परीसवेध- ओळख संघ कार्यकर्त्यांच्या जिद्द- समर्पणाची!

विवेक मराठी    15-Jun-2019
Total Views |

***मनोहर कुलकर्णी***

 'परीसवेध' या साधारणत: 250 पानी ग्रंथातून त्यांनी नगर जिल्ह्यातील ज्येष्ठ संघ कार्यकर्ते-स्वयंसेवकांच्या व्यक्तिमत्त्वांचा आठवणीवजा वेध घेतलेला आहे. अर्थात साप्ताहिक 'विवेक'मध्ये 'दीपस्तंभ' या मालिकेतून हे सारे लेख पूर्वी प्रसिध्द झाले आहेत. त्यांचे संकलन म्हणजे परीसवेध ग्रंथ होय.

 

एखादे धान्याचे बी पेरल्यानंतर त्याचे  रोपात रूपांतर होते. पुढे त्यातूनच अनेक रोपे बहरून शेतात पीक फुलून येते. फळरूपी कणसातून अनेक दाणे आणि अनेक कणसातून असंख्य दाण्यांची निर्मिती होते. ही निसर्गात चालणारी सततची प्रक्रिया आहे. अर्थात हे निर्मितीचे चक्र अखंड चालू ठेवावयाचे असेल, तर प्रत्येक वेळी अनेक दाण्यांना बीजाची जबाबदारी घेऊन जमिनीत गाडून घ्यावे लागते. सर्वस्व द्यावे लागते. निर्मितीचे हेच तत्त्व मानवी जीवनात व्यक्ती-संस्था-संघटनांनाही लागू आहे.

'व्यक्तिनिर्माणातून राष्ट्रनिर्माण' हा ध्येयवाद डोळयापुढे ठेवून मागची नऊ  दशके कार्यरत असणाऱ्या - नव्हे, सातत्याने वर्धिष्णू असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या यशाचे मर्म याच निसर्गदत्त तत्त्वाच्या प्रामाणिक अंमलबजावणीत दडलेले आहे. आत्तापर्यंतच्या नव्या-जुन्या पिढीतील सर्व असंख्य कार्यकर्त्यांनी संघविचार मानून त्याच्या प्रसार-प्रचारासाठी, वाढीसाठी स्वत:ला गाडून घेतले, म्हणजे वाहून घेतले आणि आपापल्या परीने सर्वस्व दिले. त्यातूनच आज राष्ट्रजीवनाच्या बहुतेक सर्व क्षेत्रांवर आपला प्रभाव, ठसा निर्माण करणाऱ्या राष्ट्रव्यापी, बलाढय, समर्थ अशा संघटनेच्या एका वटवृक्षात रूपांतर झाल्याचे प्रत्ययास येते. संघकार्याची जुजबी ओळख करून घेताना अनेकांची अवस्था 'एक हत्ती आणि चार आंधळे' या गोष्टीतील आंधळयांप्रमाणे होते. जो भाग हाताशी लागेल त्यावरूनच संघाचे वर्णन करणे आणि तशी धारणा करून घेणे सर्वस्वी अपुरे आणि चुकीचे आहे. खरोखरच तुम्हाला समग्र संघ समजून घ्यावयाचा असेल, तर प्रत्यक्ष त्यात सहभागी होऊन किंवा अत्यंत जवळून तो जाणून घ्यावा लागेल. त्यासाठी संघविषयक कार्य, प्रकल्प, उपक्रम यांचे आणि उपलब्ध साहित्याचे अवलोकन करावे लागेल. विशेषत:  त्यातील लहान-मोठया संघकार्यकर्त्यांचे जीवन चरित्र, व्यक्तिमत्त्व अभ्यासावे लागेल. त्या दृष्टीने एक अत्यंत उपयुक्त व प्रभावी ग्रंथ म्हणजे रवींद्र मुळे लिखित 'परिसवेध' होय.

रवींद्र उर्फ राजाभाऊ मुळे हे तसे व्यवसायाने अभियंता, बांधकाम व्यवसायिक, पण लहानपणापासूनच संघकामाशी जोडले गेलेले. दोन वर्षे पूर्णवेळ प्रचारक राहिल्यामुळे त्यांनी आत्तापर्यंत अनेक लहान-मोठया जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. मागच्या पाच वर्षांपासून ते संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे संपर्क प्रमुख म्हणून दायित्व सांभाळत आहेत. 'परीसवेध' या साधारणत: 250 पानी ग्रंथातून त्यांनी नगर जिल्ह्यातील ज्येष्ठ संघ कार्यकर्ते-स्वयंसेवकांच्या व्यक्तिमत्त्वांचा आठवणीवजा वेध घेतलेला आहे. अर्थात साप्ताहिक 'विवेक'मध्ये 'दीपस्तंभ' या मालिकेतून हे सारे लेख पूर्वी प्रसिध्द झाले आहेत. त्यांचे संकलन म्हणजे परीसवेध ग्रंथ होय. नगर जिल्ह्यात लेखकाचे दीर्घकाळ वास्तव्य आणि ते त्यांचे कार्यक्षेत्र असल्यामुळे स्वाभाविकच व्यक्तींची निवड तेथील आहे. अर्थात जवळपास साठ व्यक्तिमत्त्वांच्या चित्रणात काही बाहेरचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, ज्यांचा लेखकांशी संपर्क आला आणि त्यांच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाचा ठसा लेखकाच्या मनी उमटला. पण संघकार्य समजून घेताना तो कार्यकर्ता कुठल्या जिल्ह्यातील, प्रांत-प्रदेशातील किंवा समाजथरातील आहे, याला तसे फारसे महत्त्व नाही. संघस्वयंसेवकाची जी एक ओळख, प्रतिमा समाजात आहे, ती सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात तीच सर्वत्र अनुभवास येते. आणि हेच खरे संघकार्याचे वैशिष्टय म्हटले पाहिजे. 'शितावरून भाताची परीक्षा' म्हणतात तसे 'परीसवेध' वाचून संघाचा परिचय तेवढाच समग्र परिणामकारक होईल. त्यातही नगर जिल्ह्याचे वेगळेपण समजून घेतले पाहिजे. आज नगर जिल्हा सर्वार्थाने 'भगवा' दिसत असला, तरी एकेकाळी तो डाव्या समाजवादी आणि कम्युनिस्ट  विचारधारेचा गड होता. देश स्वतंत्र झाला, तेव्हा या चळवळीतील बहुसंख्य नेते-कार्यकर्ते सहकार चळवळीत शिरले व त्यांनी काँग्रेसला जवळ केले. त्याचाच आधार घेत त्यांनी जिल्ह्यातील बव्हंशी सत्तास्थाने काबीज करून अल्पावधीत प्रस्थापित बनले. त्यामुळे अशा संघदृष्टया खडकाळ भूमीत संघकामाला दुहेरी विरोध होता. गांधीहत्येच्या दुर्दैवी घटनेनंतर या विरोधाला वेगळीच धार आली. पण अशा प्रतिकूल परिस्थितीतही त्या त्या काळातील संघकार्यकर्ते न डगमगता हिमतीने उभे राहिले. संघविचाराचा घेतला वसा सोडला नाही. आणि उपेक्षा-हालअपेष्टांची पर्वा न करता प्रेम-आपुलकी, आस्थेच्या मार्गाने समाजाला जवळ करीत संघविचार रुजविला, वाढविला. आज त्याचे विस्तारलेले रूप दिसत असून नगर जिल्ह्यात लाल रंग हातात भिंग घेऊन शोधावा अशी स्थिती झाली आहे. एक प्रकारे या प्रदीर्घ वैचारिक लढा, संघर्षाचे त्यातील त्याग-समर्पणाचे, सेवाभावाचे चित्रण म्हणजे हा ग्रंथ होय.

ज्या साठ व्यक्तींचे चित्रण या ग्रंथात येते, त्याची विभागणी लेखकाने चार भागात केली आहे. 'ऋषितुल्य', 'शंभरीचे शिलेदार', 'यांनी इतिहास घडविला' आणि 'काही व्यक्ती आणि काही प्रसंग' असे ते चार भाग आहेत. त्या भागातील त्या त्या व्यक्तीचे नाव घेतले की त्या भागाला दिलेल्या शीर्षकाचे औचित्य ध्यानात येते. उदाहरणार्थ, मा. माणिकराव पाटील, प्रल्हादजी अभ्यंकर, तात्या इनामदार, दामूअण्णा दाते, सूर्यभानजी वहाडणे, तात्या बापट, राजाभाऊ  झरकर, अण्णा पाटील कदम, राजाभाऊ भोसले किंवा अण्णाजी जाधव असे कुठलेही नाव घेतले की त्यांचे वर्णन करायला 'ऋषितुल्य' या शब्दाशिवाय दुसरा कुठला चपखल शब्द सापडणार नाही. अशा जवळपास 25 ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाचा परिचय या भागातून लेखकाने करून दिला असून तो सर्वांनाच प्रेरणादायक दीपस्तंभासारखा ठरेल. ग्रंथातील व्यक्तींच्या लेखाला जी शीर्षके दिली आहेत, तीही त्या व्यक्तीचे चित्र चटकन डोळयापुढे उभे राहावे इतकी बोलकी व समर्पक आहेत. माणिकराव पाटील : आमचे आधारवड, दामुअण्णा दाते : नगर जिल्ह्याचे शिल्पकार, तात्या बापट : एक राजयोगी प्रचारक, सूर्यभानजी वहाडणे : जाज्ज्वल्य निष्ठेचा आविष्कार,  प्रा. सहाणे सर : बुध्दिवादी ग्रामीण चेहरा, भीमराव बडधे : कोपरगावचा अभिमन्यू, विश्वनाथ बंडी : स्वयंसेवक कामगार नेता इत्यादी. वरील साऱ्या व्यक्तिमत्त्वांचे जीवनकार्य एका लेखात मांडणे शक्यच नाही. आणि ते सारे चरित्र मांडणे हा लेखकाचा हेतूही नाही. परंतु लेखकाने ते आपल्या अनुभवातून, निरीक्षणातून आणि संपर्कातून भावलेल्या व्यक्तीचे साध्या-सोप्या, सरळ ओघवत्या भाषेतून केलेले वर्णन वाचकांना अधिक भावणारे आहे. या लेखन प्रक्रियेबद्दल बोलताना मुळे यांनी म्हटले आहे की, हा खरे तर माझा पहिलाच प्रयत्न आहे. सहजरीत्या मनात साठलेले सांगत गेलो आणि लोकांच्या सकारात्मक प्रतिक्रिया येत गेल्या. यात मोजके अपवाद सोडले, तर लिहिलेले सगळे मला जाणवलेले आहे. त्यांच्या सहवासात आकलन झालेलेच व्यक्त केले आहे. हे रूढ अर्थाने चरित्र नाही, तर संघकार्याच्या वाटचालीत भेटलेल्या थोर व्यक्तींच्या अलौकिक व्यक्तिमत्त्वाचे हे पैलू आहेत आणि लेखकाच्या या प्रामाणिक व पारदर्शक लेखनदृष्टीमुळेच हा ग्रंथ अधिक वाचनीय झाला आहे.

या ग्रंथाला रा.स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे आशीर्वचन लाभणे हा आणखी एक सुखद योग म्हटला पाहिजे. त्यात ते म्हणतात, मुळे यांनी आपल्या साध्या-सोप्या, पण नेमक्या व हृदयस्पर्शी शैलीमध्ये शब्दांकित केलेले हे संकलन संघकार्य समजून घेण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तींकरिता एक उत्तम स्वाध्याय साधन झालेले आहे. ते सहज अनुकरणीय व अनुसरणीय झालेले आहे. प्रत्येक लेख वाचताना सतत श्रीगुरुजींचा 'मी एक सामान्य स्वयंसेवक' हा बौध्दिक वर्ग आठवत राहतो. दायित्व, परिस्थिती, क्षमता आदी सर्व बाबतीत भिन्न स्तरावर असलेली ही सर्व माणसे, आपापल्या जीवनात व कार्यकर्तृत्वाचा मूलभूत स्वयंसेवकत्व जगून दाखविण्याचा प्रयत्न करीत असतात. आणि याच अनुषंगाने, 'अविरत श्रमणे, संघ जिणे, स्वप्नीही ध्येय पुनीत मने' या संघजीवनाचे मर्म सांगणाऱ्या गीताची आठवणही डॉ. भागवत करून देतात.

ऍड. माणिकराव पाटील नेहमी उल्लेख करावयाचे ते परीसाचा. परीसाच्या स्पर्शाने सोने होते. परंतु डॉक्टर हेडगेवारांनी असे परीस निर्माण केले की, त्या स्पर्शाने नवीन परीस निर्माण झाले. अशा परीसस्पर्शाची अनुभूती लेखकाला लाभली आणि ती 'परीसवेध' या ग्रंथरूपात त्यांनी समाजाला उपलब्ध करून दिली. याबद्दल रवींद्र मुळे यांचे मन:पूर्वक अभिनंदन. या ग्रंथातून त्या त्या व्यक्तींची रेखाचित्रे ख्यातनाम चित्रकार प्रमोद कांबळे व राजेंद्र वहाडणे यांनी रेखाटलेली आहेत. ज्ञानेश शिंदे यांचे मुखपृष्ठ असून या साऱ्या चित्रांमुळे ग्रंथाचे बाह्यरूपही आकर्षक झाले आहे. हिंदुस्थान प्रकाशन संस्थेने सदर ग्रंथ प्रकाशित करण्यासाठी पुढाकार घेतला, हे स्तुत्य कार्य म्हटले पाहिजे. संघकार्याचा विस्तारता परीघ पाहता अशा वेगवेगळया जिल्ह्यांतील अन्य परीसरूप कार्यकर्त्यांचे जीवनचरित्र समाजासमोर येण्याची गरज आहे. रवींद्र मुळे यांनी या पुस्तकाद्वारे नगर जिल्ह्याचा दीप प्रज्वलित करून या उपक्रमाचा शुभारंभ केला आहेच, पुढे त्याची मालिका बनून एका भव्य प्रज्वलित दीपमाळेत त्याचे रूपांतर व्हावे, ही अपेक्षा व शुभेच्छा.

 

पुस्तकाचे नाव - परीसवेध                               

लेखक - रवींद्र मुळे

प्रकाशक - सा. विवेक (हिंदुस्थान प्रकाशन संस्था, मुंबई)

पृष्ठे - 256.

मूल्य - 225 रु.