२०१९ लोकसभा निवडणुकीचा अन्वयार्थ

विवेक मराठी    25-May-2019
Total Views |
 

 
सर्व जगाचे लक्ष वेधून घेणारी, जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीतील या प्रक्रियेचा भाग असलेली निवडणूक प्रक्रिया निकालानंतर पूर्ण झाली. यथावकाश नवीन सरकारचा शपथविधी होईल आणि पंतप्रधान म्हणून नरेंद्रजी मोदी कारभार सुरू करतील. अंकांच्या आधारावर या निवडणुकीत अनेक विक्रम झाले आहेत. अनेक राज्यांत काँग्रेस भोपळाही फोडू शकली नाही, तर अनेक राज्यांत भाजपा पैकीच्या पैकी निवडून आला. महाराष्ट्रात एकेकाळी स्वप्नसुद्धा पडू शकणार नाही अशी काँग्रेस-राष्ट्रवादीची स्थिती झाली. बंगालमध्ये एवढी दडपशाही होऊनही राष्ट्रवादी विचाराचा विजय झाला. हे सगळे ढोबळमानाने वैशिष्ट्य असले, तरी समाजजीवनावर आणि राष्ट्रजीवनावर दीर्घकाळ परिणाम करणाऱ्या काही मुद्द्यांचा विचार निश्चित करावा लागणार आहे.
 
 १) राजकारणातील धर्माचे स्थान -
वर्षांमागून वर्षे एक कल्पना होती की अल्पसंख्याकांच्या लांगूलचालनामुळे सत्तेचा मार्ग खुला होतो. स्वातंत्र्यपूर्व काळापासून हे लांगूलचालन सुरू झाले आणि स्वातंत्र्यानंतर धर्मनिरपेक्ष नावाच्या गोंडस नावाने प्रस्थापित झाले. डाव्यांनी त्याला तत्त्वज्ञानाची फोडणी देत प्रतिष्ठित केले होते आणि समाजवाद्यांनी त्याला खतपाणी घातले. पण लांगूलचालन न करता विकासाच्या मुद्द्यावर या समाजातील घटकांना बरोबर घेता येते, हे सिद्ध झाले आणि त्याच वेळेस बहुसंख्य समाजाला फार गृहीत धरता येणार नाही हे २०१४ साली लक्षात आले आणि २०२९ला अधोरेखित झाले. गंगा आरती, केदारनाथ यात्रा नवरात्रीचा उपास करणारा नेता लोकांना इफ्तार पार्टीत रमणाऱ्या नेत्यापेक्षा जास्त जवळचा वाटतो, हे सिद्ध झाले.
 
२) निवडणुकीतील जातीची गणिते -
जातीची दुकाने मांडून ठेकेदारी करणारे अनेक नेते वेगवेगळ्या राज्यांत होते. जातीची ठेकेदारी करून स्वतः सत्तेच्या आसपास वावरत आपल्या जातींना अविकसित ठेवणारे पुढारी होते. आरक्षण आणि अन्य भावनिक मुद्द्यांचा खुबीने वापर करणे हा त्यांचा डाव्या हाताचा खेळ होता. पण महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या राज्यांत लागलेला निकाल जर बघितला, तर आता कुणी कुणाला गृहीत धरणे सोडून द्यावे लागणार आहे. आता तरी जाणते राजे उपहासाने महाराष्ट्राचे कर्तबगार मुख्यमंत्री कोणत्या जातीचे आहेत याचा उल्लेख करणार नाहीत, अशी आशा आहे. मुलायमसिंग आणि मायावती आणि बिहारमध्ये तेजस्वी हे आता आपल्या जातिबांधवांना गृहीत धरण्याची चूक करणार नाहीत. निवडणुकीतून जातीचे हद्दपार होणे हे एकात्म हिंदू समाजाचे दर्शन खरोखर सुखकारक आहे.
 
३) राष्ट्रवाद आणि निवडणुका -
या देशाच्या पहिल्या पंतप्रधानांना सर्वात जास्त त्रास होता राष्ट्रवाद या शब्दाचा, कारण या शब्दाने देशात militancy वाढते असा त्यांचा सोयीस्कर समज होता. त्यामुळे आमच्या शैक्षणिक धोरणात हा शब्द, राष्ट्र, राष्ट्रभक्ती हे शब्द येणार नाहीत हा त्यांचा कटाक्ष होता. सावरकर, नेताजी, शिवाजी महाराज, राणा प्रताप हे महापुरुष अडगळीत टाकण्याचे पाप यांनी केले. पण हाच राष्ट्रवाद या निवडणुकीत महत्त्वाचा ठरला. पुलवामा घटना आणि त्यानंतर बालाकोट स्ट्राइक याने देशात देशभक्तीची एक लाट निर्माण झाली आणि त्यात वरचे दोन मुद्दे  (जात आणि धर्म) वाहून गेले.
सामान्य माणसाला त्याच्या व्यक्तिगत प्रश्नात अडकवून ठेवायचे आणि त्यातून त्याला राष्ट्रवादी विचार करण्यासाठी उसंतच द्यायची नाही, हे धोरण इतके दिवस होते. या निवडणुकीने ते उद्ध्वस्त झाले.
शेतकरी, मजूर यांचे प्रश्न सोडवावे लागणारच आहेत. पण याबरोबरच ते या देशाचे देशभक्त, राष्ट्रवादी नागरिक आहेत याची या निवडणुकीत त्यांना ओळख झाली.
 
४) घराणेशाही -
यादव परिवार, चौधरी परिवार, देवीलाल परिवार, पवार परिवार, ज्योतिरादित्य शिंदे, चंद्राबाबू, अशोक चव्हाण आणि राहुल गांधी या सर्वांचा पराभव हेच सांगून जात आहे की या देशात येथून पुढे एखाद्या घरात जन्माला आलेले म्हणून राजकारणात यशस्वी होतील असे आता शक्य नाही. कारण हे आजच्या तरुण पिढीला मान्य नाही. सामान्य घरात जन्माला येऊन माणूस मोठी स्वप्ने नक्कीच बघू शकतो, हे आता होणार आहे अशी आकांक्षा असणारे तरुण हे मोदींना त्यासाठी आयडॉल मानतात. त्यामुळे नवमतदार आणि तरुण मतदार यांनी अत्यंत विचारपूर्वक मतदान केले.
 
५) शहरी सुशिक्षित मतदार -
२०१४ आणि आता २०१९ या दोन्ही वेळेस सुशिक्षित शहरी मतदार मोठ्या प्रमाणावर मतदानाला बाहेर पडला आणि त्याने अनेक वर्षांची लोकशाहीला न परवडणारी उदासीनता सोडली. निवडणुकीच्या निकालावर त्याचा परिणाम निश्चितच झाला आहे, ही एक स्वागतार्ह गोष्ट आहे.
 
६) तुकडे तुकडे गॅंगचा पराभव -
जेएनयू आणि जाधवपूर, त्याचबरोबर अनेक केंद्रीय शिक्षण संस्थांमध्ये राष्ट्रविरोधी शक्ती सरकारी आशीर्वाद मिळवत वाढत होत्या. त्या जेव्हा उघड्या पडायला लागल्या, तेव्हा चित्रपट सृष्टीमध्ये असणारे तारे, साहित्यिक आणि पत्रकार त्यांच्या मदतीला धावून आले आणि मग सैन्याला अपमानित करण्यापासून पाकिस्तानची तरफदारी करण्यापर्यंत यांची मजल गेली. कम्युनिस्ट राजकीय पाठबळ देण्यास तयार होतेच. यातून कन्हैय्या, हार्दिक पटेल, जिग्नेश, अल्पेश तयार झाले. कन्हैय्याला उभे करण्याचा प्रयोग हा त्या एकूण प्रक्रियेचा भाग होता. पण २२ टक्के मत मिळवत तिसऱ्या क्रमांकावर जात हे सगळे तोंडावर आपटले. तुकडे तुकडे गॅंगचा हा प्रतीकात्मक पराभव आणि ममतादीदीचा पराभव हा रोहिंगे, काश्मीरी पंडित आणि बांगला देशी घुसखोर यांच्या बाबतीत एकच धोरण न ठेवता देशाची धर्मशाळा होणार नाही आणि राष्ट्रविरोधी शक्ती शक्तिशाली होणार नाही, हाच संकेत या निवडणुकीने दिला आहे.
 
एकूण देशाच्या विकासाचा मार्ग हा राष्ट्रवाद आणि हिंदुत्व या दोन
तत्त्वांच्या माध्यमातूनच शक्य आहे, यावर या निकालाने शिक्कमोर्तब केले असे म्हणायला हरकत नाही.

 ************
राष्ट्रवादाच्या भक्कम पायावर शामाप्रसाद मुखर्जी यांनी जनसंघ सुरू केला. पंडित दीनदयाळजी यांनी त्याचा वैचारिक पाया घट्ट केला. लालकृष्ण अडवाणी आणि नानाजी यांनी संघटन वाढवले. अटलजींनी आपल्या अमोघ वक्तृत्वाने पक्षाला जनमानसात नेले. आणि अनेक अनेक अनामिक कार्यकर्त्यांनी पक्षाला आज जेथे पोहोचला आहे तेथे नेण्यासाठी अथक परिश्रम केले. या सर्वांस आज खऱ्या अर्थाने समाधान मिळत असेल.

१९२५ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली ती सत्तेच्या परिवर्तनाचा हेतू ठेवून नव्हे, तर व्यक्तिपरिवर्तन करून समाजपरिवर्तन करण्याच्या हेतूने. हे काम चालू असताना राजकीय क्षेत्रात अनेक स्वयंसेवक गेले आणि त्यांनी या क्षेत्रात एक निर्णायक भूमिका बजावत वर उल्लेख केलेले सर्व गुणात्मक परिवर्तन घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
त्या सर्वांचे अभिनंदन!
 
रवींद्र मुळे.
संपर्क प्रमुख
रा .स्व. संघ प. महाराष्ट्र प्रांत.
२३/५/१९