राष्ट्रकुल खेळ - 2022वर भारताचा बहिष्कार?

विवेक मराठी    29-Jun-2019
Total Views |

  बर्मिंगहॅममध्ये 2022 मध्ये होणार असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमधून नेमबाजी वगळण्याचा निर्णय भारताच्या पदकसंख्येवर परिणाम करण्याची शक्यता आहे. त्यामुळे या स्पर्धेवर भारताने बहिष्कार टाकावा अशी मागणी जोर धरत आहे. मात्र त्याबाबतही देशातच गट-तट आहेत. 

एकीकडे क्रिकेट विश्वचषक स्पर्धा ऐन भरात आली आहे, तर त्याच वेळी मैदानाबाहेरचं एक युध्द भारतीय क्रीडा विश्वात सध्या धुमसतंय. या युध्दाचं मूळही इंग्लंडच्या बर्मिंगहॅम शहरात आहे. तिथे 2022मध्ये राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा होणार आहेत. पण या स्पर्धांवर बहिष्कार टाकण्याची धमकी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने दिली आहे. म्हणजेच राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय संघ उतरणारच नाही, अशी धमकी. स्पर्धेच्या सुरुवातीपासून, म्हणजे 1930पासून भारतीय संघ या स्पर्धेचा अविभाज्य भाग आहे. मग भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने आताच अशी धमकी का दिली? या धमकीत कितपत तथ्य आहे? आणि ही धमकी प्रत्यक्षात येऊ शकते का? या धमकीचा भारतीय क्रीडा क्षेत्राला नेमका फायदा होईल की तोटा?

झालं असं की, बर्मिंगहॅममधल्या स्पर्धेत नेमबाजी हा क्रीडाप्रकार काढून टाकण्यात आला. त्याऐवजी महिलांचं क्रिकेट, बीच व्हॉलीबॉल आणि विकलांगांसाठी टेबल टेनिस या तीन नवीन खेळांची वर्णी लागली आहे. नेमबाजीत भारतीय ऍथलीट्सची कामगिरी सरस आहे. ऑलिम्पिकमधलं एकमेव वैयक्तिक सुवर्ण, तसंच राष्ट्रकुल स्पर्धेतही 2018मध्ये 16 पदकांची (एकूण पदकं 66) कमाई भारतीय संघाने केली होती. अशा वेळी जर नेमबाजी हा प्रकारच स्पर्धेत नसेल, तर संघाला त्याचा फटका बसणारच. त्यातूनच देशातल्या क्रीडा संघटना आणि नेमबाज खेळाडू यांच्यात नाराजी पसरली. नॅशनल रायफल असोसिएशनचे अध्यक्ष राणिंदर सिंग मागची काही वर्षं राष्ट्रकुल स्पर्धेवर बहिष्कार घालण्याची मागणी करत आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेत इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा यांच्यानंतर भारत हा एक महत्त्वाचा सहभागी देश आहे. अशा वेळी सहभागाची धमकी देऊन राष्ट्रकुल संघटनेवर दबाव आणायचा आणि नेमबाजीचा पुन्हा समावेश करून घ्यायचा, अशी ही खेळी आहे.

24 ते 26 जूनदरम्यान युरोपात राष्ट्रकुल खेळ फेडरेशनची एक बैठक झाली आणि त्या बैठकीच्या आधी दबाव निर्माण करण्यासाठी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव राजीव मेहता यांनी बहिष्काराचं शस्त्रं उगारलं. त्यांचं म्हणणं होतं, 'नेमबाजी हा भारतातील एक लोकप्रिय खेळ आहे. देशातील ऍथलीट ऑलिम्पिक स्पर्धांपूर्वीची तयारी म्हणून राष्ट्रकुल स्पर्धेकडे बघतात. तेव्हा राष्ट्रकुलमध्ये नेमबाजीचा समावेश नसणं ही गोष्ट आम्ही गांभीर्याने घेत आहोत. अगदी नेमबाजी नसलेल्या बर्मिंगहॅम स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचाही आम्ही विचार करू.'

मेहता यांना किंवा भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनला अर्थातच खेळाडूंचाही पाठिंबा आहे. 10 मीटर एअर रायफल प्रकारातील अव्वल नेमबाज हीना संधूनेही नाराजी व्यक्त करताना भारताने हा प्रश्न आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीपर्यंत न्यावा अशी विनंती केली आहे. अथेन्स ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत रजतपदक मिळवणारे राज्यवर्धनसिंग राठोड गेल्या वर्षीपर्यंत क्रीडा राज्यमंत्री होते. आपल्या कार्यकाळात ऑलिम्पिक समितीशी पत्रव्यवहार करून त्यांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचे प्रयत्न केले आहेत. शिवाय बर्मिंगहॅम आयोजन समितीशीही ते संपर्क ठेवून होते. पण प्रामाणिक प्रयत्नांनंतरही 2022च्या स्पर्धेत नेमबाजीचा समावेश होऊ शकला नाही, त्यालाही कारण आहे.


नेमबाजीचा राष्ट्रकुल स्पर्धेतला इतिहास बघितला तर 1960च्या एका स्पर्धेचा अपवाद वगळता हा खेळ इतर प्रत्येक स्पर्धेचा भाग राहिला आहे. पण हा खेळ प्रत्येक वेळी वैकल्पिक होता. म्हणजे असा खेळ ज्याचा समावेश करायचा की नाही याचा निर्णय आयोजक देश घेऊ शकत होता. राष्ट्रकुल फेडरेशन आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीशी समन्वयाने आयोजक देशाने नेमबाजीच्या समावेशाचा निर्णय घ्यायचा होता. पण ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीला महत्त्वाचं स्थान आहे. अशा वेळी जवळजवळ सगळयाच आयोजक देशांनी नेमबाजी काढून टाकण्यावर कधी विचार केला नाही. यंदा, म्हणजे 2022च्या स्पर्धेचं आयोजन आधी दक्षिण आफ्रिकेतील दरबान हे शहर करणार होतं. त्यांचा नेमबाजीला विरोध नव्हता. पण काही काळाने आर्थिक कारणांमुळे दरबान शहराने आयोजनासाठी नकार कळवला आणि हे यजमानपद बर्मिंगहॅम शहराला मिळालं. बर्मिंगहॅम शहरात नेमबाजी खेळासाठी पुरेशा सुविधा नाहीत. त्यामुळे या खेळाच्या आयोजनाला त्यांनी असमर्थता दर्शवली. आणि इथंच नेमबाजी खेळावर स्पर्धेत गदा आली. तेव्हापासून मागची चारपेक्षा जास्त वर्षं नेमबाजीवरील हा घोळ सुरूच आहे.

इथे आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. राष्ट्रकुल देश म्हणजे ब्रिटिशांनी ज्यांच्यावर राज्य केलं, किंवा त्यांच्या वसाहती होत्या असे देश. आणि राष्ट्रकुल स्पर्धा म्हणजे अशा देशांची स्पर्धा. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅनडा, दक्षिण आफ्रिका हे राष्ट्रकुल संघटनेतील महत्त्वाचे देश. एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल, ती म्हणजे इथे नेमबाजी हा खेळ फारसा लोकप्रिय नाही. नेमबाजीत त्यांची ताकदही नाही. त्यामुळेच भारताची मागणीही त्यांनी उचलून धरली नाही.

ऑलिम्पिक समितीनेही भारताच्या मागणीवर विचार करताना याच मुद्दयावर बोट ठेवलं आहे. त्यांनी आयोजक देशावर, म्हणजे इथे इंग्लंडवर नेमबाजीच्या समावेशाचा अधिकार सोपवला. नेमबाजीत पिस्तूल, रायफल अशा दोन मुख्य गटांत एकूण 20पेक्षा जास्त क्रीडाप्रकार आहेत. हे सगळे खेळ भरवायचे झाले, तर त्यासाठी जागा आणि व्यवस्थाही चोख लागणार. त्यामुळे इंग्लंडने आयोजनासाठी असमर्थता दाखवली आहे.

शिवाय भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव राजीव मेहता यांनी धमकी दिली असली, तरी असोसिएशनचे अध्यक्ष नरिंदर बात्रा यांनी अजूनही बहिष्काराची भाषा वापरलेली नाही. ते नव्या कार्यकारिणीत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेच्या कार्यकारी समितीचे सदस्य होणार आहेत. त्यामुळे स्पर्धेवरच बहिष्कार घालता येईल का, यावर ते वेगळा विचार करतात.

हा वेगळा विचार हा की केंद्र सरकारची स्वप्नं आता मोठी आहेत. त्यांना ऑलिम्पिकसारखी मोठी स्पर्धा भारतात भरवायची आहे. 2032च्या आयोजनासाठी भारताने दावाही केला आहे. अशा वेळी कुठल्याही कारणाने आंतरराष्ट्रीय क्रीडा समुदायाबरोबर वाद घालणं त्यांना परवडणारं नाही. त्यामुळे इतर महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंचा सहभाग कठीण होऊन बसेल आणि त्याचबरोबर भारताच्या आयोजनाच्या दाव्यालाही धक्का बसेल. त्यामुळेच हा वाद उद्भवला, तेव्हा क्रीडा राज्यमंत्री किरण रिजिजू यांनी ''बहिष्कार टाकायचा झाला, तर त्याचा निर्णय केंद्र सरकार घेईल'' असं स्पष्ट करून टाकलं. राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाजीचा सहभाग सगळयांनाच हवाय. पण त्यासाठी बहिष्कारासारखं शस्त्रं उगारायचं का, यावर मात्र भारतातच गट-तट आहेत. नेमबाजीत ऑलिम्पिक सुवर्ण विजेता खेळाडू अभिनव बिंद्राची प्रतिक्रियाही सावध आहे. भारतासाठी नेमबाजीचा समावेश नसणं दुर्दैवी आहे हे त्याला मान्य. पण त्याच वेळी बहिष्कार घालण्यावर मात्र तो सहमत नाही.

त्यामुळे आता तरी चित्र असंच आहे की ठरल्याप्रमाणे 2022ला बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धा पार पडेल. त्यात नेमबाजीचा पुनःसमावेश होणं सध्या तरी कठीण दिसत आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटना बहिष्कार घालणंही कठीणच आहे. भारताला नेमबाजीशिवाय किती पदकं मिळतील, कुस्ती, बॉक्सिंग हे भारताचे इतर आघाडीचे खेळ नेमबाजीची जागा भरून काढतील का, हे आता पाहावं लागेल.

- स्पोर्ट्स किडा