झापडं निघणार केव्हा?

विवेक मराठी    13-Jul-2019
Total Views |

पुण्यातून 9 वर्षांपूर्वी बेपत्ता झालेला संतोष शेलार जेव्हा छत्तीसगढच्या माओवादी संघटनेच्या कामात कार्यरत असलेला गेल्या आठवडयात आढळला आणि त्याची बातमी प्रसारमाध्यमांमधून सर्वांसमोर आली, तेव्हा 'कबीर कला मंच' या तथाकथित सांस्कृतिक संघटनेवरचा बुरखा पुन्हा एकदा निघाला. त्या बुरख्याआड दडलेलं ओंगळवाणं रूप पुन्हा एकदा समोर आलं. संतोष शेलारच्या आजच्या स्थितीला 'कबीर कला मंच' या संघटनेचं त्याच्या आयुष्यात येणं कारणीभूत असल्याचं मत त्याच्या आईने स्पष्ट शब्दांत सांगूनही आपल्या समाजातले स्वयंघोषित पुरोगामी डोळयावरची झापडं बाजूला करायला तयार नाहीत. त्यांच्या या करंटेपणाला काय म्हणावं? या मुद्दयावरून त्यांच्या देशप्रेमाविषयी शंका घेतली, तर छाती पिटत आक्रोश करायला ही मंडळी एका पायावर तयार असतात.


 

रा.स्व. संघासारख्या संघटनेविषयी, तसंच एका निश्चित विचारधारेने केवळ राष्ट्रहित डोळयासमोर ठेवून काम करणाऱ्या भाजपासारख्या राजकीय पक्षाविषयी मनात ठासून भरलेला द्वेष त्यांना डोळयावरची झापडं काढू देत नाही, हीच बाब पुन्हापुन्हा अधोरेखित होते आहे. मात्र त्यांच्या या पवित्र्यामुळे 'कबीर कला मंच' नावाची कीड पोसली जात आहे, ही कीड समाज पोखरते आहे, इथल्या तरुणांना चुकीच्या मार्गावर नेते आहे, याचं या पुरोगाम्यांचं भान पुरतं सुटलं आहे. देशासाठी ही अतिशय धोकादायक गोष्ट आहे.

एल्गार परिषदेत आणि त्यानंतर भीमा-कोरेगाव इथे झालेल्या हिंसाचारातही 'कबीर कला मंच'चा सहभाग उघड झाला. यानंतर महाराष्ट्राच्या पोलीस खात्याने नक्षली कारवायांचा बंदोबस्त करण्यासाठी मोठी मोहीम हाती घेतली. ती आजही काम करते आहे. या मोहिमेमुळे आजवर समोर न आलेल्या अतिशय धक्कादायक बाबी समोर येत आहेत आणि मोठया प्रमाणावर अटकसत्रंही सुरू झालं आहे. शहरी तसंच ग्रामीण भागातील नक्षल कारवायांत थेट गुंतलेले आणि या चळवळीला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाठिंबा देणारे, समाजात बुध्दिमंतांच्या-उच्चभ्रूंच्या वर्तुळात वावरणारे अशा सगळयांचा अटक झालेल्यांमध्ये समावेश आहे. आतापर्यंत या लोकांना हात लावायची हिंमत कोणी केली नसल्याने त्यांचे समर्थक अतिशय चवताळले आहेत. अस्वस्थ झाले आहेत.

2002मध्ये सांस्कृतिक संघटन म्हणून अस्तित्वात आलेल्या 'कबीर कला मंच' या संघटनेचा जन्मच मुळी शहरातल्या शिक्षित /अर्धशिक्षित, दलित/वंचित वर्गातल्या तरुणाईला नक्षल चळवळीच्या वाटेवर आणून सोडण्यासाठी झाला आहे. समाजातले भेदाभेद दूर करण्याचं उद्दिष्ट असल्याचं भासवत असले, तरी त्यांचा अंत:स्थ हेतू अतिशय कुटिल आणि या देशाच्या अखंडतेला नख लावणारा आहे. लोकप्रिय चालींवर आधारलेली पथनाटयं/गाणी/पोवाडे अतिशय प्रभावीपणे सादर करत, त्या माध्यमातून तरुणांच्या मनात व्यवस्थेबद्दल चीड निर्माण करणं, अन्यायग्रस्ततेची जाणीव निर्माण करणं, या समाजाविषयी रोष उत्पन्न करणं हे यांचं मुख्य काम. प्रामुख्याने मुंबई-पुण्यासारख्या मोठया शहरांमध्ये जिथे महाविद्यालयांचं मोठं जाळं पसरलं आहे आणि जिथे राज्याच्या वेगवेगळया भागांतून मोठया प्रमाणात मुलं शिकायला येतात, यातली बहुतेक स्वत:च्या घरापासून दूर राहून शिकत असतात, अशा मुलांमध्ये किंवा गरिबांच्या-वंचितांच्या झोपडवस्त्यांमध्ये संघटनेचं काम चालतं. या मंचाने मुंबई-पुणे हे कार्यक्षेत्र विचारपूर्वक निवडलं आहे.

पारंपरिक गीतप्रकारांचा, चालींचा वापर - इतकंच नाही, तर शब्दयोजनाही पारंपरिक वळणाच्या गीतांशी साधर्म्य असणारी करणं, हे या कबीर कला मंचाचं वैशिष्टय. अशा प्रकारे भाबडया लोकांचा बुध्दिभेद करत त्यांना मंचाकडे अाकर्षित करून घेतलं जातं.

या देशातील लोकशाही व्यवस्थेविषयी तरुणांच्या मनात द्वेष निर्माण करणं, देशविघातक कारवायांमध्ये सहभागी होण्याची मानसिकता त्यांच्यात विकसित करणं आणि त्यांना नक्षली चळवळीकडे वळवणं ही या मंचाची मुख्य कामं. नक्षली दलममधील महत्त्वाच्या पदांवर भरती करणारी ही 'रिक्रूटिंग एजन्सी' आहे, ही बाब आतापर्यंत अनेक वेळा सिध्द झाली आहे. संतोष शेलार आणि प्रवीण कांबळे हे त्याचे ताजे पुरावे. असं असताना, आजही 'कबीर कला मंच'ची पाठराखण करणाऱ्यांची महाराष्ट्रातल्या तथाकथित विचारवंतांमध्ये वानवा नाही, हे दुर्दैव. प्रसारमाध्यमातल्या काहींना या मंचाबद्दल असलेलं ममत्व संतोष शेलारच्या बातम्या काही वर्तमानपत्रांनी तसंच वृत्तवाहिन्यांनी ज्या प्रकारे समोर आणल्या, त्यातून अधोरेखित झालंच आहे.

फुटीरतावादी नक्षली चळवळीला मदत होईल असं काम करत असल्याच्या आरोपावरून या मंचाच्या मुख्य कार्यकर्त्यांना पहिल्यांदा अटक झाली ती 2011मध्ये. तेव्हा राज्य होतं आघाडीचं आणि गृहमंत्री म्हणून आर.आर. पाटील काम पाहत होते. त्या वेळीही या मंचाच्या कार्यकर्त्यांनी आणि सर्व स्तरांतल्या त्यांच्या सहानुभूतिदारांनी जमेल तेवढा गोंधळ घातला, समाजाची दिशाभूल करायचा प्रयत्न केला, तरीही सरकार ठाम राहिलं. पुढे 2014मध्ये 'कबीर कला मंच' ही माओवाद्यांसाठी काम करणारी 'फ्रंटल ऑर्गनायझेशन' असल्याचं गृह मंत्रालयाने लोकसभेत सांगितलं. इतकं होऊनही या मंचाचं काम चालूच राहिलं ते अनेक समर्थकांच्या पाठिंब्यामुळे. यावरून त्याची पाळंमुळं किती लांबवर पसरली आहेत याची कल्पना यावी.

कलेचा मुखवटा पांघरलेली ही देशविघातक संघटना टिकू द्यायची की सावध होत तिच्याविरोधात बळ एकवटून समाज म्हणून उभं राहायचं, हा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. जोवर हे बळ दिसून येत नाही, तोवर तिचं काम चालू राहील आणि झापडबंद पुरोगामी तिची पाठराखण करत राहतील.