खान मार्केट गँगचा दुहेरी सापळा

विवेक मराठी    30-May-2019
Total Views |

 ***देविदास देशपांडे***


खान मार्केट हा दिल्लीतील अत्यंत उच्चभ्रू भाग आहे. दिल्लीतील तथाकथिक उच्चभ्रू वर्तुळातील मंडळी या मार्केटमध्ये खरेदी आणि चर्चा करायला जातात. त्या चर्चांतून आलेले नासके फळ म्हणजे ही परदेशी माध्यमांतील मोदींची आणि भारताची नालस्ती. म्हणजेच भारतीय लिबरलांनी परदेशी माध्यमांचा लाभ घेऊन भारताची मानखंडना करायची आणि नंतर त्याचाच वापर करून एतद्देशीयांचा बुध्दिभ्रम करायचा
, असा हा खान मार्केट गँगचा दुहेरी सापळा आहे.

सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (रालोआला) प्रचंड यश मिळाले. या यशाला आठवडा उलटत नाही, तोच अमेरिकेच्या प्रसिध्द 'टाइम' या नियतकालिकाने 'मोदींनी भारताला एकत्र आणले' असा लेख छापला. एरवी या लेखाची चर्चा होण्याचे कारण नव्हते. कारण तसेही संपूर्ण जगाचे लक्ष या निवडणुकीकडे लागले होते आणि त्यामुळेच मोदी यांच्या या विजयाला जागतिक माध्यमांमध्ये अग्रागण्य स्थान मिळाले. मोदींचे कौतुक करणारे लेख लिहिले. मात्र 'टाइम' च्या लेखाची चर्चा होण्याचे कारण म्हणजे त्याची कोलांटउडी.

याच 'टाइम' नियतकालिकाने निवडणूक सुरू असताना आपल्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख 'डिव्हायडर इन चीफ' (प्रधान विभाजक) असा केला होता. जगातील सर्वात मोठी लोकशाही पुढची आणखी पाच वर्षे मोदी सरकार सहन करू शकते का? असा प्रश्न या अंकात विचारण्यात आला होता. त्या मुखपृष्ठावरून आणि त्या लेखावरूनही वाद निर्माण झाला होता. मात्र निवडणुकीच्या विजयानंतर 'टाइम'ने घूमजाव केले. निवडणुकीनंतर 'टाइम'ने पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो छापला. या छायाचित्राखाली 'Modi Has United India Like No Prime Minister in Decades' असे शीर्षक देण्यात आले आहे. याचा अर्थ अनेक दशकांमध्ये कोणत्याही पंतप्रधानाला जमले नाही अशा प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताला एकसंध बनवले आहे. याशिवाय 'टाइम'मध्ये छापलेल्या लेखात 'मोदींनी जाती-धर्मातील वाद मिटवले आणि त्यामुळे मोदींना बहुमत मिळाले' असेही म्हटले आहे. मनोज लडवा नावाच्या लेखकाने हा लेख लिहिला आहे.

वास्तविक 'टाइम'ला सुचलेले हे उशिराचे शहाणपण होते. कारण जागतिक पातळीवरच्या अनेक माध्यमांनी आधीच नरेंद्र मोदींचे कौतुक करून झाले होते. भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्वत्रिक निवडणुकीत शानदार विजय मिळवीत पाच वर्षांचा दुसरा कार्यकाळ सुरू केला असून पंतप्रधान मोदी यांच्या हिंदू राष्ट्रवादाच्या राजकारणाचे हे बहुमत असल्याचे ब्रिटनच्या 'बीबीसी वर्ल्ड'ने म्हटले आहे. पाकिस्तानमधील 'डॉन'ने आपल्या संपादकीयात मोदी यांचा विजय म्हणजे जातीयवादी राजकारणाचे फलित असल्याची टीका केली. 'अल जझीरा'ने पाच वर्षांच्या राजवटीनंतर पुन्हा सत्ता मिळविणारे मोदी हे पहिले गैर-काँग्रोसी पंतप्रधान असल्याचे म्हटले. 'गल्फ न्यूज'ने 'सुनमो 2.0 स्वीप्स इंडिया' या शीर्षकाखाली अनेक वर्षांमधील भाजपाचा हा अभूतपूर्व विजय असल्याचे म्हटले आहे.

मात्र मोदी यांचे हे कौतुक एकीकडे आणि त्यांना पाण्यात पाहणारा माध्यमाचा एक वर्ग दुसरीकडे, अशी ही परिस्थिती होती. विशेषतः देशातील इंग्लिश माध्यमांमध्ये मोदींच्या विरोधात एक फळी कार्यरत असून तिला हा विजय अजिबात रुचला नाही. याच फळीची दुसरी एक शाखा प्रत्यक्ष परदेशात कार्यरत आहे. एक प्रकारे देशांतर्गत आंग्ल माध्यमे आणि देशाबाहेरील सर्व माध्यमे यांचे एक रॅकेट सुरू आहे. त्यातूनच मोदींच्या विरोधात एक प्रकारची मोहीम राबविण्यात येत आहे. मोदींसह भारतातील सर्व हिंदूंचे चित्रण हुकूमशहा, हिंसक आणि द्वेषाचा प्रसार करणारे असे रंगवण्यात या माध्यमांना रस आहे. 'टाइम' साप्ताहिकात नरेंद्र मोदींना 'डिव्हायडर इन चीफ' असे म्हणणे हा याच मोहिमेचा एक भाग होता.

यापूर्वी बीबीसी, सीएनएनसह न्यूयॉर्क टाइम्स, दि गार्डियन, इकॉनॉमिस्ट आणि वॉशिंग्टन पोस्ट यांनीही असेच दिशाभूल करणारे लेख व बातम्या छापून मोदींची, हिंदूंची व पर्यायाने भारताची यथेच्छ बदनामी करण्याचा प्रयत्न केला होता. भारतातील निवडणुकीचा प्रचार ऐन भरात असतानाच 17 एप्रिल 2019 रोजी न्यूयॉर्क टाइम्सने मोदींच्या विरोधात एक बातमी प्रकाशित केली होती. यात मोदींची प्रचार मोहीम भयानक असल्याचे म्हटले होते तसेच बहुसंख्याक हिंदू हे मुसलमान आणि पाकिस्तानसाठी धोका असल्याचे म्हटले होते.

'फोर्ब्स' या आंतरराष्ट्रीय नियतकालिकाने 16 मार्च 2019 रोजी असाच एक लेख छापला होता. त्यात म्हटले होते, 'मोदींनी देश-विदेशात भारताचे स्थान उंचावले आहे, मात्र सरकार चालवण्याच्या त्यांच्या शैलीमुळे त्यांना आपल्या पदावर पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे. 'मोदी यांची धोरणे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यात अयशस्वी ठरली आहेत. सर्वसामान्य भारतीयाची परिस्थिती मोदी यांच्या काळात खालावली आहे.' मात्र याच फोर्ब्सने 18 नोव्हेंबर 2017 रोजी एका लेखात लिहिले होते, की म्हणजे मोदींचा भारत पुढे येत आहे. मोदींनी जागतिक आर्थिक व्यासपीठावर भारताला पुढे नेले आहे. भारताचे मानांकन सुधरले आहे आणि मोदींनी संरचनात्मक सुधारणा केल्या आहेत, असे त्यात म्हटले होते.

एवढेच कशाला, मोदी यांनी सत्तासूत्रे हाती घेतल्यानंतर दीड वर्षांनी 'दि गार्डियन'ने मोदी सरकारचे वर्णन हिंदू तालिबान म्हणून केले होते. हा लेख लिहिणाऱ्या लेखकाचे नाव होते अनीश कपूर. तसेच गार्डियनने लिहिलेल्या लेखात 'मोदींचा विजय हा भारताच्या आत्म्यासाठी वाईट आहे' (bad for India's soul) असे म्हटले आहे. 'खोटया बातम्या पसरवून आणि अल्पसंख्याकांना घाबरवून व्यापारानुकूल धोरणे राबविणाऱ्या आणखी एका नेत्याची जगाला गरज नाही' अशी शेरेबाजीही त्यात करण्यात आली आहे. न्यूयॉर्क टाइम्सने तर 'घृणा आणि द्वेष यांच्याद्वारे नरेंद्र मोदींनी भारताला कशी फूस लावली' या शीर्षकाचा लेख छापला आहे. तोही अर्थात पंकज मिश्रा या भारतीय नावाच्या लेखकाचा आहे.


गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून मोदींनी कारभार हाती घेतला होता, तेव्हापासून परदेशी माध्यमे त्यांच्यावर खार खाऊन आहेत. परदेशी माध्यमांतील त्यांचे वृत्तांकन हे सातत्याने एकांगी आणि पूर्वग्राहदूषित राहिले आहे. हा पूर्वग्राह मनात ठेवल्यामुळेच परदेशी माध्यमांना मोदी कर्दनकाळ आणि हुकूमशहा वाटतात. पत्रकार मिन्हाज मर्चंट यांनी 2014 साली या विषयावर लिहिताना म्हटले होते, की परदेशी माध्यमांची ही वर्तणूक मुख्यतः सांस्कृतिक कारणांमुळे आहे, कारण नरेंद्र मोदी त्यांच्या भारतीय राजकारण्याच्या कल्पनेत बसत नाहीत. पाश्चिमात्य पत्रकार चहाचे घोट घेत त्यांच्याशी गप्पा मारू शकत नाहीत किंवा पाश्चिमात्यांचे लक्ष वेधू पाहणाऱ्या अन्य प्रादेशिक नेत्यांसारखे ते नाहीत. मोदी हे सर्वच नव्हे, पण बहुतेक पाश्चात्त्य माध्यमांचा तसाच उपमर्द करतात, जसा हे माध्यम मोदींचा करतात. ते त्यांना आपल्याजवळ फटकूही देत नाहीत.

परदेशी पत्रकारांचा हा पूर्वग्राह संपूर्ण हिंदू धर्मावलंबियांबद्दल जाणवण्यासारखा आहे. त्यात कधी काळी नाझींनी गैरवापर केलेल्या स्वस्तिकाची त्यांना जास्तच धास्ती वाटते. राष्ट्रसंघातील अमेरिकेच्या माजी राजदूत निकी हॅली यांच्या स्वस्तिकसोबतच्या छायाचित्रावरून म्हणूनच गहजब झाला होता. एक-दोन वर्षांपूर्वी वॉशिंग्टन पोस्टने रुद्र हनुमानाचे चित्र दहशतवादी म्हणून दाखवले होते. त्यांच्या प्रश्नांमधूनही हीच प्रतिमा झळकते. काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील एका पत्रकाराने डेमोक्रॅटिक पक्षातर्फे अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या तुलसी गॅबार्ड यांना एक प्रश्न विचारला होता. त्यात मोदी यांच्या दडपशाहीच्या धोरणांचाच उल्लेख होता.

मोदी यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात परदेशी माध्यमांनी अनेक प्रकारे त्यांच्यावर टीका-टिप्पणी केली. मात्र यातील बहुतांश मजकूर प्रतिकूल होता आणि विशिष्ट चश्म्यातून पाहणाऱ्यांचा होता, हे नक्की. या सर्व लेखांचे निरीक्षण केले तर आणखी एक गोष्ट लक्षात येते की यातील बहुतेकांचे लेखक-लेखिका भारतीय आहेत. उदाहरणार्थ, वॉशिंग्टन पोस्टमध्ये निवडणुकीच्या काळात प्रसिध्द झालेला लेख बरखा दत्तने लिहिला होता. परदेशी माध्यमे तथाकथित बुध्दिवादी वर्ग आणि भारतीय इंग्लिश माध्यमातील लोकांची मते विचारात घेतात. त्यामुळे या लोकांच्या 'आयडिया ऑफ इंडिया'ला न मानवणाऱ्या मोदींबद्दल त्यांनाही पोटदुखी असणार, हे साहजिकच आहे.

निवडणुकीच्या काळातील आपल्या एका मुलाखतीत मोदी यांनी मोठे मार्मिक वक्तव्य केले होते. ''माझी प्रतिमा माझ्या 45 वर्षांच्या तपश्चर्येने बनलेली आहे, खान मार्केटमधल्या टोळीमुळे नाही'' असे ते म्हणाले होते. ही खान मार्केट गँग कोणती? तर खान मार्केट हा दिल्लीतील अत्यंत उच्चभ्रू भाग असून तिथे मोठमोठी दुकाने आहेत. दिल्लीतील तथाकथिक उच्चभ्रू वर्तुळातील मंडळी - म्हणजे माध्यमकर्मी, लेखक, कलावंत, राजकारणी आणि नोकरशहा - तिथे खरेदी करायला जातात आणि तिथेच असलेल्या कॅफेमध्ये कॉफीचे घोट घेत जगावर चर्चा करतात. त्यांच्या तेथील चर्चेतून कोणाची चांगली प्रतिमा निर्माण करायची, कोणाला बदनाम करायचे याचे मनसुबे ठरतात. या परदेशी मंडळींचा अड्डाही याच ठिकाणी असतो आणि भारतातील आंग्लाळलेल्या लोकांशी त्यांचा तिथेच संवाद घडतो. त्या संवादाला आलेले नासके फळ म्हणजे ही परदेशी माध्यमांतील मोदींची आणि भारताची नालस्ती.

ही परदेशी माध्यमे आणि त्यांचे पत्रकार माहितीसाठी मुख्यतः अवलंबून असतात ती दिल्लीतून प्रकाशित होणाऱ्या इंग्लिश वृत्तपत्रांवर आणि वाहिन्यांवर. त्यातील मोजके लोक भारतातील विविध भागांत जाऊन प्रत्यक्ष परिस्थिती पाहतात. एरवी स्वयंघोषित बुध्दिवादी मंडळीच्या होला हो करत यांची मतफेक चालू असते.

पंतप्रधान म्हणून मोदींना तीन वर्षे पूर्ण होताना 'द इकॉनॉमिस्ट'ने त्यांच्यावर टीकाच केली होती. नोटाबंदी आणि जीएसटी लागू करणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे अपयशी निर्णय आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतःला जेवढे सुधारणावादी दर्शवतात तेवढे ते नाहीत, असे तेव्हा या मासिकाने म्हटले होते. तेव्हा फ्रेंच मूळ असलेले भारतीय पत्रकार फ्रांस्वा गॉतिए यांनी याच विषयावर लेख लिहिला होता. परदेशी माध्यमे मोदींचा एवढा द्वेष का करतात, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. त्यात त्यांनी म्हटले होते, अर्थात, सर्व पाश्चिमात्य माध्यम प्रतिनिधी दिल्ली नावाच्या एका मोठया बुडबुडयात राहतात, तिथे त्याच दूतावासातील कॉकटेलपासून पत्रकारांच्या पाटर्यांपर्यंत त्याच 'सेक्युलर' कल्पना फैलावल्या जातात, हेही खरे आहे. ते जास्तीत जास्त तीन ते पाच वर्षापर्यंत येथे राहतात आणि भारतासारख्या गुंतागुंतीच्या, विशाल आणि विरोधाभासी देशाला समजून घेण्यासाठी हा काळ अत्यंत छोटा असतो, एका शहरातून दुसऱ्या शहरात विमानाने जातात आणि पंचतारांकित हॉटेलमध्ये राहतात ही वस्तुस्थिती आहे. याचा अर्थच हा की खरा भारत समजून घेण्याची संधीच त्यांना मिळत नाही.

आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जगभरातील माध्यमांचा ताबा नवउदारवाद्यांनी (निओ-लिबरलनी) घेतला आहे. अमेरिकेतील ऍरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीच्या आणि टेक्सास ए ऍंड एम विद्यापीठाच्या संशोधकांनी गेल्या वर्षी केलेल्या एका पाहणीत बहुतांश पत्रकार डाव्या विचारसरणीचे असल्याचे आढळले होते. अमेरिकेतील 462 आर्थिक पत्रकारांच्या आणि 18 अतिरिक्त पत्रकारांच्या मुलाखती घेतल्यावर त्यांनी हा निष्कर्ष काढला. वॉल स्ट्रीट जर्नल, न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट, असोसिएटेड प्रेस या आणि इतर अनेक प्रतिष्ठित वृत्तपत्रांच्या पत्रकारांचा यात समावेश होता.

या नव-डाव्यांच्या दृष्टीने राष्ट्रवाद म्हणजे अगदी गलिच्छ, जहरी कल्पना असून तिचा तिटकारा करणे, ती हाणून पाडणे हे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे जगभरातील लोकप्रिय सरकारांना त्यांच्या या अतिरेकी आग्राहाला बळी पडावे लागले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापासून ऑस्ट्रोलियाच्या स्कॉट मॉरिसन यांच्यापर्यंत सर्व नेत्यांना माध्यमांच्या या डावांचा सामना करावा लागत आहे. ऑस्ट्रोलियात आपल्या सुमारासच निवडणूक झाली आणि तेथे जे काही घडले ते आपल्यापेक्षा फार वेगळे नव्हते. मोदींना जसे सुप्त लाटेने विजयी केले, तसेच मॉरिसन यांनी आपल्या विजयाचे श्रेय सुप्त ऑस्ट्रोलियनना (क्वाईट ऑस्ट्रेलियन्सना) दिले. ब्राझील, हंगेरी, इटली.... तुम्ही कोणत्याही देशाचे नाव घ्या, तिथे हेच चित्र दिसेल.

अर्थात भारतातील बहुसंख्य लोक टाइमही वाचत नाहीत किंवा न्यूयॉर्क टाइम्स अथवा वॉशिंग्टन पोस्ट किंवा गार्डियनही वाचत नाहीत. त्यामुळे त्यांच्या या छिद्रान्वेषी वृत्तीच्या अभिव्यक्तीचा तिळमात्रही परिणाम भारतातील मतदारांवर होत नाही. तसे नसते तर गेली पाच वर्षे सातत्याने आगपाखड करूनही भारतीय मतदारांनी भाजपावर किंवा मोदींवर विश्वास दाखवला नसता. मात्र भारताबाहेरील व्यापक जनसमूहांवर त्याचा परिणाम होण्याची मोठी शक्यता असते. दुसरीकडे 'बघा, तुमच्या पंतप्रधानाबद्दल परदेशी लोक काय म्हणत आहेत' असे सांगून भारतीयांचे मनोधैर्य खच्ची करण्यास त्यांचे भाऊबंद तयार असतातच.

म्हणजे भारतीय लिबरलांनी परदेशी माध्यमांचा लाभ घेऊन भारताची मानखंडना करायची आणि नंतर त्याचाच वापर करून एतद्देशीयांचा बुध्दिभ्रम करायचा, असा हा खान मार्केट गँगचा दुहेरी सापळा आहे.

देविदास देशपांडे

8796752107