जबाबदारीत वाढ

विवेक मराठी    24-May-2019
Total Views |


 

केंद्रातील सत्ताधारी पक्षाविरोधात बहुतांश प्रसारमाध्यमांनी  आणि समाजमाध्यमांनी सातत्याने विखारी प्रचार करूनही, 17व्या लोकसभेच्या निवडणुकीत अभूतपूर्व यश संपादन करत भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी पुन्हा सत्तेत आली. रालोआला मिळालेल्या 352 जागांमध्ये एकटया भाजपाच्या 302 जागा आहेत, हेही विशेष नमूद करण्याजोगे. एकेका राज्यातून काँग्रेसची पीछेहाट होत असताना, देशातल्या बहुतेक राज्यांमध्ये भाजपाची पक्की होत चाललेली बैठक हे या यशामागील एक प्रमुख कारण आहे. अर्थात ते एकमेव नक्कीच नाही.

 'राष्ट्र प्रथम' ही भावना उराशी बाळगून 90 वर्षांहून अधिक काळ निरपेक्षपणे संघस्वयंसेवकांनी या देशासाठी - इथल्या समाजासाठी दशदिशांनी केलेलं काम, त्यातून संघाविषयी देशभर निर्माण झालेली सद्भावना, त्याच संघाच्या मुशीतून घडलेलं भाजपाचं शीर्षस्थ नेतृत्व, या नेतृत्वाने विजयासाठी घेतलेली अथक, नियोजनबध्द आणि कल्पक मेहनत, भाजपा कार्यकर्त्यांनी दिलेली मन:पूर्वक साथ आणि मतदारांनी दाखवलेला विश्वास या सगळयातून यशाचं हे मनोहारी चित्र आकार घेत गेलं. या यशाने 'न भूतो' असा इतिहास घडवला. या देशात काँग्रेस पक्षाव्यतिरिक्त दुसरा राजकीय पक्षही लक्षणीय बहुमत प्राप्त करू शकतो, हा संदेश या विजयाने दिला आहे.

जगभरातल्या बहुतेक सर्व महत्त्वाच्या देशांचं या निकालाकडे लागून राहिलेलं लक्ष आणि त्यातल्या अनेकांनी या देदीप्यमान यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं केलेलं मन:पूर्वक अभिनंदन या दोन्ही बाबी, भारताचं आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढत चाललेलं महत्त्व अधोरेखित करणाऱ्या आहेत. त्याचबरोबर गेल्या कार्यकाळात मोदींनी केलेल्या परदेश दौऱ्यांचं, त्यातून आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण केलेल्या संबंधांचं हे फलित आहे, हे लक्षात घ्यायला हवं. तात्पर्य, ही निवडणूक देशासाठी जितकी महत्त्वाची होती, तितकीच जगासाठीही महत्त्वाची होती. म्हणूनच देशाच्या निवडणुकीच्या इतिहासातलं ती एक मानाचं पान ठरेल, यात शंका नाही.

 या अभूतपूर्व विजयाच्या पार्श्वभूमीवर एक विशेष जबाबदारी नियतीने सर्वांवर सोपवली आहे, जिचा स्पष्ट उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निकालानंतरच्या पहिल्या विजयसभेत केला. मतदारांनी दाखवलेला विश्वास सार्थ करायचा असेल, तर या कार्यकाळात पहिल्या कालखंडापेक्षा अधिक चांगलं काम करावं लागेल हे ओघाने आलंच. त्याचबरोबर खबरदारी घ्यावी लागेल ती म्हणजे, यशाची हवा डोक्यात जाऊ न देण्याची. ती खबरदारी जशी सर्व विजेत्या उमेदवारांना घ्यावी लागेल, विजेत्या पक्षाला घ्यावी लागेल, त्या पक्षाच्या समर्पित कार्यकर्त्यांना घ्यावी लागेल, तशीच पक्षावर निष्ठा असलेल्या समर्थकांनाही घ्यावी लागेल. आवश्यक ते सर्व घटक जुळून आले तर निवडणुकीत ऐतिहासिक विजय प्राप्त करता येतो हे आता सिध्द झालं आहे. मात्र, असा विजयदेखील आमचे पाय जमिनीवर ठेवतो हे पुढच्या काळात सिध्द करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. सर्वांनीच त्याचं भान राखायला हवं. त्यासाठी, पंतप्रधान मोदींनी ज्याचा पुन्हा पुन्हा उच्चार केला ती नम्रता अंगी बाणवायला हवी.

 सत्ता संपादन करण्यासाठी बहुमत प्राप्त करणं ही प्राथमिक अट असते. त्यानंतर मात्र 'सहमती'ने कारभार करणं ही यशस्वी राज्यकारभारासाठी पूर्वअट असते. सत्ताधारी पक्षाव्यतिरिक्त ज्यांच्याशी आघाडी केली आहे असे सर्व पक्ष आणि विरोधी बाकांवर बसलेले अन्यपक्षीय खासदार अशा सर्वांच्या सहमतीतून देशोपयोगी विधायक कामांची मालिका पुढच्या काळात निर्माण व्हायला हवी. निवडणुकीच्या कालखंडात, प्रचाराच्या रणधुमाळीत परस्परांवर करण्यात आलेले आरोप-प्रत्यारोप बाजूला ठेवून, देशातील नागरिकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी या भावनेतून राज्यकर्त्यांचा सर्वांशी संवाद असायला हवा. विचारांचे विरोधक म्हणजे व्यक्तिगत शत्रू नव्हेत, हे लक्षात ठेवून पुढे जायला हवं. कोणत्याही पक्षाच्या झेंडयाखाली निवडून आलेलो असलो तरी अंतिमत: सर्वांनी एकत्र येऊन देशहिताचं काम करायचं आहे, हा पंतप्रधानांनी भाषणातून दिलेला संदेश केवळ सत्ताधाऱ्यांनीच अंमलात आणायचा नाही, तर सभागृहातील त्यांच्या राजकीय विरोधकांनीही याचं भान ठेवायचं आहे.

भाजपाची मुळं ज्या सामाजिक संघटनेत रुजली आहेत, त्या संघटनेच्या सामान्य स्वयंसेवकांनी, हितचिंतकांनीदेखील या भाषणातून व्यक्त केलेली अपेक्षा गांभीर्याने घेतली पाहिजे आणि भाजपाच्या समर्थकांनीही. हा विजयाचा क्षण आपल्या सर्वांचीच आणि पर्यायाने, जगातल्या सर्वात मोठया गणल्या जाणाऱ्या या लोकशाही देशाची परीक्षा पाहणारा आहे. या क्षणी जितकं नम्र होता येईल तितकं लोकांच्या मनावर राज्य करता येईल, त्यांची मनं जिंकता येतील हे लक्षात ठेवायला हवं.

लोकशाहीत राज्यकर्त्यांचं वर्तन कसं असावं याबाबत मोलाचं मार्गदर्शन अब्राहम लिंकन यांनी केलं आहे. 1865मध्ये दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आल्यानंतर अब्राहम लिंकन यांनी केलेलं पहिलं अध्यक्षीय भाषण जगप्रसिध्द आहे. 'राष्ट्राचे पुनर्निर्माण' या मुद्दयाचं विस्ताराने केलेलं चिंतन आणि दिशादर्शन असं या भाषणाविषयी थोडक्यात सांगता येईल. त्या भाषणाचा शेवट करताना लिंकन म्हणतात, With malice towards none, with charity for all.... एका विशिष्ट पक्षाचे प्रतिनिधी म्हणून निवडून गेलो असलो, तरी राज्यकारभार देशहित डोळयासमोर ठेवून करायचा आहे. लोकशाही प्रक्रियेतून सत्ता संपादन केल्यानंतर राज्यकर्त्यांनी याची जाणीव ठेवणं आणि त्यानुसार आपली कार्यपध्दती विकसित करणं, त्याबरहुकूम कारभार करणं याला प्राधान्य द्यायला हवं. लोकांची मनं जिंकण्याचा हा सर्वात योग्य मार्ग आहे. पंतप्रधान मोदींनीही आपल्या भाषणात याचा ठळक उच्चार केला आहे. लोकहित आणि लोकानुनय यातला फरक समजणाऱ्या नरेंद्र मोदींनी आधीच्या कार्यकाळात त्याची उदाहरणं घालून दिलीच आहेत. दुसऱ्या कालखंडात लोकहिताच्या कामांची गती वाढवण्यासाठी आपल्या सर्वांची साथ हवी. ती आपण द्यायला हवी. तेव्हा, केवळ मतदान करून आपली जबाबदारी संपलेली नाही. उलट त्यात वाढ झाली आहे.