एचआयव्ही संक्रमितांच्या आयुष्यातील मांगल्याचा सोहळा

विवेक मराठी    28-May-2019
Total Views |

  रवी बापटले यांच्या सेवालय या संस्थेमार्फत एचआयव्ही संक्रमित 4 जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा सोहळा त्या जोडप्यांच्याच नव्हे तर त्यात सहभागी झालेल्या प्रत्येकाच्या आयुष्यात मांगल्याचे क्षण घेऊन आला.

 

 दहा दिवसांपूर्वी रवी बापटले सरांचा फोन - ''डॉक्टरसाहेब, आपल्या सेवालय प्रकल्पातील 3 मुलांचा विवाह आणि त्यात एक मुलगी पालवी प्रकल्पातील असे मिळून 4 जोडप्यांच्या विवाह आणि 7 मेला हा विवाहसोहळा आपण छानपैकी साजरा करू.''सरांचा फोन ठेवल्यावर सर्वप्रथम आमची मुले विवाहयोग्य झाली, त्याचा एक पालक म्हणून आनंद गगनात मावेनासा झाला होता आणि ती एचआयव्ही संक्रमित असूनदेखील त्यांचा विवाह करून शासनाच्या 'PPTCT' (Prevention of Parent to Child Transmission) या मिशननुसार आईकडून बाळाला एचआयव्हीचा प्रसार रोखता येतो, हे या विवाहानिमित्त जनजागृतीच्या माध्यमातून दाखवून देऊन एक सकारात्मक संदेश जनसामान्यांत पोहोचवणे या मिशनने कामाला लागलो. शिवाय या मुलांनादेखील विवाहासारखा, त्यांच्या जीवनातील महत्त्वाचा निर्णय घेता येतो या विषयीदेखील व्यापक कार्य करण्याची संधी मिळाली.

लगेच एचएआरसी संस्थेचे मार्गदर्शक डॉ. शिवा आयथॉल सरांना विवाहाविषयी कळवले. सरांनादेखील आनंद झाला होता. परंतु सरांचे एकच म्हणणे - जीवनावश्यक वस्तू, अन्नदान यांचा खर्च आपण एचएआरसीमार्फत करूच, पण त्याहीपेक्षा एचआयव्ही संक्रमित अनाथांचा विवाह म्हटल्यावर समाजातील अनेक जण शंकांचे वादळ उठवतील, त्यांना ब्लॉक अथवा दुर्लक्ष न करता त्यांच्याशी संवाद साधून जनजागृती करू व विविध वैज्ञानिक संदर्भ देऊन माहिती देत राहू.

लगेच एचएआरसीच्या फाउंडर सदस्य वर्षाभाभी कालानी यांना फोन - भाभी, आपल्याला कन्यादान करायला आवडेल का? जेव्हा मी त्यांना विवाह कोणाचा आणि कशा पध्दतीने हे सर्व सांगितले, तेव्हाच त्या स्वतः भेटायला येऊन त्यांनी विवाहाच्या रुखवताची - जीवनावश्यक वस्तू, पलंग, कपाट, दागदागिने आदींची जबाबदारी, नियोजन, अन्नदानासाठी लागणारे साहित्य, वधुवरांचा पोशाख इत्यादीविषयी सूत्रबध्द नियोजन याची जबाबदारी घेतली. वेळोवेळी प्रत्यक्ष व फोनवर मिटिंग, एखाद्या मॅनेजमेंट गुरूप्रमाणे वर्षाभाभी स्वतःला झोकून सोबत त्यांच्या सहकारी मैत्रिणी, कालानी परिवार, भिशी ग्रूप सर्वांना एकत्र घेऊन तयारी करू लागल्या.

प्रा. रवी बापटले सरांकडून वेळोवेळी लागणाऱ्या साहित्याची साइझ, माप, किराणा यादी, मुलांच्या कपडे, बांगडयांचे माप, आचाऱ्याकडून मिळालेली यादी आदीविषयी रोज चर्चा व कृती सुरू होती.

इकडे व्हॉट्स ऍपवर मदतीच्या आवाहनाचे मेसेज व दात्यांकडून शुभेच्छा व आर्थिक व वस्तुरूपात मदतीच्या आवाहनास मोलाची साथ मिळत होती. पत्रकार बांधवदेखील या विवाहसोहळा पूर्वतयारीस त्यांच्या प्रसिध्द दैनिकात बातमीद्वारे प्रसिध्दी देऊन सहयोग देत होते.

मंथन, संदीप व प्रेमकुमार अशी वर मुले, तर भाग्यश्री, राणी आणि सोनाली अशा वधू मुली यांच्या विवाह तयारीनिमित्त आम्ही इतके गुंतून गेलो होतो, जणू स्वतःच्या घरातील बहीण-भावांचे विवाह होत आहेत. जरी ते रक्ताच्या नात्यात बहीण-भाऊ लागत नसले, म्हणून काय झाले? परंतु जीवनरेखा बालगृह असो की पुढे सेवालय प्रकल्प, त्यांचे बालपण, पौगंडावस्था, खोडया, अभ्यास, खेळ, कौशल्य विकास कार्यक्रम अशा त्यांच्या जीवनातील प्रत्येक टप्प्याचे आम्ही साक्षीदार होतो. त्यामुळे कदाचित रक्ताच्या नात्यापलीकडे हे नाते निर्माण झाले होते.

आदरणीय रवी बापटले सर सामाजिक कार्यातील माझे गुरू, मोठे भाऊ, मार्गदर्शक. आमच्या प्रत्येक कृतीवर विश्वास दाखवून त्यांनी ही तयारी करताना मोकळीक दिली आणि ही जबाबदारी व्यवस्थित पार पाडणे हे आमचे कर्तव्य आहे.

पुढे वर्षाभाभी कालानी यांनी त्यांच्या समविचारी भगिनींची फौज उभी केली, ज्यात जो-तो एक एक जबाबदारी पार पाडू लागला. कोणी नवऱ्या मुलीची साडी, त्यात हळद, अक्षतांची तर कोणी काठपदराची साडी, तर कोणी मणी-मंगळसूत्र, तर कोणी पायाचे जोडवे व त्यासाठी लागणारे अचूक माप घेत होते, कोणी बांगडया, बेंटेक्स हार, ज्वेलरी, वधूची सँडल, ओढणी, बांगडया सेट, तर कोणी मॅचिंग, अंतरपाट आदीची व्यवस्था जोरात सुरू होती.

केवळ वधूच काय, वरासाठी राका कलेक्शनमधून छान आकर्षक रंगाचा कुर्ता-पायजमा, फेटे, हळदीचा ड्रेस आणि स्वतः दुकान मालक विशाल राका यांनी दिलेली भरघोस सूट आणि डोनेशन, पायातील जोधपुरी बूट अशी तयारी सुरू होती.


आता गरज होती ती पलंग, कपाट, गादी, पांघरूण अशा जीवनावश्यक, संसारोपयोगी वस्तूंची, ज्याची किंमत 3 जोडप्यांसाठी 40 हजारपर्यंत जाणार होती. इथे युक्ती कामी आली. 3 कपाट आणि 3 पलंग यासाठी डोनर शोधणे. अखेर कालानी परिवार, साबू परिवार, बाठिया परिवार आणि सदैव  मदत करणारे मित्र डॉ. महेश अवचट, अतुल जावळे, विलास जोशी काका यांनी जबाबदारी उचलली. तरी अखेर थोडे बजेट जास्त होते, ती अडचण सोडवली धनराज सोनी व अमीलकंठवार सर यांनी - कारखानदाराला फोन करून डिस्काउंट मिळवून दिले. धनराज सोनी सरांनी तर 25 खर्ुच्यादेखील दिल्या.

आता तयारी बाकी होती 500 लोकांच्या भोजनाची. त्यासाठी लागणारे खाद्यपदार्थ, किराणा, आचारी वगैरे खर्च. यासाठी परभणीतील दात्यांनी आपापल्या परीने तूप, तेल, डाळी, मसाला, इतकेच नाही, तर लातूरस्थित शर्मा काकांनी 30 किलो खवा लातूरमध्ये उपलब्ध करून दिला आणि बाकी किराणा साहित्यासाठी ठाणे येथील डॉ. सुनील मिश्रा या मित्राने दिलेली मोठी देणगी कामी आली. यातून इतर सर्व गरजा पूर्ण झाल्या.

आता आम्हा सर्व कार्यकर्त्यांना सुचले की एक आगळावेगळा रुखवत सोहळा आयोजित करून या सर्व दात्यांना एकत्र बोलावून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी. सेवालय प्रकल्प हसेगाव लातूर येथे परभणीकरांच्या सहयोगातून एचएआरसी संस्थेने जी मदत गोळा केली, त्यातदेखील पारदर्शकता राहील.

सर्व भगिनींनी कालानी भाभींच्या घरी रुखवत सोहळयाची तयारी केली. वधुवरांचे पोशाख, साडया, दागिने, भांडी, कपाट, पलंग आदींची सजावट आणि सर्व दात्यांचे आगमन, दात्यांशी मुलांच्या विवाहविषयक चर्चा, मनात येणारे विविध प्रश्न, शंका - पुढे काय? त्यांची तब्येत कशी आहे? विवाहानंतर संततीविषयी? पुढे एचआयव्हीचा प्रसार होईल का? या सर्व प्रश्न-शंकांविषयी सर्व उपस्थितांशी संवादातून शंका दूर करत होतो. रात्री एचएआरसीचे मार्गदर्शक शिवा आयथॉल सरांचा खास फोन, ज्यात त्यांनी या शंकांना लेखणीतून उत्तर देण्याविषयी आदेश दिला आणि त्यांचा छोटा भाऊ, शिष्य म्हणून मी लगेच अंमलबजावणीला लागलो. मी लेख लिहिला, ज्यास सोशल मीडियावर शेअर करून अनेकांच्या मनातील शंकांचा आणि प्रश्नांचा वेध घेऊन अचूकपणे त्याचे उत्तर मांडण्याचा प्रयत्न केला.

रात्रीच टाटा योध्दा गाडीतून रुखवताचे साहित्य हासेगाव लातूरला रवाना केले. रस्ता खराब असूनदेखील सेवालय हसेगाव लातूरला ते सुव्यवस्थित पोहोचले.

दुसऱ्या दिवशी सेवालयला पोहोचलो. तिथे वधुवरांशी निवांत गप्पा, लग्नाची लगबग, डेकोरेशन, मुलांसाठी घेतलेले कपडे, संगीत गाणे असे छान धूमधाम वातावरण. आमची आई खास बांगडया भरण्यासाठी तेथे पोहोचली. संगीतमय वातावरणात बांगडया भरणे, एकमेकांच्या हातावर मेंदी काढणे सुरू. इतके छान वातावरण की एचआयव्ही/एड्ससारखा दुर्धर आजार विसरून आजचा दिवस माझा आणि तो मी का साजरा करू नये... याच उत्साही वातावरणात जो-तो झटत होता. मग सेवालय येथील कृष्णा असो की प्रकाश, इतकेच नाही, तर सर्वांचे टीमके मामा लातूरहून आणायचे साहित्य, भाजीपाला आदीच्या नियोजनात व्यग्रा होते. इतक्या धावपळीतदेखील सर्वांची काळजी आणि आग्राहाने जेवू घालणारे रवी सर आणि खुशाली विचारणाऱ्या सेवालयातील आजी यांना विसरून कसे चालेल?

सोमवारी सेलू येथे मेहुण्याच्या मुलाचा विवाहसोहळा असल्याने सेवालयला हळदीच्या कार्यक्रमास मला जाणे जमले नाही. पण आई स्वतः उपस्थित राहून तिने प्रथमच या सोहळयाचा मनसोक्त आनंद घेतला.

 सेवालय प्रकल्प

आम्ही सेवक संस्था संचलित सेवालय प्रकल्प हे हसेगाव लातूर येथे प्रा. रवी बापटले (संस्थापक) यांच्या देखरेखीखाली  0 ते 18 वयोगटातील एचआयव्ही संक्रमित अनाथ बालकांसाठी विना अनुदानित तत्त्वावर चालवले जाणारे पुनर्वसन केंद्र आहे. तिथे आता 2016पासून 18 वर्ष पूर्ण झालेल्या एचआयव्ही संक्रमित बालकांसाठी 'हॅपी इंडियन व्हिलेज प्रकल्प' सुरू झाले असून येथे मुलांना स्वयंरोजगार व प्रशिक्षण दिले जाते. प्रा. रवी बापटले यांनी 2007 मध्ये सेवालय प्रकल्पाची हसेगाव लातूर येथे स्थापना केली.

 आता मंगळवारी सेवालयच्या प्रांगणात डेकोरेशन, स्टेज, 500 लोकांचा स्वयंपाक, साईड डेकोरेशन, रोशणाई, पाणी, बुफे, ऑर्केस्ट्रा आदी व्यवस्थांकडे रवी सर वैयक्तिकपणे स्वतः उभे राहून देखरेख करत होते.

सायंकाळी 5पासून विविध भागांतून आलेले सेवालयप्रेमी पालक, पाहुणे मंडळी, ऑर्केस्ट्रा कलाकार, पत्रकार, विविध मान्यवर आदींमुळे वातावरण भरून गेले होते. प्रा. माधव वावगे - अंनिसचे ज्येष्ठ कार्यकर्ते यांनी विवाह नियोजनाची सूत्रे हाती घेतली. कारण सत्यशोधक पध्दतीने हा विवाह होणार असून ज्यात वधुवरांना शपथ देऊन एकमेकांना जीवनभर साथ देणे, त्यातही मतभेद झाले तरी चालतील पण मनभेद होऊ नये आणि एकमेकांच्या विचारांचा आदर करेल आदीविषयी त्या प्रतिज्ञापत्रात विशेष उल्लेख होता.

इकडे ढोलताशाच्या गजरात सेवालय ढोल पथकाचे अर्जुन, अनिकेत आणि सर्व बच्चेकंपनीने वधुवरांना वाजतगाजत स्टेजवर आणले. सेवालयप्रेमी पालक वर्षा महेश कालानी, बसंती सत्यनारायण चांडक, श्रीकांतराव देशमुख काका, प्रा. सोनवणे आदी आशीर्वाद देण्यासाठी व कन्यादान करण्यासाठी स्टेजवर स्थानापन्न झाले. सोहळयाचे वैशिष्टय म्हणजे कन्यादान करण्यासाठी स्वतः जिल्ह्याधिकारी जी श्रीकांत सरांचे उशिरा का होईना आगमन. पण तिन्ही वधुवरांला शपथ देताना स्वतः माइक पकडून शपथ दिली व प्रतिज्ञापत्रामधील मजकुराविषयी बारकाईने समजावून सांगून भावी वैवाहिक जीवनात एकमेकांना मनभेद होणार नाही याची काळजी घ्यायला सांगितले.

प्रेमकुमार-सोनाली, मंथन-भाग्यश्री, संदीप-राणी यांच्या विवाहाव्यतिरिक्त आम्ही सेवक संस्थेचा पदाधिकारी रविकिरण व सुलोचना यांच्या पुनर्विवाहाची कहाणी पाहता हा विवाहसोहळा अत्यंत प्रेरणादायक होय.

शपथेनंतर संगीतमय मंगलाष्टक आणि धान्याची नासाडी होऊ नये म्हणून अक्षतांमध्ये तांदळाऐवजी पुष्पवृष्टी करण्यात आली. सर्व मान्यवर, उपस्थित सेवालयप्रेमी सर्वांनी हा नेत्रदीपक सोहळा अनुभवला. पुष्पवृष्टी करताना माझे लक्ष रवी बापटले सरांकडे होते. कारण सरच या मुलांचे आई, वडील आणि सर्वस्व होते, ज्यांनी या मुलांचे लहानपण, शालेय जीवन, पौगंडावस्था आणि तारुण्य याचबरोबर वेळोवेळी त्यांच्या सुखदुःखात, आजारीपणात कधी आई बनून शुश्रुषा केली, तर ही मुले कधी चुकल्यावर बाबा बनून कठोर होऊन शिक्षा करून योग्य मार्ग दाखवला. आज ही मुले स्वतःच्या पायावर उभे राहून जीवनाच्या महत्त्वाच्या गृहस्थाश्रमात प्रवेश करत होते आणि या प्रसंगी रवी बापटले सरांचे डोळे पाणावले होते. सर्व सेवालयप्रेमी आनंदाने पुष्पवृष्टी करताना वधुवरांना आशीर्वाद देत होते.

या अभूतपूर्व, आनंददायक, प्रेरणादायक अशा विवाहसोहळयाचे आम्हा सर्वांना ना केवळ साक्षीदार, तर एचएआरसीतर्फे कन्यादान करण्याचे भाग्य लाभले. आम्ही सर्व टीमने स्टेजवर जाऊन तिन्ही जोडप्यांना भावी आरोग्यासाठी, आयुष्यासाठी आशीर्वाद दिला. उशीर झाला होता, तरी जिल्हाधिकारी साहेबांची आग्राहाची विनंती - जेवल्याशिवाय जाऊ नये! ती कशी टाळणार?

बूफे  स्टॉलवर सेवालयातील मुले आग्रहाने वाढत होती आणि सेवालयप्रेमीदेखील या आनंदसोहळयात प्रेमरूपी प्रसाद ग्राहण करत प्रत्येक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत होते. अखेर रात्री 9:30 वाजता सर्व मुलांचा, रवी सरांचा, मान्यवरांचा निरोप घेऊन आमची गाडी निघाली परतीच्या प्रवासकडे. रिकाम्या हाताने न जाता असंख्य आठवणी घेऊन परत निघालो... पुन्हा लवकरच भेटण्यासाठी...

हा असाही विवाहसोहळा बरेच काही शिकवून गेला माणसाला एक माणूस म्हणून जगण्यासाठी...

डॉ. पवन चांडक

9422924861

अध्यक्ष एचएआरसी संस्था

होमिओपॅथिक ऍकॅडमी ऑफ रिसर्च चॅरिटीज

परभणी