आनंदसोहळा

विवेक मराठी    31-May-2019
Total Views |

निवडणूक निकालानंतर भारतवासी ज्या क्षणाची  आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण अखेर आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नव्या मंत्रीमंडळाचा शपथविधी हा संपूर्ण भारतासाठीच आनंदसोहळा होता. या सोहळयाचे प्रत्यक्षदर्शी म्हणून अनुभव घेताना मनात उमटलेल्या भावनांचा हा शब्दपट.

 

23 मे रोजी जाहीर झालेल्या, 17व्या लोकसभेच्या निकालाने भाजपा आणि तिच्या मित्रपक्षांसाठी सलग दुसऱ्यांदा सत्तास्थापनेची संधी चालून आली. देशाच्या राजकारणाची बदलत असलेली दिशा ठळकपणे अधोरेखित करणारी ही निवडणूक अनेक दृष्टींनी महत्त्वाची होती. ती जशी पक्षासाठी महत्त्वाची होती, तशी या पक्षाशी वैचारिक जवळीक असणाऱ्या विवेकसारख्या नियतकालिकासाठीही महत्त्वाची होती आणि त्यामुळेच या विजयाने झालेल्या आनंद-समाधानाची जातकुळी निराळी होती. 

विक्रमी बहुमताच्या बळावर पंतप्रधानपदी विराजमान होणाऱ्या नरेंद्र मोदी यांचा शपथविधी विवेकची प्रतिनिधी म्हणून 'याचि देही, याचि डोळां' अनुभवायला मिळावा, अशी इच्छा मनात निर्माण झाली. शपथविधीची तारीख जाहीर झाल्यावर तर ही इच्छा अधिकच प्रबळ झाली. निमंत्रण मिळालं आणि देशाच्या राजकारणात नवा इतिहास घडत असताना त्याचे साक्षीदार होण्याची संधी त्या निमंत्रणाने दिली.

मीडिया आणि विशेष निमंत्रितांसह सर्वसामान्यांनाही मोठया प्रमाणात या आनंदसोहळयात सहभागी करू घेण्यात आलेलं असल्याने कार्यक्रमस्थळी दिवाण-ए-खास आणि दिवाण-ए-आम यांचा जणू एकत्रित दरबार भरला होता. लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी अक्षरश: हजारो जणांच्या साक्षीने शपथ घेणार होते.

दिल्लीच्या हवेला, इथल्या मातीला राजकारणाचा गंध आहे. त्याची अनुभूती इथल्या वास्तव्यात नेहमीच येते. या वेळी तर ती अगदी प्रकर्षाने आली.

 'मोदी सरकार 2.0'

'मोदी सरकार 2.0' हे नव्या मंत्रीमंडळाचं केवळ नाव नाही, तर त्यामागे एक संकल्पना आहे. आजच्या संगणकीय भाषेत सांगायचं तर आधीच्या मोदी सरकारची ही updated version - सुधारित आवृत्ती आहे, असा संदेश त्यातून द्यायचा आहे.  गेल्या वेळेपेक्षाही अधिक उत्तम रिझल्ट देण्यासाठी विचारपूर्वक बांधलेली ही टीम आहे. सर्व राज्यांना न्याय्य प्रतिनिधित्व देणारी अशी टीम आहे. ही टीम अधिक कालसुसंगत, result oriented आणि अधिक प्रभावी काम करेल, अशी आशा आहे.

  या सोहळयासाठी देशाच्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांबरोबर अनेक देशांच्या प्रमुखांना निमंत्रण दिल्याने नेहमीपेक्षाही अधिक कडक सुरक्षा व्यवस्था होती.

शपथविधीच्या दिवशी दुपारी हातात निमंत्रण पत्रिका आली आणि खऱ्या अर्थाने या ऐतिहासिक सोहळयाचे वेध लागले.

हजारो सहभागी असणाऱ्या या सोहळयाचं व्यवस्थापन राष्ट्रपती भवनाने, अगदी थोडक्याच कालावधीत किती चोखपणे केलं आहे याची झलक पाहायला मिळाली. निमंत्रण पत्रिकेसह जोडलेल्या सूचना, स्नेहभोजनासाठी देण्यात आलेली कूपन्स, कोणत्या गेटमधून किती वाजता कार्यक्रमस्थळी हजर व्हायचं आहे याविषयी केलेलं मार्गदर्शन वाचून कार्यक्रमाची उत्कंठा वाढत चालली होती.

आम्हाला व्ही.आय.पी.च्या मागच्या रांगेतलाच पास होता. त्यामुळे कार्यक्रमस्थळी वेळेत पोहोचून शक्य तितक्या पुढची जागा मिळवावी, या हेतूने आम्ही लवकर निघालो. पाच वाजून गेलेले असले तरी उन्हाची तीव्रता कमी झाली नव्हती. पण त्याचे चटके जाणवू नयेत असा अनामिक आनंद मन व्यापून राहिला होता.

राष्ट्रपती भवनाच्या प्रवेशद्वारावर झालेल्या अतिशय आदबीने आणि सौजन्यपूर्वक स्वागतामुळे, आत प्रवेशणाऱ्या प्रत्येकालाच आपण कोणीतरी 'विशेष व्यक्ती' असल्याचा फील येत होता.

प्रत्येक खुर्चीवर कागदी पिशवीत पाण्याची बाटली ठेवली होती. जागोजागी लावलेल्या पंख्यांमधून उडणारे पाण्याचे तुषार जिवाला थंडावा देत होते.

वेळेच्या सुमारे दीड तास आधी खुर्चीवर स्थानापन्न झालो. ज्या ठिकाणी शपथविधी सोहळा होणार होता, तो मंच, बसल्या जागेपासून काही फुटांच्या अंतरावर होता. मंचावर फुलांची केलेली आकर्षक सजावट चित्तवेधक होती. कोऱ्या canvasवर हळूहळू रंग भरत चित्र पूर्णत्वाकडे जावं, तसं मंचावरचं नेपथ्य आमच्यासमोर लागत होतं. त्यासाठी जी लगबग चालू होती त्यातही चैतन्य होतं, उत्साह होता.

मंचावर उजव्या हाताला चार रांगांमध्ये मांडलेल्या खर्ुच्या नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नवीन मंत्रीमंडळात सहभागी होणाऱ्या सहकाऱ्यांसाठी होत्या. मोदींसमवेत शपथ कोणकोण घेणार हे तोपर्यंत कळलं नसल्याने त्या खर्ुच्यांवर कोण स्थानापन्न होतं याची उत्सुकता लागून राहिली होती.

साडेपाचनंतर एक एक मान्यवर अतिथी स्थानापन्न व्हायला सुरुवात झाली. यात महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ, गोव्याचे डॉ. प्रमोद सावंत असे विविध राज्यांचे मुख्यमंत्री, तसेच उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, पुदुचेरीच्या राज्यपाल किरण बेदी, महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव आदी राज्यपालही उपस्थित होते. रतन टाटा, मुकेश-नीता अंबानी, बिर्ला यांच्यासारखे बिझनेस टायकून्स होते, तर अनुपम खेर, विवेक अग्निहोत्री, विवेक ओबेरॉय, अनिल कपूर, मधुर भांडारकर, मनोज जोशी, कंगना रणौत यासारखी लाइमलाइटमध्ये वावरणारी मोदी समर्थक मंडळीही आवर्जून हजर होती. जग्गी वासुदेव यांच्यासारखे आध्यात्मिक गुरू होते, तसे हिंदू धर्माची पताका अभिमानाने मिरवणारे भगवे वस्त्रधारी साधू-बैरागीही होते. भारताशी बंधुत्वभाव असणारे शेजारी राष्ट्रांचे प्रमुखही या आनंदसोहळयात सहभागी झाले होते. तसेच अनेक परदेशस्थ भारतीयही आवर्जून उपस्थित राहिले होते.

याव्यतिरिक्त देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले नागरिक लोकशाही उत्सवाच्या या पारण्यात सहभागी झाले होते.

शपथ घेणाऱ्या मोदी सरकारमधील मंत्र्यांसाठी मंचावर मांडलेल्या खुर्च्या हळूहळू भरत गेल्या, तसतशी लोकांच्या मनातली त्या संदर्भातली उत्सुकता शमत गेली. काटा हळूहळू 7च्या दिशेने सरकत होता. मांडलेल्या बहुतेक खर्ुच्या भरल्या गेल्या होत्या. सर्वांचं लक्ष मंचावरच्या रिकाम्या असलेल्या त्या एकमेव खुर्चीकडे लागून राहिलं होतं.

.....6 वाजून 55 मिनिटं होऊन गेली आणि अचानक चैतन्याची एक जोरदार लाट उसळत यावी, तसा त्यांच्या नावाचा गजर होऊ  लागला... नरेंद्र मोदींनी त्या भव्य प्रांगणात प्रवेश केला आणि धीरगंभीर मुद्रेने शांतपणे एक एक पायरी चढत ते त्या रिकाम्या खुर्चीवर स्थानापन्न झाले. टाळयांचा गजर टिपेला पोहोचत हळूहळू शांत झाला आणि राष्ट्रपतींच्या आगमनाची वर्दी दिली गेली.

बिगुल वाजताक्षणी माननीय राष्ट्रपतींना मानवंदना देण्यासाठी सर्व जण उभे राहिले. जन गण मनच्या सुरावटीवर सर्व जण एकसाथ राष्ट्रगीत म्हणू लागले. राष्ट्रगीत संपलं आणि त्या भारलेल्या वातावरणात राष्ट्रपतींच्या अनुमतीने शपथविधीला सुरुवात झाली.

पहिली शपथ घेतली अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. धीरगंभीर, सानुनासिक स्वरांत, 'मै नरेंद्र दामोदरदास मोदी... ईश्वर की शपथ लेता हूँ...' अशी त्यांनी सुरुवात केली, तेव्हा आकाशात मावळतीची केशरी छटा होती. प्रांगणात दिवे उजळले गेले होते, वास्तूचा घुमट हळूहळू तिरंग्याच्या रंगात न्हाऊन निघत होता.

आकाशातला सूर्य अस्ताला जात असताना या देशाच्या नवनिर्माणाची एक नवी पहाट उगवत होती. एका नव्या पर्वाचा शुभारंभ होत होता. त्या शुभंकर पर्वाचा साक्षीदार होण्याची संधी मिळाली ही विवेकची पुण्याई याची नोंद घेत, कार्यक्रमस्थळाचा निरोप घेतला.