सिंदबाद फडणवीस आणि लिलिपुट विरोधक

विवेक मराठी    24-May-2019
Total Views |

 ****देविदास देशपांडे****

महाराष्ट्रातील राजकारणाच्या गणितात देवेंद्र फडणवीस हा ‘हातचा एक’ अंक बनला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांची वाटचाल सुरू आहे. निवडणुकीच्या निकालात त्याचेच प्रतिबिंब पडले आहे. ‘सेक्युलर’ ब्रिगेडला 2014च्या लोकसभा निवडणुकीत केवळ नरेंद्र मोदींच्या मोहिमेचा सामना करावा लागला होता. मात्र 2019मध्ये महाराष्ट्रातील मतदार मोदी व फडणवीस अशा दोन किमयागारांच्या कामगिरीने दिपलेले आहेत.

 

 ही गोष्ट गेल्या महिन्यातील. एक एप्रिल रोजी, म्हणजे जागतिक मूर्ख दिनी पुण्यातील काँग्रेस कार्यकर्ते पक्षाचा प्रचार करत होते आणि लोकांकडे मतांची याचना करत होते. अर्थात कुठल्याही निवडणुकीच्या दृष्टीने हे एक सामान्य दृश्य होते, त्यात विशेष काही असायचे काही कारण नव्हते. फक्त एक अपवाद वगळता - या प्रचारकांकडे उमेदवारच नव्हता!

होय, विश्वास बसणार नाही अशीच ही परिस्थिती होती. मात्र खरोखर सतराव्या लोकसभेच्या निवडणुकांचा तारखा जाहीर झाल्यावर तब्बल 20 दिवस काँग्रेसकडे उमेदवाराचा पत्ताच नव्हता! त्यामुळे उमेदवाराविनाच प्रचार करण्याची वेळ काँग्रेसवर आली होती. अखेर कसोशीने प्रयत्न केल्यानंतर काँग्रेस श्रेष्ठींना लोकसभा निवडणुकीसाठी वरिष्ठ नेते व माजी आमदार मोहन जोशी यांच्या रूपाने उमेदवार सापडला. कसबा पेठ मतदारसंघातील पाच वेळचे आमदार व राज्याचे विद्यमान कॅबिनेट मंत्री गिरीश बापट यांच्याशी त्यांची लढत होती. या लढतीचा परिणाम काय होईल, हे कोणालाही न सांगता कळण्यासारखे होते.

काँग्रेसच्या उमेदवारांची ही वानवा एकट्या पुण्यापुरती नव्हती. राज्यातील बहुतेक जागांवर हीच परिस्थिती होती. निवडणुकीत भाग घेणे म्हणजे हात दाखवून अवलक्षण करून घेणे होय, याचा अंदाज मुरलेल्या नेत्यांना आला होता. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात न उतरणेच श्रेयस्कर, हे बहुतेकांनी ओळखले होते. म्हणूनच सांगलीत माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील असो किंवा नांदेडमध्ये खुद्द प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण असो, कोणीही लढण्यास तयारच नव्हते. ही अनिच्छा सर्वत्र दिसत होती. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने 2014मधील निवडणूक पराभूत मानसिकतेने लढविली होती. या वेळी तर त्यांची लढण्याचीही तयारी नव्हती. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सेनापतीपासून शिपायांपर्यंत सगळेच गळपटलेले दिसत होते. लढतीची ही भीती अनाठायी नव्हती, हे निवडणुकीच्या निकालाने स्पष्ट केले आहे.

लोकसभेची मागील निवडणूक ही मोदी लाट म्हणून दर्शविण्यात आली होती. त्या वेळी काँग्रेसचे केवळ दोन उमेदवार महाराष्ट्रातून निवडून आलेले होते - अशोक चव्हाण आणि हिंगोलीतील राजीव सातव. या दोघांनाही 2019च्या रणसंग्रामातील धूळधाणीचा बहुधा अंदाज आला असावा. म्हणूनच त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत लढणे टाळण्याचा प्रयत्न केला. पक्षश्रेष्ठींनी दबाव आणल्यामुळे चव्हाणांना नांदेडमध्ये नामुश्कीला सामोरे जावे लागले, तर राजीव सातव यांनी गुजरात काँग्रेसचे प्रभारी असल्याचा बहाणा करून आपली इभ्रत सांभाळली.

मुळात काँग्रेस-राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष या निवडणुकीत नव्हतेच. त्यांची आघाडीही कागदावरच होती. दुष्काळात तेरावा म्हणून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या ध्वनिफिती सोशल मीडियावर फिरल्या. आपण राजीनामा देण्याच्या विचारात असल्याचे ते बोलत असल्याचे लोकांनी ऐकले. उमेदवारांच्या निवडीबद्दल पक्षश्रेष्ठी आपले ऐकत नसल्याची तक्रार त्यांनी केली. कोणीही माझे ऐकत नाही आणि मी राजीनामा देण्याच्या मनःस्थितीत आहे, असे चव्हाण यांनी म्हटले आहे. ही ध्वनिफीत आपली असल्याचे चव्हाण यांनी तोंडदेखलेही नाकारले नाही.

काँग्रेसचा सहयोगी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था तर त्याहून वाईट होती. काँग्रेसला किमान सक्षम नेता नसण्याची सबब तरी होती. मात्र महाराष्ट्राचे सर्वात ज्येष्ठ व जाणते नेते म्हणविणार्‍या 78 वर्षीय शरद पवारांच्या पक्षाची तर भलतीच तारांबळ उडाली. पवारांच्या कोलांटउड्यांनी जनतेचे नुसते मनोरंजनच झाले नाही, तर त्यांच्या पारंपरिक मतदारांमध्येही संभ्रम उडाला. पवार यांनी आधी लोकसभेची निवडणूक न लढविण्याचे जाहीर केले होते. मात्र नंतर गुडघ्याला बाशिंग बांधून ते तयार झाले. मी माढा मतदारसंघातून निवडणूक लढवावी पक्ष कार्यकर्त्यांची इच्छा आहे, असा त्यांचा दावा होता.

त्यानंतर अजित पवारांनी आणि पवार कुटुंबीयांनी मावळ मतदारसंघाची उमेदवारी प्रतिष्ठेची केली. पवार कुटुंबीयांनी त्यांच्या उमेदवारीवर इतका घोळ घातला की एक वेळ मुलायमसिंह यादव यांच्यासारखी पवार कुटुंबातही बंडखोरी होते की काय, असे वाटत होते. मात्र पार्थला उमेदवारी देऊन पवारांनी ते संकट टाळले. अर्थात त्यांना या घोळाची जबरदस्त किंमत द्यावी लागली, हे निकालाने दाखवून दिले.

पराभवाची भीती हेही माढ्यातून पवारांनी उभे न राहण्याचे एक कारण होते. वातावरणातील बदल जाणवल्यामुळेच पवार यांनी पाय मागे घेतले, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. प्रत्यक्ष निकालाने पवारांची भीती व मुख्यमंत्र्यांचे वर्णन दोन्ही सार्थ केले.


पवारांप्रमाणेच छगन भुजबळ, गणेश नाईक, दिलीप वळसे पाटील इत्यादी अनेक नेत्यांनी याचमुळे निवडणुकीत भाग घेतला नाही.

महाराष्ट्राच्या राजकारणात चार दशकांहून अधिक काळ तथाकथित ‘धर्मनिरपेक्ष’ राजकारणाचा तोरा मिरविणार्‍या दोन प्रमुख पक्षांची ही अवस्था होती. आपल्या दुबळेपणाची या पक्षांमध्ये असलेली जाणीव इतकी जबरदस्त होती की काँग्रेस व राष्ट्रवादी दोघांनी तब्बल 56 पक्ष, संघटना व गटांना आपल्यासोबत घेतले होते. यातील अनेक गट तर निवडणुकीत उतरणारही नाहीत. देश चालविण्यासाठी 56 पक्षांची नव्हे, तर 56 इंचाच्या छातीची गरज आहे, अशी फडणवीस यांनी त्यांची उडविलेली खिल्ली प्रत्यक्षात उतरली.

राज ठाकरे नावाचा बागुलबुवा

अशा प्रकारे गलितगात्र झालेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीने आपला लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुपारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिली होती. ती त्यांनी इमाने-इतबारे बजावली. ‘नरेंद्र मोदींना पाडा’ अशी तबकडी वाजवत त्यांनी राज्यात ठिकठिकाणी सभा घेतल्या. मोदी-शहा जोडीला राजकीय क्षितिजावरून हटविण्याचे आवाहन केले होते. ‘लाव रे तो व्हिडिओ’ हा त्यांचा उर्मट संवाद लिबरल माध्यमांनी उचलून धरला. पुलवामा हल्ला अजित डोवाल यांनीच घडविला, असा आरोप करण्यापर्यंत त्यांची मजल गेली.

त्यांच्या सभांना प्रचंड गर्दी झाली. राज्यातच नव्हे, तर एरवी गुंड म्हणून त्यांची संभावना करणार्‍या माध्यमांनीही त्यांची हवा केली. मात्र राज ठाकरे किंवा मनसे नावाचा हा केवळ बागुलबुवा होता, हे निकालांनी स्पष्ट केले. राज यांच्या सभेला होणारी गर्दी ही सेक्युलर पक्षांच्या कार्यकर्त्यांचीच होती. मोदी, शहा व भाजपाच्या विरोधात त्यांना जे आपल्या नेत्यांकडून ऐकायचे होते, पाहायचे होते ते त्यांना ऐकायला वा पाहायला मिळत नव्हते. ती गरज राज ठाकरे भागवत होते, म्हणून ही टोळकी त्यांना ओरडून प्रतिसाद देत होते. त्यांच्या या चित्कारांना भाजपाविरोधी मतांची हवा, असा समज काही जणांनी करून घेतला आणि यथावकाश तो फुगा फुटला. ‘दिल बहलाने के खयाल अच्छा है’ या न्यायाने त्यांच्या सभांनी प्रचारात रंगत आणली आणि काही काळ का होईना, चुरस निर्माण केली, हे मात्र मान्य करायला हवे. एरवी ही निवडणूक भयंकर एकतर्फी झाली होती.

याउलट वंचित बहुजन विकास आघाडी नावाच्या आघाडीने आपले काम चोख बजावले. तिने केलेल्या मतविभाजनामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचे साधारण डझनभर उमेदवार पडल्याचे प्राथमिक आकडेवारीतून दिसते. अर्थात वंचित बहुजन आघाडीने फक्त काँग्रेस-राष्ट्रवादीची मते खाल्ली, बाकी लाभाच्या नावाने आघाडीकडे केवळ औरंगाबादचीच जागा आली. या आघाडीचे नेते डॉ. प्रकाश आंबेडकर हे सोलापूर आणि अकोला असे दोन्ही ठिकाणी पराभूत झाले.

मुंबईतल्या जागांवर संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले होते. गेल्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा युतीने मुंबईतील सहाही जागा जिंकल्या होत्या. या जागा टिकविणे हे युतीसमोरचे सर्वात मोठे आव्हान होते. हे आव्हान युतीने पेलल्याचे पाहायला मिळाले. या सहाही जागांवर शिवसेना-भाजपाचे उमेदवार विजयी झाले आहेत.

फडणवीस नावाचा ‘हातचा एक’

वास्तव हे आहे की महाराष्ट्रातील राजकारणाच्या गणितात देवेंद्र फडणवीस हा ‘हातचा एक’ अंक बनला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांची वाटचाल सुरू आहे. निवडणुकीच्या निकालात त्याचेच प्रतिबिंब पडले आहे. ‘सेक्युलर’ ब्रिगेडला 2014च्या लोकसभा निवडणुकीत केवळ नरेंद्र मोदींच्या मोहिमेचा सामना करावा लागला होता. मात्र 2019मध्ये महाराष्ट्रातील मतदार मोदी व फडणवीस अशा दोन किमयागारांच्या कामगिरीने दिपलेले आहेत. त्यांच्यासमोर इतरांची काय मातब्बरी? आपल्या चतुर राजकीय खेळी, सक्षम प्रशासकीय कौशल्य, असंख्य लोकाभिमुख योजना आणि भाजपा शासनाचे दिसून येणारे परिणाम यांमुळे फडणवीस यांनी स्थानिक संस्थांच्या निवडणुकांपासून संसदीय निवडणुकांपर्यंत विरोधकांना चारीमुंड्या चित केले आहे. त्यांच्यावर मात करण्याचा कोणताही मार्ग विरोधकांकडे दिसत नाही. निरनिराळ्या नावांखाली अनेक मोर्चे काढून राज्यात असंतोष असल्याचे चित्र उभे करण्यात आले, तरी त्यांनी खंबीरपणा सोडला नाही. त्यांनी भाजपाचा गड केवळ राखला नाही, तर त्याचा विस्तारही केला. जातीपातींच्या नावावर फूट पाडून त्याचा राजकीय लाभ करून घेण्याचा प्रत्येक प्रयत्न त्यांनी हाणून पाडला आहे.

फडणवीस यांचे सर्वाधिक कौशल्य शिवसेनेशी केलेल्या युतीत दिसून आले. पाच वर्षांच्या काळात शिवसेनेने मित्रपक्षाऐवजी विरोधक म्हणूनच जास्त काम केले. तरीही हिंदू मतांचे विभाजन टाळण्याच्या दृष्टीने शिवसेनेशी जवळीक केली. आज त्याचे फलित सर्वांसमोर आहे. शिवसेनेशी संधान साधण्याबरोबरच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या तरुण पिढीला आपल्या बाजूने वळविण्यासाठीही फडणवीस जबाबदार होते. मग ते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर असो किंवा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र सुजय असो, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्ष भारती पवार असो किंवा काँग्रेस नेते प्रवीण छेडा असो.

खरे तर गेल्या साडेचार वर्षांमध्ये फडणवीस यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. मग तो दुष्काळ असो वा शेतकर्‍यांच्या आत्महत्या, मराठा समाजाचे आंदोलन असो वा आपत्ती असो. मात्र फडणवीस यांनी आपले बुद्धिकौशल्य वापरून त्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला. तसेच विविध कल्याणकारक योजनांच्या माध्यमातून जनतेच्या जीवनात थेट बदल घडवून आणला. त्यातून त्यांनी जनतेचा विश्वास संपादन केला. तसेच जिथे पक्षाचे बळ कमी असेल तिथे अन्य पक्षांमधून बड्या नेत्यांना आयात करून आपले बळ वाढविले. फडणवीस यांनी झंझावाती 75 प्रचारसभा घेऊन राज्य ढवळून काढले. याच्या परिणामी शरद पवारांपासून ते काँग्रेसच्या बड्या नेत्यांनाही आपापल्या मतदारसंघाच्या बाहेर फिरता आले नाही. विरोधकांच्या प्रचार मोहिमेची स्थिती वाईटाकडून अधिक वाईटाकडे होत राहिली.


आघाडीचा धुव्वा

याचाच परिणाम म्हणून भाजपा-सेना युतीने आघाडीचा अक्षरशः धुव्वा उडविला. महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48पैकी तब्बल 41 जागा जिंकून भाजपा-शिवसेना युतीने घवघवीत यश मिळविले. राज्यात काँग्रेसचा आजवरच्या इतिहासातील हा सर्वात दारुण पराभव ठरला. अगदी आणीबाणीनंतरच्या निवडणुकीनंतरही पक्षाला इतके वाईट दिवस आले नव्हते. पक्षाच्या वाट्याला केवळ एक जागा आली. राष्ट्रवादी काँग्रेसला 4 जागा मिळाल्या, तरी गेल्या वेळेपेक्षा एक जागा कमीच झाली आहे. युवा स्वाभिमानी पक्षाने 1 आणि एमआयएमने 1 जागा जिंकली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा हा विजय आम्ही विधानसभेतही पुढे नेऊ, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. तो युतीसाठी आशादायक आहे.

या निवडणुकीत पाडाव झालेल्या दिग्गजांची नावे पाहिली, तरी जनतेच्या मनात काँग्रेस-राष्ट्रवादीबद्दल किती जबरदस्त नाराजी होती, हे लक्षात येते. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना भाजपाच्या प्रताप पाटील चिखलीकर यांनी 50 हजारांपेक्षा जास्त मतांनी पराभूत केले. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकमार शिंदे भाजपाच्या जयसिद्धेश्वर स्वामी यांच्याकडून सोलापुरात दारुणरीत्या पराभूत झाले. तसेच माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनाही त्याच वाटेने जावे लागले. काँग्रेसला जी एकमेव जागा मिळाली, ती चंद्रपूरमध्ये. तिथे भाजपाचे केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांना सुरेश (बाळू) धानोरकर यांनी पराजित केले. मात्र धानोरकर हे अलीकडेच शिवसेनेतून ऐन वेळी काँग्रेसमध्ये गेले होते, हे लक्षात घेतले तर हे यशही कितपत निर्भेळ म्हणावे याची शंकाच आहे.

तीच गत राष्ट्रवादीची. सातारा मतदारसंघात उदयनराजे भोसले यांचा विजय गृहीतच धरला जातो. तसेही राजेंचे व्यक्तिमत्त्व पक्षाच्या चौकटीत बसणारे नाही. त्यामुळे राष्ट्रवादीला त्यांच्या यशाचे श्रेय घेता येणार नाही. पार्थ पवार यांच्या रूपाने शरद पवार यांच्या घराण्याला पहिल्यांदाच पराभवाची चव चाखायला मिळाली आहे. मावळमधून शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांच्याकडून ते पराभूत झाले. दुसरीकडे पवार यांनी आपली कन्या सुप्रिया सुळे यांचा बारामतीचा गड कसाबसा राखला. मात्र त्यासाठी त्यांना जी मेहनत घ्यावी लागली, त्यावरून जुन्या खोंडांची सद्दी संपत आल्याचा स्पष्ट संदेश मतदारांनी दिला. सुप्रिया यांना विजयासाठी जंग जंग पछाडावे लागले. कांचन कुल यांनी त्यांना निकराची लढत दिली.

देशपातळीवर शेतकर्‍यांचे नेते अशी ओळख असलेल्या राजू शेट्टी यांचा पराभव हा असाच एकाच वेळेस आनंद आणि दु:खमिश्रित होता. गेल्या वेळेस भाजपा-सेना युतीबरोबर असलेल्या शेट्टी यांनी निव्वळ वैयक्तिक कारणापायी ते नाते संपविले आणि साखरसम्राटांशी संबंधित काँग्रेस-राष्ट्रवादीशी घरोबा करणे सर्वसामान्य शेतकर्‍यांना रुचले नाही. त्यामुळे हातकणंगले विधानसभा मतदारसंघात 44 हजार मतांनी त्यांचा पराभव झाला. संपूर्ण प्रचारात शेट्टी यांनी कितीही टीका केली तरी भाजपाच्या नेत्यांनी त्यांच्यावर कडवट टीका केली नाही, हे येथे लक्षणीय.

गड आला पण सिंह गेले

भाजपाच्या दृष्टीने बारामतीत आणि चंद्रपूरमध्ये झालेला पराभव हा चुटपुट लावणारा आहे. नाही म्हणायला शिवसेनेने 18 जागा जिंकल्या, तरी पक्षाला पाच ठिकाणी पराभवाचे मोठे धक्के बसले. त्यात चार विद्यमान खासदारांचा समावेश आहे, ही आणखी चिंतेची बाब. रायगडमध्ये केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस सुनील तटकरे यांनी पराभव केला. अमरावतीत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आनंदराव अडसूळ यांचा राष्ट्रवादीचा पाठिंबा असलेल्या युवा स्वाभिमानी पक्षाच्या नवनीत राणा यांनी मोठा पराभव केला, शिरूरमध्ये शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आढळराव पाटील यांचा नवख्या अमोल कोल्हे यांनी केलेला पराभव हा खरा धक्कादायक म्हटला पाहिजे.

तसेच औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांचा पराभव काळजी करायला लावणारा आहे. या एका निकालावरून भाजपा व शिवसेना यांच्यात बेबनाव निर्माण होण्याची शक्यता आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी त्यांचे जावई आ. हर्षवर्धन जाधव यांच्यासाठी आपला प्रचार केला नाही, अशी तक्रार खैरे यांनी यापूर्वीच केली आहे. त्यांचा पराभव जिव्हारी लागणारा आहे. या नेत्यांच्या भांडणात एमआयएमचे इम्तियाज जलील विजयी झाले, ही आणखी शल्य देणारी गोष्ट आहे. युतीच्या धुरीणांना ही मोठी डोकेदुखी ठरणार आहे.

थोडक्यात म्हणजे केंद्रातील मोदींच्या जोडीने महाराष्ट्रात फडणवीस हे विरोधकांसमोर सर्वार्थाने उत्तुंग ठरले. त्यांना पाहून सिंदबादच्या सफरीतील लिलिपुटांची आठवण येते. लिलिपुट हा खुज्या, सरासरी सुमारे सहा इंच उंची असलेल्या माणसांचा समाज. मात्र त्यांचा अभिमान आणि अहंकार हा सामान्य माणसांएवढाच असतो. ते सामान्यत: लोभी, द्वेषपूर्ण, कारस्थानी, हिंसक, स्वार्थी आणि अविश्वसनीय असतात. सिंदबाद जेव्हा त्यांच्या बेटावर जातो, तेव्हा ते त्याला घेरतात. मात्र त्याच्या उंचीपुढे त्यांचे काहीही चालत नाही. त्याचप्रमाणे केंद्रात नरेंद्र व राज्यात देवेंद्र यांच्यासमोर विरोधकही लिलिपुट ठरले आहेत.