व ग्रामस्थांच्या पुढाकाराचे कौतुकही केले.

गेल्या दोन वर्षांत वरोती खुर्द या गावात श्रमदानातून तीन वनराई बंधारे घालण्यात आले. यात 120 महाविद्यालयीन युवक व आयटी कंपनीतील 125 अभियंते सहभागी झाले होते. विहिरीचा पाणीसाठा वाढण्यास, तसेच पावसाळ्यानंतरचे दोन ते तीन महिने जनावरांसाठी पाणी उपलब्ध होण्यासही याचा उपयोग निश्चितच झाला.

नळपाणी योजनेची जोड

विहिरीतून गावापर्यंत पाइपलाइन टाकून गावामध्ये पाण्याची एक साठवण टाकी बांधून त्यात पाणी साठविणे हा अंतिम टप्प्या यंदाच्या वर्षी पूर्ण होत आहे. यामुळे दीड किलोमीटर विहिरीवरून पाणी आणण्याचे ग्रामस्थांचे कष्ट वाचणार आहेत. या नळपाणी पुरवठा योजनेसाठी रोटरी क्लब ऑफ कोथरूड यांच्या माध्यमातून इंजीनिअर्स विदाउट बॉर्डर्स या संस्थेतर्फे अर्थसाहाय्य उपलब्ध झाले आहे. पाण्याच्या साठवण टाकीचे बांधकाम व पाइपलाइन अंथरण्याचे कामही पूर्ण झाले झाले आहे.

पाणीटंचाई निवारणाचे एकेका गावातील काम किमान तीन वर्षे चालते. प्रबोधिनीचे या परिसरात असलेले संस्थात्मक अस्तित्व किमान काही दशकांचे आहे. अनेक कार्यकर्त्यांचे स्थानिक ग्रामस्थांशी असलेले वैयक्तिक पातळीवरील नातेदेखील अनेक वर्षांचे आहे. त्याचे संचित म्हणूनच वरोती खुर्दच नव्हे, तर पाणीटंचाई असणार्‍या परिसरातील अनेक गावांमधील ग्रामस्थ पुढे येत आहेत. श्रमदानात हिरिरीने सहभाग घेत आहेत. वेळप्रसंगी लोक वर्गणीदेखील काढताहेत. त्या आधारेच प्रबोधिनीने या डोंगराळ गावात आतापर्यंत किमान 18 गावांतून विहिरींची कामे पूर्ण केली आहेत. या गावातील लोकांना आता पाणीटंचाई निवारणासाठी शासकीय उंबरठे झिजवावे लागणार नाहीत. तालुक्याच्या पुढार्‍यांनाही आता या गावात पाणीप्रश्न सोडविण्याचे आश्वासन देऊन निवडणुकांसाठी मते मागता येणार नाहीत. अशी ही स्वतःच्या हिकमतीवर पाणीप्रश्न सोडवू पाहणार्‍या निवडक गावांमध्ये चालणारी जलस्वराज्याची आगळीवेगळी व अनुकरणीय चळवळ आहे!

- विवेक गिरिधारी