दुष्काळग्रस्त मराठवाडयाचा जलनायक -प्रसाद चिक्षे

विवेक मराठी    03-Jun-2019
Total Views |

 **विवेक गिरिधारी***

प्रसाद चिक्षे हे ज्ञान प्रबोधिनीचे पूर्णवेळ कार्यकर्ते आहेत. चक्षे यांनी 2013पासून जनजागृतीच्या माध्यमातून पाण्याच्या प्रश्नावर काम करण्यास सुरुवात केली. मराठवाडयातील तीन जिल्ह्यांतील 25 गावांत आणि विदर्भातील एका जिल्ह्यातील तीन गावांत सध्या प्रबोधिनीचे दुष्काळ निवारणाचे काम चालू आहे.

सध्या माहितीचा जसा महापूर आलाय, तसाच प्रश्न चर्चेत ठेवणाऱ्या फौजांचाही सुकाळ झालाय. प्रश्न चर्चेत ठेवण्यात पेपरवाले-चॅनेलवाले पत्रकार, संशोधक, अभ्यासक ही सर्व मंडळी आघाडीवर असली, तरी लाख मोलाचा प्रश्न उरतो तो म्हणजे 'हे सर्व घडवून आणणार कोण?' प्रश्न माहीत असलेली व प्रश्नांच्या मांडणीवर जगणारी माणसे उदंड जाहली... पण प्रश्न सोडवावया येतो कोण? हाच खरे तर आजच्या काळातला 'मिलिअन डॉलर प्रश्न' आहे. त्यासाठी उत्तराची वाट शोधू पाहणाऱ्या... नव्हे, 'ज्यांचे जगणे हेच उत्तर आहे' अशा आडवळणावरच्या आडमुठया माणसांपर्यंत पोहोचायला हवे. मराठवाडयाच्या दुष्काळावरच्या प्रदीर्घ प्रश्नांवर तावातावाने चर्चा करणारे खूप आहेत, पण उत्तरे शोधू पाहणाऱ्या मोजक्या कृतिप्रवण व्यक्तींमध्ये बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईच्या प्रसाद चिक्षे यांचे नाव नक्कीच अग्रास्थानी आहे. अंबाजोगाईला तर दुष्काळाबाबत काम करण्याचा मोठा वारसा आहे. अंबाजोगाईमधील 'मानवलोक' संस्थेचे संस्थापक व अलीकडेच दिवंगत झालेले द्वारकादास लोहिया उर्फ बाबूजी यांनी पाणलोट क्षेत्रविकासाचे तंत्र मराठवाडयाला सर्वप्रथम शिकविले व यशस्वीपणे रुजविले. गरज होती आता त्याच्या सार्वत्रिकीकरणाच्या चळवळीची. 2016मध्ये सुरू झालेल्या 'सत्यमेव जयते वॉटर कप' स्पर्धेने ती उणीव नेमकेपणाने भरून काढली.

प्रसाद चिक्षे हे ज्ञान प्रबोधिनीचे पूर्णवेळ कार्यकर्ते आहेत. त्यांनी अभियांत्रिकीचे पदवी व पदव्युत्तर शिक्षण अनुक्रमे औरंगाबाद व पुणे येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून विशेष गुणवत्तेसह पूर्ण केलेले आहे. प्रबोधिनीशी निगडित 'प्रचिती' या युवक संघटनेच्या माध्यमातून चिक्षे हे पुण्यात पदव्युत्तर शिक्षण चालू असताना सर्वप्रथम ज्ञान प्रबोधिनीच्या संपर्कात आले. 1993च्या किल्लारी-लातूर भूकंपात त्यांनी ज्ञान प्रबोधिनीचे ज्येष्ठ कार्यकर्ते अण्णा ताम्हणकर यांच्यासमवेत प्रत्यक्ष राहून दोन महिने मदतकार्यात सहभाग घेतला. त्यापाठोपाठ ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आळंदी येथील उपोषणकाळात त्यांचे स्वीय सचिव म्हणून प्रासंगिक काम केले. त्यानंतर 1994 ते 1999 दरम्यान त्यांनी विवेकानंद केंद्राचे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेशमध्ये काम केले. 1999पासून आजतागायत गेली वीस वर्षे ते अंबाजोगाई येथील ज्ञान प्रबोधिनीच्या विस्तार केंद्राचे प्रमुख म्हणून काम पाहत आहेत. शिशुशाळा, युवकांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन यासारखे अनेकविध शैक्षणिक उपक्रमही तिथे सातत्याने चालू असतात.

मराठवाडयातील दुष्काळाबाबतची जनजागृती

प्रसाद चिक्षे यांनी 2013पासून जनजागृतीच्या माध्यमातून पाण्याच्या प्रश्नावर काम करण्यास सुरुवात केली. प्रसाद चिक्षे यांचा पिंडच मुळी संघटनाचा व प्रश्नांभोवती माणसे जोडण्याच्या आहे. जनजागृती करत दुष्काळाशी दोन हात करण्याचे वातावरण स्थानिक ग्राामस्थांमध्ये तयार करायचे, दुसरीकडे शहरवासीयांनी यात योगदान करण्यासाठी आवाहन करायचे. एकीकडे गावागावांमध्ये थेट संचार करायचा, लोकांना दुष्काळाविरुध्द झगडण्यासाठी स्थानिक नेतृत्व प्रेरित करायचे, पेटवायचे, तर दुसरीकडे शहरवासीयांची नाळ या दुष्काळाच्या प्रश्नाशी कशी जोडता येईल यासाठी प्रयत्न करायचे. शहरवासीयांचे औदार्य फक्त आर्थिक देणगीपुरते मर्यादित राहू न देता शहरी तरुणांना थेट दुष्काळी गावात कामासाठी बोलवायचे, नियोजनात सहभागी करून घ्यायचे. पुण्या-मुंबईतील शहरी प्रौढांना दुष्काळी कामे पाहण्यासाठी आमंत्रित करायचे, त्यांची ग्राामस्थांशी चर्चा घडवून आणायची, नाते निर्माण होईल असे बघायचे अशी प्रसाद चिक्षे यांची ही आगळीवेगळी पध्दत आहे. यातून शहरवासीयांनी जणू काही गावागावांतील दुष्काळविरोधी लढयाचे पालकत्व स्वीकारल्याचे अनोखे चित्र आज पाच-सहा वर्षांनंतर उभे राहत आहे. 'जल'संधारणाच्या कामातून जशी गावात 'मन'संधारणाची प्रक्रिया घडत होती, तशीच ती अल्प-स्वल्प स्वरूपात शहरातही रुजू पाहत होती. आत्मकेंद्रितेत घुसमटणारी शहरी माणसे या निमित्ताने उमलू पाहत होती.

शहरांचे दुष्काळाशी नाते जोडण्याचा यशस्वी प्रयोग

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळातून कार्यकारी अभियंता म्हणून अलीकडेच निवृत्त झालेले सतीशकाका नवाथे हे या सर्व प्रक्रियेतले प्रातिनिधिक उदाहरण! ते राहणारे मुंबईतील अंबरनाथ येथील. पुण्यातल्या तळेगाव येथील एका बडया फार्म हाउसचे मालक. मराठवाडयातील प्रबोधिनीच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेली दुष्काळाची कामे बघायला म्हणून इतरांबरोबर गेल्या वर्षी बीड जिल्ह्यात येऊन गेले. धारूर तालुक्यातील व्हरकटवाडी गावात दोन दिवस मुक्काम केला. स्वतः श्रमदानाचा अनुभव घेतला. ऊसतोड मजूर असणाऱ्या ग्राामस्थांची दुष्काळाविरुध्द लढण्याची पोटतिडीक बघितली आणि या कामासाठी सव्वा लाख रुपयांची देणगी देऊन लगोलग निघून गेले. पावसाळयानंतरच्या दिवाळीत स्वारी फराळाचे साहित्य घेऊन सपत्नीक व्हरकटवाडीत दाखल झाली. व्हरकटवाडीने पुन्हा यंदा 'सत्यमेव जयते वॉटर कप' स्पर्धेत सहभागी व्हायचे ठरविले, तेव्हा चक्क गावाचे प्रतिनिधी म्हणून काका अन्य तीन ग्राामस्थांसमवेत चार दिवसाच्या पाणलोट प्रशिक्षणाला जाऊन आले. शिवाय गेल्या महिन्यात परत आठवडाभरासाठी अंबाजोगाईत येऊन गेले. आता येताना नवनवीन लोकांना ते मुंबईतून घेऊन येत असतात. इतर जण 'जिवाची मुंबई' करायला, समुद्र बघायला आसुसलेले असतात आणि इकडे काका मुंबईकरांना रखरखीत उन्हात बीडमधली दुष्काळाने होरपळलेली गावे आणि करपलेली माणसे दाखवीत फिरत असतात. आतासुध्दा परत जाताना दुष्काळी कामांसाठी 50 हजार रुपयांची स्वतःची देणगी देऊन गेले. मुंबईत या दुष्काळी कामांची माहिती सांगून अनेक जणांकडून सध्या ते देणग्या मिळवत असतात. मराठवाडयातील दुष्काळाशी नाते सांगणारी आता तर अशी अनेक उदाहरणे मुंबईत तयार झाली आहेत. अमित दातार, अनिकेत प्रभुदेसाई, सौरभ शेंडे, भाग्यश्री वझे, दीपाली केळेकर, रुपेश उबाळे, निनाद मुंगी अशी ही यादी बरीच वाढविता येईल. या सर्व हितचिंतक गटाला 'विवेकवाडी परिवार' असे नाव देण्यात आलेले आहे. यात श्रीलक्ष्मीनारायण संस्थेचे माधवराव जोशी यांचेही महत्त्वाचे योगदान आहे. ज्ञान प्रबोधिनी डोंबिवली विस्तार केंद्राच्या श्रुतीताई फाटक व वृंदाताई गोडसे या कार्यकर्त्या तर दुष्काळाव्यक्तिरिक्त अनेक शैक्षणिक उपक्रमांतही सहभागी असतात. मुंबईच्या स्मिताताई आठवले यांनी आपल्या परिचितांच्या मदतीने पुण्यात कुसुमाग्राजांच्या कवितावाचनाचा कार्यक्रम घडवून आणला आणि त्यात दुष्काळग्रास्तांसाठी मदतीचे आवाहन करत पुणेकरांकडून यंदा दीड लाख रुपये जमविले! नौदलातून अभियंता म्हणून निवृत्त झालेले विनायक पटवर्धन हे आणखी एक मुंबईकर. ते गेल्या वर्षी अंबाजोगाईमध्ये जाऊन महिनाभर राहिले. याशिवाय त्यांनी गेल्या वर्षी 1 लाखाची आणि यंदा 50 हजारांची देणगी दिली आहे.


यंदाच्या उन्हाळयातील दुष्काळी कामांमध्ये

आघाडी घेणारी गावे

यंदाच्या वर्षीदेखील प्रसाद चिक्षे यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी फाउंडेशनच्या 'सत्यमेव जयते वॉटर कप' स्पर्धेत सहभाग घेऊन त्या माध्यमातून अनेक गावे पाणलोट क्षेत्र विकासाची कामे करत आहेत. ग्राामस्थांचे श्रमदान व मशीनने केलेले काम याला स्वतंत्रपणे गुणांकन आहे. या गुणांच्या आधारे गावे तालुका स्तरावरील व जिल्हा स्तरावरील पात्रता फेरीत प्रवेश करतात. शारीरिक श्रमदानासाठी लोकांची मानसिकता तयार करणे व मशीनच्या कामासाठी गावातून लोकवर्गणी गोळा होणे हे या सर्वातील कळीचे मुद्दे आहेत. हे सर्व गावात घडवून आणण्यासाठी प्रभावीपणे ग्राामसभा घेणे, लोकांच्या भावनांना हात घालणे यात प्रसाददादाचा हातखंडा आहे. केवळ आजच्या दुष्काळाच्या प्रश्नांसाठी नव्हे, तर पुढच्या पिढीच्या, नातवंडांच्या भवितव्यासाठी गट-तट, हेवे-दावे, राजकीय वैमनस्य बाजूला ठेवून एकत्र या असे प्रसाद चिक्षे यांचे या ग्राामसभेमधले आवाहन लोकांना भिडणारे असते. काही गावे तर झटपट कामालाही लागतात. त्याची काही वानगीदाखल उदाहरणे -

केज तालुक्यातील पाथरा हे बेताची आर्थिक परिस्थिती असलेले मोजकी लोकसंख्या असलेले गाव. या गावात लोकवर्गणीसाठी पैसे उभे करणे अवघड आहे, असे आसपासच्या गावातील ग्राामस्थांचे मत होते. पण या गावात प्रसाददादांची सभा झाली व या गरीब गावातून अर्ध्या तासात चक्क 67 हजार रुपयांची लोकवर्गणी गोळा झाली. धारूर तालुक्यातील मोटेवाडी या अशाच एका 22 कुटुंबांच्या दुर्लक्षित गावाला जाण्याचा धड रस्ता नाही. सगळे गाव दर वर्षी नित्यनेमाने ऊसतोडीला जात असते. अशा या गावातल्या मंदोदरी होनमाने यांनी तर आपल्या नवजात बाळाच्या कानातील सोन्याची काडी पंधराशे रुपयाला विकली व ते पैसे लोकवर्गणीत जमा केले. बीड तालुक्यातील गुंदेवाडी गाव मोठे जिद्दीचे. गाव पैशाने नव्हे, तर हिमतीने मातब्बर! इतर गावांप्रमाणेच या गावात पैशाची रड. जिथे संपूर्ण बीड जिल्हा मागासलेला आहे, तिथे त्यातली गावे तरी कशी बरे श्रीमंत असणार? या गावाने मजबूत श्रमदान करून शारीरिक श्रमदानचे उद्दिष्ट झटपट पूर्ण केले; परंतु पैशाअभावी मशीनचे काम लवकर हाती घेता येईना. मग गावाने मशीनसाठी वाट न बघता मशीनने करावयाचे काम चक्क शारीरिक श्रमदानाने चालू केले! हे कळल्यावर प्रसाददादाने फेसबुकवर आवाहन करून या गावाला मशीनसाठी आवश्यक असलेल्या निधीतला काही भाग जमवून दिला.

फेसबुक हे प्रसाददादाचे देणगी मिळविण्यासाठीचे हुकमी साधन आहे. त्याच्या फेसबुक पानावर तुम्हाला या दुष्काळी गावांमध्ये पुढाकार घेणाऱ्या निवडक पण अनेक व्यक्तींची सहजपणे रेखाटलेली व्यक्तिचित्रे सापडतील, गावातल्या विषण्ण करणाऱ्या परिस्थितीची अनेक वर्णने सापडतील. प्रतिकूल परिस्थितीतसुध्दा न हरणाऱ्या, रूढार्थाने अशिक्षित अथवा अल्पशिक्षित असणाऱ्या गावपातळीवरील व्यक्तींच्या प्रेरक व हेलावून टाकणाऱ्या प्रसंगकथा सापडतील. सापडणार नाहीत ते म्हणजे चित्र-विचित्र ओठांचे चंबू केलेले सेल्फी फोटो! त्याचे फेसबुक म्हणजे मराठवाडयातील दुष्काळ कामाची बखर आहे! 'व्यक्त होणे' हेच ज्याचे जगणे आहे, त्याची ती विचारपूर्वक केलेली अभिव्यक्ती आहे!!

सातासमुद्रापलीकडची अनपेक्षित मदत

बीड जिल्ह्यातील नेकनूर फाटयाजवळील 'मांडवखेल' गावातील जवळपास एेंशी टक्के लोकांना मजुरीला जावेच लागते. त्याचे प्रमुख कारण म्हणजे दुष्काळामुळे वाटयाला येणारी नापिकी. अशा बिकट परिस्थितीत गावाने पाणलोटाचे काम करायचे जिद्दीने मनावर घेतले. पै-पै करत का होईना, पण या तुलनेने मोठया असलेल्या गावाने चक्क 2 लाख रुपयांची लोकवर्गणी गोळा केली. 'सध्या काय चालू आहे?' अशी वास्तपुस्त करणाऱ्या, अमेरिकेतील एका वर्गमित्राला प्रसादने या गावाची कथा सांगितली. त्या वर्गमित्राने हे सर्व ध्यानात ठेवून पाठोपाठ येणाऱ्या आपल्या पत्नीच्या वाढदिवशी दुष्काळाच्या कामासाठी एक लाख रुपयांची मदत ऑनलाइन पाठवून दिली. प्रसाद व सीमंतिनी सराफ असे या जोडप्याचे नाव!

आपल्या चरितार्थासाठी अमेरिकेत गेलेल्या पण भारतीय मातीशी नाळ कायम ठेवणाऱ्या हेमंत जोशी यांना व त्यांच्या समविचारी मित्रमंडळींना विदर्भ-मराठवाडयातील शेतकरी आत्महत्यांनी अस्वस्थ करून सोडले होते. त्यांनी याविषयीची अधिक आकडेवारी, कारणे आणि शोध अहवाल गोळा करून अभ्यासण्यास सुरुवात केली आणि ते मुळापासून हादरून गेले. अमेरिकेतून आपण भारतीय शेतकऱ्यांसाठी काय करू शकतो असे चक्र या मंडळींच्या डोक्यात चालू झाले. त्यांनी सुरुवातीला यवतमाळमधील आत्महत्या झालेल्या कुटुंबांत काही आर्थिक मदत केली. एवढे करून ते स्वस्थ बसले नाहीत, तर त्यांनी Save Indian Farmers (SIF) या नावाने छोटा गट स्थापन केला. अमेरिकेतील भारतीयांना ते याबाबत माहिती पोहोचवू लागले. चक्क रेल्वे स्टेशनवर भेटणाऱ्या भारतीयाला याबाबत माहिती सांगू लागले, निधी संकलन करू लागले व भारतातील दुष्काळग्रास्त कामांपर्यंत मदत पोहोचवू लागले. प्रसाद चिक्षे यांच्या ज्ञान प्रबोधिनीच्या माध्यमातून चालणाऱ्या दुष्काळी निवारणाच्या कामांची माहिती कळल्यावर ते थेट अंबाजोगाईमध्ये येऊन धडकले व चालू कामांना गेल्या वर्षी भेट दिली आणि तातडीने 15 लाख रुपयांची मदत केली. यंदाच्या कामांनाही त्यांनी 18 लाख रुपयांची मदत देऊ केली आहे. हे सर्व तुम्ही का करता? असे त्यातील हेमंत जोशी यांना विचारल्यावर त्यांनी जे उत्तर दिले, ते आपल्यालाही विचार करायला लावणारे आहे. ते म्हणाले, ''मी जर काही चांगले केले नाही, तर मला रात्री शांत झोप येणार नाही. मुळात हे सर्व करताना माझे स्वतःचे काही तरी देणे आहे हे समजून मी करतो. 'आशा' ही माणसासाठी खूपच मोठी गोष्ट आहे. ती मरता कामा नये!'' खरे तर भारतात राहणाऱ्या, पण इथे राहूनसुध्दा पूर्णपणे अमेरिकन जीवनशैलीचे अनुसरण करणाऱ्यांनीसुध्दा असा काही 'वेगळा' विचार करायला काय हरकत आहे?

कामातून घडणारे मनुष्यबळ

दुष्काळाचे काम करताना खूप मोठी यंत्रणा उभारायची, मशीनद्वारे भली-मोठी कामे हाती घ्यायची, मग त्यासाठी खूप मोठा निधी गोळा करायचा, मानधनावर माणसे नेमायची, सीएसआरवाल्यांच्या खुशामती करत बसायच्या, त्यांना मोठया शहरांजवळ काम करण्यापेक्षा मराठवाडयात जिथे प्रश्नांची तीव्रता व दाहकता अधिक आहे तिथे काम करणे कसे गरजेचे व महत्त्वाचे आहे हे पटवत बसायचे, हे करणे प्रसाददादाच्या स्वभावात नाही. ते चूक आहे असे नव्हे, तर तो त्याचा पिंड नव्हे. शहरातल्या ज्यांना वाटते त्यांनी ऐच्छिक आर्थिक मदत करावी, त्यावर न थांबता प्रत्यक्ष कामाला भेट द्यावी, शक्य झाल्यास कामाच्या नियोजनात आठवडे-दोन आठवडे राहून योगदान-सहभाग द्यावा. उन्हाळातील सलग दोन-तीन महिने कामाच्या जागी बीडमध्ये येऊन राहता आले तर उत्तमच! दुष्काळाच्या निमित्ताने ग्राामीण व शहरी लोकांचे एक नाते निर्माण व्हावे असा प्रबोधिनीचा आग्राह आहे. देणाऱ्याचा 'सेवाभाव' जागा केल्यास तो घेणाऱ्यालाही सन्मानाने व कर्तव्यभावनेने देतो, असे लक्षात येते. नाहीतर देणाऱ्यांच्या 'कंटाळवाण्या फोटोसेशन'चा तो बळी ठरतो.

शहरातील अनेक महाविद्यालयीन युवक छोटया-मोठया कालावधीसाठी मदतीसाठी तर कधी उत्सुकतेपोटी अंबाजोगाईला येत असतात. पुण्यात शिकणारा विदर्भातील राहुल व्यवहारे हा असाच एक महाविद्यालयीन युवक गेल्या वर्षी प्रसाददादाच्या संपर्कात आला. दुष्काळाचे दोन महिने कोणतेही मानधन वगैरे न घेता कामात सहभागी होण्यासाठी म्हणून परीक्षेनंतर अंबाजोगाईमध्ये येऊन राहिला. गावागावात होणाऱ्या ग्राामसभांना उपस्थित राहिला. उन्हातान्हात धावपळ करून सर्व गावांमधील मशीनकामाच्या पाठपुराव्याची जबाबदारी त्याने नेटाने पार पाडली. यंदा आता पुण्यातील एलएलबीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यावर विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील 'पोफळी' या त्याच्या गावात परत गेला तो पाण्याचे काम करायचे अशी खूणगाठ बांधूनच! गावातील लोकांना त्याने एकत्र केले. पाणलोट क्षेत्रविकासाची कामे स्पर्धेच्या माध्यमातून करण्यास गावकऱ्यांना राजी केले. गाव लोकसंख्येने मोठे असले, तरी त्यांच्यात एकजुटीची भावना निर्माण करून लोकवर्गणी गोळा करण्यास तयार केले. हा हा म्हणता गावातून दुष्काळी कामांसाठी तीन लाख रुपये उभे राहिले. शहरात नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने राहणाऱ्या, स्थायिक झालेल्या ग्राामस्थांनी तितकीच मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. प्रेरणेचे कसे संक्रमण होऊ शकते याचे एक हे जिवंत उदाहरण आहे. पुण्याच्या प्रबोधिनी युवक विभागातील सुरेश मरगळे व सुमित पाटील हेदेखील नुकतेच अंबाजोगाईत दोन आठवडे राहून गेले आहेत. सुरेश मरगळे हा आता पुणे जिल्ह्यातील धनगर वस्त्यांच्या पाणीप्रश्न कसा सोडविता येईल याचा विचार करतोय.

यंदाची दुष्काळी कामे आता अंतिम टप्प्यात आहेत. मराठवाडयातील तीन जिल्ह्यांतील 25 गावांत आणि विदर्भातील एका जिल्ह्यातील तीन गावांत सध्या प्रबोधिनीचे काम चालू आहे. कामासाठी लागणारा मोठा निधी कसा उभा करायचा ही विवंचना तर कायम असतेच. म्हणूनच शहरवासीयांनी या कामांना लवकरात लवकर भेट देऊन वेळेचे व आर्थिक योगदान करण्यातला आपला सहभाग निश्चित केला पाहिजे. तो भविष्यातल्या कामांसाठी नक्कीच आश्वासक व निर्णायक ठरेल यात शंका नाही.

प्रसाद चिक्षे संपर्क : 8208438600/ (02446)248912

Account Name : Jnana Prabodhini, Solapur Bank : Axis Bank, Solapur Branch.

Account Number : 266010100020402.

IFSC code : UTIB0000266

(Donations are eligible for section 80G of Income Tax)