नाशिककरांचा स्मार्ट चॉइस : हेक्जी सायकल

विवेक मराठी    06-Jun-2019
Total Views |

***ओमकार शौचे***

स्मार्ट सिटी अभियान या पंतप्रधानांच्या फ्लॅगशिप कार्यक्रमाअंतर्गत नाशिक शहरात हेक्जी कंपनीच्या माध्यमातून शेअरिंग तत्त्वावर दळणवळणासाठी सायकलचा वापर सुरू करण्यात आला आहे. या नावीन्यपूर्ण संकल्पनेचा वेध घेणारा हा लेख!

'टि्रंग टि्रंग' असा घंटेचा आवाज पूर्वी ऐकला की कोणाचे तरी बाबा सायकलवरून घरी आलेले असायचे, पोस्टमन काकांच्या सायकलचीसुध्दा हीच घंटा, गल्ल्यागल्ल्यांतून टि्रंग टि्रंग असा आवाज करत सुट्टया आहेत, अशी आठवण करून देणारी बच्चेकंपनीची सायकल. आता ही घंटाच दुर्मीळ झाली आहे, कारण आता सगळया ठिकाणी वाजतात पॉम पॉम हॉर्न! सायकलची जागा आता आलिशान गाडयांनी घेतली आहे. पण फिटनेसचा फंडा म्हणून का होईना, काळानुरूप परत सगळयांना सायकलकडेच वळावंस वाटू लागलेय. मध्यंतरी वाचनात आले की, कोणत्या तरी परदेशी शाळेमध्ये आजही शाळेच्या मुख्याध्यापकांपासून विद्यार्थ्यांपर्यंत सगळे सायकलवरच येतात. रोज बाहेर कुठेही फिरण्यासाठी सायकलचा वापर करणारे लोक अगदी बोटांवर मोजण्याइतके. परंतु सायकलसारखी तिहेरी उपयोगी वस्तू नाही. तुमची तब्येत, तुमचा पैसा आणि प्रदूषण टाळणे हा तिहेरी उपयोग सायकलचा. स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत नाशकात राबविल्या जात असलेल्या हेक्जी कंपनीच्या सायकल शेअरिंग उपक्रमाद्वारे आता नाशिककर दळणवळणाच्या आणि फिटनेसच्या बाबतीतही स्मार्ट होऊ लागलेत. दहा-पंधरा हजाराची सायकल विकत घेण्यापेक्षा आणि तिच्या पार्किंगचा ताप डोक्याला करून घेण्यापेक्षा लोकांना हेक्जीचीच सायकल जास्त आवडू लागलीये! अवघ्या दहा रुपयांत सायकलही मिळते आणि जवळच्या कोणत्याही डॉकवर पार्कही करता येते!

हेक्जी कंपनीची ही सायकल सार्वजनिक वापराच्या दृष्टीने विशेष प्रकारे तयार केलेली आहे. हिला पंक्चर न होणारे टयूबलेस टायर्स बसविण्यात आले असून, पुढच्या बाजूला सामान ठेवण्यासाठी एक मजबूत बास्केटही देण्यात आली आहे. गंज न चढणारे पार्ट्स या सायकलला आणखीनच मजबुती देतात. हिच्या सीट्सदेखील आपण आपल्या उंचीप्रमाणे ऍडजस्ट करू शकतो. हिचे सर्वोत्तम वैशिष्टय म्हणजे, यावर बसविण्यात आलेली जीपीएस यंत्रणा आणि क्यूआर कोडने उघडले जाणारे लॉक! यामुळे, ही सायकल चोरी जाण्याचा तर प्रश्नच नाही, त्याचबरोबर विद्यार्थी ही सायकल वापरत असल्यास सुरक्षा हा एक पैलू जोडला जातो. शिवाय, सायकलचे काही नुकसान झाल्यास/अपघात झाल्यास, ती कोणाच्या ताब्यात असताना ते झाले, याचा शोध घ्यायलाही मदत होऊ शकते. ही सायकल वापरण्यासाठी तुमच्या मोबाइलमध्ये हेक्जी ऍप असणे आवश्यक आहे. यावर नोंदणी करणे अत्यंत सोपे असून, यासाठी फक्त आपला मोबाइल नंबर नोंदवावा लागतो व कोणत्याही ई पेमेंट गेटवेवरून, भीम यूपीआय किंवा डेबिट/क्रेडिट कार्डद्वारे रिचार्ज करता येते. सायकलवरचा क्यूआर कोड स्कॅन केला की सायकलचे लॉक उघडते व तुमच्या ऍपवर घडयाळ सुरू होते. यासाठी अर्ध्या तासाला 10 रुपये, तासभारासाठी 20 रुपये इतके नाममात्र शुल्क आकारले जाते.

सायकल शेअरिंगची संकल्पना तशी मूळ युरोपातली. सर्वात पहिला सायकल शेअरिंग कार्यक्रम अमस्त्र्दाम शहरात 1965 सालच्या आसपास राबविण्यात आल्याचा दाखला आपल्याला मिळतो. परंतु कोणत्याही देखरेख यंत्रणेअभावी हा यशस्वी होऊ शकला नाही. आपल्याकडेही ज्याप्रमाणे नवनव्या रेल्वेंच्या नुकसानीच्या घटना आपण बघितल्या, तसेच या सायकलीही नाल्यात फेकून दिलेल्या, टायर फोडलेल्या अवस्थेत आढळून आल्यानंतर या कार्यक्रमाला मोठा धक्का बसला. परंतु हेक्जीच्या सायकल्समध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अशा गोष्टी होणार नाहीत याची दक्षता घेण्यात आली आहे. पुढे ही संकल्पना पुन्हा रुजू लागायला 90चे दशक उजाडावे लागले. पुढे इंग्लंड, स्पेन, फ्रान्स आणि हळूहळू पश्चिमेकडे अमेरिका आणि कॅनडा या देशांत ही संकल्पना रुजू लागली. सध्या सायकल शेअर करणऱ्या देशांत चीन व अमेरिका अव्वल स्थानी आहेत. स्मार्ट सिटीच्या निमित्ताने भारतही हळूहळू या देशांच्या पंक्तीत आपली जागा बनवू पाहत आहे!

2014 साली प्रथम सत्तेत आलेल्या मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमांपैकी एक म्हणजे स्मार्ट सिटी! याअंतर्गत शहरातील वाहतूक व्यवस्था ताळयावर आणण्याचाही समावेश होतो. याचाच एक भाग म्हणजे वाहतुकीची पर्यावरणपूरक पर्यायी व्यवस्था! भारतासारख्या विशाल देशात तशी शहरांतर्गत दळणवळणाची व्यवस्था अजूनही म्हणावी तशी गतिमान, पर्यावरणपूरक, त्रासरहित नाही. उलटपक्षी, वाहतूक कोंडी, वाहनांमधून निघणाऱ्या विषारी वायूंचे प्रदूषण आणि त्यातून निर्माण होणाऱ्या आरोग्य समस्या यांचाच सामना आपल्याला करावा लागतो. यावर मात करण्यासाठी ही हेक्जी सायकल शेअरिंगची व्यवस्था! त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलावर आपले अवलंबित्व कमी करण्यासाठीदेखील ही संकल्पना हळूहळू खारीचा वाटा उचलेलच. दळणवळणाबरोबरच फिटनेसचा फंडा म्हणूनदेखील लोकांना ही व्यवस्था आवडू लागली आहे आणि हीच बाब या संकल्पनेला यशाकडे नेण्याच्या दिशेने दिसणारा आशेचा किरण म्हणता येईल!

हेक्जी या दळणवळण क्षेत्रात काम करणाऱ्या एका स्टार्ट अप कंपनीतर्फे आउटसोर्सिंग तत्त्वावर हा सर्व प्रकल्प चालवला जातो. जगातील सर्वात मोठी सायकल उत्पादक कंपनी हिरो मोटर्स आणि युआन टेक्नॉलॉजीज या दोन कंपन्यांचा हा संयुक्त उपक्रम आहे. देशभरात चंदीगड, जबलपूर, कोची, विशाखापट्टण, भुवनेश्वर आणि नाशिक या शहरांत हा प्रकल्प सध्या राबवला जात असून त्यास लोकांची पसंती मिळत आहे. सध्या देशात एकूण 4000 सायकली कंपनीने रस्त्यावर उतरविल्या असून, पुढील काळात हा आकडा 10,000पर्यंत नेण्याचे ध्येय हेक्जीने ठेवले आहे.

 

उपक्रमाचे वैशिष्टय

*हेक्जीच्या माध्यमातून नाशिककरांचे स्मार्ट पर्यावरण प्रेम

*नाशिकमध्ये पीपीपी तत्त्वावर हा उपक्रम राबविला जात आहे.

* हेक्जीच्या माध्यमातून शहरभरात उभारण्यात आले 100 सायकल डॉकिंग स्टेशन (स्टँड)!

* नाशिक स्मार्ट सिटीसाठी 1000 सायकलींचा पुरवठा करण्यात आला आहे.

* 1 ते 19 मार्च दरम्यान 19 दिवसात 9 हजार वापरकर्त्यांची ऑपवर नोंदणी, तर 14 हजार राइड्स!

* नाशिक शहरात एकूण 45 हजार वापरकर्त्यांची नोंदणी!

* 6 महिन्यांत एकूण 54 हजार सायकल राइड्स!

* सध्या दररोज सरासरी 1500 सायकल राइड्सपर्यंत राइड्र्सची संख्या!