युवराज गजब है!

विवेक मराठी    14-Jun-2019
Total Views |

२००० साली श्रीलंकेत झालेली युवा विश्वचषक स्पर्धा भारताने जिंकली आणि स्पर्धेचा सर्वोत्तम खेळाडू होता युवराज सिंग. तिथून त्याला ओळख मिळाली आणि पुढे २००२ साली इंग्लंडमध्ये नॅटवेस्ट ट्रॉफीदरम्यान महम्मद कैफच्या साथीने त्याने केलेली १२१ धावांची भागीदारी कोण विसरेल? भारताला अशक्य वाटणारा विजय मिळवून दिला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटने युवराजची पहिल्यांदा दखल घेतली ती या सामन्यातून. पुढे २००७च्या टी-२० विश्वचषकात स्टुअर्ट ब्रॉडला सहा चेंडूंवर सहा षटकार मारण्याच्या त्याच्या कामगिरीमुळे त्याची क्षमता आणि ताकद जगाला कळली.

डावखुरे बॅट्समन मुळातच शैलीदार. त्यामुळे त्यांची फलंदाजीही देखणी. ब्रायन लारा, गारफिल्ड सोबर्स, क्लाइव्ह लॉईड यांच्या फलंदाजीला रसिकांनी एखाद्या कलाकृतीला द्यावी तशी दाद दिली. भारतातही विनोद कांबळी आणि त्यानंतर सौरभ गांगुली यांनी रसिकांना त्यांच्या प्रेमात पाडलं.

पण, एकदिवसीय क्रिकेटने आणि पुढे टी-२० क्रिकेटने जोर पकडला, तेव्हा जगावर छाप पाडणारा एकमेव भारतीय डावखुरा फलंदाज म्हणजे युवराज सिंग. मनगटातील ताकद आणि टायमिंगची नजाकत असं मिश्रण असलेला हा क्रिकेटपटू. आणि पठ्ठ्याने जे टायमिंग आपल्या बॅटने क्रिकेटच्या मैदानावर साधलं, तेच गेल्या आठवड्यात आपल्या निवृत्तीच्या टायमिंगनेही साधलं. इंग्लंडमध्ये विश्वचषक स्पर्धा भरात आली असताना भारताचा एकदिवसीय क्रिकेटचा महाराजा, सिक्सर किंग निवृत्त होत आहे. त्यामुळे युवराजच्या झळाळत्या कारकिर्दीच्या आठवणींना उजाळा देण्याचा एक बहाणा मिळाला आहे.

२०००च्या शतकात आंतरराष्ट्रीय स्तरावर उगम झालेला या निकषावर युवराजला मिलेनियम क्रिकेटर म्हणता येईल. अशा मिलेनियल क्रिकेटपटूंचं नेतृत्वच युवराजने केलं. वर्क हार्ड, प्ले हार्ड (पार्टी हार्ड) मंत्राचे प्रणेते असलेली ही पिढी मैदानावर कुणालाही न घाबरणारी. आणि रात्री कुणाचं न ऐकणारी.... सचिनच्या पिढीतलं सोज्ज्वळ क्रिकेट त्यांनी पुढे नेलं आणि नेव्हर से डाय बाण्यामुळे भारतीय क्रिकेटलाही पुढे नेलं.

भारतीय संघ आता क्रिकेटविश्वातली एक ताकद म्हणून उभा राहिला आहे. पण तुम्हाला हे माहीत आहे का, की आयसीसीच्या ज्या पाच महत्त्वाच्या स्पर्धा भारतीय संघाने जिंकल्या आहेत, त्यातल्या तीन भारताला जिंकून देण्यात युवराजचा मोठा हात आहे. २०००चा युवा विश्वचषक, २००७चा टी-२० विश्वचषक आणि २०११चा एकदिवसीय विश्वचषक. प्रसिद्ध क्रिकेट विश्लेषक आणि ज्येष्ठ महिला पत्रकार शारदा उग्र यांच्या म्हणण्यानुसार, भारताला या तीन स्पर्धा जिंकता आल्या, याचं १०० टक्के श्रेय युवराजला जातं. बॅट आणि बॉल ही त्याची शस्त्रं होती आणि चाकोरीबाहेर, बंडखोर विचार करण्याचा (जुन्या भारतीय खेळाडूंकडे अभावाने आढळणारा) स्वभाव होता. त्यामुळे चेंडू सीमारेषेबाहेर भिरकावून देणं त्याला वरचेवर शक्य झालं.

मोठ्या स्पर्धांचं आव्हान पेलणं, तिथे हमखास वरचढ कामगिरी करणं हे अव्वल खेळाडूचं लक्षण आहे. भारतात सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली यांनी ही परंपरा सुरू केली. युवराजने तर या मानपत्रावर चंदेरी अक्षरात आपलं नाव कायमचं कोरलंय. तीनशेच्या वर सामन्यांत राष्ट्रीय टीमकडून खेळलेला युवराज भारताच्या सर्वोत्तम एकदिवसीय खेळाडूंपैकी एक गणला जाईल.

२००० साली श्रीलंकेत झालेली युवा विश्वचषक स्पर्धा भारताने जिंकली आणि स्पर्धेचा सर्वोत्तम खेळाडू होता युवराज सिंग. तिथून त्याला ओळख मिळाली आणि पुढे २००२ साली इंग्लंडमध्ये नॅटवेस्ट ट्रॉफीदरम्यान महम्मद कैफच्या साथीने त्याने केलेली १२१ धावांची भागीदारी कोण विसरेल?  इंग्लंडच्या ३२५ धावांचा पाठलाग करताना २५व्या षटकातच भारताने ५ पहिले फलंदाज गमावले होते. युवराजने ६३ चेंडूत ६९ आणि महम्मद कैफने ८७ धावा करत भारताला अशक्य वाटणारा विजय मिळवून दिला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटने युवराजची पहिल्यांदा दखल घेतली ती या सामन्यातून.

पुढे २००७च्या टी-२० विश्वचषकात स्टुअर्ट ब्रॉडला सहा चेंडूंवर सहा षटकार मारण्याच्या त्याच्या कामगिरीमुळे त्याची क्षमता आणि ताकद जगाला कळली. स्पर्धेतला सर्वोत्तम खेळाडूचा मान पटकावत त्याने भारतालाही स्पर्धा जिंकून दिली.

२०११चा विश्वचषक तर युवराजचाच होता, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. उपान्त्य आणि अंतिम सामन्यात आपली कामगिरी उंचावत पुन्हा एकदा आयसीसी आयोजित स्पर्धेत तो भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला.


आपल्या सतरा वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत युवराज ३०४ एकदिवसीय सामने खेळला. ३६च्या सरासरीने त्याने ८७०० धावा केल्या. यात १५ शतकांचाही समावेश आहे. ४० टेस्ट त्याच्या नावावर आहेत. फलंदाज, उपयुक्त डावखुरा फिरकी गोलंदाज आणि तेजतर्रार क्षेत्ररक्षण या सगळ्याच त्याच्यासाठी जमेच्या बाजू होत्या.

युवराज सिंग हे दोन शब्द उच्चारलेत, तर क्रिकेटपटू आणि क्रिकेटरसिकांसमोर आठवणींचा खजिनाच जागा होईल. सचिन तेंडुलकर, हरभजन सिंग, सौरव गांगुली, संजय मांजरेकर, वीरेंद्र सेहवाग हे सगळे सध्या समालोचनासाठी इंग्लंडमध्ये आहेत आणि प्रत्येकानेच युवराजबद्दलच्या आपल्या भावना ट्विटरच्या किंवा इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केल्या. सचिनने नेहमीपेक्षा मोठी पोस्ट युवराजसाठी लिहिली. त्यात युवराजने क्रिकेटसाठी दिलेल्या योगदानासाठी त्याचे आभार मानले आहेत. लढवय्या क्रिकेटपटू म्हणून त्याचा गौरव केला आहे. इतरांनीही काही राखून न ठेवता त्याचं कौतुक केलं. ‘देशाला तुझा अभिमान आहे. सगळ्या चांगल्या गोष्टी कधी ना कधी संपतात. आणि तुझी गोष्ट तर खूपच छान होती’ या शब्दात गांगुलीने भावना व्यक्त केल्यात.

युवराजनेही निवृत्ती पत्करताना दिलेला संदेश अगदी साफ मनाने दिला आहे. दुखापत, कॅन्सरशी दिलेला लढा आणि एकूणच जीवनशैली यामुळे फिटनेससाठी असलेली यो-यो चाचणी पूर्ण करणं शक्य होत नव्हतं, म्हणून निवृत्तीचा निर्णय घेतला असं त्याने प्रांजळपणे कबूल केलं.

युवराजने आपल्या कारकिर्दीत अनेक चढ-उतार पाहिले. काही स्वभावातल्या बेफिकिरीमुळे, तर काही कामगिरीतल्या. बालपणी आपले वडील योगराज आणि आई शबनम सिंग यांच्यातल्या दुराव्याची झळ त्याने सोसली. आक्रमक, शीघ्रकोपी वडिलांचा राग झेलत त्याने क्रिकेटचा सराव केला आणि पुढे २०११मध्ये कॅन्सरशी त्याने दोन हात केले. या सगळ्याचा सामना करताना त्याने कधीही कटुता मनात बाळगली नाही आणि लढाईला तो कधी घाबरला नाही. त्याच्या चेहऱ्यावर हास्य कायम राहिले. अगदी २०१७पर्यंत भारतीय टीममध्ये कमबॅक करण्याचे त्याचे प्रयत्न सुरूच होते. त्याने टीममध्ये स्थान मिळवलंही. पण हळूहळू तो फिटनेसमध्ये मागे पडल्याचं त्याच्या लक्षात आलं आणि त्याने निवृत्तीचा निर्णय जाहीर केला.

२०११चा विश्वचषक जिंकल्यावर युवराजने सचिन तेंडुलकरला खांद्यावर घेऊन मैदानात फिरवलं. भारताचा विजय आणि आपली कामगिरी त्याने सचिनला समर्पित केली. कारण युवराजच्या मते त्याच्या स्पर्धेतल्या कामगिरीमागची प्रेरणा आणि स्फूर्ती सचिन तेंडुलकर हीच होती.

आता वेळ आलीय आताच्या भारतीय टीमने युवराजला मानवंदना देण्याची. भारतासाठी विश्वचषक गाजवलेल्या खेळाडूसाठी तोच खरा सन्मान असेल.

- स्पोर्टक्रीडा