योगस्थः कुरु कर्माणि

विवेक मराठी    18-Jun-2019
Total Views |

जसं जमिनीत बी पेरण्यापूर्वी जमिनीची मशागत करून तिला सुपीक बनवावं लागतं, तसं आसनं आणि प्राणायाम साधण्यासाठी, यम आणि नियम यांचं आचरण चोवीस तास करावं लागतं. आसनं आणि प्राणायाम हे योगाचं अंतिम उद्दिष्ट नाही. यांच्या आधारे धारणेपासून कैवल्यप्राप्तीचा प्रवास सुकर करायचा असतो. जागतिक योग दिनानिमित्त विशेष लेख.

जागतिक योगदिन सुरू झाल्यापासून ‘योग’ शब्दाची चलती फारच वाढली आहे. भारत ही योगशास्त्राची जन्मभूमी असल्याने, योगदिनाला भक्कम शास्त्रीय पाया राहील याची काळजी घेण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे.

आंतरजालावर थोडा फेरफटका मारला तर योगाच्या नावाखाली कल्पनेच्या किती भरार्‍या मारल्या जात आहेत, शास्त्र बाजूला ठेवून त्यात व्यापार घुसवायचे प्रयत्न कसे केले जात आहेत ते आपल्याला कळू शकेल.power yoga, yin yoga, restorative yoga, bizarre yoga, naked yoga, beer yoga, anti-gravity yoga, Cannabis yoga/Ganjasana  असे विविध प्रकार जगात कुठेतरी सुरू होऊन योगाच्या या जन्मभूमीत पोहोचतात आणि आपल्याकडे त्यांचा उदोउदो सुरू होतो. हे आपण खपवून घेतो, कारण कवायती आसनं, नाक धरून केलेला प्राणायाम, घड्याळ लावून केलेलं ध्यान आणि निद्राधीन होईपर्यंत घेतलेली योगनिद्रा याच्या पलीकडे आपलं योगशास्त्रविषयक ज्ञान जात नाही.

भारताची परंपरा अत्यंत उज्ज्वल आहे. आपले पुराणकालीन पूर्वज योगयुक्त जीवनशैली जगत होते. युद्धात मृत्यू आला नसेल तर बहुतांश जणांचं प्राणोत्क्रमण हे योग मार्गानं, प्राणांचं नियमन करून झालेलं असायचं. राजापासून सामान्य लोकांपर्यंत सहसा सर्वांना कुंडलिनी जागृत करता येत असे. राक्षसदेखील दैनंदिन योगसाधना करत असत. इतकं प्रचलित असलेलं हे योगशास्त्र आता आपल्याला ग म भ न पासून शिकावं लागतंय.

सध्या सामान्यतः दिवसभरात अर्धा तास केली जाणारी आसनं आणि प्राणायाम, ही योगाच्या अष्टांगातील केवळ दोन अंगं आहेत. जसं जमिनीत बी पेरण्यापूर्वी जमिनीची मशागत करून तिला सुपीक बनवावं लागतं, तसं आसनं आणि प्राणायाम साधण्यासाठी, यम आणि नियम यांचं आचरण चोवीस तास करावं लागतं. आसनं आणि प्राणायाम हे योगाचं अंतिम उद्दिष्ट  नाही. यांच्या आधारे धारणेपासून कैवल्यप्राप्तीचा प्रवास सुकर करायचा असतो. स्वामी विवेकानंदांच्या मते प्रत्येक जीवाला हा प्रवास अनिवार्यपणे करायचा आहे. त्यामुळे जितक्या लवकर हा मार्ग कळेल तितकं उत्तम असा आपल्या पूर्वजांचा आग्रह होता. म्हणूनच योग हे तेव्हा वार्धक्यात शिकायचं शास्त्र नव्हतं. ध्रुवबाळ, भक्त प्रल्हाद, नारदमुनी असे कित्येक जण अगदी बालवयात त्याच्या अभ्यासाला लागले होते.

भगवद्गीता हा आपला धर्मग्रंथदेखील योगशास्त्राचाच उपदेश करणारा आहे. यातील प्रत्येक अध्यायाच्या शेवटी ‘श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे...’ असं स्पष्ट म्हटलं आहे.

कलियुगातील महत्त्वाकांक्षी, करियर ओरिएन्टेड आणि बहिर्मुख मनुष्याला त्याच्या धावपळीच्या आयुष्यात योगशास्त्राची गरज भासू लागली आहे. मनुष्याच्या सर्व कर्मांचे तनामनावर होणारे सद्य परिणाम टाळण्यासाठी योगशास्त्राशिवाय त्याला अन्य पर्याय दिसत नाही. मात्र भगवद्गीतेत भगवंत सांगतात, ‘योगस्थः कुरु कर्माणि संगं त्यक्त्वा धनंजय’ - आधी योगस्थ व्हा, शरीर आणि मनानं स्थिर व्हा, स्वत:च्या देहातीत अस्तित्वाचा अनुभव घ्या, कैवल्याची अनुभूती घ्या, कैवल्यासाठी बाह्य साधनाची आवश्यकता नाही हे ज्ञान करून घ्या आणि मग संगरहित होऊन कर्मप्रवृत्त व्हा. आपला प्रवास नेमका उलटा चालू आहे. आपण आधी कर्मप्रवृत्त होतोय आणि मग स्थैर्यासाठी योगशास्त्राच्या वळचणीला जातोय.

भौतिक प्रगतीचा चढता आलेख, त्यामुळे शरीराला आलेली सुखासीनता, इंद्रियांना निरंतर प्राप्त होणारे विषय, वाढलेली स्वार्थी वृत्ती, नास्तिकता, दूरदृष्टीचा अभाव, हितकर गोष्टींपेक्षा सुखकर गोष्टी अंगीकारण्याकडे वाढलेला कल... अशा अनेक कारणांमुळे आज वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक पातळ्यांवर बर्‍याच समस्या निर्माण झाल्या आहेत. वैयक्तिक आयुष्यात निराशेचं आणि मनोरोगांचं प्रमाण वाढतंय. कुटुंब अधिकाधिक छोटी होत आहेत. सामाजिक स्तरावर वैरभाव, असमानता, भय, पर्यावरण असंतुलन. यांचं थैमान आहे. कायदे करून प्रश्न सुटत नाहीत.

अशा परिस्थितीत योगशास्त्र हा मनुष्यजातीला मोठाच आधार आहे. प्रत्येक व्यक्ती वैयक्तिक आयुष्यात योगशास्त्राच्या मार्गाने जाईल तर तिचा इतरांना उपद्रव कमी होईल आणि इतरांचा उपद्रव करून न घेता जगायची कला तिला आत्मसात होईल. मात्र यासाठी अष्टांग योगशास्त्राचा अभ्यास हवा. त्यातील समाधी वगळता अन्य सात अंगांचा नियमित सराव हवा. पतंजली मुनींनी योगातील प्रत्येक अंगाचे मनुष्याला होणारे फायदे स्पष्ट केले आहेत. ते बघितले तरी एकविसाव्या शतकातील मनुष्याच्या समस्यांवर ‘योग’ हे किती चपखल उत्तर आहे हे आपल्याला कळेल.

1) योगाङ्गानुष्ठानादशुद्धिक्षये ज्ञानदीप्तिराविवेकख्यातेः॥28॥

योग अनुष्ठान केल्याने तना-मनातील अशुद्धी नष्ट होतात, अविवेक नष्ट होतो आणि ज्ञानज्योत प्रदीप्त होते.

2) यमनियमासनप्राणायामप्रत्याहारधारणाध्यानसमाधयोऽष्टावङ्गानि ॥29॥ - यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी ही योगशास्त्राची आठ अंगं आहेत.

3) अहिंसासत्यास्तेयब्रह्मचर्यापरिग्रहा यमाः॥30 - अहिंसा, सत्य, अस्तेय (चोरी न करणं), ब्रह्मचर्य (इंद्रियनिग्रह), अपरिग्रह (आवश्यकतेपेक्षा अधिक संचय न करणं) हे पाच यम आहेत.

4) अहिंसाप्रतिष्ठायां तत्सन्निधौ वैरत्यागः॥35॥ - वैयक्तिक पातळीवर कायिक, वाचिक आणि मानसिक अहिंसेचं पालन करणार्‍या व्यक्तीच्या सान्निध्यात येणारे सर्व प्राणी वैरभावाचा त्याग करतात. पूर्वी ऋषीमुनींच्या आश्रमात सर्व प्राणी प्रेमाने एकत्र राहत असल्याचे दाखले मिळतात. आजही डॉ. प्रकाश आमटे यांच्या हेमलकसा प्रकल्पात हा वैरत्याग बघायला मिळतो. मात्र वैयक्तिक स्तरावर अहिंसा जितकी उपयुक्त आहे, तितकीच राष्ट्रीय स्तरावर ती सद्गुणविकृती ठरते याचा अनुभव आपण हजारो वर्षं घेत आहोत.

5) सत्यप्रतिष्ठायां क्रियाफलाश्रयत्वम् ॥36॥ - आयुष्यात सत्य प्रस्थापित केलं तर सर्व क्रिया सफल होतात. सत्यावर आधारित कर्मांचं उपयुक्त फल निश्चित मिळतं.

6) अस्तेयप्रतिष्ठायां सर्वरत्नोपस्थानम्  - अन्य कुणा जीवाच्या अधिकाराचं धन, अन्न, पद इ. हरण न करणं म्हणजे अस्तेय. अस्तेयाच्या पालनाने जगातील उत्तमोत्तम रत्नं उपलब्ध होतात. प्रत्येक जीवाला त्याची वाटणी मिळणं ही एक मोठी उपलब्धीच आहे.

7) ब्रह्मचर्यप्रतिष्ठायां वीर्यलाभः॥38॥ - इंद्रियनिग्रह केल्यास वीर्य म्हणजे शक्तीचा लाभ होतो. इंद्रियांचे चोचले पुरवण्यात मनुष्याच्या आयुष्याचा मोठा कालापव्यय होतो. इंद्रियांचे विषय प्राप्त करण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. त्यात श्रम आणि शक्ती वाया जाते. इतकं करून दैववशात् ते विषय प्राप्त झाले नाहीत तर राहिलेली शक्ती शोक करण्यात नष्ट होते. म्हणून इंद्रियनिग्रह हा कळीचा मुद्दा आहे.

8) अपरिग्रहस्थैर्ये जन्मकथन्तासम्बोधः॥39॥

इंद्रियनिग्रह केल्याने गरजा कमी झाल्या की संचय करण्याची वृत्ती कमी होते. संचय म्हणजे इतरांच्या हक्कावर अतिक्रमण होय. मनुष्याशिवाय अन्य कोणताही प्राणी असा संचय करत नाही. संचयापोटी भय वसतीला येतं. संचय करणं बंद केलं की मनुष्याला त्याच्या अन्य जन्मांचं ज्ञान होऊ लागतं. आपल्याच पाप-पुण्यांची कल्पना येऊन विवेक जागृत होतो.

9) शौच, संतोष, स्वाध्याय, तप आणि ईश्वरप्रणिधान हे पाच नियम आहेत.

10)  शौचात्स्वाङ्गजुगुप्सा परैरसंसर्गः॥40॥ - निरोगी राहण्यासाठी शारीरिक शौच, आनंदी राहण्यासाठी मानसिक आणि वाणीचं शौच यांचं महत्त्व आपण जाणतो. प्रत्येक व्यक्तीने अर्थशौचाचं पालन केलं तर समाजातील भ्रष्टाचार निश्चित कमी होऊ शकतो.

सत्त्वशुद्धिसौमनस्यैकाग्र्येन्द्रियजयात्मदर्शनयोग्यत्वानि च॥41। -सर्व प्रकारची शौचं पाळली तर मन प्रसन्न होतं, एकाग्रता वाढते, इंद्रियसंयम प्राप्त होतो आणि मनुष्य आत्मदर्शनाला योग्य होतो.

11) सन्तोषादनुत्तमसुखलाभः॥42॥ - विनाकारण, कुठल्याही भौतिक आधाराशिवाय संतुष्ट राहता येणं हे परमोच्च सुख आहे. भगवंत याला ‘आत्मनि एव आत्मनः तुष्ट:’ असं म्हणतात. ही स्थित:प्रज्ञ स्थिती आहे.

12) कायेन्द्रियसिद्धिरशुद्धिक्षयात्तपसः॥43॥ - तप केल्याने शरीर आणि इंद्रिय यांची शुद्धी होऊन ते सिद्ध होतात. कठोर तपानंतर सिद्धी प्राप्त होतात याचे अनेक दाखले आपल्याला प्राचीन इतिहासात मिळतात.

13) स्वाध्यायादिष्टदेवतासम्प्रयोगः॥44॥ - स्वाध्याय म्हणजे लोककल्याण करणार्‍या शास्त्रांचा अभ्यास आणि प्रचार. इथे लोककल्याण हा कळीचा मुद्दा आहे. प्राणिमात्रांच्या हिताच्या आड येणार्‍या शास्त्रांना इथे स्थान नाही. स्वाध्यायामुळे इष्ट देवता संतुष्ट होतात.

14) समाधिसिद्धिरीश्वरप्रणिधानात् ॥45॥ - ईश्वरप्रणिधान (जप, नामस्मरण) यामुळे समाधीसाठी मनुष्य सिद्ध होतो.

15) ततो द्वन्द्वानभिघातः॥48॥ - आसनांच्या अभ्यासाने शारीरिक (उदा. शीत/उष्ण) आणि मानसिक द्वंद्व (उदा. सुख/दुःख) सहन करण्याची क्षमता वाढते.

16) ततः क्षीयते प्रकाशावरणम् ॥52॥ - धारणासु च योग्यता मनसः॥53॥

प्राणायामाच्या सरावाने आपल्या प्रकाशरूपी अस्तित्वावर असलेलं अज्ञानरूपी आवरण क्षीण होतं. चंचल मनावर नियंत्रण मिळून ते धारणेला योग्य होतं.

17)  प्रत्याहार - तत: परमावश्यतेइन्द्रियाणाम्॥ पातंजल योग सूत्र 2/55 - प्रत्याहाराचा नियमित अभ्यास केल्यास, इंद्रिय वश होतात. हे अत्यंत कठीण आणि श्रेष्ठ फल आहे.

योगशास्त्र हा विषय खूप विस्तृत आणि गहन आहे. एका लेखात त्याचा धांडोळा घेणं केवळ अशक्य आहे. मनुष्याला स्वतःचं चिरंतन हित साधायचं असेल तर योगशास्त्राच्या अभ्यासाशिवाय पर्याय नाही हे निश्चित. त्याची महती कळावी यासाठी हा लेख!

वाचकांना हा लेख वाचून योगशास्त्राकडे वळण्याची प्रेरणा मिळावी हीच प्रार्थना!

एम.डी. आयुर्वेद, बी.ए. योगशास्त्र (सुवर्णपदक)