ज्ञानप्रबोधिनीच्या योगदानाने बीड जिल्ह्यात जलसंजीवनी

विवेक मराठी    03-Jun-2019
Total Views |

 **विवेक गिरिधारी**

 दुष्काळाचा सामना करणाऱ्या बीड जिल्ह्याच्या आंबाजोगाई परिसरात ज्ञान प्रबोधिनीच्या माध्यमातून आणि प्रसाद चिक्षे यांच्या मार्गदर्शनाखाली गेली काही वर्षे जलसंवर्धनाचे काम सुरू आहे. लोकसहभागातूनच केल्या जाणाऱ्या या दुष्काळी कामांचे सकारात्मक परिणाम आता अनेक ठिकाणी दिसू लागले आहेत.

 मराठवाडयातील दुष्काळाची पार्श्वभूमी - सध्या प्रसारमाध्यमांत मराठवाडयाच्या दुष्काळाची बरीच चर्चा झाली. परंतु जेवढी तीव्रता आहे, त्या प्रमाणात नाही झाली. लोकसभेच्या महाराष्ट्रातील प्रत्यक्ष निवडणुका होईपर्यंत जणू काही राजकीय बातम्यांसाठी वृत्तपत्रांत जागा राखीव होत्या की काय, असे वाटावे इतक्या दुष्काळाच्या तुरळक बातम्या होत्या. यापूर्वी 2016पासून मराठवाडयाच्या दुष्काळाची खूप मोठी चर्चा होण्यास सुरुवात झाली. प्रत्यक्षात वस्तुस्थिती अशी होती की उर्वरित महाराष्ट्राला प्रथमच प्रसारमाध्यमांमुळे मराठवाडयातील परिस्थिती कळत होती. गेली कित्येक वर्षे लातूर शहरात उन्हाळयात सुरुवातीला आठ दिवसांआड आणि नंतर पंधरा दिवसांआड पाणी येत असे. तीच परिस्थती बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहराची. उन्हाळयात 21 दिवसांतून एकदा येणाऱ्या पाण्याची पुण्या-मुंबईच्या मंडळींना स्वप्नातदेखील कल्पना करणे जड जाईल, अशी अंबाजोगाईची स्थिती. यंदा मात्र अंबाजोगाईमध्ये दहा दिवसांतून एकदा पाणी येते आहे, म्हणजे 'बरी परिस्थिती' आहे, प्रगती आहे असे म्हणायचे.

मराठवाडयातील ग्राामीण भागातील दुष्काळाची दाहकता तर आणखीनच कठीण आहे. दिवसदिवस टँकरच्या प्रतीक्षेत घालवायचे. मराठवाडा तर टँकरवाडा होऊन गेला. छोटे-मोठे सर्व प्रकारचे जलाशय आटले आहेत. या सर्वाचे मूळ कारण म्हणजे गेली काही वर्षे सलगपणे कमी पडलेला पाऊस! पावसाच्या तुटीचा व अनियमितपणाचा शेतीच्या उत्पन्नावर तर कमालीचा विपरीत परिणाम झाला. लाखभराच्या आसपास असणाऱ्या कर्जाच्या रकमांपुढेदेखील शेतकरी अगतिक होऊ लागला. अगतिकतेबरोबरच आपण असाहाय्य असल्याच्या भावनेचा कडेलोट होऊ लागला. विदर्भातून ऐकू येणाऱ्या शेतकरी आत्महत्येच्या बातम्या आता गेल्या काही वर्षांपासून मराठवाडयातून येऊ लागल्या आहेत. महिन्यातून अनेकदा बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव शेतकरी आत्महत्येसाठी वृत्तपत्रात झळकत असते. आपल्या बापाला स्वतःच्या शिक्षणाचा व लग्नाच्या खर्चाचा भार सोसविणार नाही, या भावनेने ग्राासलेल्या तरुण कोवळया मुलींनी केलेल्या एकापाठोपाठच्या आत्महत्या तर निश्चितच चटका लावणाऱ्या आहेत. दुष्काळाची विषण्ण व गडद छाया मराठवाडयावर पसरलेली दिसते.

दुष्काळाबाबतची जनजागृती - एक अत्यावश्यक पैलू

दुष्काळाच्या दीर्घकालीन प्रश्नावर मुळापासून उत्तर शोधायचे, तर जनजागृती अत्यावश्यकच होती. मग त्याला कृतीची जोड देणे शक्य होणार होते. जनजागृती नाही झाली, तर पुन्हा परिस्थिती मूळ पदावर येण्याचा धोका कायम राहतो हे लक्षात घेऊन बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईमधील ज्ञान प्रबोधिनी केंद्राचे प्रमुख कार्यकर्ते प्रसाददादा चिक्षे यांनी 2013मध्ये अंबाजोगाई तालुक्यातील 40 गावांमध्ये 'पाण्याचा जागर' हा उपक्रम राबविला. यात पाणलोट क्षेत्रविकासाच्या साहाय्याने व श्रमदानाच्या चळवळीने दुष्काळावर मात करणाऱ्या राळेगणसिध्दी व हिवरेबाजार या आदर्श गावांच्या चित्रफिती दाखविण्यात आल्या. त्यावर ग्राामस्थांच्या चर्चा घडवून आणण्यात आल्या.  या दरम्यान जनजागृती उपक्रमांबरोबरच अंबाजोगाईजवळील चनई गावात सहा एकरावर 'विवेकवाडी' उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्यक्ष पाणलोट उपचारांचे प्रयोग करण्यात आले. त्याचे अनुभव लाखमोलाचे ठरले. पुढील दोन वर्षांत लोखंडी सावरगाव, सनगाव, वरपगाव, चनई, आडस, धावडी व कोलकानडी या परिसरातील निवडक गावांत लोकसहभागातून तलावातील गाळ काढणे व विहीर पुनर्भरण करणे आदी उपक्रम करण्यात आले. यासाठी टाटा ट्रस्ट, प्राज फाउंडेशन व डोंबिवली नागरी सहकारी बँक यांचे अर्थसाहाय्य मिळाले.

2016मधील उन्हाळयात आपल्या सहकाऱ्यांसह जलसहयोग चळवळीच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यावर चिक्षे यांनी भर दिला. दुष्काळाच्या तीव्रतेमुळे अंबाजोगाई परिसरातील प्रमुख कार्यकर्ते व सेवाभावी संस्था यांनी मिळून ही जलमोहीम राबविली. पाणी जपून वापरा, पाण्याची बचत करा, पाणी परत-परत वापरा असे सांगत त्यासाठी छोटे छोटे पण नेमके करता येतील असे उपाय चळवळीच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत प्रभावीपणे आणि अंबाजोगाई परिसरातील सुमारे 20 हजार विद्यार्थी व शिक्षक यांच्यापर्यंत ही मोहीम यशस्वीपणे पोहोचविण्यात आली. पाठोपाठ आपल्या छतावरील पावसाच्या पाण्याचे संकलन करून ते कूपनलिकेच्या माध्यमातून भूगर्भात मुरविण्यासाठी एक एक करत अनेक जण पुढे आले. त्यांनी स्वखर्चाने हे काम केले, हे विशेष! त्यातून पुनर्भरणविषयक कामाला गती मिळाली.

शहरातील जनजागृतीबरोबरच ग्राामीण भागात थेट काम

शहरातील या कामापाठोपाठ मग मोर्चा वळविला तो अंबाजोगाई तालुक्यातील ग्राामीण भागातील गावांकडे. योगायोगाने त्या दरम्यान तालुक्यात 'सत्यमेव जयते वॉटर कप' स्पर्धेची सुरुवात होत होती. ग्राामस्थांनी लोकसहभागातून श्रमदानाने आपल्या गावच्या शिवारात पाणी मुरविण्याची प्रत्यक्ष कामे करायची, ही मूळ संकल्पना. मग या श्रमकार्याचे मूल्यांकन व गुणांकन करून त्याआधारे तालुका व राज्यपातळीवर रोख बक्षिसे द्यायची, अशी रचना. 2016मध्ये राज्यातील फक्त तीन जिल्ह्यांतील तीन तालुक्यांत ही स्पर्धा राबविण्यात आली. दर शनिवारी टीव्हीवर त्याचे प्रक्षेपण होऊ लागले, तसतशी कामातील रंगत वाढत जाऊ लागली. ग्राामस्थ मंडळी टीव्हीवर झळकू लागली. श्रमदान करणाऱ्यांचे टीव्हीच्या पडद्यावरील मेकअपविना रापलेले चेहरे बरेच काही सांगून जात होते. स्पर्धा आणि ईर्षा हा स्थायिभाव असणाऱ्या ग्राामीण भागात हे गुण  प्रथमच सकारात्मक अंगाने फुलविण्याचा प्रयत्न चालू होता. अन्यथा एरव्ही आपण शिसारी आणणाऱ्या ग्राामीण राजकारणाच्या रूपात त्याचे ओंगळवाणे स्वरूप बघत असतोच.

स्पर्धा सर्व गावांसाठी जरी खुली असली, तरी त्यातील श्रमदानाचा आग्राह लक्षात घेता जेमतेम एक तृतीयांश गावेच खऱ्या अर्थाने त्यात सहभागी होत होती. पूर्वी 'पाण्याचा जागर' मोहीम राबविली होती. त्यातील अनेक प्रतिसादक गावे या स्पर्धेत सहभागी होत आहेत, हे लक्षात येत होते. या वेळी या संपर्कांचा निश्चितच उपयोग होत होता.

दुष्काळ निवारणाच्या कामासाठी

हिरिरीने सहभागी होणारी गावे

व्यसनासाठी ओळखल्या जाणाऱ्या लमाण समाजाच्या राडी तांडयासारख्या गावात चक्क व्यसनमुक्तीसाठी काही लमाण युवक पुढे आले. त्यांनी दारू सोडून पाण्याच्या कामाची शपथ घेतली. कुंभेफळ हे टोकाच्या जातिभेदाने पोखरलेले गाव पाण्याच्या कामासाठी एक झाले. गावातील एका शिक्षकांच्या प्रेरणेने वरपगाव उभे राहिले. अंबाजोगाई शहरात स्थलांतरित झालेल्या उद्योजक कुटुंबाने गावाशी असलेली नाळ न तोडता कोळकानडी गाव स्पर्धेत उतरवले. श्रीपतरायवाडी गाव प्रबोधिनीच्या जुन्या संपर्कातून तयार झाले. गावातील निवृत्त कृषी अधिकाऱ्याची मदत घेऊन खापरटोन गावाने तर मोठी मजल गाठली. शेपवाडी गावाने अंबाजोगाई शहराजवळ असूनसुध्दा लोकसहभाग जिद्दीने उभा केला.

एकूण ही सगळी स्पर्धेच्या माध्यमातून चालणारी दुष्काळाविरुध्दची 45 दिवसांची लढाई होती. पाणी मुरविण्यासाठी लोक श्रमदानातून गावोगावी सलग समपातळी चर खणत होते. छोटे-मोठे दगडी बांध घालत होते. माती बंधाऱ्याला आतून दगडाचे अस्तर (पिचिंग) करत होते. गावात घरोघरी सांडपाणी जिरविण्यासाठी शोषखड्डे खणले जात होते. या सर्व श्रमकार्यात महिलांचाही वाटा मोठा व लक्षणीय होता. माणस श्रमदानावर तुटून पडताहेत असे आजच्या काळात दुर्मीळ झालेले दृश्य या गावांमध्येतरी दिसून येत होते. शहरात गेलेल्या गावच्या मंडळीकडून, गावातील नोकरदार वर्गाकडून  लोकवर्गणी, देणग्या गोळा करत होती. उर्वरित महाराष्ट्राला घाउकीत मजूर पुरविणाऱ्या मराठवाडयातील गावांमध्ये हे सर्व घडत होते. ही गावे म्हणजे काही मातब्बर गावे नव्हेत. या गावात चित्रपटात दिसणारे आठमाही पाटातून वाहणारे झुळुझुळु पाणी वगैरे नसते...

काम गावे करत होती, पण तेथील गावाला हाकारणारे स्थानिक नेतृत्व फुलविण्याचे काम सूक्ष्म व अदृश्य स्वरूपात प्रबोधिनी करत होती. सातत्याने लोकसंपर्क करून लोकांमध्ये प्रेरणा जागृत ठेवण्याचे महत्त्वाचे काम प्रबोधिनी करत होती. मराठवाडयात दोन दशकांपूर्वी पाणलोट क्षेत्र विकास कामाची मुहूर्तमेढ रोवणारी मानवलोक ही संस्था तर या कामात हिरिरीने सहभागी होतीच. श्रमदानातून जी कामे करणे शक्य नसते, अशा शेततळे, माती बंधारे व प्रामुख्याने नाला खोलीकरणाच्या व बांधबंदिस्तीच्या कामासाठी या दोनही संस्थांनी जेसीबीसारखी मातीकामाची यंत्रे उपलब्ध करून दिली. त्यामुळे जलसंधारणाच्या कामाला एक वेगळी गती मिळाली. या कामासाठी प्रबोधिनीच्या माध्यमातून 7.44 लाख रुपयांचा खर्च करण्यात आला. हा निधी देणग्यांच्या माध्यमातून उभा करण्यात आला. मानवलोक व ज्ञान प्रबोधिनी या लोकप्रबोधन व लोकसंघटन करणाऱ्या संस्थाबरोबरच 'समस्त महाजन' ही अर्थसाहाय्याच्या माध्यमातून मदत करणारी संस्था यात सामील झाली. समस्त महाजन ही समाजाचे देणे मानणाऱ्या मुंबईतील हिरे व्यापाऱ्यांची ही संस्था. व्यापाराला वा व्यवसायाला समाजसेवेचे कोंदण असले पाहिजे, असा प्रयत्न चक्क हिऱ्याचे व्यापारी करताहेत!

अखेर या सर्व परिश्रमांचे चीज झाले. 2016मधील सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेत खापरटोनने दुसऱ्या, तर व राडीतांडा गावाने तिसऱ्या क्रमांकाचे राज्यस्तरीय बक्षीस पटकावले. खापरटोनला पाणी फाउंडेशनतर्फे 15 लाख व मुख्यमंत्री निधीतून 15 लाख असे एकूण 30 लाख रुपयांचे बक्षीस मिळाले.  राडीतांडयालाही पाणी फाउंडेशनतर्फे 10 लाख व मुख्यमंत्री निधीतून 10 लाख असे एकूण 20 लाख रुपयांचे बक्षीस मिळाले. कुंबेफळ, श्रीपतरायवाडी व शेपवाडी या गावांनी उत्तेजनार्थ पारितोषिके पटकाविली. या तिन्ही गावांना मुख्यमंत्री निधीतून प्रत्येकी 5 लाख रुपयांचे बक्षीस मिळाले. याशिवाय टाटा ट्रस्टने दिलासा संस्थेच्या माध्यमातून कुंबेफळला 5 लाख, तर श्रीपतरायवाडी व शेपवाडी यांना प्रत्येकी 3 लाख रुपये बक्षीस दिले. मुख्यमंत्री व या स्पर्धेचे प्रवर्तक असणारे आमिर खान यांच्या हस्ते गावच्या प्रतिनिधींनी मुंबईत थाटाने अन दिमाखात ही सर्व बक्षिसे स्वीकारली. ज्ञान प्रबोधिनीचे कार्यकर्ते प्रसाद चिक्षे व मानवलोक संस्थेचे अनिकेत लोहिया यांचाही या वेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला!

अंबाजोगाईतील कार्याचा विस्तार

मराठवाडयातील एकूण दुष्काळी परिस्थितीचा विचार करता दुष्काळ निवारणाचे काम अंबाजोगाई तालुक्याबाहेर विस्तारणे गरजेचे होते. तीन तालुक्यांपुरती मर्यादित असणारी पाणी फाउंडेशनची 'सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा' 2017मध्ये 30 तालुक्यांमध्ये घेण्यात आली. प्रबोधिनीने अन्य तालुक्यांतील निवडक मोजक्या गावांवरच लक्ष केंद्रित केले होते. शेपवाडी (ता. अंबाजोगाई), कोळपिंप्री व जायभायवाडी (ता. धारूर),  केवड व काशिदवाडी (ता. केज), वाठवडा (ता. कळंब) या गावांमध्ये लोकांनी उत्साहाने भरभरून काम केले. प्रबोधिनीनेही या कामाच्या खर्चासाठी देणग्यांच्या संपर्कातून सुमारे दहा लाख रुपये उभे केले होते.

झालेल्या कामाचा फायदा बघून शेपवाडी गावाने दुसऱ्या वर्षीही दुष्काळ निवारणाच्या कामात हिरिरीने सहभाग घेतला. बांधबंदिस्ती व नाला खोलीकरणाची मोठी कामे लोकसहभागातून पूर्ण केली. वाठवडासारखे लोकसंख्येने मोठे असलेले गावही गावातील डॉक्टर व शिक्षक मंडळींच्या पुढाकाराने कामाला लागले. जायभायवाडी हे शंभर टक्के ऊसतोड मजुरांचे छोटे गाव. दर वर्षी उन्हाळयात दसऱ्यानंतर ऊसतोडीसाठी हे गाव स्थलांतर करते. या गावाने तर कमालच केली. गावातील अलीकडेच वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेल्या डॉ. सुंदर जायभाय यांनी आपला खासगी दवाखाना दीड महिना पूर्णपणे बंद ठेवून या दुष्काळ निवारणाच्या कामात स्वतःला झोकून दिले. गावही ऊसतोडीसाठी गेले नाही. डॉक्टरांनी गावाला संघटित करून त्यांना दुष्काळ निवारणाच्या कामाला नादी लावले आहे. येत्या काही वर्षांमध्ये  शेतीत स्वावलंबन मिळवून गावातील लोकांच्या हातातील ऊसतोडणी विळा आणि स्थलांतर बंद होण्याची स्वप्ने हा तरुण डॉक्टर बघतो आहे. त्यांनी जागविलेली ग्राामस्थांची आशा पूर्ण करण्याची जबाबदारी आता समाजाची आहे!

अपेक्षेप्रमाणे ऑगस्ट 2017मध्ये पाणी फाउंडेशनच्या स्पर्धेचा निकाल लागला. अंतिम निकालात जायभायवाडीने राज्यस्तरीय दुसऱ्या क्रमांकाचे 30 लाख रुपये बक्षीस मिळविले. केज, धारूर व कळंब तालुक्यातील पहिले बक्षीस अनुक्रमे काशिदवाडी, कोळपिंप्री व वाठवडा या गावांनी पटकावले. त्यांना प्रत्येकी 18 लाख रुपये मिळाले. अंबाजोगाई तालुक्यातील 7 लाख 50 हजार रुपयांचे दुसरे बक्षीस शेपवाडीला मिळाले. प्रबोधिनी सक्रिय असलेल्या पाच गावांना 91 लाख 50 हजारांची बक्षिसे मिळाली.

दुष्काळी कामांचे विस्तारणारे क्षितीज

2018मध्ये राज्यातील 75 दुष्काळी तालुक्यांमध्ये पाणी फाउंडेशनची 'सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा' घेण्यात आली. तीन तालुक्यांपासून सुरुवात झालेली स्पर्धा आता 75 तालुक्यांपर्यंत विस्तारली गेली. खऱ्या अर्थाने राज्यस्तरीय होऊ घातली. स्पर्धेची गुणांकन पध्दतही अधिक काटेकोर होत गेली. कामाच्या दर्जाला महत्त्व प्राप्त झाले. नुसता लोकसहभाग व शारीरिक श्रमदान याआधारे स्पर्धेत मुसंडी मारणे सोपे राहिले नव्हते. शारीरिक श्रमदानाचा निकष पूर्ण करणाऱ्या गावांना फक्त डिझेल खर्चावर पोकलँड व जेसीबीसारखी मशीनरी उपलब्ध करून देण्याचा भारतीय जैन संघटनेचा निर्णय खूपच आश्वासक होता. तरीही काही लाखांमध्ये येणारा डिझेल खर्च या दुष्काळी गावांना नक्कीच परवडणारा नव्हता. मान मोडून श्रमदान करणारी गावेदेखील डिझेलसाठीच्या लागणाऱ्या भरमसाठ पैशापुढे  हतबल झाली होती.

गावपातळीवरील लोकसंघटन व लोकवर्गणी यावर प्राधान्याने भर देणाऱ्या प्रबोधिनीने या वर्षी आर्थिकदृष्टया कमकुवत असणाऱ्या गावांच्या पाठीमागे उभे राहण्याचे ठरविले. लगेचच त्यासाठी मुंबईतील दुष्काळी कामांचा हितचिंतक असणारा  'विवेकवाडी परिवार' गट नियमितपणे जमू लागला. त्यांनी मुंबईतून अंदाजे 150 जणांकडून सुमारे आठ लाख रुपये गोळा केले. अमेरिकेतील 'सेव्ह इंडिअन फार्मर्स' हा गट सक्रिय झाला व त्यांच्या प्रतिनिधीने अंबाजोगाईला भेट दिली. पुण्यातील रमा-पुरुषोत्तम न्यासानेदेखील आर्थिक मदत देण्याचे मान्य केले. या दोघांनीही प्रत्येकी 15 लाख रुपये दिल्यामुळे दुष्काळी गावांच्या मशीनने करावयाच्या कामांना चालना मिळाली. अन्यथा, उत्तम श्रमदान करणारी ही गावे पैशाअभावी स्पर्धेत मागे पडली असती. अखेरच्या निकालातही त्याचे प्रतिबिंब उमटले. पाच तालुक्यांतील तब्बल 16 गावांनी तालुकास्तरीय स्पर्धेत, तर दिपेवडगाव गावाने राज्यस्तरीय बक्षीस मिळवून मुसंडी मारली. पाणी फाउंडेशन व महाराष्ट्र शासन यांनी दिलेल्या बक्षिसांची एकत्रित रक्कमच मुळी 1 कोटी 32 लाख रुपये इतकी झाली.

मुंबईकर मंडळी नुसती देणगी देऊन थांबली नाहीत, तर त्यांच्यातील दोन गट हे काम बघण्यासाठी थेट अंबाजोगाईमध्ये येऊन गेले. स्वच्छतागृहाची व्यवस्था नसल्यामुळे थेट गावात राहायला नकार देणाऱ्या मुंबईकर महिलांच्या गटाने गावातील श्रमदानाचे उत्साहवर्धक वातावरण बघून ऐन वेळी गावात राहण्याचा निर्णय घेतला. शेतकरी आत्महत्या झालेल्या 'निमला' गावातील कुटुंबांची हलाखीची परिस्थिती बघून त्यांचे मन द्रवले. अशा बिकट परिस्थितीतही जिद्द न सोडणाऱ्या या गावाला त्यांनी डिझेल खर्चासाठी जागेवर 25 हजार रुपये रोख दिले. केवळ संवेदनशीलतेमुळे समृध्दीचे नाते अभावग्रास्तांशी जोडले गेले. 45 अंशाकडे झेपावणाऱ्या तापमानाची तमा न बाळगता स्पर्धेच्या दरम्यान दोन युवक व सैन्यातील एक निवृत्त कर्नल यांनी उत्स्फूर्तपणे अंबाजोगाईत प्रत्यक्ष राहून काम केले, हे विशेष!  उत्स्फूर्त प्रतिसाद देणाऱ्या मुंबईकरांनी या दुष्काळाशी दोन हात करणाऱ्या गावांच्या प्रतिनिधींना थेट मुबईत बोलावून त्यांच्या अनुभवकथनाचा हृद्य कार्यक्रमही घडवून आणला.

बीड जिल्ह्यातील 'वॉटर कप' स्पर्धेच्या माध्यमातून या पाणलोट क्षेत्र विकासाच्या कामांमुळे अनेक गावे पाणीदार बनली आहेत. ऊस घेण्याच्या मोह टाळणाऱ्या व्हरकटवाडीत आजही विहिरींमध्ये पाणी आहे. अनेक गावांमध्ये खरीपाचे पीक तर व्यवस्थित आलेच, शिवाय निवडक गावांमध्ये दुष्काळातही रब्बी पीक निघाले! या मोहिमेत तन-मन-धन अर्पून सहभागी झालेल्या प्रत्येकालाच या नवसंजीवनीचे श्रेय द्यावे लागेल.