आनंदयात्रा घडवू या

विवेक मराठी    26-Jun-2019
Total Views |

आनंदयात्रा! हा एक प्रवास आहे आम्हा सगळया जणींचा, 'काही विशेष न करण्यापासून काहीतरी बरं करतोय' इथपर्यंतचा. आम्ही सगळया जणी म्हणजे संघपरिवारातून जुजबी तोंडओळख असणाऱ्या, कधीतरी वार्षिक उत्सवाच्या निमित्ताने एकमेकींना दिसणाऱ्या. फक्त 'हाय, हॅलो' म्हणणाऱ्या. अशाच सात-आठ जणी. ठाण्यातील विभाग प्रचारक मंदारजी कुलकर्णी यांनी एक दिवस सगळया जणींना एकत्र बोलावून 'संस्कार वर्ग' हा विषय मांडला. विषयाची समाजातील गरज आणि गांभीर्य लक्षात न घेता सहज होकार देऊन आम्ही कामाला लागलो.

'करून तर बघू' एवढेच मनाशी ठरवले होते. प्रत्येकीकडेच काहीतरी कौशल्य होते आणि ते वापरून मुलांना जास्तीत जास्त चांगले, काय आणि कसे देता येईल? यावर विचार आणि अभ्यास सुरू झाला. त्यातूनच आकाराला आली आनंदयात्रा!

आनंदयात्रा हा केवळ छंदवर्ग नाही, तर ती संस्कारांची सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे, हा आनंदयात्रेचा दृष्टीकोन निश्चित झाला आणि हेच ब्रीद घेऊन एक सेवा कार्य सुरू झाले.

चले निरंतर चिंतन मंथन, चले निरंतर अथक प्रयास

मनाशी खूणगाठ बांधली - ज्या समाजात आपण राहतो, तिथे फार विशेष उल्लेखनीय नाही, तर निदान बरे कार्य करायचे हे ठरले. खूप तयारी न करता केवळ पंधरा दिवसांच्या नियोजनावर महिन्याभराच्या आनंदयात्रा शिबिराची उभारणी केली आणि मुहूर्तमेढ रोवली गेली. आमच्या या शिबिराला पालकांचा आणि मुलांचा कितपत प्रतिसाद मिळतोय याबद्दल मनात धाकधूक होती. परंतु 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती आयोजित आनंदयात्रा' या नावामुळेच कदाचित समाजाने सकारात्मकरीत्या हे शिबिर स्वीकारले आणि तीस मुलांची नोंदणी अपेक्षित असताना नोंदणी संख्या पासष्ट झाली.

ही घटना आम्हाला सगळयांना उत्साहित आणि अंतर्मुख करून गेली. आडव्या वस्तीबरोबरच उभ्या वस्तीतही संस्कार वर्गाची असणारी गरज जाणवली आणि आम्ही जोमाने कामाला लागलो. महिनाभराचे शिबिर पार पडले. मागील वर्षभरात गुरुपौर्णिमा आणि भोंडला अशा वेगवेगळया उत्सवांच्या निमित्ताने पालकांशी जोडलेले राहिलो. कारण या सगळया प्रक्रियेत मुले, पालक आणि आम्ही सगळया जणी ही एक शृंखला आहे. प्रत्येक कडी तितकीच महत्त्वाची! साधणारी!

दुसऱ्या वर्षीही शिबिराचा पुन्हा घाट घातला. मागच्या वर्षीचा अनुभव, मुलांशी पालकांशी झालेल्या चर्चा, संवाद आणि सहकारी म्हणून शिबिरात नवीन मैत्रिणींची लाभलेली साथ या सगळयामुळे या वर्षी शिबिर अतिशय शिस्तबध्द झाले. 50 मुलांसाठी नियोजन केले आणि नोंदणी शंभर झाली. मुलांच्या दुप्पट वाढलेल्या संख्येमुळे बरेचसे प्रश्न उभे राहिले. अगदी जागेचादेखील प्रश्न निर्माण झाला. पण मनापासून काम केले, तर समोर आलेले प्रश्नही सहज सुटत जातात. आम्हाला तर जणू असे वाटत होते की मदतीला स्वतःहोऊन येणारा प्रत्येक जण ईश्वरी प्रेरणेने इथे येत होता. पाच ते बारा वयोगटातील मुलामुलींना केंद्रस्थानी ठेवून शिबिराचे नियोजन केले गेले. स्वरूप निश्चित झाले. ॐकार, प्रार्थना, दिनविशेष, वाढदिवस असेल तर औक्षण याबरोबरच मैदानी खेळ, बैठे खेळ, गाणी, गप्पागोष्टी, वक्तृत्व, चित्रकला, हस्तकला तसेच सीडबॉल मेकिंगसारखे पर्यावरणाशी नाळ जोडणारे उपक्रमही घेतले गेले. या सगळयात समाजातील मान्यवर आणि तज्ज्ञ लोकांनी खूप योगदान दिले, हे विशेष उल्लेखनीय.

हाती घेतलेले कार्य खूप मोठे आहे आणि आम्ही सगळयाच जणी नवख्या आहोत. पण एवढे मात्र निश्चित आहे की घेतलेले हे सेवाव्रत अखंड चालवायचे. संस्कारांची ही आनंदयात्रारूपी शृंखला अखंडित राहावी. यातून समाजाच्या पुढील जडणघडणीत आमचा खारीचा हातभार लागला, तरी आम्ही स्वतःला भाग्यवान समजू!

चट्टानों सी बाधाओं पर, चलो रचे हम शिल्प नया

सेवा के  सिंचन से मरुभू, पर विकसाये तरुछाया

सद्भावों से संस्कारों से भर देंगे, यह जन-गण-मन

दूर ध्येय मंदिर हो फिरभी, मन मे है संकल्प सघन॥

 

शब्दांकन - रेणू महेश परळकर