वादग्रस्ततेच्या लाटेवर

विवेक मराठी    17-Jun-2019
Total Views |

***राजेश कुलकर्णी****

 गिरीश कार्नाड यांचे सिनेसृष्टी, रंगभूमी, नाटयलेखन या साऱ्या क्षेत्रांमधले योगदान इतक्या उच्च दर्जाचे व प्रसंगी अभिजात अशा स्वरूपाचे आहे की आपली राजकीय भूमिका मांडताना ते त्याबाबतच्या किमान अभ्यासाच्या अभावी साफ उघडे पडतात, हे पाहणे खरे तर आश्चर्यकारक आहे. त्यांच्या अपरिपक्व राजकीय भूमिका आणि त्यातून निर्माण झालेले वाद यांचे विश्लेषण.

 प्रख्यात लेखक आणि नाटय-चित्रकलाकार गिरीश कार्नाड यांच्या निधनानंतर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या. अलीकडे काही प्रसंगांमुळे ते वादांच्या भोवऱ्यात सापडले होते. त्यामुळे त्यांच्या कलाकार असण्यापेक्षा राजकीय वादांचीच चर्चा अधिक होत राहिली. काहींनी केवळ त्यांच्या साहित्यिक व कलाक्षेत्रातील इतर योगदानाबद्दल लिहिणे पसंत केले. काहींना त्यांना श्रध्दांजली वाहताना आताच्या सरकारवर शेरेबाजी केल्याशिवाय राहवले नाही. काहींनी त्यांना हिंदूविरोधी व देशविरोधी ठरवत टोकाची टीका केली.

या सर्व पार्श्वभूमीवर गिरीश कार्नाड यांची साहित्य-कलाक्षेत्राशिवाय राजकीय आणि इतर भूमिका होती तरी काय, याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. विविध प्रसंगांच्या माध्यमांमध्ये झालेल्या वृत्तांकनाबरोबरच कार्नाड यांनी वेळोवेळी दिलेल्या मुलाखतींचाही यासाठी आधार घेतलेला आहे.

एक लक्षात घ्यायला हवे की गिरीश कार्नाड यांची एकूण राजकीय भूमिका पाहता पुरस्कारपरती ब्रिगेडमधील एकांगी व कांगावखोर साहित्यिक-कलाकारांशी त्यांची तुलना करता येणार नाही. त्यांची पंतप्रधान मोदींबद्दलची मते कितीही टोकाची असली, तरी ते साहित्यिक नयनतारा सहगल यांच्यासारखे जेथे जातील तेथे द्वेषवाटप करत फिरणारे नव्हते. ते 'अंधार-अंधार' असा कांगावा करणाऱ्यांसारखे नव्हते. आणीबाणीच्या काळामध्ये पुण्यातील फिल्म इन्स्टिटयूटचे संचालक असताना अशा वातावरणात स्वतंत्रपणे काम करणे शक्य नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी आपला भाजपाविरोध लपवला नाही. भाजपाला विरोध करायचा याच एका हेतूने त्यांनी कर्नाटकात सिध्दरामैय्या मुख्यमंत्री असताना बंगळुरू लोकसभा मतदारसंघात काँग्रोसचे उमेदवार नंदन निलेकणी यांचा प्रचार केला.

टिपू सुलतानबद्दल आदर असल्याचे मी कर्नाटकातील माझ्या अनेक मित्रांकडून ऐकलेले आहे. प्रथमपासून अभ्यासक्रमात तसेच शिकवलेले असताना तसा समज होणे साहजिक आहे. अभ्यासक्रमाव्यतिरिक्तही बालपणापासून कानावर पडणाऱ्या त्याच्याबद्दलच्या अनेक लोककथा प्रचलित असल्याचेही ते सांगतात. त्यामुळे टिपूला महान समजणारे तेथील सर्वच हिंदू हे भाजपाविरोधी असल्याचे समजण्याचे कारण नाही. मात्र टिपूचे समर्थन करण्यात गिरीश कार्नाड हे इतके वाहवत गेले की टिपू हिंदू असता तर त्याला शिवाजीच्या बरोबरीने स्थान मिळाले असते, असे ते म्हणाले. म्हणजे तो मुस्लीम असल्यामुळेच त्याच्यावर अन्याय झाला. कर्नाटकाच्याच काही भागांमध्ये आणि केरळमध्ये टिपूला खलनायक समजतात, या वास्तवाची त्यांनी दखल घेतली नाही. औरंगजेबाने काही मंदिरांना मदत केली होती याचे दाखले देत त्याला महात्मा ठरवणारे इतिहासकार असतात, त्याच धर्तीवर टिपूने आपल्या आईसाठी कोणत्या मंदिराला मदत केल्यामुळे किंवा शृंगेरी मठाला मदत केल्यामुळे त्याला महान ठरवण्याच्या नादात त्याने धर्माच्या नावावर केलेल्या अनेक घटनांमधील क्रूर वर्तनाचे पुरावे उपलब्ध असतानाही त्याकडे साफ दुर्लक्ष करणारे इतिहासकार आपल्याकडे आहेत. त्यामुळे टिपू मुस्लीम असल्यामुळेच त्याच्यावर अन्याय केला जातो असे म्हणत शिवाजी महाराजांशी त्याची तुलना करण्याचे धारिष्टय कार्नाड यांनी दाखवले. की त्यांना शिवाजीराजे काय होते हे समजलेच नाही, असे (कोणत्याही अभिनिवेशाशिवाय) म्हणावे! त्याहीपलीकडे जात टिपूने जी धर्मांतरे क्रूरपणे घडवली, सामूहिक हत्या घडवल्या, ते सारे तेव्हाच्या म्हैसूर राज्याच्याबाहेरील प्रदेशांमध्ये केले आणि ते तेव्हाच्या संदर्भातच पाहायला हवे, असा अजब युक्तिवाद ते करतात. हा सारा त्यांचा बेजबाबदारपणाच होता. प्रख्यात कन्नड कादंबरीकार एस.एल. भैरप्पा यांनी अतिशय मुद्देसूदपणे टिपूने धर्माच्या आधारावर केलेल्या अनेक क्रूरकर्मांची जंत्री देत इतिहास वास्तव स्वरूपात मांडायला हवा असा आग्राह धरला आणि कार्नाड यांनी तसे केलेले नाही, हे निक्षून सांगितले. या मुद्दयांना उत्तर न देता कार्नाड यांनी भैरप्पा यांचे इतिहासाचे ज्ञान 'पी हळद आणि हो गोरी' अशा स्वरूपाचे असल्याचा अतिशय उथळ आरोप केला. या चर्चेत काही त्रयस्थ टीकाकारांनीही भाग घेत भैरप्पा यांनी उपस्थित केलेल्या मुद्दयांचा प्रतिवाद करण्यात कार्नाड साफ कमी पडले, असे मत व्यक्त केले. विजयकर्नाटका या कन्नड दैनिकातील ही चर्चा आता विस्मरणात गेलेली दिसते. इ.स. 1537मध्ये बंगळुरू गाव वसवणारे केम्पेगौडा हे स्वातंत्र्ययोध्दे नसल्यामुळे बंगळुरूच्या विमानतळाला त्यांच्याऐवजी टिपूचे नाव द्यावे, अशी सूचना कार्नाड यांनी केली आणि अनेक कन्नडिगांचा रोष ओढवून घेतला. कोणाचे नाव द्यावे याबाबत प्रत्येकाला आपले मत असायला हरकत नाही; परंतु उपलब्ध पुराव्यांकडे साफ दुर्लक्ष करत कार्नाड टिपूबाबत किती वाहवत गेले होते, हे यावरून दिसून येते.

काही वेळा मात्र कार्नाड यांना विरोधासाठी विरोध करायचा म्हणून त्यांच्यावर अन्यायही करण्यात आला. म्हैसूरच्या जगप्रसिध्द दसरा उत्सवाचे उद्धाटन करण्यासाठी कर्नाटकचे तेव्हाचे मुख्यमंत्री सिध्दरामैया यांनी कार्नाड यांना आमंत्रण दिले. कार्नाड हे नास्तिक, म्हणजे खरे तर निरीश्वरवादी असल्यामुळे त्यांना या उत्सवाचे उद्धाटन करण्यापासून रोखावे, यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी प्रयत्न केले. मात्र कार्नाड हे कन्नड लेखक यू. आर. अनंतमूर्ती यांच्याप्रमाणे हिंदू देवदेवतांची निंदानालस्ती करत नसत, हे कोणी लक्षातच घेतले नाही. तीच गोष्ट कर्नाटक सरकारने संमत केलेल्या अंधश्रध्दाविरोधी कायद्याबाबत. या कायद्याचा मसुदा बनवण्याबाबत कार्नाड यांनी कर्नाटक सरकारला साहाय्य केले. त्यावरून त्यांना हिंदूविरोधी ठरवण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला. महाराष्ट्रातही अशा स्वरूपाचे विधेयक संमत करून घेण्यात किती अडचणी निर्माण करण्यात आल्या आणि अखेरीस संमत झालेल्या कायद्यात प्रत्यक्षात काय शिल्लक राहिले, हे सर्वांनी पाहिले. ते स्वत: गोमांस खात नसत, मात्र काय खावे व काय नाही, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, त्यात धर्म आड आणू नये, या भूमिकेतून त्यांनी गोमांसाविषयीच्या कर्नाटक विधानसभेतील कायद्याला विरोध केला होता.

सोनियांमुळे काँग्रोस घराणेशाहीतून बाहेर पडू शकली नाही आणि राहुल गांधी हे नाकर्ते आहेत; डॉ. मनमोहन सिंग यांच्याऐवजी प्रणब मुखर्जी चांगले पंतप्रधान बनू शकले असते, मात्र त्यांना सत्तेच्या मार्गातून बाजूला काढण्यासाठीच राष्ट्रपती बनवण्यात आले आणि मग सोनियांना आपला अधिकार गाजवता आला, अशी कार्नाड यांची विधाने उपलब्ध आहेत. यावरून त्यांचा स्पष्टवक्तेपणा दिसून येतो. तळागाळातून वर येत पंतप्रधानपदी पोहोचल्याबद्दल कार्नाड यांनी मोदींबद्दल चार चांगले शब्द बोलल्याचेही आढळते. मात्र गुजरातमधील विकासाचे श्रेय मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदी घेत असतील, तर 2002च्या दंगलींची जबाबदारीही त्यांनी घ्यायला हवी अशा पध्दतीने ते आपला तर्क ताणतात. मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांनी आपली जबाबदारी हेतुपुरस्सरपणे पार पाडली नाही, या आजवर होत आलेल्या सवंग आरोपांमागचा खोटेपणा आता कोठे राजदीप सरदेसाई यांच्यासारखे पत्रकार उघडपणे मान्य करू लागले आहेत. ही दंगल मोदींनी घडवली किंवा पसरवली असे म्हणण्यास जागा नाही, असे त्यांनी नुकतेच मान्य केले. दहशतवादी हल्ल्यांचे टीव्हीवर थेट प्रक्षेपण करण्यात प्रसिध्दीमाध्यमांनी जो बेजबाबदारपणा केला, तसेच या दंगलीबाबतही झाले आणि त्यात ही माध्यमे वाहवत गेली. अशा प्रसंगी माध्यमांवर सेन्सॉरशिप असायला हवी. दंगल हाताळण्यात मोदींचा अननुभव कारणीभूत ठरला असे फारतर म्हणता येईल, मात्र त्यांनी हेतुपुरस्सरपणे निर्णय घेण्यात कसूर केली असे म्हणता येणार नाही, असेही त्यांनी म्हटले होते. त्यांची ही मुलाखत जेमतेम एका महिन्यापूर्वीची आहे, हे पाहता इतरांप्रमाणेच गिरीश कार्नाडदेखील मोदींबद्दल हेतुपुरस्सर पसरवल्या गेलेल्या किटाळाचे बळी ठरले नसल्यास नवल. त्यांनी इतकी वर्षे त्याच पूर्वग्राहाचे ओझे वाहिल्याचे दिसते. मोदी केवळ मुस्लीमविरोधीच नाहीत, तर ते राज्यघटनाविरोधी आहेत, ते निवडणूक आयोगाच्या विरोधात आहेत, असे शक्य ते सारे कार्नाड यांनी बोलण्याच्या ओघात बोलून टाकलेले दिसले.

मोदीविरोधी मते व्यक्त करण्याचा वर उल्लेख केलेल्या मुलाखतीत कार्नाड यांना देशातील मुस्लीम कट्टरतावादाबद्दलही विचारण्यात आले. त्यावर तो धोका असला तरी त्याच्या निवारणासाठी प्रयत्न करायला हवेत, असे गुळमुळीत उत्तर त्यांनी दिले. भय असल्यामुळे देशातील मुस्लीम शांत आहेत, मात्र ते एकत्र आल्यास आपल्या सर्वांचीच अवस्था बिकट होईल, असे ते म्हणाले. एकतर हे विधान फारच उथळ आहे हे सांगायची गरज नाही. शिवाय त्यांच्या मते हा धोका जर खरोखर आहे, तर त्यांनी ज्या हिरिरीने मोदींवर टीका केल्याचे दिसले, त्याच हिरिरीने हा धोकाही उघडपणे मांडण्याचे धारिष्टय दाखवल्याचे दिसते का? दुर्दैवाने याचे उत्तर नाही असेच आहे. कार्नाड या देशातील सेक्युलर परंपरेचा व ती परंपरा धोक्यात आल्याचा उल्लेख तर करताना दिसतात, मात्र दुसरीकडे त्यांची हिंदू धर्माबद्दलची कल्पना काय असल्याचे दिसते? ते म्हणतात, हिंदू असे या देशात काही नाही. ती केवळ राजकीय व्यवहारांपुरती बनवलेली गोष्ट आहे. संकटसदृश परिस्थिती उद्भवली की (हिंदू म्हणून वागण्याऐवजी) यांचे वर्तन दक्षिण भारतीय, दलित, ब्राह्मण अशा विविध स्वरूपांत दिसते. प्रत्यक्षात देशातील लोकशाही याच पध्दतीने चालते. आपल्यातील प्रत्येक जण आपली अशी वेगळी ओळख बाळगून आहे, असे त्यांचे म्हणणे होते. अजूनही हिंदुत्व या शब्दाबाबत प्रत्येकाची समज काय असू शकते याबाबत भरपूर गोंधळ दिसतो, हे पाहता त्यांच्या या विश्लेषणात वास्तवाचा अंश आहे, असे समजायला हरकत नाही. मात्र यातून सेक्युलर असणे म्हणजे निश्चित काय अपेक्षित आहे हे ते सांगताना दिसत नाहीत. आजवर केवळ सत्तेसाठी अल्पसंख्याकांचे लांगूलचालन करण्यामुळे हे अल्पसंख्याक राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात न आल्यामुळे किती गंभीर आव्हाने उभी आहेत, याचा उल्लेखही ते कोठे करताना दिसत नाहीत. किंबहुना ते मुस्लीमविरोधी म्हणून मोदींना जितक्या वेळा लक्ष्य करताना दिसतात, त्याच्या अगदी थोडया प्रमाणातही ते देशापुढील अशा आव्हानांबद्दल बोलताना दिसत नाहीत. यावरून ते दांभिक होते की त्यांची राजकीय समजच मर्यादित होती आणि ते तिच्या परीघाएवढेच बोलू शकत, याबाबत ज्याने-त्याने स्वत:चा असा निष्कर्ष काढावा. मात्र याबाबत त्यांनी मोठाच निवडकपणा व दुटप्पीपणा केला हे स्पष्टपणे सांगता येते. गुजरात दंगलींचा विषय निघाला की 1984मध्ये दिल्लीत व इतरत्र घडवल्या गेलेल्या शिखांच्या शिरकाणाचा उल्लेख होतोच. त्याबद्दल कार्नाड म्हणतात की त्यानंतर काँग्रोसने माफी मागितली आणि त्या शिरकाणाची भरपाई करण्यासाठी एका शीख व्यक्तीला, म्हणजे डॉ. मनमोहन सिंग यांना पंतप्रधानपदी बसवले. हा त्यांच्या मर्यादित राजकीय समजुतीचा आणखी एक नमुना. दक्षिणायन या संस्थेच्या एका संमेलनात बंगळुरूमध्ये 2018मध्ये ते म्हणाले की राजकारणाबद्दलची त्यांची समजूत तोपर्यंत लांचावतारा (भ्रष्टाचाराचा नाच) अशी होती, ती आता लिंचावतारा (लिंचिंगचा नाच) अशी झाली आहे. शाब्दिक कोटी करण्याच्या प्रयत्नात आजवरच्या राजकारणाचा दोष केवळ भ्रष्टाचारापुरताच मर्यादित होता, असे समजत राजकारणाबद्दलची आणि त्यामुळे सेक्युलरपणाबद्दलची त्यांची एकूणच कल्पना किती बाळबोध होती हे त्यांनी दाखवले. बिहार विधानसभेच्या निवडणुकांच्या तोंडावर पुरस्कारपरतीचे जे सामूहिक नाटक घडवण्यात आले, त्यात गिरीश कार्नाड सामील झाले नव्हते. त्यांनी त्यांना मिळालेले विविध पुरस्कार त्यासाठी पणाला लावल्याचे दिसले नाही. मात्र हेदेखील खरे, की या निवडणुकीत भाजपाची वाताहत झाल्यानंतर त्यांनी त्या दिवसाचा उल्लेख 'बिहारदिन' असा केला. हे त्यांच्या भाजपाविरोधाचे त्या मानाने फारच सौम्य असे उदाहरण म्हणायला हवे.

वर उल्लेख केलेल्यापैकी त्यांच्या काही कृती त्यांचे समर्थक त्यांच्या स्पष्टवक्तेपणाची उदाहरणे म्हणून सांगतात. त्याचाच भाग म्हणून त्यांनी रवींद्रनाथ टागोर यांच्या नाटकांना दर्जाच्या बाबतीत मोडीत काढले. पं. भीमसेन जोशी यांच्या स्वकेंद्रितपणावर टीका केली. मात्र त्यांनी हद्द केली ती 2012मध्ये भारतीय वंशाचे लेखक व्ही.एस. नायपॉल यांना मुंबईतील एका साहित्य संमेलनात जीवनगौरव पुरस्कार देण्याच्या समारंभात. या संमेलनात कार्नाड यांना त्यांच्या रंगभूमीवरील आयुष्याबद्दल बोलण्यास सांगितले होते. मात्र त्यांनी त्याबद्दल एक चकार अक्षरही न बोलता नायपॉल यांना लक्ष्य केले. नायपॉल हे मुस्लीमविरोधी आहेत, त्यांनी आपल्या पुस्तकात भारतातील मुस्लिमांची आक्रमक आणि अत्याचारी अशी प्रतिमा रंगवत जगाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला असल्यामुळे त्यांना हा पुरस्कार द्यायलाच नको होता, असे कार्नाड यांनी आपल्या भाषणात म्हटले. अलीकडे प्रख्यात चित्रकार प्रभाकर बरवे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित कार्यक्रमात भलत्याच विषयाला हात घालत 'अंधार-अंधार' अमोल पालेकर यांनी जसा औचित्यभंग केला, त्याहीपेक्षा कितीतरी अधिक गंभीर प्रकार गिरीश कार्नाड यांनी त्या वेळी केला. या कार्यक्रमाच्या आयोजकांपैकी एक असलेले प्रसिध्द पत्रकार अनिल धारकर यांनी मुस्लीम आक्रमकांच्या अत्याचारांची व विध्वंसाची अनेक उदाहरणे देत कार्नाड यांच्या दाव्याच्या अक्षरश: चिंधडया उडवल्या. अशा मूलभूत बाबींमध्येही कार्नाड यांची समजूत इतकी वरवरची असेल, तर सेक्युलरपणाबाबत त्यांची कल्पना नक्की काय असेल हे सांगण्याची वेगळी गरज नसावी.

सर्वात अलीकडे ते वादात सापडले होते ते म्हणजे गौरी लंकेश यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित केलेल्या सभेत 'मीही शहरी नक्षल' असा फलक गळयात अडकवून बसल्यावरून. वास्तविक त्यांची प्रकृती त्या वेळीही ठीक नव्हती. ते अशा सभांना उपस्थित राहताना प्राणवायूचे सिलिंडर बरोबर घेऊन जात. एकतर प्रसंग काय होता आणि त्यांनी हे जे कृत्य केले, याचा काही मेळ बसत नव्हता. शिवाय ज्यांना शहरी नक्षलवादी म्हणून पकडण्यात आले, त्यांच्यापैकी काहींनी उघडपणे केलेला हिंसेचा पुरस्कारच नव्हे, तर प्रत्यक्ष हिंसा घडवण्यात असलेल्या त्यांचा सहभाग लक्षात न घेताच कार्नाड यांनी हे बेजबाबदार कृत्य केले. यावरून शहरी नक्षल्यांकडून या देशाला असलेल्या धोक्याची काडीमात्रही कल्पना त्यांना नसल्याचे दिसते.

गिरीश कार्नाड यांचे सिनेसृष्टी, रंगभूमी, नाटयलेखन या साऱ्या क्षेत्रांमधले योगदान इतक्या उच्च दर्जाचे व प्रसंगी अभिजात अशा स्वरूपाचे आहे की आपली राजकीय भूमिका मांडताना ते त्याबाबतच्या किमान अभ्यासाच्या अभावी साफ उघडे पडतात, हे पाहणे खरे तर आश्चर्यकारक आहे. आता एका आघाडीच्या माध्यम समूहाने कार्नाड यांचे निधन झाल्यावर त्यांची ओळख 'टायगर जिंदा है मधील अभिनेता' अशी करून देण्याचा पराक्रम केला. नव्या पिढीला कार्नाड यांच्या साहित्य-नाटयचित्रक्षेत्रातील कामगिरीची माहिती नसणे साहजिक आहे. मात्र त्यांची ओळख इतकी उथळ नव्हती हे जसे समजून घ्यायला हवे, तसेच त्यांच्या राजकीय मतांचा प्रतिवाद करताना आपण त्यांना थेट हिंदूविरोधी वा देशविरोधी तर ठरवत नाही आहोत ना, हे पाहण्याचे तारतम्य ठेवायला हवे. त्यांना तसे ठरवणे हा त्यांच्यावरील मोठाच अन्याय ठरेल.