स्वयं स्वीकृतं आणि कंटकाकीर्ण’

विवेक मराठी    25-May-2019
Total Views |

  सोशल मीडियावर तुम्ही नियमित लिहीत असाल, तर त्याचा एक तोटा असतो. काही महत्त्वाची घटना घडली की जवळचे मित्र किंवा नातेवाईक यांना त्यावर तुमची प्रतिक्रिया हवी असते. खरं तर त्याबद्दल त्यांना चर्चाही करायची असते.

आणि माझं नेमकं उलट होतं. कालच्या निकालांसारखी एखादी ऐतिहासिक घटना असेल, तर इतके असंख्य लोक त्यावर व्यक्त होत असतात की मी एकदम कोषात जातो. अशा वेळी स्वतः बोलण्यापेक्षा त्यांनी लिहिलेले घटनेचे विविध पैलू वाचण्याकडे माझा कल असतो. कालही तसच झालं. पण फोनवर, चॅटमध्ये आणि व्हॉट्स अ‍ॅप ग्रूप्सवर मित्रांना माझी यावर सविस्तर कमेंट हवी होती.

आणि खरं सांगायचं तर मला सकाळपासूनच काहीच बोलणं सुचत नव्हतं. टीव्हीसमोर बसलो तर अनेकदा भरून येत होतं. राहून राहून मला आमचे ‘बाळासाहेब खरे’च आठवत होते...

तुम्ही म्हणाल कोण बाळासाहेब खरे??

माझ्या वयाचे आणि त्याहून मोठे डोंबिवलीतले जे नियमित संघस्वयंसेवक असतील, त्यांना बाळासाहेब खरे चांगले माहीत आहेत. शाखेत आम्ही बाल होतो, तेव्हाच ते रिटायर झाले होते. संघकाम सोडून त्यांना अन्य छंद नसावा. उंची जेमतेम पाच फूट, बारीक शरीरयष्टी, डोक्याला निम्मं टक्कल, थोडा गंभीर चेहरा, वयोमानानुसार पाठीत किंचित बाक आलेला, हळू आवाज, पण झाकला न जाणारा टिपिकल कोकणस्थी टोन. अंगात संघाची खाकी हाफ पँट आणि त्यात खोचलेला, कोपरापर्यंत बाह्या दुमडलेला खादीचा कुडता हा बाळासाहेबांचा नियमित पोशाख. आणि दिवसभर ते याच वेशात सर्वत्र दिसत.

सकाळी रामनगरमधल्या ‘रामदास प्रभात’ शाखेत जात. तिथून मग ठरल्यानुसार स्वयंसेवकांकडे संपर्क, गंगाजळी, कार्यक्रमांचे निरोप अशी विविध कामं करत असतील. मग संध्याकाळी डीएनसी शाळेजवळच्या आमच्या हनुमान सायम् शाखेत जरा वेळ उपस्थिती लावून नांदिवली गावाकडे कूच करत. कधीतरी आमच्यापैकी कुणाला तरी बरोबर नेत. त्यांच्याकडे सायकल नव्हती, त्यामुळे अर्थातच सगळा प्रवास पायी. नांदिवलीची टेकडी तिथून दोनेक किलोमीटर लांब असेल. आता बिल्डिंगांनी खचाखच भरलेलं नांदिवली हे तेव्हा (1990) डोंबिवलीच्या बाहेर एखाद्या आदिवासी पाड्यासारखं होतं. बहुसंख्येने मूळनिवासी आगरी-कोळी समाजाची विरळ वस्ती. तिथे जाऊन बाळासाहेब सायम् शाखा लावत. त्या वस्तीसाठी संस्कार आणि बौद्धिक वगैरे फारच लांबची बाब होती. त्यामुळे घराघरात जाऊन लहान मुलांना गोळा करायचं आणि समोरच्या मैदानात खेळ खेळायचे याने शाखेची सुरुवात झाली. मग खेळून दमल्यावर बाळासाहेब हळूहळू संघाची पद्य, प्रार्थना त्यांच्याकडून म्हणून घ्यायचे.

उन्हाळा-हिवाळा-पावसाळा काहीही असो, बाळासाहेब न चुकता शाखा लावणारच. अनेकदा शाखेत जेमतेम 2-4 स्वयंसेवक असायचे. पण त्यामुळे बाळासाहेबांच्या नेमात कधीच फरक पडला नाही. मला आठवतंय, काही वेळा तर कुणीच येत नसे. मग बाळासाहेब एकटेच शाखा लावत. शाखेचे रोजचे ठरलेले कार्यक्रम करत आणि शेवटी प्रार्थना म्हणून शाखा सोडत. मैदानात उभे राहून कुठलाही संकोच न बाळगता एकट्याने शाखा लावणं काय असतं आणि त्यासाठी काय कोटीची मानसिक कणखरता असावी लागते, हे संघात गेलेल्या स्वयंसेवकांनाच समजेल. अन्य त्याची केवळ कल्पना करू शकतील. पण ते असो.

आजूबाजूला राहणारे पाड्यावरचे लोक हा विलक्षण प्रकार बघत आणि दुसर्‍या दिवशी मुलाला शाखेत पाठवत. पण अशा तर्‍हेने वर्षभरात बाळासाहेबांनी नांदिवली गावात उत्तम जनसंपर्क निर्माण केला. मग एक दिवस त्या शाखेला नाव मिळालं - अभिमन्यू सायम्. पुढे कधीतरी ध्वजही मिळाला, जो चटकन मिळत नसतो. कारण बाजारात गेलो आणि ध्वज विकत आणला असं संघात नसतं. त्यासाठी आवश्यक उपस्थिती त्या शाखेने कमवावी लागते. मग अभिमन्यू सायम्मध्ये तिथलेच बाल स्वयंसेवक गटनायक म्हणून नियुक्त झाले. सुरुवातीला बाहेरून मुख्यशिक्षक आणि कार्यवाह यांनी काम केल्यावर पुढे तिथल्याच स्वयंसेवकांनी तीही जबाबदारी पेलली. पद्य म्हणणारे, प्रार्थना सांगणारे स्वयंसेवक तयार झाले. संघाचे वार्षिक उत्सव शाखेवर स्वतंत्रपणे सुरू झाले. रविवारी सकाळी नगर सांघिकला (एकत्रीकरण) बाळासाहेब खरे अभिमन्यू सायम्च्या स्वयंसेवकांना घेऊन येताना दिसायला लागले.

अशा रितीने दोन-तीन वर्षांत ‘अभिमन्यू सायम्’ स्वयंपूर्ण व्हायच्या बेतात आली आणि बाळासाहेबांनी नांदिवलीच्या थोडं पुढे भोपरच्या टेकडीवर त्यांचं लक्ष केंद्रित केलं. भोपर गाव हेनांदिवलीपेक्षा कठीण ठिकाण होतं. चाकू-सुरे-तलवारी घरात बाळगणारी वस्ती. या वाडीतला माणूस त्या वाडीत शिरला तर राडा नक्की, अशी त्या वेळी स्थिती. पण हाफ पँटवाल्या बाळासाहेबांना सगळ्या घरांमध्ये फक्त प्रवेश. तिथेही नांदिवलीतल्या शाखेचे स्वयंसेवक घेऊन त्यांनी काम सुरू केलं. ते नक्की कधीपर्यंत चालू होतं कल्पना नाही. पण बाळासाहेब आजारी पडून आडवे होईपर्यंत हा क्रम सुरूच असावा.


मला वाटतं पंधरा एक वर्षापूर्वी ते वारले. *बाळासाहेब कुणी महान व्यक्तिमत्त्व किंवा थोर बुद्धिमान प्रचारक वगैरे नव्हते. सर्वसामान्य लोकांप्रमाणे नोकरी करणारे संसारी गृहस्थ होते. पण त्यांची कार्यनिष्ठा आणि चिकाटी थक्क करणारी होती. आणि डोंबिवलीचे बाळासाहेब खरे हे केवळ एक उदाहरण आहे. असे हजारो बाळासाहेब देशात विविध ठिकाणी काम करतात, तेव्हा एखादं संघटन दशकानुदशके टिकतं आणि मोठंही होतं. त्यातूनच हजारो सेवा कार्यं उभी राहतात.* बाळासाहेबांसारख्या लोकांना संघाकडून एक पैसा मानधनाची अपेक्षा नसते. किंबहुना अनेकदा ते पदरमोड करून कामं करत असतात

आता गेली काही वर्षं भाजपाला मिळणारं यश हे केवळ अशा बाळासाहेबांच्या कामामुळे मिळालंय, या भाबड्या भ्रमात मी नाही. अन्यथा ते या अगोदर कधीच मिळालं असतं. राजकारणात प्रत्यक्ष सत्ता स्थापन करण्यासाठी जी यंत्रणा उभी करावी लागते, जे तंत्र विकसित करावं लागतं, ते या बाळासाहेबांचं क्षेत्र नसतं. त्यासाठी एखादे प्रमोद महाजन किंवा एखादे मोदीच तिथे असावे लागतात. पण ज्या वेळी पक्ष पराभूत होतो, त्या वेळी कुठलाही विषाद न बाळगता काम करत राहण्याची आणि संघटना वाढवत नेण्याची शक्ती असे गावोगावचे बाळासाहेब सातत्याने निर्माण करत असतात. ज्यांच्या ‘स्वयं स्वीकृतं आणि कंटकाकीर्ण’ मार्गात भाजपाची सत्ता असणं-नसणं यामुळे काहीच फरक पडत नाही.

मी मनात कल्पना केली की समजा, मी डोंबिवलीतच राहत असतो आणि काल संध्याकाळी घराखाली मला बाळासाहेब खरे भेटले असते, तर काय झालं असतं?

मी त्यांना सांगितलं असतं, “बाळासाहेब, मोदी परत आले. एकट्या भाजपाला 300 जागा मिळाल्या, कळलं ना तुम्हाला?”

बाळासाहेब हसून म्हणाले असते, “हो, समजलं दुपारीच... मी भोपरला चाललोय. वेळेत शाखा लावायची आहे, येतोस का?”

- सुधन्वा कुलकर्णी 

sudhanwa1gmail.com