ज्योतीला ज्योत मिळाली

विवेक मराठी    08-May-2019
Total Views |

 

 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक आणि वनवासी कल्याण आश्रमाचे पूर्व अखिल भारतीय ग्रामविकास प्रमुख प्रकाश कामत यांचे रविवार, दि. 21 एप्रिल 2019 रोजी बेळगाव येथे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्याविषयी आठवणी जागवणारा हा लेख.

प्रकाश कामत यांचे निधन हे वनवासी कल्याण आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब देशपांडे यांच्या स्मृतिदिनी होणे  म्हणजे एका अर्थाने दिव्य ज्योतीला ज्योत मिळण्याचे अनोखे उदाहरण म्हणता येईल .

वनवासी कल्याण आश्रमाचे कार्य बीजरूपात ज्यांनी रुजवले व वनवासी, जनजाती समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी संपूर्ण भारतभर आपल्या कठोर परिश्रमाने  विकसित केले, त्या वनयोगी बाळासाहेब देशपांडे यांचाही 21 एप्रिल हा स्मृतिदिन.

मला आठवते की सिलिगुडी बैठकीनंतर प्रवासामध्ये प्रकाश कामत यांची माझी प्रथम भेट झाली. मीही प्रचारक म्हणून वनवासी कल्याण आश्रमाचे काम नुकतेच 2015मध्ये सुरू केले होते. मोठया महानगरात व नगरात राहणाऱ्या जनजातीय समाजाशी संपर्क साधण्याचे काम माझ्याकडे होते. ते कर्नाटकचे असल्याकारणाने  त्यांची कानडी-मराठी मला त्यांच्याकडे आकर्षित करून गेली. त्या वेळेला आस्थेने माझी चौकशी करून ''कसं चाललंय काम? काही अडचण नाही ना?'' असे त्यांनी मला विचारले. त्यामुळे एक सहज संवाद आणि आत्मीयता पूर्ण भावविश्व आमच्यामध्ये निर्माण झाले आणि मग त्यांच्या असलेल्या कामाच्या संदर्भात माझे त्यांचे बोलणे सुरू झाले.

प्रकाश कामत त्या बैठकीनंतर त्यांच्या दोन दिवसांच्या प्रवासासाठी मुंबईला येणार होते, तेव्हा त्यांनी मला मुलुंडला दोन लोकांना भेटायचे आहे, असे सांगितले. त्यात एक त्यांच्या व्यक्तिगत परिचयाचे नाव होते आणि दुसरे नाव हे एकूण ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात ज्यांचे धोरणात्मक योगदान होते, अशा व्यक्तीचे होते.

मी वनवासी कल्याण आश्रमामध्ये अगदी नवखा होतो. माझ्याकडे जबाबदारी वेगळी होती. परंतु माझ्याबरोबर त्यांनी या विषयाची चर्चा करून या विषयात मला किती गती आहे याचा एक आराखडा बांधला आणि 'ये अपने काम की व्यक्ती है।' याची मनाशी खूणगाठ बांधली.

माणूस भेटला की त्याला कसा गुंतवायचा, या प्रचारक संकल्पनेच्या यादीत माझी नोंद करून आपली इतिकर्तव्यता  पूर्ण केली, हे मी म्हणू  ठामपणे सांगू शकतो, कारण त्यांनी मग माझ्याशी ग्रामीण विकासाला धरून कुठे काही प्रकल्प चालतात का, कोण चालवतो? तुझ्या परिचयाचे कोणी आहेत का? हे विचारले. मीही मला माहीत असलेल्या प्रकल्पांची आणि व्यक्तींची माहिती दिली. लगेच त्यांनी एक छोटी वही काढली व त्यात नोंद करून टाकली. प्रचारक आपल्या कृतीतून अनेक गोष्टी शिकवतो. मला तत्काळ टिपून ठेवण्याचा न बोलता एक धडा मिळाला.

पुढच्या प्रवासामध्ये आवर्जून आपण त्यांना भेटू, कधी भेटू शकतो, त्याचे नियोजन त्यांनी नक्की केले आणि मला कामाला जुंपले. प्रवासातला तिसरा धडा माझ्या डोक्यात पक्का बसला.

 प्रवास संपला. ते त्यांच्या कामात, मी माझ्या कामामध्ये व्यग्र असताना एकदा फोन आला. पाठपुरावा आणि आठवण केली. त्यानंतर माझ्याही आत्मीयतेच्या वलयामध्ये प्रकाश कामत नाव कोरले गेले.

कमी वेळात इतक्या सलगीने वागणाऱ्या माणसाबद्दल मग उत्सुकता निर्माण झाली. बैठकीमध्ये करून दिलेला परिचय तोंडपाठ झाला. वनवासी कल्याण आश्रमाचे अखिल भारतीय ग्राम विकास प्रमुख असलेले प्रकाश कामत हे संघाचे वरिष्ठ प्रचारक असून मूळ कर्नाटकमधील पवित्र क्षेत्र शृंगेरीचे आहेत. आपले सुवर्ण पदकासहचे अभियांत्रिकी शिक्षण प्रचारक होण्यासाठी समाजाच्या चरणी संघाच्या माध्यमातून समर्पित करून आजीवन प्रचारक बनले.

जन्म 10 एप्रिल 1949 आणि मृत्यू 21 एप्रिल 2019. म्हणजे 70 वर्षांच्या आयुष्यात जवळजवळ 45 वर्षे प्रचारक या नात्याने विविध स्थानी त्यांनी कार्य केले. त्यात ईशान्य भारतामधील 10 वर्षे त्यांच्या दृढ मनोबलाबरोबर कार्य दृढ करण्याची साक्ष देतात. 

पुढे वनवासी कल्याण आश्रमाची जबाबदारी आली. वनवासी कल्याण आश्रमामध्ये  त्यांच्याकडे अखिल भारतीय ग्रामविकास प्रमुख म्हणून जबाबदारी होती. त्या दृष्टीने त्यांचा प्रवासामध्ये आग्रह असायचा की मुख्य मोठया शहरांमध्ये तुम्ही मला न ठेवता जेथे प्रत्यक्ष ग्रामीण जीवनाचे आपले कार्य चालते, त्या प्रकल्पावर किंवा पाडयांवर निवासाची व्यवस्था करण्यात यावी, जेणेकरून ग्रामदर्शन आणि आपल्याला हवे असलेले काम आपण करू शकतो, पाहू शकतो. अशा प्रकाश कामत यांनी आपल्या प्रचारकी अनुभवाच्या आधाराने ग्रामविकासाला एक चालना दिली. आजारी होण्याच्या अगोदर पुणे येथे त्यांच्या पुढाकाराने जनजाती ग्रामीण विकासाची कार्यशाळा झाली. या कार्यशाळेत अनेक मार्गदर्शक गोष्टी निश्चित झाल्या, ज्या आज या कामासाठी पथदर्शक झालेल्या आहेत.

बिहार कार्यकारिणीच्या बैठकीच्या वेळी काहीतरी निमित्त झाले आणि पक्षघाताच्या आजाराने ग्रामविकासाचे हे चालते बोलते विद्यापीठ एका जागी जखडले गेले. व्यापक अनुभवी अशा प्रकाशाला ग्रहण लागले.

गेली तीन वर्षे प्रदीर्घ आजारावर एकाच ठिकाणी उपचार घेत आजाराशी झुंजत राहण्याचा आपल्या कठोरतम आत्मबलाचा परिचय देत दिनांक 21 एप्रिल रोजी, ज्यांच्या प्रेरणेने भारावून जाऊन आपली सारी शक्ती, बुध्दी, परिश्रम कुशलतापूर्वक वनवासी समाजाच्या उत्कर्षसाठी जिझवली ते जीवन वनयोगी बाळासाहेब देशपांडे यांच्या स्मृतिदिनीच निजधामास जाणे म्हणजे एका निष्ठावंत आणि सच्च्या कार्यकर्त्याची ज्योत एका तेजात विलीन होऊन कायमची अमर झाल्यासारखी आहे?

शरद चव्हाण

8422882614

प्रचारक - 
वनवासी कल्याण आश्रम