सामान्य माणूस जिंकला

विवेक मराठी    28-May-2019
Total Views |

 शिवसेनेची एक सामान्य कार्यकर्ती म्हणून लोकसभा निवडणुकांकडे पाहताना माझ्यासारख्या अनेक शिवसैनिकांच्या मनात ही निवडणूक युतीतूनच पार पडावी, असेच वाटत होते. यासाठी अनेक कारणे होती. पण गेल्या पाच वर्षांत जे काही अंतर्गत राजकारण चालू होते, त्यामुळे मनात शंकेची पाल चुकचुकत होती. राजकारण म्हटले की आरोप-प्रत्यारोप होतच राहतात. पण काही वेळा त्यांची पातळी इतकी खालच्या दर्जाची होती की, अनेक कार्यकर्त्यांच्या आणि सामान्य नागरिकांच्या मनात संभ्रमाचे वातावरण निर्माण होत होते.

श्रध्देय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांची शिवसेना, त्यांनी निर्माण केलेले पक्षाचे स्थान, तिचा दरारा कायमच महाराष्ट्रात अभिमानाचा विषय राहिला. बाळासाहेबानंतर पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे यांचा शब्द म्हणजे लाखो शिवसैनिकांना त्यांनी दिलेला आदेश आणि तो पूर्ण ताकदीनिशी पेलणे हेच शिवसैनिकांचे आद्य कर्तव्य. असे असले, तरी लाखो शिवसैनिकांना असे वाटत होते की, साहेबांनी युती संदर्भात निर्णय घेताना सकारात्मक घ्यावा.

पक्षप्रमुखांवर पूर्ण विश्वास होताच, परंतु काही कारणास्तव ही युती नाही झाली, तर पक्ष म्हणून नुकसान होईलच आणि देशाचा विचार करता हिंदुत्ववादी शक्तीचे विभाजन होईल, याची भीती वाटत होती. कारण ही निवडणूक देशाचे भवितव्य ठरविणारी होती. डाव्या शक्तींना असेच उधाण आलेले होते. त्यांच्या छुप्या कारवाया तर चालूच होत्या. देशाचा विचार केला तर स्वातंत्र्यानंतर अर्धशतक उलटून गेले, तरी भारत हिंदू राष्ट्र असूनदेखील हिंदुहिताचे शासन यायला इतकी वर्षे वाट पाहावी लागली.

इतक्या वर्षांनी हिंदुहिताचे शासन आले आणि ते आपल्याच छोटया-मोठया रुसव्याफुगव्यांनी त्याचा बळी जाता कामा नये. अनेक वर्षांच्या तपस्येने आपल्याला हिंदुहिताचे शासन प्राप्त झाले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून इंग्रजांनी फुटीचे राजकारण केले आणि पुढे दीर्घकाळ आपल्या देशात ज्यांची सत्ता होती, त्यांनी केराच्या टोपलीत टाकण्याऐवजी कुरवाळत बसण्याचे काम अधिक गतीने केले. याचा फायदा म्हणजे सत्ता कायम आपल्याच हातात हवी.

भाजपा-शिवसेना हे दोन्ही पक्ष हिंदुहिताचा, पर्यायाने देशहिताचा विचार करणारे पक्ष आहेत. हिंदू धर्म म्हणजे एका धर्मगटाचा विचार नाही. हिंदू हा काही धर्म नाही, ती एक जीवनपध्दती आहे. 'मानवजात, प्राणिजात, वनस्पतिजीवन या सर्वांचा समग्र विचार, सगळयांच्या कल्याणाची आशा धरणारा, सर्वांना बरोबर घेऊन जाणारा, सर्वांच्या हिताचा विचार करणारा, तो हिंदू.' हिंदू म्हणजे पूजापध्दती नव्हे, तर हिंदू म्हणजे जीवनपध्दती होय. हिंदू केवळ भारताचाच विचार करीत नाही, तर संपूर्ण विश्वकल्याणाचा विचार करतो, तो हिंदू होय. हिंदूशिवाय भारत नाही आणि भारताशिवाय हिंदू नाही, हे त्रिकालाबाधित सत्य आहे.

ही विचारधारा असणारे पक्ष म्हणजे हिंदुत्ववादी विचारधारा असणारे पक्ष. पहिली निष्ठा आपल्या भारत देशावर असली पाहिजे आणि त्यानंतर इतर निष्ठांचे क्रम लागले पाहिजेत ही शिकवण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या शिवसैनिकांना दिली आहे.

पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिवसेना-भाजपा युतीचा प्रस्ताव स्वीकारून बाळासाहेबांचा हा वारसा पुढे नेला आहे याचा शिवसैनिकांना मनस्वी आनंद झाला. पक्षप्रमुखांचा शब्द हा आदेश मानून प्रत्येक निष्ठावंत शिवसैनिक उत्साहाने कामाला लागला. शिवसैनिकांना एकदा का आदेश मिळाला की तो कुठलेही काम प्रामाणिकपणे करतो. अत्यंत उत्साहाने प्रत्येक शिवसैनिक प्रचाराला उतरला. प्रचारादरम्यान त्याला पाच वर्षांत युती शासनाने केलेली विकासाची कामे जमेची बाजू ठरली. शिवसैनिक म्हणून आम्हाला आणखी एका गोष्टीचा अभिमान आहे, तो म्हणजे शिवसैनिक हा आपल्या विभागातील जनतेशी केवळ निवडणूक आल्यावरच त्याच्याशी संपर्कात राहत नाही, तर वर्षाचे 365 दिवस त्याचा संपर्क जनतेशी असतो आणि शिवसेनेची शाखा प्रत्येक नागरिकासाठी 24 तास उघडी असते. शिवसेना-भाजपा युती झाली, ही कार्यकर्त्यांना उत्साह देणारी ठरलीच, त्याचबरोबर प्रचार करताना अनेक सामान्य मतदारांच्या प्रसन्न भावमुद्रेने आणि त्यांनी केलेल्या स्वागताने हे अधोरेखित होत होते.

प्रचार करताना प्रत्येक प्रभागात स्वागत तर होतच होते, त्याचबरोबर अधिक जबाबदारीची जाणीवही होत होती. युती शासनाबाबत नागरिकांच्या अपेक्षा अधिक वाढल्या होत्या. याचे कारण युती शासनावर त्यांचा विश्वास होता. परंतु तरुण पिढी थोडीशी नाराज दिसली. कारण त्यांचे मतदान ओळखपत्र अजून मिळाले नव्हते. त्यांना आपण पहिल्यांदाच मतदान करणार आहोत ही उत्सुकता आणि ओळखपत्र मिळाले नाही, याची नाराजी असे संमिश्र भाव त्यांच्या चेहऱ्यावर होते. आमच्या प्रभागातील कार्यकर्त्यांनी त्या मुलांना धीर दिला आणि तुमचे ओळखपत्र मतदानाच्या दिवशी तुमच्या हातात देण्याची व्यवस्था करु, असे आश्वासन दिले. नुसतेच आश्वासन दिले नाही, तर प्रत्येकाला त्यांचे ओळखपत्र मिळवून दिले.

अखेर निवडणुकीचा दिवस आला आणि प्रचाराच्या वेळी प्रभागातील लोकांशी संपर्क आलेला त्या प्रत्येक कार्यकर्त्याने आणि स्थानिक लोकांनी पुढाकार घेऊन जास्तीत-जास्त मतदार मतदानासाठी मतदान केंद्रापर्यंत पाठविण्याची व्यवस्था केली. आपल्या प्रभागातून जास्तीत-जास्त मतदान कसे होईल यासाठी कसोशीने प्रयत्न केले. लोकसभा निवडणूक ही प्रचाराच्या दृष्टीने खोलवर होत नसते, असा इतक्या वर्षांचा अनुभव होता. परंतु या वेळेस मतदानाच्या दिवशीही महानगरपालिका निवडणुकीप्रमाणेच शिवसेना आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक घराघरात जाऊन मतदारांना बाहेर काढण्याचे काम केले. प्रभागातील निवडणुकीचा पूर्ण दिवस आपल्या घरातील शुभकार्य किंवा एखादा सण-उत्सव असल्यासारखी सगळयांची लगबग सुरू होती. मतदान अगदी व्यवस्थित पार पडले.


आता निकालाची आतुरता लागली होती. युतीचे शासन येणार याची खात्री होती, तरीही द्विधा मनःस्थिती होती. कारण प्रचारादरम्यान अनेक विरोधी पक्षांनी गाठलेली प्रचाराची हीन पातळी, भाडोत्री प्रचारसभा याचा तर आपल्या संख्याबळावर परिणाम होणार नाही ना? झाल्यास बहुमताच्या गोळाबेरजेवर याचा परिणाम होईल का? एक ना अनेक शंकांनी मनात थैमान घातले होते. पण आतून आवाज येत होता, 'येऊन येऊन येणार कोण, युती शासनाशिवाय आहेच कोण'! आणि हा आतला आवाजच मनात ऊर्जा निर्माण करत होता.

निकालाचा दिवस, तीच ती भीती मनात घर करत असतानाच आतला आवाज एकदम बाहेर यावा, तसा पहिल्या फेरीतच युती शासन आघाडीवर हे आशादायक चित्र डोळयासमोर आले आणि आता तिळमात्रही शंका मनात उरली नाही की, युती शासनाचे काय होणार? साऱ्या देशातच आनंदाला उधाण आले होते. देशभर ढोल-ताशांच्या गजरात येणाऱ्या सशक्त शासनाचे स्वागत होत होते. आनंदाच्या वातावरणात एकमेकांचे तोंड गोड केले जात होते. दसरा-दिवाळीचे वातावरण पूर्ण देशभरात साजरे होत होते. मातोश्रीवर आणि सेनाभवनावरही विद्युत रोशणाई करून विजयोत्सव साजरा करण्यात आला.

निकाल जाहीर झाला, त्या दिवशी माझे ऑफिस चालू होते. अनेक जणांचे अभिनंदनासाठी फोन आणि मेसेजेस आले. माझ्या मुलीनेही पहिल्यांदाच तिचा मतदानाचा हक्क बजावला होता आणि तिने ज्या उमेदवाराला मतदान केले, त्या उमेदवारही प्रचंड बहुमताने विजयी झाल्या होत्या. मुलीने फोन केला आणि आनंदाने म्हणाली, ''मम्मी, मला आता गिफ्ट पाहिजे.'' मीही नकारघंटा न लावता गिफ्ट देण्याचे कबूल केले. घरी नातेवाईकही खूश होते. आज घरी आल्यावर आपण पार्टी करायची आहे.

प्रत्येक कार्यकर्त्याला आणि प्रत्येक देशवासीयाला असाच आनंद झालेला दिसत होता. कारण हे शासन केवळ विकास ही प्राथमिक गोष्ट करणार नाही, तर विकासाबरोबरच राष्ट्रीय सुरक्षेलाही बांधिल आहे. शिवाय भारताला जगात अभिमान मिळवून देणारे शासन आहे, हा आत्मविश्वास प्रत्येक भारतीयाच्या मनात होता. हा विजय मोदी सरकारचा, शिवसेना-भाजपा युतीचा नसून हा विजय आपला आहे, ही आपलेपणाची भावनाच प्रसन्न करणारी होती. युती शासनाचे घोषवाक्य आहे, 'सबका साथ, सबका विकास' हे खऱ्या अर्थाने सार्थ झाल्याचे लक्षण म्हणजे 2019च्या निवडणुकांचे घवघवीत यश!