वाराणसी ते आनंदकानन

विवेक मराठी    08-May-2019
Total Views |

वाराणसी शहर उत्तर प्रदेश राज्यातील ईशान्य भागातील एक महत्त्वाचे आणि सर्वात वेगाने शहरीकरण होत असलेल्या शहरांपैकी एक शहर आहे. भारतातील प्राचीन काळापासून मोक्षदायिनी म्हणून सुप्रसिद्ध असणार्‍या ह्या शहराकडे राजकीय विश्लेषकांचे आणि टीकाकारांचे दुर्लक्ष झाले होते. गेल्या पाच वर्षात प्रगतीचा रथ हळूहळू पुढे सरकत आहे आणि वाराणसी शहर आपल्या समस्यांमधून बाहेर पडत परत एकदा ‘आनंदकानन’ म्हणून उदयास येत आहे.

लोकसभेच्या मतदान प्रक्रियेतील सगळ्यात शेवटच्या टप्प्यात, म्हणजे मे 19 तारखेला वाराणसीमध्ये मतदान प्रक्रिया पार पडेल आणि गेल्या दोन-तीन महिन्यांपासून सुरू असणार्‍या प्रचाराची, तसेच सात टप्प्यांतील मतदान प्रक्रियेची सांगता होईल. आज हा लेख लिहीत असताना पुढील बरोबर एका महिन्यात लोकसभा निवडणुकांचे निकाल स्पष्ट होऊन नवीन सरकार स्थापनेच्या दृष्टीने तयारीदेखील सुरू झालेली असेल.

आता थोडेसे मागे जाऊ या. ज्या दिवशी लोकसभेच्या निवडणुका आणि त्यांचे वेळापत्रक जाहीर झाले, त्या दिवशी काही तथाकथित जाणकार आणि मुख्यत्वे लिबरल पत्रकार अचानक वाराणसी शहरात दाखल होऊ लागले. ह्या जाणकारांनी मग तत्परतेने गंगा नदीवरील ऐतिहासिक अशा घाटांच्या पायर्‍या उतरत तेथील लोकांना प्रश्न विचारून आपली मते पेरत रिपोर्टिंग सुरू केले. वाराणसी शहरात गेल्या पाच वर्षांत कोणता बदल झाला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्या मतदारसंघात खरोखरच विकास झाला आहे का, ह्याविषयी प्रश्नचिन्हे उपस्थित करीत ह्या लोकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली.

वैदिक धर्मसंस्कृतीचे तसेच तत्त्वज्ञानाचे एक अतिशय महत्त्वाचे केंद्र असलेल्या आणि देशाची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणार्‍या प्राचीन वाराणसी शहराच्या अनेक दशकांपासून असणार्‍या समस्या, गेल्या 5 वर्षांत राबविल्या गेलेल्या अनेक नवीन योजना तसेच उपक्रम, त्यांची अंमलबजावणी आणि दिसू लागलेले बदल ह्या घटनांचे सर्वसमावेशक चित्र हे फक्त काही ठरावीक लोकांशी बोलून, ठरावीक मोजकी उदाहरणे पुढे करीत आणि मुख्यत्वे आपला पूर्वग्रह जपत लोकांच्या समोर सादर करणे हा माझ्या मते ह्या प्रक्रियेमधील सर्वात मूलभूत दोष आहे.

सदर लेखात, काही लोकांनी वाराणसीच्या विकासाबाबत जो हेतुपुरस्सर दुष्प्रचार आणि संशय निर्माण केला आहे, तो किती चुकीचा आहे आणि त्याचबरोबर गेल्या पाच वर्षांत ह्या प्राचीन शहराचा कायापालट होण्यास कशा प्रकारे सुरुवात झाली आहे, ह्या विषयी काही ठरावीक उदाहरणांचा दाखला देत मी आपल्यासमोर वाराणसी नगरीचे चित्र उभे करण्याचा प्रयत्न करणार आहे.

सुरुवातीला थोडीशी राज्याची सद्यःस्थिती आणि गेल्या दोन वर्षातील बदल ह्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. मार्च 2017मध्ये 312 जागांवर ऐतिहासिक विजय नोंदवीत भारतीय जनता पक्षाने (भाजपाने) तब्बल 16 वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर उत्तर प्रदेशमध्ये आपले सरकार स्थापन केले. भाजपाच्या ह्या देदीप्यमान विजयानंतर उत्तर प्रदेशातील सर्व समीकरणे बदलून गेली आणि त्याचबरोबर वाराणसी शहरातील अनेक योजना आणि कामे - जी समाजवादी पक्षाच्या राजवटीमध्ये रेंगाळली होती, ती कामे झपाट्याने सुरू झाली.

नरेंद्र मोदी यांनी 2014 साली वाराणसी मतदारसंघातून निवडणूक जिंकल्यावर संपूर्ण देशातील तसेच आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांचे आणि जाणकारांचे लक्ष वाराणसीमध्ये होणार्‍या घटनांकडे राहिले आहे. दुर्दैवाने काही अपवाद वगळता वाराणसी शहराला राजकीयदृष्ट्या फार मोठे महत्त्व कधीच मिळाले नाही. भारतातील प्राचीन काळापासून मोक्षदायिनी म्हणून सुप्रसिद्ध असणार्‍या ह्या शहराकडे राजकीय विश्लेषकांचे आणि टीकाकारांचे दुर्लक्ष झाले होते. वाराणसी शहराचा पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्था, प्रामुख्याने शहराच्या जुन्या आणि अरुंद अशा गल्ल्यांंमधून उचलला जाणारा कचरा व त्याचे व्यवस्थापन, सार्वजनिक वाहतूक आणि इतर अनेक शहरी सुविधा याबाबत साधारणपणे 1951च्या ‘मास्टर प्लॅन’पासून कोणते बदल झाले, ह्याविषयी जाणून घेण्याची आवश्यकता सध्या अति-उत्साहाने टीका करणार्‍या ह्या टीकाकारांना जाणवली नाही... किंबहुना त्यांना ती करायचीही नाही आहे.

नरेंद्र मोदी ह्यांच्या मतदारसंघाबाबत आणखी एक विशेष गोष्ट घडत आहे. 1947पासून एकूण 15 माजी पंतप्रधानांचा मतदारसंघ आणि त्या मतदारसंघातील झालेल्या सुधारणा, प्रगतीची कामे आणि त्यामुळे त्या शहराचा झालेला कायापालट याविषयी कधीही देश-विदेशातील पत्रकारांनी आणि लिबरल लोकांनी सखोल आणि तपशीलवार समीक्षा आजपर्यंत कधीही केलेली नाही. आपल्या ह्या सर्वात मोठ्या लोकशाही देशात डॉ. मनमोहन सिंग हे 2004पासून सलग 10 वर्षे पंतप्रधानपदावर राहिले. डॉ. सिंग हे 1991पासून सतत आसाममधून राज्यसभेचे सदस्य म्हणून निवडून येत आहेत. आसामकरिता त्यांनी कमीत कमी पंतप्रधान म्हणून कार्यरत असताना कोणती प्रगतीची कामे केली, ह्याविषयी खूपच कमी माहिती आज उपलब्ध आहे आणि त्याविषयी सविस्तर समीक्षा करण्याची तसदीदेखील कोणी घेतली नाही. लोकप्रतिनिधींच्या मतदारसंघाची समीक्षा आणि राबविलेल्या योजनांचा आढावा घेण्याची पद्धत ही जरी अगदी आदर्शवत असली, तरी ती जर फक्त एकाच व्यक्तीसाठी आणि कमालीची एकांगी असेल आणि त्याच वेळेस विरोधी पक्षांमधील अनेक नेते - जे गेली अनेक वर्षे एकाच मतदारसंघातून निवडून येत आहेत, त्यांच्या मतदारसंघात किती आमूलाग्र प्रगती झाली आहे ह्याविषयी चार ओळीदेखील जर लिहून येणार नसतील, तर मग ही पद्धत पूर्णपणे चुकीची आणि अन्यायकारक आहे.

 विकास कामांची नांदी

ह्या सर्व गोष्टींची जाणीव ठेवून आता आपण वाराणसीमध्ये गेल्या 5 वर्षांत काय घडले ह्याचा आढावा घेऊ या.

वाराणसी शहर उत्तर प्रदेश राज्यातील ईशान्य भागातील एक महत्त्वाचे आणि सर्वात वेगाने शहरीकरण होत असलेल्या शहरांपैकी एक शहर आहे. भारतीयांना पवित्र असलेल्या गंगा नदीच्या पश्चिम तटावर वसलेल्या ह्या शहराची लोकसंख्या साधारणपणे 16 लाख इतकी आहे. काशी विश्वनाथ मंदिराबरोबर हजारो प्राचीन मंदिरे, कुंडे, पुष्करणी, गंगा नदीवरील 84 देखणे आणि मनोहर घाट, बनारस हिंदू विश्वविद्यालय, मानसिंग वेधशाळा, रामनगर किल्ला आणि वस्तुसंग्रहालय, तसेच सारनाथ अशा अनेक सुप्रसिद्ध धार्मिक, ऐतिहासिक, सामाजिक आणि सांस्कृतिक स्थळांना भेटी देण्यासाठी येणारे लाखो भाविक, यात्रेकरू, पर्यटक ह्यांच्यामुळे वाराणसी शहर सतत गजबजलेले असते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट जाता जाता आवर्जून नमूद करावीशी वाटते, ती म्हणजे उत्तर प्रदेश सरकारच्या अहवालानुसार 2016 साली देशातील पर्यटकांचे पसंतीचे शहर आग्रा नसून वाराणसी होते. हा बदलदेखील खूप महत्त्वाचा आहे.

1991 ते 2011 दरम्यान वाराणसी शहराचा वेगाने विस्तार होत मोठ्या प्रमाणावर बांधकाम प्रकल्पांना सुरुवात झाली. पर्यावरणतज्ज्ञांच्या मते ह्या कारणांमुळे शहराचा पर्यावरण समतोल बिघडत गेला. गंगा नदीमध्ये अस्सी घाटानजीक कोणत्याही प्रक्रियेविना सांडपाणी मोठ्या प्रमाणावर सोडले जात होते. शहरातील पाण्याची अनेक प्राचीन कुंडे आणि तलाव ह्यांची स्थिती अतिशय वाईट होती. त्यापैकी अनेक कुंडे अगोदरच अनेक कारणांमुळे अतिक्रमणाच्या विळख्यात अडकून नामशेष झाली होती. कित्येक कुंडे अनेक दशकांपासून योग्य देखरेखीच्या अभावी नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्याचबरोबर अनियमित पाणीपुरवठा, विजेचा सतत चालणारा लपंडाव आणि कोलमडून गेलेली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अशा अनेक समस्या नागरिकांना तसेच बाहेरून येणार्‍या पर्यटकांना भेडसावत होत्या.


पायाभूत नागरी सुविधांचा विकास करण्याच्या महत्त्वाकांक्षी उद्देशाने संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीएच्या) सरकारने 2005 साली ‘जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण योजना’ ही राष्ट्रीय योजना एकूण 9 वर्षे राबविली. ह्या योजनेअंतर्गत निवडलेल्या 63 शहरांमध्ये वाराणसी शहराचादेखील समावेश करण्यात आला होता. शहराचा पाणीपुरवठा, घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन, मंदिरे, कुंडे यांचे आणि इतर ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा स्थळांचे संवर्धन आणि देखरेख अशी काही प्रमुख कामे वाराणसी शहराच्या पुनर्निर्माण योजनेमध्ये होती. पण ह्या नवीन प्रकल्पांच्या अंमलबजावणीविषयी झालेली कमालीची दिरंगाई, अकार्यक्षम व्यवस्थापन आणि अपुरा पाठपुरावा यामुळे ह्या समस्यांचे निवारण झाले नाही. जेव्हा आपण गेल्या 5 वर्षांत वाराणसी मतदारसंघात कोणती विकासकामे झाली ह्याचा हिशोब मांडतो, त्या वेळेस शहराच्या जुन्या समस्या आणि त्यांचा अनुशेष ह्या सर्वांचा विचार करणे सयुक्तिक ठरेल.

वाराणसीतील बदल

ह्या लेखात मी प्रामुख्याने केंद्र सरकारचे ‘स्वच्छ भारत अभियान’ आणि त्यामुळे वाराणसीमध्ये जाणवू लागलेला बदल, तसेच ‘वारसा शहर विकास आणि विस्तार योजना’ (हृदय) आणि ‘तीर्थयात्रा पुनरुत्थान आणि आध्यात्मिक संवर्धन’ (प्रसाद) ह्या केंद्र शासनाच्या योजनांतर्गत वाराणसी शहरातील महत्त्वाच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा स्थळांचे संरक्षण, देखभाल आणि नूतनीकरण ह्याविषयी काही गोष्टी आपल्या समोर ठेवीन. आणि लेखाच्या शेवटी अगदी थोडक्यात वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी सुरू असलेल्या योजना आणि नवीन महामार्गांचे काम ह्यामुळे वाराणसी शहर कसे झपाट्याने बदलत आहे, ह्याचा उल्लेख करीन.

मोदी ह्यांनी आपल्या मतदारसंघात अस्सी घाटावर स्वतः हातात कुदळ आणि फावडे उचलून, तिथे अनेक वर्षे सतत साचत आलेला गाळ आणि चिखल काढून ‘स्वच्छ भारत अभियान’ ह्या महत्त्वाकांक्षी आणि आतापर्यंत काही ठरावीक विचारसरणीच्या लोकांकडून सर्वात जास्त टीका आणि उपहास केलेल्या योजनेचा शुभारंभ केला. नंतर मोदी ह्यांनी झाडू घेऊन वाराणसीच्या जुन्या भागातील गल्ल्यांमध्ये साफसफाई केली. अतिशय अरुंद, चिंचोळ्या आणि कोणतीही नवखी व्यक्ती सहज हरवून जाईल अशा गल्ल्यांमधून कचरा उचलणे आणि साफसफाई करणे हे अतिशय कठीण काम आहे. पण आपल्या ह्या दोन छोट्या कृतींमधून पंतप्रधानांनी आपला मुख्य उद्देश नागरिकांसमोर ठेवून त्यांना स्वच्छतेसाठी जागरूक आणि प्रेरित केले. वाराणसी शहरात एकूण 90 वॉर्ड असून तेथील नगरपालिकेबरोबर इतर 3 स्वतंत्र संस्था ह्या सार्वजनिक स्वच्छता आणि आरोग्य यासाठी गेल्या 4 वर्षांपासून कार्यरत आहेत. मोदींच्या ह्या उपक्रमांमुळे 2013पासून गंगा नदीवरील घाटांची, तसेच अतिशय अस्वच्छ बनलेल्या काही कुंडांची साफसफाई आणि देखभाल करत असलेली तेम्सुतुला इमसोंग ही तरुण कार्यकर्ती आणि तिच्यासह काम करत असलेले अनेक स्वयंसेवक ह्यांना खूप मोठे बळ आणि उत्साह मिळाला. ह्यातून पुढे जाऊन त्यांनी वाराणसीमध्ये 2015च्या ऑगस्ट महिन्यात दोन दिवसांची ‘राष्ट्रीय श्रमदान कार्यशाळा’ आयोजित केली. ह्या परिसंवादामध्ये देशातील अनेक शहरांतून तेम्सुतुला इमसोंग ह्यांच्या स्वयंसेवी संस्थेप्रमाणे स्वच्छतेसाठी श्रमदान करणार्‍या अनेक गटांनी सहभाग घेतला. अनेक तरुण कार्यकर्ते मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाच्या संपर्कात येऊन आपापल्या परीने आपल्या शहरात, गावात काम करत आहेत.

वाराणसी शहरातून मोठ्या प्रमाणावर सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता अस्सी घाटानजीक अस्सी नाल्यातून गंगा नदीमध्ये सोडले जात होते. गेल्या वर्षी मोदी ह्यांनी दोन मोठ्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचे उद्घाटन केले. निर्मल गंगा अभियानांतर्गत होत असलेल्या कामांमुळे वाराणसी शहरातून ह्यापुढे दूषित पाणी गंगेमध्ये मिसळणार नाही आणि ह्यामुळे पुढील काळात आपल्याला निश्चितच खूप मोठा बदल अनुभवायला मिळेल. वाराणसीमध्ये गंगा नदीमध्ये स्नान करण्यासाठी येणार्‍या लाखों भाविकांसाठी, तसेच पर्यावरणाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा ठरेल.

कुंड आणि तलावाचा विकास

आता थोडेसे प्राचीन कुंड आणि तलाव ह्यांच्याविषयी. वाराणसी शहरात शंभराहून अधिक प्राचीन कुंड, पुष्करिणीं आणि तलाव होते. आजही अनेक भाविक आणि यात्रेकरू स्कंदपुराणातील काशी खंडात, तसेच श्रीगुरुचरित्रात उल्लेख असणार्‍या लोलार्क कुंड, लक्ष्मी कुंड, दुर्गा कुंड, पिशाचमोचन कुंड, पितृ कुंड, लाट भैरव, मणिकर्णिका कुंड अशा अनेक प्राचीन कुंडांचे दर्शन घेण्यासाठी येतात. दुर्दैवाने ब्रिटिशांनी अनेक कुंडे आणि तलाव एकतर बुजवून टाकून रस्ता रुंदीकरण केले किंवा तिथे सार्वजनिक बागा बांधल्या. साधारणपणे 200 वर्षांपासून कुंडे आणि तलाव हळूहळू नष्ट होते गेले. फक्त धार्मिक तीर्थस्थान म्हणून किंवा ऐतिहासिक आणि सामाजिक असे ह्या कुंडांचे महत्त्व नसून ही पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहेत. पावसाचे अतिरिक्त पाणी साठवून घेत आणि भूजलपातळी संतुलन ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी ही कुंडे आणि तलाव करत असतात. अभ्यासकांच्या मते ही कुंडे व तलाव गंगा आणि उत्तरेकडील वारणा या नद्यांशी, तसेच शहराच्या दक्षिण दिशेला असणार्‍या आणि पुराणात शुष्क नदी असा उल्लेख असणार्‍या अस्सी नदीशी भुयारी मार्गाने जोडली गेली होती. दर दोन-तीन वर्षांनी पावसाळ्याच्या महिन्यांमध्ये गंगा नदीची वाढणारी जल-पातळी आणि परिणामस्वरूप शहरातील अनेक सखल भागांमध्ये साचणार्‍या पाण्याची समस्या, तसेच खालावणारी भूजलपातळी ह्या गंभीर समस्या शहराला भेडसावत आहेत. अनेक पर्यावरण अभ्यासकांच्या मते जर शहरातील कुंड, तलाव आणि विहिरी ह्यांचे संरक्षण करून जर योग्य काळजी घेतली गेली, तर ह्या समस्यांचे समाधान होऊ शकेल.

‘वारसा शहरविकास आणि विस्तार योजना’ आणि ‘तीर्थयात्रा पुनरुत्थान आणि आध्यात्मिक संवर्धन’ ह्या दोन योजनांद्वारे इतर वारसा स्थळांचे आणि काही ठरावीक कुंडांचे नूतनीकरण आणि संवर्धनाचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. ओएनजीसीसारख्या संस्था ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’च्या - अर्थात ‘सीएसआर’च्या माध्यमातून ह्यापैकी दुर्गा कुंड, लाट भैरव, पुष्कर कुंड, लक्ष्मी कुंड अशा काही कुंडांचे जीर्णोद्धाराचे काम करत आहेत. ह्या संस्था ह्या ठरावीक कुंडांचे देखभालीचे काम पाच वर्षे पाहतील. प्रामुख्याने गेल्या दोन वर्षांत काही कुंडांमध्ये लक्षणीय बदल दिसू लागला आहे. कुंडांमध्ये साचलेला गाळ, कचरा तसेच जलपर्णी काढणे, सभोवतालची जागा साफ करणे, पायर्‍यांची दुरुस्ती, निर्माल्यासाठी स्वतंत्र व्यवस्था, संरक्षक जाळी लावणे यासारखी अनेक कामे सुरू आहेत. खालील काही छायाचित्रांच्या द्वारे आपल्याला तो बदल बघायला मिळेल.

ह्यात आवर्जून उल्लेख करायला पाहिजे, तो म्हणजे मातृ कुंडाचा. अतिक्रमण, भरमसाट कचरा आणि दुर्गंधी यामुळे जवळपास नष्ट झालेले हे प्राचीन कुंड परत एकदा जिवंत झालेले आहे. इतर काही कुंडांप्रमाणे आज मातृ कुंडातदेखील मासे आणि कासवे दिसू लागली आहेत.

शेवटी वाराणसी शहरातील मला अनुभवायला आलेल्या विजेच्या लोंबकळत आणि अतिशय धोकादायक असणार्‍या तारा, तसेच अनियमित वीजपुरवठा याविषयी थोडेसे. जर आपण वाराणसीच्या जुन्या भागांतून - विशेषतः श्रीविश्वनाथ मंदिराच्या सभोवताली असणार्‍या भागांतून फिरला असाल, तर लोंबकळणार्‍या आणि गुंतागुंतीच्या विजेच्या अनेक तारा आपण दोन-तीन वर्षांपूर्वी बघितल्या असतील. पण आता अनेक भागांतून भूमिगत तारांचे काम पूर्ण झाल्याने, होत असणार्‍या विजेच्या चोरीला, होणार्‍या अपव्ययालासुद्धा आळा बसला आहे.

आपल्या एका भाषणात वाराणसीमधील सुरू असलेल्या विकासकामांविषयी, अनेक योजनांसंबंधी बोलत असताना पंतप्रधान मोदी म्हणाले की “ह्या प्राचीन शहरात ‘प्रकृतीचा, संस्कृतीचा तसेच साहसाचादेखील एक सुरेख संगम होत आहे.” आपल्याला आणि खरोखर ज्यांना हा संगम आणि बदल बघायचा आहे, अशा लोकांना आता वाराणसीला पोहोचणे पूर्वीपेक्षा सोपे झाले आहे. आज काम सुरू असलेले नवीन महामार्ग, रेल्वे आणि विमानसेवेद्वारे आपण वाराणसी तीर्थक्षेत्री जलद पोहोचू शकता. लाल बहादुर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यावर, पूर्वी वाराणसीला पोहोचण्यासाठी दोन-तीन तास इतका वेळ लागत असे. पण आता नवीन बांधलेल्या बाबतपूर-वाराणसी ह्या चारपदरी महामार्गावरून, तसेच रिंग रोडमुळे आपण अर्ध्या तासाच्या आत वाराणसी शहरात दाखल होता.

ह्या वर्षी वाराणसीमध्ये भारत सरकारच्या 15व्या ‘प्रवासी भारतीय दिवस’ कार्यक्रमाचे अतिशय सुरेख आयोजन झाले. सुमारे 85 देशांतून आलेल्या चार हजारांहून अधिक निमंत्रितांचे स्वागत आणि आदरातिथ्य वाराणसी शहरात झाले. हा गेल्या पाच वर्षात प्रगतीचा रथ हळूहळू पुढे सरकत आहे आणि वाराणसी शहर आपल्या समस्यांमधून बाहेर पडत परत एकदा ‘आनंदकानन’ म्हणून उदयास येत आहे.

- महेश गोगटे

 (क्योतो विद्यापीठ, जपान)