‘अनादि मी, अनंत मी’ ध्वनिनाट्य स्वरूपात

विवेक मराठी    28-May-2019
Total Views |

येत्या स्वा. सावरकर जयंतीदिनी दिनांक 28 मे 2019पासून, स्वा. सावरकरांची जीवनगाथा असलेल्या ‘अनादि मी, अनंत मी’ ह्या महानाट्याचे ध्वनिनाट्य (ऑडिओ ड्रामा) स्वरूपात रूपांतरण विविध डिजिटल माध्यमांद्वारा प्रकाशित होत आहे. या रूपांतरणाच्या प्रवासाविषयीचे अनुभवकथन.


  इसवीसन 1983-84चा तो काळ! साधारणपणे ज्या काळात बहुतेक आई-वडील आपल्या 4-6 वर्षे वयोगटातील लहानग्यांना बागेत किंवा मोकळ्या जागी फेरफटका मारायला नेतात, अशा सुमारास माझे वडील - ज्येष्ठ नाट्यरंगकर्मी माधव खाडिलकर मात्र एका अनोख्या वैचारिक अग्निकुंडाचा घाट घालत होते. भारताने क्रिकेटचा विश्वचषक अनपेक्षितपणे प्रथमच जिंकला होता. पण बाबा मात्र मुंबईतील आमच्या विलेपार्ल्याच्या घरात एक अलौकिक ऐतिहासिक कहाणी साकार करण्याची तयारी करत होते. भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील अग्रणी क्रांतिकारक, प्रखर देशभक्त, ज्येष्ठ साहित्यकार, क्रांतिकारकांचे अग्रणी, समाजसुधारक, विज्ञानवादी विचारवंत, द्रष्टे नेते स्वा. सावरकर ह्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या ज्वलंत आयुष्याचा रंगमंचीय आविष्कार दाखविणारे अनोखे नाट्यशिल्प ते शब्दांकित करत होते. बरोबरीने आई - सुप्रसिद्ध गायिका आशाताई खाडिलकर यांच्या सांगीतिक प्रतिभेच्या समिधा त्या शाब्दिक अग्निकुंडाला सतत चेतवत होत्या. रोमांचकारक निवेदन माध्यमातून फुललेल्या नाट्य कलाकृतीच्या प्रत्येक टप्प्याचे जिवंत साक्षीदार होण्याचे आणि त्यामधून नकळत घडणार्‍या संस्कारांना आपलेसे करण्याचे भाग्य आम्हा दोघा भावा-बहिणीला लाभले. आमची विचारसरणी त्या संस्कारांच्या तेजस्वी प्रभेमध्ये नकळत तावून सुलाखून निघत होती. मनाला प्रज्वलित करणे काय, ह्याचे काहीसे प्रत्यंतर त्या पर्वाने आम्हाला दिले. बाबांनी पार्ल्यातील शाळा-कॉलेजांमधील तरुण मुले-मुली हळूहळू एकत्रित केली आणि तीन-साडेतीन महिन्यांच्या अथक, अविरत आणि कधीकधी अविचारी वाटणार्‍या त्या प्रयत्नांचा नाटकीय आविष्कार मे 1984मध्ये लोकमान्य सेवा संघाच्या पु.ल. देशपांडे सभागृहात जवळजवळ एक-दीड हजार लोकांच्या साक्षीने सादर झाला. ‘अनादि मी, अनंत मी’ ह्या नावाने सावरकर जीवनदर्शनाची तेजस्वी गाथा साकारण्याचे भाग्य माझ्या आई-बाबांना लाभले.

रोमांचकारक इतिहासाचे दर्शन घडविणार्‍या ह्या नाट्यकलाकृतीचा पहिला व्यावसायिक प्रयोग, 26 फेब्रुवारी 1984 रोजी शिवाजी मंदिर, दादर, मुंबई येथे प्रचंड उपस्थितीत सादर झाला. 1985 साली नाटकाच्या पुस्तकाचे प्रकाशन खुद्द लंडनमध्ये इंडिया हाउसच्या ऐतिहासिक वास्तूमध्ये अनोळखी भारतीयांच्या उपस्थितीत झाले. पुस्तकाला माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्यांची बेधडक आणि दिलखुलास प्रस्तावना तर लाभलीच, तसेच महाराष्ट्र शासनाचे विशेष लक्षणीय वाङ्मयनिर्मितीसाठी लेखनाचे आणि नाट्यदर्पण प्रतिष्ठानचे संगीत दिग्दर्शनाचे पुरस्कारही ह्या नाटकाला मिळाले. 1985-1990 कालावधीत नाटकाचे व्यावसायिक स्वरूपात जवळजवळ दीडशे प्रयोग झाले, तर नाट्याभिवाचन स्वरूपात इंग्लंड, अमेरिका आणि कॅनडामध्येही प्रयोग सादर झाले. मुंबईच्या दादरमधील स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे उद्घाटन, भारताच्या तत्कालीन उपराष्ट्रपती आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत दि. 29 मे 1989 रोजी ह्याच नाटकाने झाले. त्या प्रयोगात बाल सावरकरांचे ‘माझी मातृभूमी’ विषयावरचे निबंधात्मक भाषण करण्याचे अहोभाग्य मला स्वतःला लाभले.

नाटकाच्या तालमीत बाजूला समूहगान करता करता हळूहळू बाल सावरकरांचे वक्तृत्व मी आत्मसात केले आणि काही ठरावीक प्रयोगांमध्ये कामही केले. मी आणि माझी बहीण शाळा-कॉलेजमध्ये गेलो आणि नेहमीचे शैक्षणिक जीवन सुरू झाले. मात्र खरे सांगायचे, तर त्या काळाचा खरा प्रभाव आम्हा भावा-बहिणीला उमगेपर्यंत मध्यंतरी बराच काळ उलटून गेला. नंतर आम्ही नोकरी-व्यवसायात मग्न झालो, पण सावरकर ह्या अकल्पित प्रतिभेच्या व्यक्तिमत्त्वाचे ठसे आमच्या वाढत्या वयावरील मनामध्ये कायमचे घर करून राहिले, हे मात्र खरे! अथक त्याग, बलिदान, क्रियाशीलता, सचोटी, जिद्द, धैर्य, निश्चयी, साहित्यिक, विज्ञानवादी विचारसरणीचे संस्कार आम्हाला पुढे आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यांवर मदतीचा आणि मार्गदर्शक हात देत राहिले.

आम्ही हे सगळे पाहिले, तेव्हाही भारत स्वतंत्र होता आणि आजही आपण स्वातंत्र्य लोकशाही पद्धतीने अनुभवण्याचा प्रयत्न करीत आहोत. पण बहुतेक सामान्य नागरिकांना, स्वातंत्र्याचा अर्थ खर्‍या अर्थाने समजला का, हा विचार ज्याने त्याने सतत करणे जरूरीचे आहे. मनमिळाऊ वृत्ती जपून आणि परिश्रम चालू ठेवून, काही पराभवांच्या चटक्यातून सावरून समर्थपणे अविरत पुढे चालण्याची भावना आपल्या बहुतेक सामाजिक, शैक्षणिक, राजकीय राहणीमानामध्ये अजूनही दिसत नाही. आपल्या सर्वधर्मसहिष्णुतावादी अखंड भारतात ब्रिटिशांनी भारतीयांना एकत्रित येण्यापासून परावृत्त करून दीडशे वर्षे जखडून ठेवले, आणि स्वातंत्र्यानंतर जवळजवळ सत्तर वर्षांच्या टप्प्यावर येऊनही आपण अजूनही एकमेकांना दूर करून, जातिभेदांना साकडे घालत, देशाच्या संरक्षणाबाबत दूरदर्शी न राहता, आपल्याच गौरवशाली इतिहासाकडे दुर्लक्ष करत, आपापले घोडे पुढे दामटविण्याच्या प्रवृत्तीला अजूनही आळा घालू शकलेलो नाही. ईस्ट इंडिया कंपनीच्या नावाने गवसणी घेतला गेलेला भारत आणि विशेषतः तरुण पिढी आज हळूहळू वेस्टर्न इंडिया होण्याच्या मार्गावर मार्गस्थ आहे.

2016 साली स्वा. सावरकरांच्या 50व्या आत्मार्पण स्मृती वर्षानिमित्ताने ‘अनादि मी, अनंत मी’ नाटकाचे नाट्याभिवाचन स्वरूपात पुनर्निर्माण करण्याच्या इर्षेने मला चेतना दिली! त्यानंतर पुण्या-मुंबईतील 25-30 तरुण हौशी कलावंतांना, गायक-वादकांना आणि तंत्रज्ञांना हाताशी धरून आम्ही नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून ह्या नाटकाची जमेल तशी उलाढाल सुरू केली. आमचे प्रयत्न आणि बर्‍यापैकी चांगल्या होत असलेल्या तालमी पाहून बाबांनी मला ह्याचे पुन्हा पूर्ण स्वरूपात नाटक सादर कर असे प्रोत्साहन आणि विश्वास दिला.

पहिल्याच प्रयोगाला पुण्याच्या ऐतिहासिक भरत नाट्यमंदिर येथे रसिकांनी हाउसफुल्ल असा अनपेक्षित परंतु प्रचंड प्रतिसाद दिला की, जवळजवळ 300 लोकांना आम्हाला नाट्यगृहाबाहेरूनच परत पाठवावे लागले. तेव्हा आम्हाला थोडी जाणीव झाली की आपण जे काही प्रामाणिक प्रयत्न करत आहोत, ते सर्वसामान्यांना आवडत आहेत. त्याबरोबरीनेच माझ्या पिढीतील किमान 20 तरुण हौशी कलाकार आणि त्यांचे कुटुंबीय आणि मित्र यांच्यापर्यंत स्वा. सावरकरांचे पूर्ण जीवनचरित्र आपण ह्या माध्यमातून पोहोचवू शकलो, ह्याचे मनोमन समाधानही मिळाले. त्यांनतर आतापर्यंत पुणे, मुंबई, ठाणे, डोंबिवली, सांगली, औरंगाबाद, वाई, पारनेर, रत्नागिरी अशा विविध प्रमुख केंद्रांवर सादर झालेल्या जवळजवळ 20पेक्षा जास्त प्रयोगांमधून कुठलीही प्रापंचिक, आर्थिक अपेक्षा न ठेवता, केवळ जास्तीत जास्त लोकांना ह्या अनोख्या जीवनकहाणीचा अनुभव घेता यावा आणि खर्चाची तोंडमिळवणी व्हावी इतपत अपेक्षा ठेवून हे प्रयोग सादर झाले आणि प्रेक्षकांनी प्रत्येक प्रयोग उचलून धरला! अमेरिकेत बे एरिया, कॅलिफोर्निया आणि सिअ‍ॅटल, वॉशिंग्टन येथेही ह्या कलाकृतीचे एकपात्री नाट्याविष्कार सादर झाले आहेत.

मात्र कोणत्याही नाटकाच्या प्रयोगासाठी प्रेक्षक उठून नाट्यगृहात जावेत, ही किमान अपेक्षा असतेच. त्यामुळे जरी कोणताही नाट्यप्रयोग विनामूल्य सादर केला, तरीही किती प्रयोग कोणत्या ठिकाणी किती प्रेक्षक अनुभवू शकतील ह्यालाही मर्यादा आलीच.

स्वा. सावरकर हे महाराष्ट्राच्या आणि भारताच्या राजकारणात, समाजकारणात तसेच शैक्षणिक जीवनात विविध कारणांमुळे आतापर्यंत दुर्लक्षित आणि बहुतांशी चुकीच्या तर्‍हेने समजले गेलेले व्यक्तिमत्त्व. अजूनही बहुतेक शालेय इतिहासाच्या पुस्तकात केवळ क्रांतिकार्य, अंदमानचा बंदिवास, जयोस्तुते आणि बोटीतून उडी मारलेले एक स्वातंत्र्यसेनानी इतपत त्यांची क्षुल्लक माहिती विद्यार्थ्यांमध्ये आणि जनसामान्यांमध्ये आहे. काही साहित्यामध्ये त्यांना खुजे ठरविण्यात धन्यता मानण्यात आली आहे. त्यापलीकडचे त्यांचे शतपैलू व्यक्तिमत्त्व आणि सर्वांगीण विचारधारा समजून घेण्याचा प्रयत्न काही अभ्यासक, विचारवंत, साहित्यिक सोडता कोणाच्या पचनी पडत नाही.

आताचा जमाना तर सोशल मीडियाचा, स्मार्ट फोन्सचा, संगणकीय तंत्रज्ञानाचा आहे. स्वा. सावरकरांचा कल नेहमीच अद्ययावत गोष्टी आणि तंत्रज्ञान आत्मसात करून उपयागोत आणण्यामागे राहिला.

तेव्हा ‘अनादि मी, अनंत मी’ ह्या नाट्य कलाकृतीच्या माध्यमातून, मराठी भाषेतील सर्वोच्च दर्जाची एक उत्तम नाट्यसंहिता आणि स्वा. सावरकरांची समग्र जीवनगाथा. सध्याच्या डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून, सोशल मीडियाच्या माध्यमातून पुन्हा एकदा नव्या पिढीला माहीत व्हावी असे वाटत होते. स्वा. सावरकरांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाची आणि त्यांच्या विविधांगी व्यक्तिमत्त्वाची ओळख नव्या पिढीला झाली पाहिजे, याच उद्देशाने येत्या स्वा. सावरकर जयंतीदिनी दिनांक 28 मे 2019पासून, ‘अनादि मी, अनंत मी’ ह्या महानाट्याचे ध्वनिनाट्य (ऑडिओ ड्रामा) स्वरूपात रूपांतरण विविध डिजिटल माध्यमांद्वारा प्रकाशित होत आहे.

ओघवत्या निवेदनाद्वारे सावरकरांच्या धगधगत्या आयुष्याचे नाट्यपूर्ण कथन करतानाच, आरती, देशभक्तिपर गीते, भाषणे, ओव्या, फटके, पोवाडे, नाट्यप्रवेश, अंदमानातील विविध प्रसंग अशा पैलूंनी सजलेले हे ध्वनिनाट्य तरुणांना, इतिहासतज्ज्ञांना आणि काही सावरकर अभ्यासकांना माहीत नसलेले अनेक पैलू प्रकाशात आणेल. सुप्रसिद्ध संवादिनीवादक आणि संगीत संयोजक आदित्य ओक आणि मराठी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध ध्वनिसंयोजक मंदार कमलापूरकर ह्या मित्रवर्य कलाकारांच्या तांत्रिक परीसस्पर्शाने उजळून निघालेले नव्या स्वरूपातील ‘अनादि मी, अनंत मी’ हे ध्वनिनाट्य सर्व इतिहासप्रेमी, राष्ट्राभिमानी आणि कलाप्रेमी रसिकांना आवडेल ह्याची खात्री आहे.

उत्तुंग सांस्कृतिक परिवार ट्रस्ट आणि 'REVERB KATTA' ह्या डिजिटल मनोरंजन मीडियाच्या सहकार्याद्वारा संपूर्णत: विनामूल्य स्वरूपात www.reverbkatta.in ह्या संकेतस्थळावर, तसेच बुकगंगा, स्नोवेल इत्यादी ऑडियो अ‍ॅप्स आणि अनादि मी, अनंत मी यूट्यूब चॅनलवर हे ध्वनिनाट्य उपलब्ध असणार आहे. मूळ नाटक जरी अडीच तासांचे असले, तरी सर्वांना ते सलग ऐकणे शक्य होणार नाही, हे लक्षात घेऊन सुमारे 15 मिनिटांच्या 12 भागात एखाद्या नाट्यपूर्ण गोष्टीसारखे हे ध्वनिनाट्य रसिकांना, त्यांच्या सोयीनुसार आणि वेळेनुसार घरबसल्या किंवा प्रवास करताना अनुभवता येईल. सर्व शालेय आणि महाविद्यालयीन मुलांनी ही नाट्यपूर्ण गाथा आवर्जून ऐकावी आणि आत्मसात करावी, ह्यासाठी पार्श्वसंगीताचा प्रभावी वापर ह्यात केला गेला आहे.

ह्या नाट्यगाथेच्या रूपाने प्रत्येकातील कुठेतरी लपलेल्या राष्ट्राभिमानी वृत्तीला जागविण्याकडे ह्या कलाकृतीचा एक जरी शब्द आणि क्षण कामी आला आणि स्वा. सावरकरांचे खरे, समग्र धगधगते आयुष्य आणि विचार श्रोत्यांना समजले, तरी आमचा संकल्प सिद्धीस गेला असे समजतो. ह्या ध्वनिनाट्याच्या उपलब्धतेविषयी अधिक माहितीसाठी, खालील फेसबुक पेजला भेट देऊन जगभरातील अधिकाधिक मराठी भाषिकांपर्यंत ही बातमी पोचहोविण्यास प्रवृत्त करावे ही नम्र विनंती!

ओंकार खाडिलकर

(निर्माता, ‘अनादि मी, अनंत मी’ ध्वनिनाट्य)