निसर्गाचे वरदान - कंपोस्ट

विवेक मराठी    11-Jun-2019
Total Views |

***श्रीपाद काबे***

कचऱ्याच्या समस्येवर कंपोस्टिंग हा महत्त्वाचा पर्याय ठरला आहे. जैविक कचऱ्याचे चांगल्या दर्जाच्या खतात रूपांतर करण्याची ही प्रक्रिया आज सर्वत्र वापरली जाते. कंपोस्टिंगचा उगम, प्रकार, प्रक्रिया, फायदे-तोटे याविषयीची माहिती. 

निसर्गाचा निर्मिती, पोषण, दुरुस्ती, पुनर्नवीनीकरण आणि नष्ट करण्याचा स्वत:चा मार्ग आहे. निसर्ग आपल्याला आपल्या जीवनासाठी आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट देतो. निसर्गात सर्व काही विनामूल्य आहे आणि काहीच अनावश्यक नाही. प्रत्येक गोष्टीचा उद्देश, वापर, पुनर्वापर आणि रूपांतरण शक्य आहे. निसर्गाला शक्य तितके परत देण्याची आपल्यापैकी प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आणि कर्तव्यदेखील आहे. आपण एक सुसंस्कृत प्रजाती असूनसुध्दा, आपल्या निरंतर वाढत जाणाऱ्या हावेमुळे निसर्गाच्या संदर्भातल्या आपल्या मर्यादा आपण सतत ओलांडत असतो आणि त्याचाच परिणाम म्हणून निसर्ग विविध आपत्तींमधून आपला सूड घेत असते.

आपण बऱ्याचदा ऐकतो, वाचतो की आपल्याकडून निर्माण होणारा कचरा हा कंपोस्टिंग किंवा इतर माध्यमातून वापरला गेला पाहिजे. जे आपण कचरा म्हणून टाकून देतो, त्याचे पुनर्चक्रण, पुनर्प्रक्रिया किंवा रूपांतरण करून आपण त्याला एक नवीन उपयोगी उत्पाद किंवा इंधन म्हणून वापरू शकतो. त्यालाच आपण 'कचऱ्यातून ऊर्जा' किंवा 'कचऱ्यातून समृध्दी' अशी नावे देत असतो.

कंपोस्ट म्हणजे काय?

कंपोस्ट हा एक जैविक पदार्थ आहे, जो विविध सेंद्रिय पदार्थांचे मिश्रण बनवून त्यात विघटन करणारे द्रव्य टाकून तयार केला जातो. हे कंपोस्ट खत म्हणून मातीत वापरले जाऊ शकते. कंपोस्टने मातीचा क्षय आणि पाण्याचा अपव्ययसुध्दा रोखता येतो.

कंपोस्टिंगच्या इतिहासाबाबतीत अगदी थोडी माहिती उपलब्ध आहेत. हिंदू साहित्य, भगवद्गीता, बायबल, ओल्ड टेस्टामेंट आदीमध्ये आपल्याला सर्वात जुने पुरावे मिळतात. सुमारे 10,000 वर्षांपूर्वी ए.के . केडियन राजवंशातील किंग सरगोन (2320 इ.स.पूर्व - 2120 इ.स. पूर्व) याने कंपोस्टिंग पध्दतीची माहिती मातीवर कोरलेली होती. स्कॉटलंडमधील निओलिथिक कांस्य पाषाण युगात कंपोस्टिंगच्या वापराचे पुरावे सापडले आहेत. फंचेंगं चीशु यांनी लिहिलेल्या इ.स.पूर्व पहिल्या शतकातील शेतीविषयक लिखाणांवरून असे सूचित होते की उत्तर चीनमध्ये कंपोस्टिंग अस्तित्वात होते. माक्रस पोर्शियस कॅटोने प्राण्यांकडून आलेल्या सेंद्रिय कचऱ्याचे कंपोस्टिंगने खत तयार केल्याचे लिहून ठेवले आहे. इजिप्तमध्ये (इ.स.पूर्व 50मध्ये) क्लिओपात्राने गांडूळ मारण्यावर प्रतिबंध केला होता. ही सि्बस्टन डिस्कवरी म्युझियम येथे शीट कंपोस्टिंग व सीड बॉल्ससाठी प्रदर्शन दाखवले जाते. त्यात ब्रिटनमधील आणि उत्तर अमेरिकेतील धर्मसंस्थांनी सक्रिय कंपोस्टिंग पध्दती शोधल्याचे दाखवले जाते. याचाच संदर्भ आणि अभ्यास करून स्टिफन ह्युट यांनी हीप लेयर कंपोस्टिंग तंत्र तयार केले. एफ. एच. किंग यांनी याविषयी पुस्तक लिहिले आहे.  इ.स. 1905मध्ये इनडोअर कंपोस्टिंगची पध्दत विकसित करण्यासाठी सर एल्बर्ट हॉवर्ड यांनी याच पुस्तकातून प्रेरणा घेतली. आय.इ. रोडेल यांनी 1943मध्ये 3 लेयर हेप गेट पध्दत संपूर्ण जगभर पसरवली.

    कंपोस्टिंग

कंपोस्टिंग हा पुनर्चक्रणाचा (रीसायकलिंगचा) नैसर्गिक प्रकार आहे. यात जैविक कचऱ्याचे सेंद्रीय खतामध्ये रूपांतरण होते. ऑक्सिजन, तापमान, आर्द्रता, कचरा सामग्राी, जैविक पदार्थांचा आकार, सूक्ष्म जंतूंची संख्या यावर कंपोस्टिंगची प्रक्रिया अवलंबून असते.

कंपोस्टिंगसाठी आवश्यक असलेले घटक - सूक्ष्मजीव इनोक्युलम बॅक्टेरिया किंवा जीवाणू किंवा बुरशी किंवा संयोग, आर्द्रता, तापमान, ऑक्सिजन, कार्बन आणि नायट्रोजन हे सर्व इष्टतम कार्यक्षमतेचे आणि उच्च गुणवत्तेचे कंपोस्ट मिळविण्यासाठी योग्य प्रमाणात असावे. जर हे सर्व योग्य प्रमाणात नसेल तर सूक्ष्मजीव वाढत नाहीत. त्यामुळे कोणतीही उष्णता निर्माण होत नाही.

प्रक्रियेचे टप्पे

सर्वात प्रथम कचऱ्याचे पृथक्करण करणे आवश्यक आहे. पृथक्करण झालेला सेंद्रिय कचरा ठेचला गेला पाहिजे आणि एकसंध मिश्रण (पेस्ट) तयार झाले पाहिजे. त्यानंतर कचरा, कल्चर (बॅक्टेरिया) आणि शोषक सामग्राी एकत्र मिश्रित केली जाते.

सुरुवातीला तापमान 200  ते 400 से. असावे. या काळात कठीण जैविक कचरा भुसभुशीत होतो व त्याला 2 -3 दिवस लागतात. पुढच्या टप्प्यात 450 ते 700 सेल्सियस इतक्या तापमानाची सतत आवश्यकता असते. इथे पुढील चयापचयात्मक क्रिया होतात. विघटन प्रक्रियेत 3-4 दिवसांनंतर कूलिंग प्रक्रिया होते आणि नंतर एरेटेड क्युरिंगमुळे (सेंद्रिय कचऱ्याचे निर्जंतुकीकरण) चांगले प्रदूषणमुक्त कंपोस्ट तयार होते, जे थेट जमिनीच्या समृध्दीसाठी वापरता येते. एकूण प्रक्रियेला 9 ते 12 दिवस लागतात. विविध प्रकारच्या प्रक्रिया कंपोस्टिंग सुरू होण्यासाठी 15 दिवस ते 90 दिवसांपर्यंत वेगवेगळा कालावधी घेतात. ते कचऱ्याच्या गुणवत्तेवर, बॅक्टेरियाचा प्रकार व इतर घटकांवर अवलंबून असते.

कंपोस्ट केवळ एक रूपांतर आहे. नवीन किंवा नूतनीकरणक्षम ऊर्जा नाही. सध्या अनेक पर्यायी तंत्रज्ञान/पध्दती/ प्रणाली आहेत ज्याद्वारे सेंद्रिय कचऱ्याला मातीची गुणवत्ता वाढवणारे (सॉइल एन्हांसर) म्हणून, तसेच जैविक खत (बायोफर्टिलायझर) म्हणून रूपांतरित करता येते. ह्युएलकल्टर, कंपोस्ट टी, वर्म कॉड, 24 अवर मशीन, कास्टमॉल्ड, बोकाशी या कंपोस्ट उत्पादनाच्या काही वैकल्पिक पध्दती आहेत. विशेष म्हणजे काही पध्दती विघटनाद्वारे कंपोस्ट तयार करत नाहीत. उदाहरणार्थ, बोकाशीमध्ये लॅक्टोबॅसिलिचा समावेश आहे आणि तो विघटन करीत नाही, तर आंबवून कंपोस्ट तयार करतो.

कम्पोस्टिंग - प्रक्रियेच्या पध्दती.

विविध प्रकारच्या कंपोस्टिंग पध्दती आहेत -

1) हॉट कंपोस्टिंग - हॉट कंपोस्टिंग ही कंपोस्ट तयार करण्यासाठी सध्या सर्वमान्य पध्दत आहे. यात मॅन्युअल टर्निंग / रोटेशनची (ढवळण्याची) वारंवार आवश्यकता असते. हवा खेळती राहणे गरजेचे असते, अन्यथा दुर्गंधी आणि अस्वच्छता होऊ शकते. जास्त मनुष्यबळ लागते. उंदरांचा त्रास होतो आणि कंपोस्ट निर्मितीसाठी दीर्घ कालावधी लागतो.

मात्र वेसल टंबलर यंत्रणेमध्ये मनुष्यबळ लागत नाही, दिवसातून दोन वेळा 15 मिनिटे ढवळावे लागते. 12 दिवसांत कंपोस्ट तयार होते.

2) कोल्ड कंपोस्टिंग - हे कंपोस्टिंग मोकळया मैदानात, बागेच्या आसपास खुल्या जागेत करावे लागते. कंपोस्ट तयार करण्यासाठी (नैसर्गिक प्रक्रिया) 2 वर्षांचा वेळ लागतो

3) शीट कंपोस्टिंग - कचरा मोठया प्रमाणावर मोकळया हवेत पसरलेला असतो. नैसर्गिक प्रक्रियेद्वारे कंपोस्टमध्ये रूपांतर होण्यासाठी सुमारे 1 वर्ष लागते

4) पिट / हीप / ट्रेन्च कंपोस्टिंग - 1 फूट खोल खड्डा करावा आणि तो सेंद्रिय कचऱ्याने भरून टाकावा.     वरून भरपूर माती टाकावी. 4 वर्षाने कंपोस्ट तयार होते.

5) गांडूळ खत (व्हर्मिकंपोस्ट)

ही गांडूळ वापरून कंपोस्ट तयार करण्याची प्रक्रिया आहे. यामध्ये सेंद्रिय कचरा सामग्राीचे विघटन होऊन एक विषम मिश्रण तयार होते. याला व्हर्मकास्ट - गांडूळ खत म्हणतात. गांडुळाद्वारे सेंद्रिय कचरा सामग्राीचे विघटन होऊन गांडूळ खततयार होते. गांडूळ खतामध्ये पाण्यात लवकर विरघळणारी पोषक तत्त्वे असतात आणि विषारी रसायनांचे प्रमाण कमी असते. म्हणूनच हे मातीला चांगले पोषण देते.

व्हर्मिकंपोस्टिंगसाठी काही विशिष्ट प्रजातींचीच् गांडुळे वापरली जातात. उदा. लाल गांडूळ (इसेनिया), विशेष गांडूळ (लुम्ब्रीकस), निळे गांडूळ (पिरियोनिक्स), लाल गांडूळ (युड्रीलस). सर्वसामान्य गांडूळ व्हर्मिकंपोस्टिंगसाठी वापरले जाऊ शकत नाही.

6) बी पिट सिस्टिम - या पध्दतीत सोसायटयांसाठी 224 फुटाचा खड्डा खणला जातो. कचरा आणि गांडूळ त्यात टाकले जातात. चांगली प्रक्रिया चालल्यास चांगले कंपोस्ट मिळते.

मोठया प्रमाणात कंपोस्टिंग करण्यासाठी दोन पध्दती आहेत.

 

अ) विंड्रो पध्दत - यात गांडुळांना जगण्यासाठी आवश्यक घटक असतात. या सेंद्रिय कचऱ्याचे रूपांतर गांडूळ मातीच्या खतामध्ये करतो. वरून सेंद्रिय कचरा त्यात टाकत राहावे. एकूण प्रक्रियेस बरेच महिने लागतात व गांडूळ खत तयार होते. यात अमोनिया गॅस आणि दुर्गंधी बाहेर पडते.

ब) फ्लो थ्रू प्रणालीद्वारे- यात सेंद्रिय कचऱ्याचे थर तयार केले जातात व वरच्या थरावर गांडूळ सोडले जातात. या पध्दतीतून खत तयार व्हायला लागणारा कालावधी जास्त असला, तरी विंड्रो पध्दतीच्या तुलनेत कमी आहे. त्याचे कारण म्हणजे गांडूळ खालच्या बाजूने त्यांचे अन्न खात वरच्या बाजूला येतात. त्यामुळे खालच्या थरावर तयार झालेले खत जाळीदार दरवाजांच्या द्वारे काढून घेता येतं.

योग्य पध्दतीची निवड

हवामान व कचऱ्याचे प्रमाण यावर गांडुळांची निवड अवलंबून आहे. गांडुळांचेही अनेक प्रकार असतात. काही गांडुळे जमिनीच्या पृष्ठभागावर राहतात, तर काही खोल बिळात राहतात. काही गांडुळे सामान्य वातावरणाला जिवंत राहतात, काही 100 से. (550 फॅ.) ते 300 से.पेक्षा कमी किंवा अधिक तापमानात मरतात. त्यांना थेट सूर्यप्रकाश सहन होत नाही व अधिक हिवाळयामध्ये ते जगू शकत नाहीत.

व्हर्मिकंपोस्टिंगचे फायदे - माती भुसभुशीत होणे, कचरा कमी करणे, लँडफिलमध्ये कमी होणे, ग्राीनहाउस गॅसमध्ये घट होणे, आर्थिकदृष्टया अतिशय फायदेशीर, कचरा रीसायकल होणे, मातीची पाणी धारण क्षमता वाढणे, माती समृध्द करणे, मातीतील प्राणवायू वाढणे.

व्हर्मिकंपोस्टिंगचे तोटे - काळजी न घेतल्यास दुर्गंधी पसरू शकते. पाण्याचा अपव्यय होतो. अनेक गांडुळे मरतात, जमिनीच्या पीएचमध्ये वाढ होते, उंदरांचा प्रादुर्भाव वाढतो, कंपोस्टमध्ये पोषणद्रव्ये कमी होतात, पावसाळयाच्या दरम्यान शेवाळ तयार होतात.

त्यामुळे व्हर्मिकंपोस्टिंगऐवजी अन्य आधुनिक कंपोस्टिंग यंत्रणा वापरणे अधिक चांगले.

9892401836

shripadkabe@gmail.com

अनुवाद - अमोल दामले