शैक्षणिक संस्कृतीची धोकादायक दिशा

विवेक मराठी    06-May-2019
Total Views |

***डॉ. जयंत कुलकर्णी ****

नुकताच तेलंगण राज्याचा बारावीचा निकाल जाहीर झाला. निकालापाठोपाठ विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरू झाले. एकापाठोपाठ एक अशा बावीस मुलांनी आत्महत्या केल्या आहेत. निकालातील घोळ हे आत्महत्यांचे प्रमुख कारण असले, तरी ते एकमेव कारण नक्कीच नाही. मुलांच्या आत्महत्या आणि त्यांचे मानसिक आजार हा आणखी एक मोठा विषय आहे.

18 एप्रिल रोजी तेलंगण राज्याचा बारावीचा निकाल जाहीर झाला. एखादा साथीचा रोग पसरावा त्याप्रमाणे या निकालापाठोपाठ विद्यार्थ्यांच्या आत्महत्या सुरू झाल्या आणि म्हणता म्हणता पुढील सहा दिवसांत बावीस मुलांचे बळी गेले. काहींनी नापास झाले म्हणून आणि काहींनी अपेक्षेइतके गुण मिळाले नाहीत म्हणून आत्महत्या केल्या. शहरी, ग्रमीण, श्रीमंत, मध्यमवर्गीय, कनिष्ठ मध्यमवर्गीय अशा वर्गांबरोबरच आदिवासी भागातून हैदराबादेत शिकायला आलेल्या आणि अशिक्षित कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या मुलांचाही या आत्महत्या करणार्‍यांमध्ये समावेश आहे.

या वर्षीच्या निकालात राज्य परीक्षा मंडळाने अभूतपूर्व चुका केल्या आणि परीक्षेला बसलेल्या नऊ लाखांपैकी साडेतीन लाख मुलांना नापास जाहीर केले. बारावीचे वर्ष आणि त्यात मिळणारे गुण हीच आयुष्यातील एकमेव महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्यात यश मिळवले नाही, तर आपण जगायला मुळात लायकच नाही आहोत, अशी कमकुवत मानसिकता असणार्‍या मुलांना हा धक्का सहन झाला नाही. नापास घोषित केलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका पुन्हा एकदा तपासल्या जातील असे आश्वासन देऊनही सरकार हे आत्महत्यांचे सत्र थांबवू शकले नाही.

या वर्षी झालेला निकालातील हा घोळ हे तेलंगणातील विद्यार्थ्यांच्या मोठ्या प्रमाणातील आत्महत्यांचे प्रमुख कारण असले, तरी ते एकमेव कारण नक्कीच नाही. प्रत्येक वर्षी बारावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण लक्षणीय असते आणि ते दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. इतकेच नाही, तर हैदराबादसारख्या शहरात अकरावी-बारावीच्या अभ्यासाचा ताण न झेपल्याने मुलांनी क्लासेसमध्येच आत्महत्या केल्याच्या बातम्या वर्षभर सतत येतच असतात.

अर्थात दहावी-बारावीच्या वळणावर किंवा त्याही पुढील महाविद्यालयीन जीवनात अभ्यासाचा ताण आणि अपयशाचा धसका यामुळे होणार्‍या विद्यार्थ्यांच्या आत्महत्या ही केवळ एकाच राज्यापुरती सीमित असलेली समस्या नाही. देशभरात सगळीकडे थोड्याफार फरकाने शैक्षणिक संस्कृतीच्या या काळ्या बाजूचे हे चित्र सारखेच विदारक आहे.

आपले आयुष्य संपवून टाकावे असे कोणाला वाटणे हीच मुळात एक गंभीर घटना आहे, हे सर्वमान्य आहे. त्या पार्श्वभूमीवर संवेदनशील वयातला एक मोठा तरुण वर्ग सातत्याने आत्महत्येला उद्युक्त होतो, हे अशांत समाजमनाचेच  निदर्शक आहे.

कुठे आहे ही अशांतता?

घर, शाळा, क्लासेस या सगळ्याच ठिकाणी या अस्वस्थतेची मुळे आहेत. पण ‘पालक म्हणून विचार करण्याच्या आपल्या पद्धतीतच’ तिचा खरा उगम आहे. माझ्या जवळच्या मित्राच्या मुलाला परवाच्या बारावीच्या परीक्षेत पासष्ट टक्के मार्क्स मिळाले. आपल्या मुलाने आय.आय.टी.ची तयारी करावी अशी माझ्या मित्राची तीव्र इच्छा होती. मुलाला गणित व शास्त्र या दोन्हीतही फारशी रुची नव्हती. पण वडिलांच्या आग्रहामुळे तो उघडपणे तसे काही म्हणत नव्हता. मी माझ्या या मित्राला एकच प्रश्न विचारला, “तुझे तुझ्या मुलावर प्रेम आहे की भविष्यात तो ‘जे होणार’, त्यावर जास्त प्रेम आहे?” अर्थातच तो निरुत्तर झाला आणि बरेच समजावून सांगितल्यानंतर मुलाची कल-चाचणी (अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट) करून मगच त्याच्या शिक्षणाची पुढची दिशा ठरविण्यास तयार झाला.

मुलांची अंगभूत क्षमता न ओळखता आपण आपले विचार, आपल्या योजना आणि इच्छा त्यांच्यावर लादू पाहतो आणि तिथेच या अशांततेला सुरुवात होते.

गेल्या वीस-पंचवीस वर्षांत भारतात जागतिकीकरणाच्या  प्रभावामुळे अनेक सकारात्मक बदल होत गेले. नोकरी, उद्योग आणि व्यवसायांच्या प्रचंड संधी हा त्यातील प्रमुख बदल. त्यातही तुलनेने ‘नोकरी’ या क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडले आणि इंजीनिअरिंगच्या कोणत्याही शाखेतील पदवीधारक वयाच्या बावीस-तेविसाव्या वर्षीच आकर्षक पगार मिळवू लागले.आई-वडील निवृत्त होताना त्यांना मिळणारा पगार त्यांची पुढील पिढी नोकरीच्या पहिल्या महिन्यातच घरी आणू लागली. सुखी माणसाच्या या सदर्‍याला ‘इंजीनिअरिंग’ हे नाव मग आपोआपच मिळाले.

खलील जिब्रानने त्याच्या प्रसिध्द अशा गद्य-कवितांमध्ये पालकांना शंभर वर्षांपूर्वीच काही गोष्टी किती छान समजावून सांगितल्या आहेत. तो म्हणतो, 'Your children are not your children. They are the sons and daughters of Life's longing for itself. They come through you but not from you, and though they are with you yet they belong not to you... तुम्ही तुमच्या मुलांना भरपूर प्रेम द्या, पण तुमची स्वप्ने त्यांच्या डोळयात पाहू नका आणि त्यांचे मार्गही तुम्हीच आखू नका' हे  त्याच्या या कवितेचे सार आहे.

 

वैद्यकीय क्षेत्रातील झळाळीनेही याच दरम्यान पालकांच्या मनात घर केले होतेच. पण तो मार्ग ‘इंजीनिअरिंग’च्या मानाने जरा अधिक कष्टाचा आणि मुख्य म्हणजे वेळखाऊ. तरीही ‘इंजीनिअरिंग’ आणि ‘मेडिकल’ या दोन शब्दांनी गेल्या दोन-तीन दशकात पालकांच्या मनावर जे गारुड निर्माण केले, त्याचा प्रभाव आजही कायम आहे.

बाहेरच्या जगाचा परिणाम म्हणून वा यशस्वी आयुष्याच्या चुकीच्या कल्पना म्हणूनही सगळ्याच पालकांना आपल्या मुलामुलींच्या याच ‘चाकोरीबद्ध’ यशाची स्वप्ने पडतात. त्याच्या किंवा तिच्या नैसर्गिक क्षमता माहीत असूनही आपल्या समाधानासाठी आपणच त्यांच्याकडे ‘दुर्लक्ष’ करतो. पालक म्हणून खोट्या जगात वावरतो. बहुसंख्य पालकांच्या विचार पद्धतीला साजेसे रूप मग शाळाही धारण करतात आणि जिथे शाळा कमी पडतात, तिथे ‘क्लास’ नावाची संस्था आपोआपच उदयाला येते. दहावीपर्यंत आनंदी आयुष्य जगणार्‍या आपल्या मुलांना आपणच पिंजर्‍याच्या एका दारातून आत सोडतो आणि दोन वर्षांनी एक ‘गरुड’ आकाशात झेप घेत, पिंजर्‍याच्या दुसर्‍या दारातून बाहेर पडेल या स्वप्नात दंग राहतो. व्यावसायिक कोचिंगचे अड्डे नेमक्या याच ‘वीक-पॉइंट’चा फायदा उठवतात आणि पालकांना मुलांच्या ‘भन्नाट’ यशाची स्वप्ने जाहिरातीतून विकतात. या स्वप्नरंजनाचा मोठा फटका बसतो तो खुशीने किंवा क्वचित बळजबरीने या पिंजर्‍यात जाणार्‍या आपल्याच मुलांना. स्वप्नांची पूर्तता होत नसल्याचे पालकांचे दु:ख परिस्थिती अधिकच बिघडवते आणि संपूर्ण कुटुंबच एका जीवघेण्या मानसिक आवर्तनात सापडते.

मुलांच्या भावविश्वातील अस्वस्थता

मुलांच्या भावी जीवनाबद्दल पालकांनी स्वप्ने रंगविण्यात गैर काहीच नाही. फक्त मुलांच्या अंगभूत क्षमता आणि त्यांचा नैसर्गिक कल हा त्या स्वप्नांना साजेसा असायला हवा. त्यामुळेच मुलांच्या शालेय जीवनात पालकांचा सहभाग वास्तवाचे भान असणारा, मुलांना धीर देणारा आणि त्यांच्या नैसर्गिक क्षमतांना फुलून येण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण कारण्याइतपतच असायला हवा. अन्यथा सगळ्याच मुलांकडून सारख्याच यशाची अवास्तव अपेक्षा ठेवणार्‍या शाळा आणि शाळांच्या अशा प्रयत्नांना साथ देणारे पालक हेच मुलांच्या भावविश्वात अस्वस्थता निर्माण करणारे महत्त्वाचे घटक ठरू शकतात. आय.आय.टी.ची तयारी आम्ही पहिल्या इयत्तेपासूनच करून घेतो असे अभिमानाने सांगणार्‍या शाळा टेक्नो स्कूल, कन्सेप्ट स्कूल, डिजिटल स्कूल अशा नावांनी मोठी जाहिरात करतात. मैदानावरचे खेळ आणि वक्तृत्व, वाचनालय, वादविवाद, संगीत असे अभ्यासेतर उपक्रम न घेता पाचवीच्या पुढे मुलांकडून अतिरिक्त अभ्यास करवून घेतात. शाळांच्या या प्रयत्नांना अनेक पालकांचाही सक्रिय पाठिंबा असतो.

असा ही एक अनुभव

माझ्या महाविद्यालयात इंग्लिश विषय शिकवणार्‍या शिक्षिका पूर्वी एका अशाच ‘टेक्नो स्कूल’मध्ये शिक्षिका होत्या. त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचा पडताळा पुढे मलाही अनेकदा आला. या शाळांमधून ‘करिअर काउन्सेलिंग’च्या नावाखाली बाहेरील कोचिंग क्लासेसच्या लोकांना अधूनमधून बोलाविले जाते आणि आठवीपासून पुढील वर्गांच्या मुलांना त्यांच्यापुढे सक्तीने बसविले जाते. ‘कुणाकुणाला आय.आय.टी.ला प्रवेश मिळवायचा आहे?’ हा या तथाकथित काउन्सेलिंगमधला पहिलाच प्रश्न. हात वर न करणार्‍या मुलांची जाहीर निर्भर्त्सना करायलाही हे काउन्सेलर मागे-पुढे पाहत नाहीत. मुळात गणित व शास्त्र विषयांत फार गती नसलेला, त्यामुळे त्या विषयांची आवड नसलेला, स्वाभाविकच वर्गात मागे पडणारा आणि येता जाता शाळेत शिक्षकांचे व घरी पालकांचे  टोमणे खाणारा बारा-तेरा वर्षांचा मुलगा या अशा वातावरणात किती गुदमरून जात असेल, याची कल्पनाच केलेली बरी!

माझ्या 25 वर्षांच्या शिक्षकी पेशात एक महत्त्वाची गोष्ट मी शिकलोय ती ही की, कोणताच विद्यार्थी ‘निरुपयोगी’ नसतो. त्याला पूर्णपणे व्यक्त व्हायला ‘अवकाश’ मिळाला पाहिजे. शालेय जीवनात किमान माध्यमिक वा उच्च माध्यमिक स्तरावर असताना तो नेमका ‘कोण’ आहे हे इतरांना नाही कळले तरी चालेल, पण त्याला ‘स्वत:’ला तरी कळायला हवे. हे कळण्यासाठी त्याला नेतृत्वाच्या वा सहभागाच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत. ‘हुशार’ मुलांनाच अभ्यासेतर उपक्रमांमध्ये संधी, सर्व उपक्रमांत त्यांचीच ‘निवड’ वा त्यांच्यातूनच ‘कॅप्टन’ वगैरे निवडणे हा आपल्या शाळांमधून होणारा अत्यंत बिनडोक व अशास्त्रीय प्रकार पुस्तकी अभ्यासात तुलनेने प्रवीण नसलेल्या मुलांचे मानसिक बळच खच्ची करणारा असतो.

एखाद्या विषयाची आवड, इच्छा आणि क्षमता नसताना मुलांकडून त्याच विषयात उत्तम कामगिरीची अपेक्षा ठेवणे, ती न पार पडल्यास त्याचा दोष मुलांना देणे, त्यासाठी त्यांच्यावर अवाजवी दबाव आणणे हे त्यांना मानसिक अस्वस्थतेकडे ढकलणारे पहिले कारण असते आणि ती प्रक्रिया कळत-नकळत शालेय स्तरावरच सुरू झालेली असते. आपल्या मुलांनी दोन वर्षे प्रचंड मेहनत केली तर त्याचे किंवा तिचे पुढील सर्व आयुष्य सुखात आणि आनंदात जाऊ शकते, या पालक म्हणून असणार्‍या आपल्या भावनेत वरवर पाहता काहीच विसंगती नसते. पण आपल्या या वाटण्याशी मुलांच्या क्षमता जुळत नसतील, तर मात्र मुलांच्या व पर्यायाने संपूर्ण कुटुंबाच्याच भावविश्वातील अशांतता प्रत्येक पायरीवर वाढतच जाते.

याकडे गांभीर्याने पाहा

कोटा व हैदराबाद या भारतातील दोन शहरांमध्ये इंजीनिअरिंगच्या प्रवेशासाठी ज्या अमानवी पद्धतीने आणि बाजारू वृत्तीने मुलांकडून तथाकथित ‘तयारी’ करून घेतली जाते आणि त्यातून संपूर्ण देशभरात अनुकरण होणारी कोणत्या प्रकारची शैक्षणिक संस्कृती आकाराला येत आहे, त्याकडे आतातरी पुरेशा गांभीर्याने पाहिले पाहिजे.

मुळात दिवस-रात्र चालणार्‍या या कोचिंगची अवाढव्य फी, एकेका वर्गात कोंबलेली अनेक मुले, रोज होणार्‍या सराव परीक्षांचे वाढते दडपण, ‘आणखी थोडी मेहनत घेतली, तर कोणत्यातरी प्रथितयश संस्थेत नक्कीच प्रवेश मिळेल’ असे सांगत पालकांना शेवटपर्यंत दाखविला जाणारा खोटा आशावाद, दहावीच्या मार्कांवर काही हुशार विद्यार्थ्यांना कोचिंग फीमध्ये देऊ केलेली सवलत आणि सराव परीक्षांमध्ये सतत चांगले मार्क्स पडले नाहीत तर सवलत काढून घेण्याची दिली जाणारी धमकी या सर्वांचा ताण असह्य होऊन, कुणाशीच सहज संवाद नसलेली आणि वाढत्या निराशेने खचलेली मुले अखेरीस आपले आयुष्यच संपवून टाकण्याचा निर्णय घेतात. या बातम्या वाचणारा समाज तरीही प्रत्येक वर्षी वाढत्या संख्येने अशा कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश घेण्यासाठी पुन्हा रांगा लावून हजर असतोच.

प्रचंड प्रमाणात वाढलेली लोकसंख्या आणि दर्जेदार उच्च शिक्षणाच्या अत्यंत तोकड्या सुविधा या व्यस्त प्रमाणामुळे चांगल्या संस्थांमधील प्रवेशासाठी मोठी चुरस आणि स्पर्धा असणार, हे स्वाभाविक आहे. अशी स्पर्धा असायलाही काहीच हरकत नाही, फक्त या स्पर्धेत धावणारा प्रत्येक जण तितका सक्षम आहे का, त्याच्या या धावण्यात स्वयंस्फूर्ती आहे की बळजबरी आहे आणि त्याला धावणे असह्य झाले तर किमान काही काळ थांबण्याचा पर्याय तरी उपलब्ध आहे का, या प्रश्नांचा विचार न करताच या स्पर्धेला सुरुवात होते, हे चित्र बदलायला हवे.

“सर, ह्याने खूप मेहनत घेतली. खूप अभ्यास केला दोन वर्षं, पण थोडक्यात नंबर गेला याचा. आय.आय.टी., एन.आय.टी.मध्ये तर नाहीच आता, पण आम्हाला वाटलं ‘बिट्स’मध्ये तरी नंबर लागेल.. पण तेही शक्य दिसत नाहीये. या सगळ्या गडबडीत याने स्टेट सी.इ.टी.चा अभ्यास केलाच नाही, त्यामुळे रँक खाली गेली आहे. तुमच्या कॉलेजमध्ये मिळेल ना याला प्रवेश?” हा संवाद सध्या जवळपास रोज माझ्यापुढे होतोय. चित्रातील चेहरे बदलले जातात, कधी मुलगा तर कधी मुलगी, पण पालकांच्या बोलण्याचा आशय हाच. निराशेने खचलेले पालक आणि डोळ्यातील तेज हरवलेले विद्यार्थी ...

पालकांचा ‘अ‍ॅॅप्रोच’ महत्त्वाचा

मला समजतं, यांच्याशी प्रथम खूप बोलायला हवं. एकत्रच. नंतर हवे तर त्या मुलाशी किंवा मुलीशी स्वतंत्रदेखील. माझ्या दोन्ही मुलांच्या बाबतीत या सगळ्या ताण-तणावाच्या परिस्थितून मी गेलोय, ‘पालक’ म्हणून माझ्यातील ‘शिक्षका’ने योग्य तिथे, योग्य त्या प्रमाणात मलाच सावरले आहे. मुलांच्या मनावरील हा ‘अपेक्षां’चा तणाव वाढविण्यात, तो कमी वा नाहीसा करण्यात पालकांचा ‘अ‍ॅॅप्रोच’ फार महत्त्वाचा असतो. त्यामुळे या विषयावर त्या मुलांच्या समोरच काही गोष्टी पालकांशी हसत-खेळात बोलल्या तर त्या योग्य त्या ठिकाणी, योग्य तो परिणाम करीत पोहोचतात. पालकांचा ‘दृष्टीकोन’ मुलांच्या काळजीपोटी वा त्यांच्या भवितव्याविषयीच्या चिंतेनेच बर्‍याच वेळा अवाजवी अपेक्षा ठेवणारा असतो हे पालकांनाही कळायला हवे. तसे त्यांना कळले नाही तर किमान मुलांना तरी ते समजले पाहिजे. आणि ही प्रक्रिया एकमेकांच्या समोर झाली तर हे ‘कळण्याची’ शक्यता खूप वाढते... हाही पुन्हा अनुभवच!

काही वर्षांपूर्वी, म्हणजे माझ्या मुलीची दहावी झाल्यावर, माझ्या मुलीने स्वत:होऊनच या ‘पिंजर्‍या’त दोन वर्षे शिरायचा निर्णय घेतला. अक्षरश: रात्रीचा दिवस करून अभ्यास केला. कोचिंग क्लासच्या सगळ्या चित्र-विचित्र अटी पाळल्या. परीक्षा संपताच सुटकेचा नि:श्वास टाकत तिने पुढे कुठे-कसा प्रवेश मिळतोय की नाही याची फिकीर न करता आधीच सेलिब्रेशन केले. मी मुळात जशी होते तशीच मला परत मिळवू शकले याचा आनंदच मला मोठा आहे, असे सांगणारा या ‘पिंजर्‍या’तील अनुभवांविषयीचा एक लेख तिने ‘हिंदू’ दैनिकात पाठविला. हा लेख वाचताच देशभरातून आलेल्या प्रतिक्रिया थक्क करणार्‍या आणि एकसारख्याच होत्या. हे सर्व अनैसर्गिक आहे याविषयी सर्वच जण सारखेच अस्वस्थ असतात. तरीही धोके माहीत असूनही आपली घरे दर वर्षीच या वेगाने बदलणार्‍या शैक्षणिक संस्कृतीची ‘शिकार’ होतात.

मुलांच्या प्रगतीला दिशा देणे आवश्यक

आवड आणि क्षमता नसताना इंजीनिअरिंगच्या अभ्यासक्रमाला आलेल्या मुलांच्या परवडीला तर अक्षरश: अंत नसतो. कसाबसा तीन महिन्यांचा कालावधी असलेल्या प्रत्येक सत्रात किमान सहा विषय आणि दोन वा तीन प्रात्यक्षिक परीक्षांची तयारी यात त्यांच्या आयुष्यातील चार मोलाची सुंदर वर्षे निसटून जातात. सर्व विषय सुटतीलच याची शाश्वतीही नसते आणि पदवी मिळाली तरी मूलभूत कौशल्यांचा अभाव असल्याने नोकरी मिळेलच याचीही खात्री नसते. या पार्श्वभूमीवर होणार्‍या मुलांच्या आत्महत्या आणि त्यांचे मानसिक आजार हा आणखी एक मोठा विषय आहे. मी वर्षानुवर्षे अक्षरश: जवळून ही परिस्थिती बघतोय. आपणच ओढवून घेतलेल्या या आजारातून पालकांना व मुलांना बाहेर काढण्याचे प्रयत्न समुपदेशनाद्वारे आम्ही करतोच, तसेच उपायांपेक्षा प्रतिबंधच महत्त्वाचा हे शाश्वत सत्य या आजाराला तर अधिकच लागू पडते. स्वत:च्या क्षमतांची स्पष्ट कल्पना असणारी मुले आणि आणि त्या क्षमतांच्या मर्यादा ओळखूनच मुलांच्या प्रगतीला दिशा देणारे त्यांचे पालक या सर्व पार्श्वभूमीवर म्हणूनच मला अधिक भावतात.

मानसशास्त्र, इंग्लिश व इतर परकीय भाषा, कायदा यासारख्या विद्याशाखांमध्येही आज अनेक संधी निर्माण झालेल्या आहेत. नाट्य-चित्रपट-संगीत या कलांचा व्यावसायिक उपयोग कितीतरी मोठ्या परीघात पसरला आहे. बँकिंग, वाणिज्य, व्यवस्थापन या क्षेत्रात चांगल्या उमेदवारांना सतत मोठी मागणी असते. कोणत्याही अंगभूत क्षमता आज व्यावसायिक अंगाने विकसित करता येऊ शकतात. मुख्य म्हणजे आपली मुले कितीतरी अधिक आनंदाने त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात चमकदार कामगिरी करू शकतात. संपूर्ण देश तरुण होतोय. काही वर्षांत शेकडा पासष्ट टक्के लोकसंख्या पस्तिशीच्या खालील असणार आहे. येणार काळ हा त्यामुळेच वाढत्या शक्यतांचा (एीर ेष शुरिपवळपस िेीीळलळश्रळींळशीचा) काळ असणार आहे. आपल्या मुलांना मनसोक्तपणे त्यांच्या क्षमतांना साजेसे मुक्त अनुभव घेत या काळाच्या वेगाबरोबर आनंदाने धावायला सोडायचे की त्यांच्या पायात आपल्या इच्छांच्या बेड्या अडकवून त्यांना कायमचे अधू करायचे, हा विचार आतातरी आपल्यापैकी प्रत्येक सुजाण पालकांनी करायला हवा.

डॉ. जयंत कुलकर्णी 

उपप्राचार्य, विज्ञान भारती इन्स्टिट्यूट

ऑफ टेक्नॉलॉजी, हैदराबाद