कलाबीज पेरताना

विवेक मराठी    28-Jun-2019
Total Views |

***श्रीनिवास बाळकृष्णन***

मुले कलेच्या वाटेवर चालली, तर संवेदनशील मने तयार होतील. त्यांची आयुष्ये सुंदर बनतील. पुढे कलाकार होणाऱ्या विद्यार्थ्यांचा टक्का वाढेल. 'चित्रपतंग ट्रस्ट'चे शहरी आणि ग्रामीण विद्यार्थ्यांसाठीचे उपक्रम याच उद्देशाने घेतले जातात. 'छत्री रंगवा' हा असाच एक उपक्रम.

'चित्रपतंग'ची सुरुवात झाली ती माझ्या महाराष्ट्रात दृश्यकलेचा प्रसार-प्रचार करण्यासाठीच! मोठयांसाठी कलादालने, कला महाविद्यालये आहेत. पण शालेय विद्यार्थ्यांसाठी कलाशिक्षण केवळ तासभर असते. त्यातही जुनाच कलाभ्यास शिकवला जातो. काही शाळेत तर तेही नसते.

आज महाराष्ट्रातील ग्रामीण भागात असणाऱ्या जि.प. प्राथमिक मराठी शाळेत वेगळा कलाशिक्षक नाही. माध्यमिकसाठी असतात, पण तेव्हा नववी-दहावीची वर्षे अभ्यासाची असल्याने कलाशिक्षण दूरच राहते. कलाशिक्षणापासून वंचित अशा अनेक पिढया महाराष्ट्रात तयार झालेल्या आहेत, ज्यांना महाराष्ट्रातील कलात्मक वारशाची जाणीव असेल असे वाटत नाही. म्हणूनच आम्ही शिक्षणाच्या प्राथमिक स्तरावरच काम करण्याचे आखले आणि माध्यमिक गटासाठी स्पेशल कोर्स डिझाइन केले.

आम्ही शहरात राहत असल्याने ग्रामीण भागातील मुलांना वार्षिक वर्ग देता येत नाही, याची कसर भरून काढायला म्हणून चित्रपतंग ट्रस्टने 'कलाजत्रा' नावाचा उपक्रम सुरू केला, ज्या अंतर्गत कलेची जुजबी ओळख, विदेशी प्रदर्शन, पुस्तके, आवड वाढवतील अशा कार्यशाळा आम्ही महिन्यातून एकदा ग्रामीण भागात नेतो. यात मागील वर्षापर्यंत कोकण विभाग होता. या वर्षी पश्चिम महाराष्ट्रदेखील समाविष्ट करण्यात आला आहे.

इ. दुसरीपासूनचे विद्यार्थी यात सामील होतात. चित्रपतंगचे कलामार्गदर्शक चित्रकलेतीलच विविध विषय मुलांसमोर मांडतात. मग विद्यार्थी आवडीचा विषय निवडतात. वेळ असेल त्यानुसार वेगळे विषयदेखील शिकतात. विद्यार्थी कार्यशाळेत रममाण असताना शिक्षकांसाठी कला इतिहासाची जुजबी ओळख करवून देणारा कार्यक्रम असतो.

या मुलांना कलेबद्दल यथाशक्ती जाण व भान निर्माण होण्याचा शुध्द हेतू यामागे आहे. जी गोष्ट शैक्षणिक विभागाने किंवा सांस्कृतिक विभागाने करायला हवी, ती गोष्ट आम्हाला करावी लागत आहे. त्यामुळे आमचा खारीचाच वाटा आहे.

मुले कलेच्या वाटेवर चालली, तर संवेदनशील मने तयार होतील. त्यांची आयुष्ये सुंदर बनतील. पुढे कलाकार होणाऱ्या विद्यार्थ्यांचा टक्का वाढेल. देशांतर्गत ऐतिहासिक स्थळदर्शन वाढीस लागेल.


ग्रामीण-आदिवासी भागातील अनेक शाळांत मुलांना रंगांची मराठी नावेही माहीत नसतात. पण हेच अनामिक रंग पाहून ती हरखून जातात आणि आमचा प्रवासाचा थकवा दूर पळतो. मुलांना चित्र खूप आवडतात. आम्ही मोफत दिलेल्या रंगसाहित्यात, पुस्तकांत रमून जातात. 'छत्री रंगवा' हा असा उपक्रम आहे, ज्यात मुलांना छत्री मोफत मिळण्याचे अप्रूप असतेच, तसेच ती स्वत:च्या मनाप्रमाणे रंगवायची ही कल्पना त्यांच्या रोजच्या अनुभवाच्या पल्याड असते. काही करायच्या आधीच चुकेल वगैरे या विचाराने काही मुले रडतातही. पण मग सुटतात.

शहरी भागातील कार्यशाळा बऱ्याचदा मुलांसाठी सशुल्क होत्या. ग्रामीण भागातील मात्र मोफत. पण दोन्हीकडची मुले ही मुलेच असतात. निरागस असतात. रंगाबाबत खूप सजग असतात. शहरातील मुलांना थोडी जास्त समज असते. कारण ते टीव्ही, सिनेमा पाहू शकतात. दुर्गम भागात हे नसल्याने मुलांच्या प्रतिक्रिया देण्यात मात्र थोडा फरक दिसतो.

शिवाय ही मुले खूपच लाजाळू असतात आणि आम्ही खूप नवखे असतो. त्यात कपडे शहरी असतात. तो खूप मोठा फरक अधोरेखित करतो. म्हणून आम्ही गेली काही वर्षे साधा टीशर्ट-हाफ पँट घालून आदिवासी पाडयात जातो.

हे उपक्रम आम्ही आमचे राबवतो. यात काही स्वायत्त संस्था मदतही करतात. मागील वर्षी या उपक्रमाला सर जे.जे. स्कूल ऑॅफ आर्ट्सने आमच्याशी सहकार्य करार केला. ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. त्यामुळे मुलांना याच वयात जे.जे.ची अभ्यास सहल, प्रदर्शन, कार्यशाळा, प्रात्यक्षिक साध्य झाले. यासाठी जे.जे.चे अधिष्ठाता विश्वनाथ साबळेसरांचे आम्ही ॠणी आहोत.

ह्याशिवाय कुठल्याही सरकारी मदतीशिवाय हे चालू आहे. मोफत असल्याने शाळा, व्यवस्थापन, पालक खूश असतात. परंतु पैसे नसणे ही गोष्ट कलाशिक्षणाला खूपदा अडसर ठरते.

यासाठी शहरातील शाळेत दत्तक वर्ग योजना सुरू केली. केवळ चाळीस हजार रुपयांत आम्ही एक वर्ग पूर्ण वर्षभरासाठी कला शिक्षणासाठी दत्तक घेतो. यात शांताराम कारंडे फाउंडेशन, शिवप्रतिष्ठान फाउंडेशन, कैवल्य व्हेंचर्स, स्नेहपरिवार यांची मदत झाली आहे. तसेच विजय कलमकर, शर्वरी विद्वांस, संदीप राऊत, कुणाल गोगरकर यांच्यासारखे अनेक कलाकार मुलांसाठी मोफत प्रात्यक्षिक द्यायलाही येतात, जी आम्हाला सर्वात मोठी मदत वाटते.

आमच्या आयुष्याला मर्यादा असल्याने या जन्मी आम्ही केवळ कलाबीज रोवण्याचे काम करणार आहोत. त्याचे मूल्यमापन करण्यासाठी आमच्याकडे वेळच नाही.

संस्थापक, चित्रपतंग समूह