भाषा हा संस्कृतीचा वारसा आणि आरसा

विवेक मराठी    24-Jun-2019
Total Views |

 

''एखादी भाषा लोप पावली की त्याबरोबर ती संस्कृतीही नाहीशी होते. म्हणून आपण आपल्या बोलीभाषा जपल्या पाहिजेत'' असे डेक्कन कॉलेजच्या प्राध्यापक भाषातज्ज्ञ डॉ. सोनल कुलकर्णी-जोशी यांनी सांगितले. 'विवेक साहित्य मंच' आयोजित बोलीभाषा कथा अभिवाचन आणि परिसंवाद या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

विवेक साहित्य मंचने बोलीभाषा कथास्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचा पारितोषिक वितरण समारंभ, तसेच याच स्पर्धेतील बोलीभाषा कथा अभिवाचन आणि परिसंवाद या कार्यक्रमाचे आयोजन दि. 29 जून 2019 रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्र, पुणे येथे करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या प्रथम सत्रात विवेक साहित्य मंच समन्वयक डॉ. अर्चना कुडतरकर यांनी प्रास्ताविकातून विवेक साहित्य मंचाची भूमिका स्पष्ट केली. आपल्या बीजभाषणात डॉ. सोनल कुलकर्णी-जोशी यांनी सांगितले की ''केवळ 96% भारतीयांकडून 4% बोलीभाषा वापरल्या जातात. स्वभाषेचा त्याग करून प्रतिष्ठित भाषेचा स्वीकार केल्याने बोलीभाषा लोप पावतात. भाषा हा त्या संस्कृतीचा वारसा आणि आरसा असतो.'' बोली आणि भाषा यांतील फरक स्पष्ट करताना ''बोलीभाषा या नियमांनी जखडलेल्या नसतात; तर प्रमाण भाषेला लिपी, व्याकरण यांचे बंधन असते.'' तसेच, बोलीभाषांचे संवर्धन करण्यासाठी डेक्कन कॉलेजकडून  सुरू असणाऱ्या प्रकल्पांविषयी माहिती त्यांनी दिली. बोलीभाषांचे चैतन्य टिकवण्याच्या व त्याविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने हे प्रकल्प सुरू असल्याचे सांगत त्यांनी उपस्थित श्रोत्यांच्या प्रश्नांना माहितीपूर्ण उत्तरे दिली.

कार्यक्रमाच्या द्वितीय सत्रात स्पर्धेतील प्रथम क्रमांक जयश्री केणे(नागपुरी बोली), द्वितीय क्रमांक अरुण इंगवले (कोकणी), तृतीय क्रमांक मेघना जोशी (मालवणी), उत्तेजनार्थ वर्षा फाटक (संगमेश्वरी), मेधा मराठे (चित्पावन) या विजेत्यांनी आपल्या कथांचे अभिवाचन केले. यामुळे कोकणी, मालवणी, नागपुरी, चित्पावनी यांसारख्या बोलीभाषा एकाच वेळी एका मंचावर ऐकण्याची संधी प्रेक्षकांना मिळाली. केवळ स्पर्धा डोळयांसमोर ठेवून त्यांनी या कथांचे लेखन केले नाही, तर प्रत्येक विजेत्याचा त्या-त्या बोलीभाषेचा परिपूर्ण अभ्यास असल्याचे परिसंवादातून लक्षात येत होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष विक्रम भागवत यांनी आपले मनोगत व्यक्त करताना कथा कशी घडते, कथेचा प्रवास उलगडत कथालेखन करताना लेखकांनी काय काळजी घ्यावी याविषयी सांगितले. तसेच, ''बोलीभाषेतून बोलणे हा न्यूनगंड समजला जातो. त्यातूनच प्रमाण भाषा जवळ केली जाते. पण बोलीभाषेला अर्थकारण मिळाले, तर त्या टिकून राहतील'' अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

या वेळी कार्यक्रमात 'प्रतिलिपी'तर्फे घेण्यात आलेल्या नाटय आणि एकांकिका स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.

सा. विवेकचे प्रबंध संपादक दिलीप करंबेळकर, कार्यकारी संपादक अश्विनी मयेकर, भाषा संवर्धन समिती अध्यक्ष माधुरी सहस्रबुध्दे व अनेक मान्यवर लेखक, प्रकाशक आणि भाषा अभ्यासक या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते.

दोन्ही सत्रांतील सकारत्मकतेचे सार संागत संजीवनी शिंत्रे यांनी परिसंवादाचा समारोप केला. रोहित वाळिंबे यांनी सूत्रसंचालन केले. उपस्थितांना धन्यवाद देत विवेक साहित्य मंचाच्या कार्यक्रमाची ही सुरुवात असल्याचे सांगत डॉ. अर्चना कुडतरकर यांनी आभार मानले.