रिमझिम गिरे सावन

विवेक मराठी    18-Jun-2019
Total Views |

पहिला पाऊस आणि पहिले प्रेम लाजरेच. हो की नाहीच्या उंबरठ्यावर रेंगाळणारे. एकमेकांच्या मनाचा कानोसा घेणारे. हलक्या पायाने येणारा हा पहिला पाऊस, होकार मिळाल्यावर मात्र उधळतो. वाजत गाजत बरसतो.

वैशाख वणवा पेटलेला असताना, येणारी दुपार भगभगती, रखरखीत, असह्य, अंगाची लाहीलाही करणारी. अचानक आकाश आपला रंग बदलते. पांढरे, पिंजलेले, पसरलेले ढग आक्रमक होतात. त्यांच्या संगतीने, वाराही बेभान होतो. रस्त्यावर गपगार पडलेली धूळ दचकून उठते. झाडांची वाळकी पाने या आवेगाने घाबरून, हवेत अस्ताव्यस्त उडू लागतात. वार्‍याच्या एका झुळकेसाठी आसुसलेल्या घरांच्या खिडक्यांनासुद्धा या नवागताची चाहूल लागल्याने, त्या आनंदाने ताल धरतात. अंधार दाटून येतो. लखलखणारी वीज त्याच्या आगमनाची सूचना देते. बालगोपाळ स्वागताच्या घोषणा देतात आणि या सार्‍यांच्या साक्षीने तो कोसळतो. झाडांच्या काळसर, निब्बर खोडांवर फुटलेली कोवळी पालवी पावसाचे थेंब तोलायला सज्ज होते. उन्हाने तापलेली धरित्री सुखावते. शांत होते. एवढा धसमुसळा असूनही तिची काहीच तक्रार नसते. इतक्या महिन्यांच्या विरहाने उगवलेला असतो ना, त्याच्यात विरघळून ती स्वतःच पाऊस होते.

कथा-कादंबर्‍यांत आणि सिनेमात प्रेम आणि पाऊस एकमेकांना चिकटून येतात. यातील पात्रांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या प्रसंगांचा साक्षीदार म्हणूनही पाऊस भूमिका बजावतो. पहिली नजरभेट, पहिले प्रेम, त्या प्रेमाची कबुली, प्रेमाने ओलांडलेली मर्यादा या सार्‍या पायर्‍या पावसाच्या साथीने होतात. पहिला पाऊस तसा आगाऊ आणि खट्याळ. कुणाच्याही ध्यानीमनी नसताना कोसळतो. मात्र शरीराला, मनाला सुखावतो. त्याचे येणे आपल्या हातात नसते आणि त्याला थांबवणेसुद्धा.

प्रेमाचेही तसेच.

‘मंजिल’ या चित्रपटात नायक आणि नायिकेची भेट पावसाच्या नाही, पण पावसाच्या गाण्याच्या संगतीने होते.

 रिमझिम गिरे सावन

सुलग-सुलग जाए मन

भीगे आज इस मौसम में

लगी कैसी ये अगन

 गाडीचा टायर पंक्चर झाल्याने नायिका टॅक्सीच्या शोधात निघते. भर दुपारची वेळ. कार्यक्रमाला उशीर होणार म्हणून तिची तगमग आणि त्यात पाठीमागून पावलांचे आवाज. त्यातली घाई तिला जाणवतेय. रस्ता निर्मनुष्य. आता मात्र ती घाबरते. आपला पाठलाग होतो आहे का? हा चोर असेल का? मनात शंकांचे वारूळ. त्याला मात्र तिच्या मनातल्या भीतीची जाणीवसुद्धा नाही.

हळूहळू त्याच्या पावलांना वेग येतो आणि तिलाही मागे टाकून तो पुढे निघून जातो. आपल्या वेड्या मनाला ती हसते खरी, पण त्या मनात त्यानेही हलक्या पावलाने प्रवेश केला असतो.

नशिबात असेल तर योगायोगसुद्धा जुळून येतात. ज्या ठिकाणी तिला पोहोचायचे असते, तिथेच तोसुद्धा आमंत्रित असतो. चित्रपटाच्या सुरुवातीला येणार्‍या रिमझिम गिरे सावन या गाण्यात कुठेच पाऊस नाही. तिच्या मनात मात्र बरसतो आणि पावसाचे गीत सादर करणारा, तोसुद्धा अलगद रुतून बसतो.

जब घुंघरुओं सी बजती हैं बूंदे

अरमाँ हमारे पलके न मूंदे,

 पावसाच्या थेंबाचे नर्तन धरतीला भिजवत असतानाच एका अगम्य भावनेने तिला स्पर्श केला आहे. मनाच्या या अस्वस्थतेत झोप कुठे येणार! मग त्याच्या स्वप्नांना तरी प्रवेश कुठे मिळणार!

 कैसे देखे सपने नयन, सुलग-सुलग जाए मन

भीगे आज इस मौसम में

 हे गीत गातो आहे नायक, पण या गीताची अनुभूती मात्र तिची. शब्द आणि सूर त्याचेच, पण त्याचा अर्थ मात्र तिच्यासाठी जिवंत झाला आहे.

महफ़िल में कैसे कह दें किसी से

दिल बंध रहा है किस अजनबी से

हाय करें अब क्या जतन

सुलग-सुलग जाए मन

 प्रेमात पडण्याची क्रिया गूढच असते. ते का होते, एका विशिष्ट व्यक्तीविषयीच ओढ का वाटते, याला तसे शास्त्र नाहीच. ते घडायचे तेव्हा घडते. अगदी एका नजरभेटीतसुद्धा हृदय गमावण्याच्या घटना घडतात. अजिबात शक्यता नसताना, मन भलतीकडेच असताना, समोरचा ओळखीचा नसतानासुद्धा मन चोरून नेतो आणि त्या अनुभवाची वाच्यतासुद्धा कुणाकडे करता येत नाही. स्वतःलाच जिथे समजत नाही, तिथे दुसर्‍यांकडे मन तरी मोकळे कसे करणार!

पहिला पाऊस आणि पहिले प्रेम लाजरेच. हो की नाहीच्या उंबरठ्यावर रेंगाळणारे. एकमेकांच्या मनाचा कानोसा घेणारे. हलक्या पायाने येणारा हा पहिला पाऊस, होकार मिळाल्यावर मात्र उधळतो. वाजत गाजत बरसतो.

रिमझिम गिरे सावन हे गीत जेव्हा दुसर्‍यांदा वाजते, तेव्हा त्याच्या जोडीला धुंवाधार पाऊस असतो. पहिल्या गीताला किशोरचा आवाज आहे. शांत, गंभीर, तिला विचार करायला, सावरायला वेळ देणारा आश्वासक आवाज. नंतर मात्र ओळख पटली आहे. मने जुळली आहेत. आताच पाऊस हा खोडकर आहे. लताबाईंच्या आवाजात तो खट्याळपणा पुरेपूर भरला आहे.

 पहले भी यूँ तो बरसे थे बादल

पहले भी यूँ तो भीगा था आँचल

अब के बरस क्यूँ सजन

सुलग-सुलग जाए मन

पावसात तर नेहेमीच भिजलो आहोत, पण हे असे जोडीने भिजणे वेगळेच.

या गीताच्या लोकप्रियतेत या चित्रपटाचे चलचित्रकार के.के. महाजन यांचा महत्त्वाचा वाटा आहे. याचे चित्रीकरण लाइव्ह झाले होते. अगदी भर पावसात. नायक आणि नायिकेपेक्षासुद्धा या गीतात भाव खाऊन जाते ती महाजन यांनी कॅमेर्‍यात टिपलेली, सचैल भिजलेली मुंबई. फार गर्दी नव्हती तेव्हा या शहरात. सत्तरच्या दशकातली मुंबई किती वेगळी दिसते. कमी गाड्या, त्यात आता जवळजवळ नाहीशी झालेली काळी-पिवळी फियाट टॅक्सी. मध्येच भर्रकन पाणी उडवीत जाणारी बेस्ट बस. तीन-चार मजल्यांच्या इमारती, त्याच्या वळचणीला थांबलेले चाकरमानी आणि यात आपली वाट, हातात हात घालून चालणारे अमिताभ आणि मौशमी.

 इस बार सावन दहका हुआ है

इस बार मौसम बहका हुआ है

जाने पी के चली क्या पवन

सुलग-सुलग जाए मन

भीगे आज इस मौसम में

 आता तिला या प्रश्नाचे उत्तर माहीत आहे.

दोघांच्याही हातात छत्री नाहीच. भर पावसात सूट घालून भिजलेला नायक आणि अंगभर साडीतली गोड नायिका. आता वयाने वाढली आहेत म्हणून ही लेबले लावायची. खरे तर लहान मुलेच दिसतात ती. अंगावर पाऊस झेलत एकमेकांशी बोलणे, एकमेकांना काहीतरी नवीन दाखवणे, उगाच हसणे, पाणी उडवणे आणि दमल्यावर एकमेकांच्या कुशीत ओलेत्या बाकड्यावर बसणे. सहजसुंदर अभिनय.

हे गीत ऐकणे आणि पाहणे म्हणजे असंख्य भिजलेले दिवस परत जगणे. अमिताभच्या अनेक यशस्वी असलेल्या चित्रपटांत मंजिलचा समावेश नाही. मात्र आर.डी. बर्मन याचे संगीत असलेले आणि योगेश यांनी शब्दबद्ध केलेले हे गीत, मुंबईच्या पावसाला दिलेली सलामी आहे.