सोशल मीडियावरही नव्या भारताचा विजय

विवेक मराठी    30-May-2019
Total Views |

  भाजपाचं सरकार पुन्हा निवडून आलं. फक्त निवडूनच आलं नाही, स्पष्ट बहुमताने आलं. फक्त बहुमताने नाही, आधीपेक्षा अधिक जागा मिळवून आलं. हा विजय कोणत्याही राजकीय पक्षाशी वा विचारधारेशी बांधील नसलेल्या, परंतु राजकीयदृष्टया सजग व सक्रियरीत्या बोलणाऱ्या समाजमाध्यमातून व्यक्त होणाऱ्या अनेकांचासुध्दा होता.

पाहता पाहता निवडणूक झाली. संपली. अतिशय विशेष घटना झाली ही. कारण 2014 साली भारतातील तमाम विचारी, अभ्यासू मंडळींनी अगदी शपथेवर एक भाकीत केलं होतं - मोदी पंतप्रधान झाले, तर 2019ला निवडणूक होणार नाही! हुकूमशाही येणार! फॅसिस्ट राज सुरू होणार.

पण अशात जे सतत होतंय - विचारवंत मंडळी खोटी ठरली. हे भाकीतदेखील खरं ठरलं नाही.

2019 लोकसभा निवडणुका झाल्या. तथाकथित पुरोगाम्यांना भीती वाटत होती, तसे दंगेधोपे न होता निवडणूक होऊन गेली. अर्थात, हिंसा घडलीच. परंतु ती तथाकथित पुरोगाम्यांना हव्या त्या राज्यात, हव्या त्या नेत्याकडून घडली नसल्याने ती अदखलपात्र ठरली. सबब, निवडणूक शांततेत पार पडली आणि ...हे राम... भाजपाचं सरकार पुन्हा निवडून आलं. फक्त निवडूनच आलं नाही, स्पष्ट बहुमताने आलं. फक्त बहुमताने नाही, आधीपेक्षा अधिक जागा मिळवून आलं. आणि भाजपा-संघसमर्थक परिवारात या निकालाचा जेवढा आनंद दिसला, तितकाच समस्त जनतेत ही दिसून आला.

असं का घडलं असावं?

कारण हा विजय फक्त मोदी-शहांचा नव्हता. फक्त भाजपा-संघाचा नव्हता. फक्त कार्यकर्ता-प्रचारकांचा नव्हता. हा विजय कोणत्याही राजकीय पक्षाशी वा विचारधारेशी बांधील नसलेल्या, परंतु राजकीयदृष्टया सजग व सक्रियरीत्या बोलणाऱ्या आमच्यासारख्या अनेकांचासुध्दा होता.

हे 'आमच्यासारखे' म्हणजे कोण? आम्ही कोण मोठे तुर्रमखां लागून गेलो? तर, आम्ही कोणीच खास नाही. आम्ही म्हणजे फक्त असे काही लोक, जे चहूकडे सुरू असलेल्या दांभिक, अप्पलपोटया प्रचारकी प्रस्थापितांना वैतागून ठोस भूमिका घेत होते. आमच्यासारखे असे काही - ज्यांनी ही ठोस भूमिका घेतल्यामुळे कित्येक शिव्याशाप सहन केले होते. ट्रोलिंग पचवली होती.

म्हणूनच हा विजय फार महत्त्वाचा होता. आमच्यासारख्यांसाठी.

आम्ही फक्त सत्य बोलतो म्हणून पेड ठरवले जात होतो.

खोटं उघडं पाडतो म्हणून मूर्ख ठरवले जात होतो.

मुद्दयांवर बोलत होतो म्हणून ट्रोल ठरवले जात होतो.

हे ठरवलं जाणं कुणा राजकीय पक्षाकडून, पक्ष कार्यकर्त्यांकडून होणं सहाजिक होतं. त्याचं फार काही वाटलं नसतं. कारण राजकारण म्हटल्यावर आरोप-प्रत्यारोप, विरोधकांच्या अंगावर धावून जाणं, मानसिक दबाव आणणं हे प्रकार आलेच. आमच्या बाबतीतही ते घडलं नाही असं नाही. पण त्याचा त्रास झाला नाही. हा मानसिक त्रास त्या लोकांकडून होत होता, जे चहूकडे वैचारिक, विश्लेषक, विचारवंत वगैरे म्हणून मिरवत होते. त्यांच्यासमोर आपली काय बिशाद? हुशार लोक! ते म्हणतील ती पूर्व दिशा! नि त्यांनी दाखवलं त्या दिशेकडे धावत सुटणारे त्यांचे कंपू!

या कंपूने गेली 2-3 वर्षं काय नाही केलं?

आमच्या व्यवसायावर शेरेबाजी केली. फेक प्रोफाइल्स तयार करून अपमानास्पद लिखाण केलं. आमच्या कुटुंबाच्या, बायको-पोरांच्या नावाने नीच विनोद केले. फोटोज, मिम्स करून ट्रोलिंग केलं...!

आणि हे सगळं कशासाठी? का बरं?

कारण आम्ही सत्य काय ते मांडत होतो.

आम्ही हे मांडत होतो की मोदींनी 15 लाखांचं वचन दिलंच नव्हतं. आम्ही हे दाखवून देत होतो की सिंग आणि मोदी यांच्या परदेशभेटींच्या दिवसांत व खर्चात फारसा फरक नव्हता, पण त्यातून आलेला RoIl मात्र फारच वेगळा होता! आम्ही हे सिध्द करत होतो की देशावर वाढलेलं कर्ज हा मुद्दा चूक असून - डेट टू जीडीपी रेशो बघून निष्कर्ष काढायचे असतात - जे काढले तर सध्याच्या सरकारचं काम उजवं ठरतं. आम्ही हे दाखवून देत होतो की राफेलवरील सर्व आरोप चुकीचे आहेत नि 30,000 कोटी अन् अंबानींच्या ईमेलमागचं सत्य अगदीच वेगळं होतं.

निवडणुकीच्या काळात 'आजच्या प्रश्नांवर बोला' म्हणण्याची फॅशन यांनी रुजवली होती. हजारो वर्षांपूर्वीचा मनू, शेकडो वर्षांपूर्वीचं ब्राह्मण्य, 2 शतकांपूर्वीची पेशवाई, 7 दशकांपूर्वीची गांधीहत्या या सगळयाचं भांडवल करण्यात ज्यांचं आख्खं सामाजिक आयुष्य गेलं, ते लोक उपदेश करताना म्हणतात - ही निवडणूक आजच्या प्रश्नांवर लढायला हवी. राजीव गांधी, इंदिरा गांधी, जवाहरलाल नेहरू यांच्या नावावर नको.

मोदींचं ते भाषण आठवतं? ज्यानंतर आपण जवाहरलाल नेहरूंच्या भाषणाची ऑडिओ क्लिप रिलीज केली होती? मोदींशी परदेशी ऑफिशियल्स हस्तांदोलन करतानाचे ते फोटो आठवतात? ज्यावर उत्तर म्हणून नेहरूंना रिसिव्ह करायला आलेल्या राष्ट्राध्यक्षांचा फोटो समोर आणला होतात? आजची टेलिकॉम-आयटी बूम राजीव गांधींमुळे कशी आहे, आजची अर्थव्यवस्था 1992-93ला मनमोहन सिंगांनी कशी बदलली... आठवतात का इतिहासाची प्रवचनं?

फार कशाला, काल-परवा झालेलं ऍंटी सॅटेलाइट मिसाइल लॉन्च आठवतं? ज्यावर नेहरूंची DRDO छाप प्रचार केले होते? उठता बसता वाजवलेली गांधी कुटुंबाने देशासाठी जीव दिल्याची टेप आठवते?

इतिहास उकरून काढणं - बस इतकाच ज्यांचा धंदा आहे - ते आता गैरसोयीचा इतिहास समोर आल्यावर म्हणत होते, आजच्या संदर्भात बोला.

हे लोक इतके दिवस काय करत होते? 2002 नि करण थापर मुलाखत असला इतिहासच उगाळत होते ना?

- हे प्रश्न विचारले म्हणून आम्ही अंधभक्त ठरलो.

भारतात मॉब लिंचिंग वाढलं आहे हे दाखवणारी आकडेवारी कुठेही उपलब्ध नाही हे स्पष्टपणे म्हणालो, म्हणून आम्ही कम्युनल ठरलो.

NACद्वारे सोनिया गांधींच्या मुठीत सत्ता ठेवून कारभार चालवणाऱ्या काँग्रेसच्या काळात लोकशाही धोक्यात नव्हती काय? हा प्रश्न विचारला म्हणून आम्ही फॅसिस्ट ठरलो.

सरकारी योजनांमधील कोटयवधी रुपयांचा, विविध मार्गांनी गुडुप होणारा पैसा डीबीटद्वारे कसा वाचवला गेला, हे समोर आणलं म्हणून आम्ही कॉर्पोरेटचे दलाल ठरलो.

कुणी ठरवलं हे सगळं?

त्या लोकांच्या ट्रोल गँगने, ज्यांचे देशाच्या सामाजिक विश्वातलं योगदान फक्त एकच - वेगवेगळया समूहांना एकमेकांची भीती दाखवत समाजात फूट कायम ठेवणं.

आणि हे लोक आम्हाला देश तोडणाऱ्या मानसिकतेचे समर्थक ठरवत होते.

या सगळयाचा त्रास झाला नाही, याकडे दुर्लक्ष करतो - हे बोलायला सोपं आहे. पण खरंच जमतं का हे? नाही जमत! होतोच त्रास.

वाटायचंच कधीकधी... ज्यातून कोणताही व्यावहारिक लाभ होत नाही, त्या लढाईत पडायचंच कशाला? खासकरून तेव्हा - जेव्हा जरासं खुट्ट वाजलं की तुमच्याच बाजूचं सैन्य तुमच्यावर आक्रमण करत धावत येतं!

पण निवडणुकीचे निकाल लागले आणि या सगळया त्रासाचा निचरा झाला.

गेल्या 5 वर्षांत - खासकरून गेल्या अडीच वर्षांत - ज्या अपप्रचाराविरोधात आपण उभे राहिलो, तो प्रोपागंडा काल परास्त झालेला दिसला आणि सगळया त्रासाचा निचरा झाला.

या निकालातून हे सिध्द झालं की भारतीय जनता खरंच हुशार आहे. प्रचार-अपप्रचार ओळखू शकते. सगळं काही ओळखून योग्य तो निर्णय घेऊ शकते.

म्हणूनच हा विजय मोदी शहा, भाजपा, संघ वगैरे सर्वांचा होताच - पण त्याच वेळी तो ठामपणे सत्याला सत्य आणि असत्याला असत्य म्हणणाऱ्या सुज्ञ भारतीय जनतेचा होता. हा फरक ओळखू शकणाऱ्या लोकांचा हा विजय होता.

हा विजय नव्या भारताचा होता!

- ओंकार दाभाडकर

7710097620