गेस्ट हाउस कांड

विवेक मराठी    07-Jun-2019
Total Views |

उत्तरप्रदेशात लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेला थांबवण्यासाठी कट्टर विरोधक सपा बसपा या पक्षामध्ये युती झाली. पण अपेक्षित कौल मतदरांनी न दिल्याने ही युती तुटली आहे. जरी आगामी पोटनिवडणुकीत फक्त युती नसल्याचे मायवती यांनी जाहीर केले असले तरी, ही युती कार्यकर्त्यांना अपेक्षित नव्हतीच. यामागे 1995चा  'गेस्ट हाउस कांड' कारणीभूत आहे..


 

उत्तर प्रदेशाच्या राजकारणात 2 जून 1995चे 'गेस्ट हाउस कांड' हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.

यापूर्वी 1993मध्ये मुलायमसिंहांच्या सपाने आणि मायावती-काशीराम यांच्या बसपाने आघाडीचं सरकार चालवलं होतं. ठरल्याप्रमाणे सुरुवातीची अडीच वर्षं मुलायमसिंह यांच्या नेतृत्वात हे सरकार चाललं. पुढील अडीच वर्षं त्यांनी सत्ता बसपाला, म्हणजे अर्थातच मायावतींना देणं अपेक्षित होतं. मात्र मुलायमसिंह काही सत्ता सोडायला तयार नव्हते. त्यामुळे दिनांक 1 जून 1995ला बसपाने मुलायमसिंह यांचं सरकार पाडण्याची घोषणा केली. मायावतींना मुख्यमंत्री व्हायचं होतं. काशीराम यांची तब्येत अत्यंत खराब होती आणि ते दिल्लीला हॉस्पिटलमध्ये भरती होते.

त्या वेळी उत्तर प्रदेशचे राज्यपाल होते मोतीलाल व्होरा. त्यांना भेटून मायावतींनी भाजपा,काँग्रेस आणि जनता दल यांच्या समर्थनाने सरकार बनवण्याचं पत्र दिलेलं होतं. पैलवान मुलायमसिंह यादव मायावतींच्या ह्या 'विश्वासघातकी' भूमिकेने प्रचंड संतापलेले होते. त्यांना काहीही करून मुख्यमंत्रिपद सोडायचं नव्हतं.

इकडे लखनौच्या व्ही.आय.पी. गेस्ट हाउसमध्ये मायावती, आपल्या आमदारांबरोबर 'तख्तापलट' योजनेला अंतिम रूप देत होत्या. काही निवडक आमदारांना घेऊन त्या रूम नंबर 1मध्ये गेल्या. त्यांचे बाकीचे आमदार कॉमन हॉलमध्ये बसले होते. संध्याकाळची सुरुवात होत होती. साधारण पाच वाजत होते.

आणि... समाजवादी पार्टीच्या दोनशेपेक्षा जास्त आमदार-कार्यकर्त्यांनी या गेस्ट हाउसवर हल्ला केला. बाहेर बसलेल्या बसपाच्या आमदारांनी गेस्ट हाउसचं दार बंद करण्याचा प्रयत्न केला, पण सपाच्या खवळलेल्या आमदारांनी ते दारच फोडलं. जबरदस्त राडा झाला. बसपाच्या पाच आमदारांना अक्षरश: फरफटत नेऊन गाडीत टाकलं आणि त्यांना मुख्यमंत्री निवासात नेलं. तिथे त्यांच्याकडून, बसपाचे बंडखोर नेते राजबहादूर यांच्या नेतृत्वाखाली सपाला समर्थन देण्याच्या पत्रावर सह्या घेतल्या. काही आमदार तर इतके घाबरलेले होते, की त्यांनी कोऱ्या कागदावरच सह्या केल्या.

इकडे गेस्ट हाउसवर हल्ला चालूच होता. मायावतींच्या रूमच्या दरवाजावर सपाचे तीस-चाळीस कार्यकर्ते शिव्या देत दरवाजा तोडण्याच्या प्रयत्नात होते. 'चमार औरत को उसकी मांद से घसीट के निकालो..' असा घोष चालू होता. आत मायावती आपल्या निवडक दोन-चार आमदारांबरोबर अक्षरश: थरथर कापत उभ्या होत्या.

तितक्यात पोलीस आले. मायावतींची विटंबना टळली. पण मायावती आयुष्यभर हा प्रसंग विसरू शकत नाही, असं त्यांनीच म्हटलंय.

आणि गंमत बघा - प्रचंड घाबरलेल्या, थरथर कापत कापत, जिवाच्या आकांताने आक्रंदन करणाऱ्या मायावती 2 जून1995ला, त्यांच्या जिवावर उठलेल्या सपाच्या त्याच 'गुंड' आमदार-कार्यकर्त्यांबरोबर युती झाली होती.  जरी आगामी पोटनिवडणुकीत फक्त युती नसल्याचे मायवती यांनी जाहीर केले असले तरी, ही युती कार्यकर्त्यांना अपेक्षित नव्हतीच.