दोन वाचाळ तोंडे

विवेक मराठी    08-May-2019
Total Views |

प्रसिध्द संगीतकार जावेद अख्तर आणि मर्ाक्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीतराम येचूरी या डाव्या मंडळीच्या वक्तव्यांनी चांगली खळबळ उडाली आहे. अख्तरमियांनी बुरख्याप्रमाणेच घुंगटवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. तर येचूरी यांनी रामायण व महाभारत या दोन महाकाव्याचा आधार घेत हिंदू हिंसक असल्याचे म्हटले आहे. या दोन्हीं वक्तव्यांचा विचार केला असता डावी सांप्रदायिकता प्रगट न करता आपल्या अज्ञानाचे दर्शन घडविले.

दोन तोंडे या वेळेला नको ते पचपचली आहेत. एक आहे जावेद अख्तर यांचे आणि दुसरे आहे सीताराम येच्युरी यांचे. तसे दोघेही डाव्या विचारांचे असल्यामुळे वाटेल ते पचपचणे हा त्यांचा जन्मसिध्द अधिकार आहे. हे त्यांचे भाषणस्वातंत्र्य आहे, त्याचबरोबर ते त्यांचे विचारस्वातंत्र्य आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्य आहे. हे विचारस्वातंत्र्य आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्य मिळविण्यासाठी डाव्या लोकांनी काहीही केलेले नाही. त्यांनी स्वातंत्र्यचळवळीचा विश्वासघात केला. आता फुकट मिळाले आहे, त्याची फुकट मिरासदारी ते मिरवतात.

मुस्लीम महिलांच्या बुरख्यांवर बंदी आणावी, असा लेख सामनात प्रकाशित झाला आणि त्याने खळबळ माजली. त्यापूर्वी श्रीलंकेने अध्यादेश काढून सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्यास बंदी केली आहे. फ्रान्समध्येदेखील बुरख्यावर बंदी आहे. मुस्लीम महिलांनी बुरखा घालायचा की नाही घालायचा, हा त्यांचा प्रश्न आहे. मुंबईसारख्या दमट शहरात, संपूर्ण शरीर झाकणारा काळा बुरखा अंगाची कशी लाहीलाही करत असेल, याची कल्पना न केलेलीच बरी. परंतु त्याचा निर्णय मुस्लीम महिलांनी घ्यायचा आहे, त्यांच्या धर्मगुरूंनी घ्यायचा आहे, त्यात निर्णय घेण्याचा आपल्याला काही अधिकार नाही.

'अख्तर मियाँ'ची हास्यास्पद मागणी

मुस्लीम महिलांच्या बुरख्यावर बंदी आणावी, या वाक्यामुळे अख्तर मियाँ खवळले आणि त्यांनी घुंघट ओढण्यावरदेखील बंदी आणावी, अशी हास्यास्पद मागणी केली. अख्तर बुध्दिमान, कवी, गझलकार. पण या माणसाला हे माहीत नाही की घुंघट म्हणजे बुरखा नाही, डोक्यावरून ओढलेला साडीचा पदर असतो. तो काळा नसतो आणि मुस्लीम महिलांप्रमाणे पूर्ण शरीर झाकणारादेखील नसतो. घुंघट एवढयासाठीच ओढायचा असतो की, मोठे दीर, सासरे, काका, मामा, असे ज्येष्ठ पुरुष आले असता, त्यांच्यापुढे नम्र राहायचे, ही प्रथा आहे. धार्मिक रूढी नाही. हिंदू धर्मातील कोणत्याही स्मृतीत महिलांनी घुंघट ओढला पाहिजे असले आदेश नाहीत. हा रितीरिवाजाचा प्रश्न आहे.

रितीरिवाज समाज पाळीत असतो. परंपराचे पालन करण्यात त्याला आनंद वाटत असतो. या रितीरिवाजात कसलीही उच्च-नीचता नसते. मर्यादांचे पालन त्यात असते. काळ बदलतो, तसे रितीरिवाज बदलत जातात, प्रथा बदलत जातात. घुंघट ओढण्याची प्रथा उत्तरेत जास्त आहे, पण ती सर्वच घरात आहे, असे नाही. हळूहळू ती इतिहासजमा होत जाईल. हेच हिंदू समाजाचे वैशिष्टय आहे. हिंदू समाज म्हणजे मुसलमान समाज नव्हे. जे अरबस्तानात आहे, ते पवित्र आणि त्याचे पालन 'कयामत के दिन तक' करत राहायचे, असी आपली प्रथा नाही.

घुंघट या शब्दावर फार सुंदर गाणी रचली आहेत. 'घुंघट के पट खोल, तोहे पिया मिलेंगे', 'घुंघट नही खोलूँगी सैंय्या तोरे आगे', 'घुंघट की आड में दिलबर का..', 'अरे यार मेरी, तुम भी हो गजब घुंघट तो जरा ओढो', 'गोरी घुंघट में मुखडा छुपा ओ ना'. असे बुरख्यावर एखादेही गाणे मी कधी ऐकले नाही. अख्तर मियाँनी घुंघटवर तोंड वाजविण्यापूर्वी, ते ज्या सिनेमासृष्टीत राहतात तिथे घुंघट या शब्दावर किती सुंदर संगीत रचना झाली आहे, याचा अभ्यास करायला पाहिजे. आपली डावी सांप्रदायिकता प्रगट न करता बुरख्यात झाकून ठेवणे सोयीचे आहे.

येच्युरी महायशाचे महाकाव्यांविषयी वक्तव्य

सीताराम येच्युरी म्हणाले, ''रामायण आणि महाभारत हिंसाचारी युध्दांनी भरलेले आहे. प्रचारक म्हणून तुम्ही महाकाव्याचे उदाहरण देता आणि सांगता की हिंदू हिंसक असू शकत नाही. एक धर्म हिंसेवर विश्वास ठेवतो आणि हिंदू हिंसेवर विश्वास ठेवत नाहीत, या तर्काला काही अर्थ नाही.'' येच्युरींना म्हणायचे आहे की, हिंदू हिंसक आहेत आणि हिंदू धर्म हिंसेला प्रोत्साहन देतो.

कम्युनिस्ट माणसाला हिंसा प्रिय असते. येच्युरींचे बाप लेनिन, स्टॅलिन, माओ, पोलपॉट, यांनी आपल्या राजवटीत साडेतीन ते चार कोटी माणसे ठार मारलेली आहेत. येच्युरींचे तत्त्वज्ञान हिंसेचे समर्थन करणारे आहे. हिंसेशिवाय क्रांती नाही आणि क्रांतीशिवाय भांडवलदारी वर्गाची कत्तल नाही, हे कम्युनिस्ट तत्त्वज्ञान आहे. अशा माणसाने रामायणाच्या आणि महाभारताच्या नादी लागू नये. या दोन महान महाकाव्यांचा उच्चार करूनसुध्दा येच्युरीचे तोंड पवित्र होणार नाही.

रामायणात युध्द आहे, महाभारतातदेखील युध्द आहे. ही दोन्ही युध्दे धर्मासाठी आहेत. धर्म म्हणजे अल्लाची उपासना कशी करावी, आकाशातील बापाला कसे शरण जावे, हे सांगणारे नियम नव्हेत. धर्म म्हणजे न्याय, धर्म म्हणजे नीती, धर्म म्हणजे न्यायपूर्ण हक्क, त्याच्या प्रस्थापनेसाठी रामायण आणि महाभारत घडले. रावणाने सीतेचे अपहरण केले आणि दुर्योधनाने द्रौपदीचे वस्त्रहरण करायला लावले, म्हणजे अधर्म केला, नीती सोडली. पांडवांना त्यांचे न्याय्य हक्क देण्याचे नाकारले, म्हणून युध्द झाले. हे युध्द हिटलर आणि स्टॅलिनच्या युध्दासारखे नाही. एकमेकांचा प्रदेश हडप करण्यासाठी झालेले नाही, दुसऱ्याच्या स्वातंत्र्याचे हरण करण्यासाठी झालेले युध्द नाही. हंगेरी, पोलंड, तिबेट बळकाविण्याचे हे कारस्थान नाही. येच्युरी महाशयांनी जीभ उचलताना हे समजून घ्यायला पाहिजे.

रामायणाचे युध्द होऊ नये, असा प्रयत्न रामाने केला. आपला दूत अंगद याला शिष्टाईसाठी रावणाकडे पाठविले. महाभारताचे युध्द होऊ नये म्हणून भगवान श्रीकृष्ण शिष्टाई करण्यासाठी गेले, पण हे प्रयत्न अयशस्वी झाले. अधर्म करणाऱ्या रावणाला धर्म मान्य नव्हता आणि दुर्योधन तर म्हणत होता, मला धर्म काय आहे हे समजत, अधर्म काय आहे हे समजते, परंतु माझी प्रवृत्ती अधर्माचरणातच आहे. हिंसेसाठी हिंसा म्हणून ही युध्दे झालेली नाहीत. जिहादी दहशतवादाचे समर्थन करण्यासाठी हिंदूदेखील हिंसकच आहेत, हे येच्युरीसारखा कम्युनिस्टच म्हणू शकतो. दुर्योधनाप्रमाणे ज्यांचा जन्म अधर्माचरणासाठीच झालेला आहे, ते यापेक्षा वेगळे काही बोलू शकत नाहीत, हे आपण समजून घ्यायला पाहिजे.

जगाला स्पष्ट झाले, डाव्यांना कधी?

हिंदूचा स्वभाव कसा आहे, हे मॅक्स मूलर यांनी What India can teach us या भाषण मालिकेत फार उत्तमरीत्या सांगितले आहे. भारतात सनदी नोकर म्हणून येणाऱ्या ब्रिटिश मुलांसमोर 1882 साली त्यांची भाषणे झालेली आहेत. त्यात ते म्हणतात, ''सर्व संपत्तीने युक्त असा देश, जगाच्या पाठीवर शोधण्यासाठी मी जेव्हा पाहतो तेव्हा माझे लक्ष भारताकडे जाते. भारताचा काही भाग भूलोकीचा स्वर्गच आहे. जर मला कुणी विचारले की मन आणि बुध्दीची देणगी जी माणसाला मिळाली आहे, तिचा सर्वोत्तम विकास कुठे झाला असेल, तर तो भारतात झाला आहे. जीवनाचे गुंतागुंतीचे प्रश्न आणि त्यातील काहींची उत्तरे प्लेटो आणि कान्ट यांनी शोधण्याचा प्रयत्न केला आहे, पण भारताने त्याची उत्तरे शोधली आहेत.''

याच भाषण मालिकेत मॅक्स मूलर विदेशी प्रवाशांचे दाखले देऊन भारतीय लोकांचे वर्णन असे करतात. हुऐनत्संग हा चिनी प्रवासी लिहितो (सातवे शतक) - ''जरी भारतीय सौम्य स्वभावाचे असले, तरी प्रामाणिकता आणि स्पष्टवक्तेपणा ही त्यांच्या स्वभावाची वैशिष्टये आहेत. पैसाचा विषय केला तर ते अन्यायाने कुणाचे धन घेत नाहीत. न्यायाचा विचार केला तर ते अतिउदार असतात. स्पष्टपणा हा त्यांच्या कारभारचा एक विशेष आहे.'' मॅक्स मूलर मुस्लीम इतिहासकार इद्रिस याचे म्हणणे सांगतात, ''हिंदू नैसर्गिकताच न्यायाच्या पक्षाचे असतात. ते आपल्या कृतीने यापासून कधीही दूर होत नाहीत. त्यांच्या श्रध्दा, प्रामाणिकता, आपल्या अंगीकृत कार्याबद्दलच्या त्यांच्या निष्ठा फार प्रसिध्द आहेत. आणि या गुणांनी ते इतके विश्वविख्यात आहेत की, जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक त्यांच्या देशाला भेट देण्यास येतात.''

डावी मंडळी स्वतःला फार स्कॉलर समजतात, म्हणून मॅक्स मूलरच्या भाषण मालिकेतील ही निवडक अवतरणे दिली आहेत. रामायणकालीन आणि त्यानंतरचा हिंदू कसा आहे, हे यातून स्पष्ट होते, हे जगाला स्पष्ट होईल, पण डाव्यांना स्पष्ट होईल का?

vivekedit@gmail.com