गरज मुळावर घाव घालण्याची

विवेक मराठी    06-May-2019
Total Views |

 नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक मतदान गडचिरोलीमध्ये झाले, अशा बातम्या प्रकाशित होत होत्या, तेव्हा काही क्षणासाठी वाटले की बदल होतोय. नक्षलप्रभावित क्षेत्र म्हणून असलेली ओळख पुसत गडचिरोली जिल्हा लोकशाही आणि विकास प्रक्रिया यावर आपला विश्वास प्रकट करतो आहे. पण एक मे रोजी नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटांनी या विश्वासाला तडा देण्याचे काम केले. या स्फोटात सी-60 या कंपनीचे पंधरा जवान आणि एक वाहन चालक अशा सोळा जणांना वीरमरण आले. या स्फोटानंतर घटनास्थळाला भेट देऊन राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी सांगितले की, “नक्षलवाद्यांच्या या हल्ल्याने आमचे मनोबल खच्ची होणार नाही. आम्ही नक्षलवाद्यांना अजिबात सोडणार नाही. आमचा अ‍ॅक्शन प्लॅन तयार आहे. लवकरच तो कृतीत दिसेल. झालेल्या चुका सुधारू.”

गेल्या वर्षी एकाच वेळी चाळीस नक्षलवाद्यांना कंठस्नान घातल्यानंतर त्यांच्या हालचाली मंदावल्या होत्या. मात्र 9 एप्रिल रोजी दंतेवाडा येथे झालेला हल्ला आणि 1 मे रोजी घडवून आणलेला स्फोट पाहता आता मुळावर घाव घालण्याची वेळ आली आहे. अशा प्रकारच्या घटना घडल्या की सरकारला, मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करण्याची पद्धत खूप जुनीच आहे. त्यानुसार काही प्रसारमाध्यमे आणि राजकीय पत संपलेले राजकारणी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागत आहेत. घटना इतकी गंभीर आहे की कोणताही सर्वसामान्य सुजाण माणूस हळहळल्याशिवाय राहणार नाही. मात्र शरद पवार, अशोक चव्हाण यासारखे लोक अशा घटनांचे राजकारण करू लागतात, तेव्हा त्यांची कीव वाटू लागते. नक्षलवाद संपवण्यासाठी राज्य सरकार गेली काही वर्षे कठोरपणे कारवाई करत आहे. या कारवाईत नक्षलवादाचे समर्थक आणि शहरी नक्षलवादी यांच्याभोवती फास आवळताच कळवळणारे या घटनेचा साधा निषेधही करताना दिसत नाहीत. पाच संशयितांना अटक झाली, तेव्हा दूरचित्रवाहिन्यांवर रतीब घालणारे या घटनेनंतर कोठे लपून बसले आहेत? हा सर्वसामान्य माणसाला पडलेला प्रश्न आहे. ‘नक्षलवादी देशाचे मित्र आहेत’ असे म्हणणारे प्रकाश आंबेडकरही आता या विषयावर बोलत नाहीत. नक्षलवादाचा निषेध करण्याची हिंमत ही मंडळी का दाखवत नाहीत? या प्रश्नाचे त्यांना उत्तर द्यावेच लागेल.

एक मे रोजी झालेल्या या स्फोटाची पार्श्वभूमी लक्षात घेतली, तर असे दिसून येईल की नक्षलवाद्यांनी आधी सदतीस वाहने जाळली आणि दहशत निर्माण केली. एका रस्त्याचे बांधकाम चालू असताना ही घटना घडली. या घटनेचा तपास करण्यासाठी आलेल्या ताफ्याला स्फोटात उडवले. असा घटनाक्रम समोर येत असला, तरी तो तेवढ्यापुरता मर्यादित नाही. 23 एप्रिल 2018 रोजी कसनसूर येथे झालेल्या कारवाईत नक्षलवादी कुमकवत झाले, तर सरकारने विकासकामांवर आणि स्थानिकाच्या मनात विश्वास निर्माण करण्यावर आपले लक्ष केंद्रित केले. याचा परिणाम निवडणुकीत दिसून आला. स्थानिक नागरिक नक्षलवाद्यांच्या दहशतीतून मुक्त होत आहेत त्याचा हा परिणाम होता. गडचिरोली जिल्हातील नक्षलवाद्यांची अनेक केंद्रे उद्ध्वस्त झाली. नवे केडर आणि नव्या नेतृत्वाखाली नक्षलवादी पुन्हा उभारी घेण्याचा प्रयत्न करत होते. आपले अस्तित्व दाखवण्यासाठी आणि कसनसूर कारवाईत मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी नक्षलवादी संधी शोधत होते. या सार्‍या गोष्टी लक्षात घेतल्या, तर एक मेच्या स्फोटामागची कारणे लक्षात येतील.

नक्षलवादी हे कायमच लोकशाहीच्या आणि विकासाच्या विरोधात राहिले आहेत. त्यामुळे जिथे जिथे विकासकामांना सुरुवात होते, तिथे तिथे अडथळे निर्माण करून नक्षलवादी आपली दहशत प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असतात. आताही रस्ते, पूल बांधू नका अशा आशयाची पत्रके नक्षलवाद्यांनी प्रकाशित केली होती. युती शासनाच्या काळात नितीन गडकरींनी बी.एस.एफ.ची मदत घेऊन नक्षलप्रभावित भागात रस्ते बांधले होते. गेल्या वर्षभरात विविध विकासकामे जोरात चालू आहेत. त्याचा परिणाम स्थानिकांवर होताना दिसू लागला होता. आणि हेच नक्षलवाद्यांना नको आहे. एकदा का विकास झाला की त्यांना समर्थन मिळणे अवघड जाणार आहे आणि म्हणूनच त्यांनी हा स्फोट घडवून आणला. या घटनेनंतर राज्याच्या पोलीस महासंचालकांनी नक्षलवाद ठेचून काढण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. तो कृतीतून साकार व्हायला हवा.

नक्षलवाद्यांनी पोलिसांवर हिंसात्मक हल्ला केला आहे, म्हणजेच राज्यावर हल्ला केला आहे. आणि राज्य हे कायद्याने स्थापन झालेले लोकांचे राज्य असते. राज्यावरचा हल्ला म्हणजेच लोकांवरचा हल्ला असतो आणि राज्याला नेहमी हिंसात्मक हल्ल्यातून अशा हल्ल्याचे उत्तर द्यावे लागते. नक्षववादी राज्यासमोर आव्हान निर्माण करत आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारची भीडभाड न बाळगता  पोलिसांनी कारावाई करायला हवी. मुळावर घाव घातल्याशिवाय अशा कारवाया संपणार नाहीत. त्यासाठी सरकारने पोलीस यंत्रणेच्या पाठीशी ठामपणे उभे राहून नक्षलवादाचा बिमोड करायला हवा.