शब्दांचा मृत्यू होऊ नये, म्हणून...

विवेक मराठी    08-Jun-2019
Total Views |

 

 लोकभाषेतील शब्दांच्या मृत्यूंबाबत सर्व पातळयांवर अनास्था दिसते. खरे तर मराठी भाषेतील शब्दांच्या मृत्यूंचे भान मराठी बोलणाऱ्यांना नाहीच. भाषेच्या बाबतीत बेगडी अस्मिता आणि कळवळा दाखविण्यापेक्षा भाषेच्या शब्दश्रीमंतीचे संरक्षण करण्यासाठी काही केले पाहिजे, एवढी समजही भाषाभानासाठी पुरेशी आहे.

मातृभाषादिन (21 फेब्रुवारी) आणि मराठी राजभाषादिन (27 फेब्रुवारी) या दोन दिवसांच्या निमित्ताने मराठी भाषेविषयी वेगवेगळया विचारपीठांवर बरेच बोलले जाते. ठिकठिकाणी बरेच लिहिलेही जाते. भाषेच्या संदर्भातील ही सारी चर्चा भाषेविषयीच्या आस्थेमुळे होत असते. भाषेविषयीची जागरूकता त्यातून दिसते. या सर्व विचारमंथनातून नेहमी एक मत व्यक्त होते की, जागतिकीकरणाच्या गतिमान प्रक्रियेत आपल्या मातृभाषेचे अस्तित्व टिकवणे हे मोठे आव्हान आहे. हे अगदी खरे आहे. भाषा नदीसारखी असते. लोकभाषांचे प्रवाह मूळ आणि प्रमुख भाषेचा मुख्य प्रवाह समृध्द करीत असतात. नदीला मिळणारे प्रवाह आटले की नदी क्षीण होणार, यात शंका नाही. लोकभाषांचा ओघ आटला तर मराठी प्रवाह क्षीण होणार हे निश्चित. शब्दांची समृध्दी ही भाषेची संपत्ती असते. आज मराठी भाषेतील शब्दसंपत्तीचे अस्तित्व धोक्यात येत आहे. शब्द विस्मरणात जाणे, लुप्त होणे, हद्दपार होणे हे आणि असे सारे प्रकार म्हणजे शब्दांच्या मृत्यूपूर्वीची स्थिती होय. शब्दांचा मृत्यू ही घटना भाषा मरणपंथाला लागली असल्याचे पहिले चिन्ह होय. मराठी भाषेतील कितीतरी शब्दांचा मृत्यू झाला आहे, हे आज ही भाषा बोलणाऱ्या प्रत्येकाने समजून घेण्याची गरज आहे. एकटया विदर्भ प्रदेशाचा विचार केला तरी लोकभाषेतील अनेक शब्दांचा मृत्यू झाल्याचे आणि अनेक शब्द मृत्युपंथाला लागले असल्याचे स्पष्ट दिसते.

एखाद्या शब्दाचा मृत्यू झाल्यानंतर कालांतराने शब्दकोशाच्या पानावरूनही त्याची जागा काढून घेण्यात येते आणि मग शब्द नामशेष होतो, अशीही उदाहरणे आहेत. लोकभाषांच्या शब्दसमृध्दीची कोशातही मोजदाद नसल्याने या शब्दांच्या मृत्यूची दखलही कोठे घेतली जात नाही. विस्मृतीत गेलेले अथवा मृत्युपंथाला लागलेले कितीतरी शब्द विदर्भाच्या लोकभाषेत आहेत. या शब्दांचे अर्थ आजच्या मराठी भाषेत सांगितले नाहीत, तर ते परभाषेतील वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही एवढे ते अपरिचित आहेत. विदर्भात दात नसलेल्या माणसासाठी 'खेबडा' असा एक शब्द आहे, तर आळशी माणसासाठी 'दंदी' असा शब्द आहे. 'खपती' म्हणजे 'वेडा', 'सांगो' म्हणजे बावळट, 'हिकमती' म्हणजे हुशार. 'हिंगजिऱ्या' म्हणजे कंजूस, मतलबी. पण हे आणि असे कितीतरी शब्द आता मृत्युपंथाला लागले आहेत. आता विदर्भाच्या मातीत गुरुवारला 'बस्तरवार' आणि रविवारला 'इतवार' म्हणणारी मंडळी फार थोडी उरली असतील. झाकट (सकाळ), फोतर (टरफल), धुंधाळ (वादळ), फुफट (धूळ), बेदाड (चिखल), चऱ्हाट (दोर), कावळ (दरवाजा), लवण (नाला) हे आणि असे असंख्य शब्द जिभेवरून केव्हाच पसार झाले आहेत. रस्त्याला 'रोड' म्हणताना रस्त्याच्या प्रकारांचे कितीतरी पर्यायी शब्द हद्दपार झाले. वाट, पाऊलवाट, पांदी, पांदण, पांदणवाट, घाट, वाटुली, पायवाट, आडवाट, पाखाडी, सरी, नाळ, सडक हे आणि असे अनेक शब्द वेगवेगळया प्रकारच्या रस्त्यांसाठीचे पर्याय आहेत. लाल अथवा तांबडया रंगाच्या निरनिराळया छटांसाठी विटकरी, तांबूस, लाल्या, डाळिंबी, कथ्या, मनुका, जास्वंदी, शेंदरी, फळसफुल्या, गुलाली, मेंदी, भगवा, काशाय, जांभा, पोवळा, लालगव्हाळी, शरबत्ती, लालसर, लालजर्द, लालबुंद, लालेलाल, रक्ताळ, रक्तचंदनी, काळपट लाल असे कितीतरी शब्द आहेत. 'हुर्दुक' हा शब्द आठवण आणि अव्यक्त, अनाम हुरहुर या अर्थांनी विदर्भात वापरला जातो. 'सय', 'याद' हे शब्देदेखील 'आठवण' या शब्दाचे पर्याय आहेतच. लोकभाषेतील मृत्युपंथाला लागलेल्या शब्दांची उदाहरणे दिली, तर असे हजारो शब्द नोंदविता येतील.

लोकभाषेतील शब्दांच्या मृत्यूंबाबत सर्व पातळयांवर अनास्था दिसते. खरे तर मराठी भाषेतील शब्दांच्या मृत्यूंचे भान मराठी बोलणाऱ्यांना नाहीच. भाषेच्या बाबतीत बेगडी अस्मिता आणि कळवळा दाखविण्यापेक्षा भाषेच्या शब्दश्रीमंतीचे संरक्षण करण्यासाठी काही केले पाहिजे, एवढी समजही भाषाभानासाठी पुरेशी आहे.

लोकभाषेत संवाद साधण्यासंदर्भातील न्यूनगंड संपविला पाहिजे. भाषा हे संवादाचे माध्यम आहे. तेव्हा लोकभाषेत व्यक्त होत असताना न्यूनगंड, भयगंड नको, अहंगंडही नको. भाषेचा फाजिल अहंकार नको. भाषेतील शब्दसंपत्ती टिकविण्यासाठी बोलणाऱ्या माणसांच्या ओठावर भाषा हवी. लोकभाषेतील शब्द आशयानुगामी असतात. रव, नाद, ध्वनी, घोष, सूर, आरव हे सारे शब्द 'आवाज' या अर्थाचे असले, तरी त्यांची योजना करताना वाक्याच्या अर्थाचा प्रथम विचार केला जातो. लोकभाषेतील शब्द भावना, संस्कृती, आशय, विचार, अभिव्यक्ती अशा घटकांनी परिपूर्ण असतो. दोन किंवा त्यापेक्षा अधिक लोकभाषांचे परस्पर आदानप्रदान चालत असते. भाषासंकर आणि संस्कृतिसंकराच्या काळात काही शब्दांचा मृत्यू होतच असतो. पण काही नवे शब्द भाषेत उगवून येतच असतात. नव्या संकल्पना, नवे संदर्भ, नव्या अभिरुची, नवी तंत्रसाधने, नवी संशोधने हे आणि असे व्यापक पर्यावरण लोकभाषा आपल्या कवेत घेताना काही शब्दांची मोडतोड, काही शब्दांची आयात, निर्यात, काही शब्दांचा मृत्यू तर काही शब्दांची निर्मिती ही प्रक्रिया सुरूच राहणार आहे. इच्छा असेल तरी ही प्रक्रिय थांबणारी नाही. शब्दसमृध्दी आणि शब्दश्रीमंतीसह भाषा शाबूत ठेवायची असेल तर ती कायम ओठांवर असली पाहिजे. संवादप्रक्रियेतून भाषा वजा झाली की तिचे वाईट दिवस सुरू होतात. मनात, मेंदूत असणारी भाषा ओठांवर नित्य असली पाहिजे. भावपूर्ण, आशयपूर्ण आणि विचारांनी परिपूर्ण असे शब्द ओठांवरून, म्हणजे प्रत्यक्ष बोलण्यातून हद्दपार झाले की मग ते जीवनातून आणि कोशातूनही लुप्त होतात. भाषा जिवंत आणि प्रवाही ठेवायची असेल, तर शब्दसंपत्तीचे जतन आणि नव्या शब्दांचे निर्माण या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. भाषा टिकवायची असेल तर लोकभाषेतून व्यक्त होत राहणे आणि संवादप्रक्रिया लोकभाषेतूनच नित्य घडत राहाणे अत्यावश्यक आहे. भाषिक अस्मिता, भाषिक कळवळा, भाषिक चिंता या बाबी आपल्या ठायी शिल्लक आहेत, हे सिध्द करण्याची पूर्वअट म्हणजे आपले सर्व व्यवहार मराठी लोकभाषेतूनच करणे होय.

डॉ. अजय देशपांडे

9850593030

deshpandeajay15@gmail.com