परिस्थिती हाच माझा गुरू -सायली मराठे

विवेक मराठी    15-Jul-2019
Total Views |

'आद्या'सारखा चांदीच्या दागिन्यांचा नावाजलेला ब्रॅण्ड तयार करणाऱ्या सायली मराठे परिस्थितीलाच आपला सगळयात मोठा गुरू मानतात. त्याशिवाय आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर भेटलेल्या मार्गदर्शकांविषयी त्यांच्याच शब्दात.

 

कॉलेज संपून आता 14 वर्षे झाली, पण दर गुरुपौर्णिमेला आयुष्यात येणाऱ्या गुरूंची संख्या मात्र वाढतच जाते. सुरुवात होते ती शाळेपासून.

मी आयुष्याची 7 वर्षे इंग्रजी माध्यमात आणि मग नंतरची 6 मराठी माध्यमात शिकले. प्रत्येक इयत्तेत मनापासून शिकविणारे आणि विषयाची गोडी निर्माण करणारे शिक्षक मिळणे हे खरेच नशीब आहे. मी खरेच भाग्यवान. पुस्तकाबाहेरचा इतिहास, भूगोल मी शाळेतच शिकले. शास्त्राचे सगळे प्रयोग पुस्तकाच्या आधी आम्ही करून पाहिले. अग्रलेख वाचणे, कवितांचे रसग्रहण हे आमच्या शिक्षणाचा भाग होते.

माझ्या घरात दोन्ही आज्या शिक्षक. एक गणितात मुरलेली आणि दुसरी भाषाप्रेमी. त्यामुळे माझे पहिले गुरू मला घरीच भेटले. दासबोध शिकविणारी एक आजी आणि दुसरी गणिताची भीती पळवून लावणारी.

माझ्या शिक्षकांवर माझा प्रचंड विश्वास. माझ्या त्यांच्यावरच्या प्रेमापेक्षाही जास्तच कदाचित. मी पहिलीत असतानाच माझ्या आईला, तू माझा अभ्यास घेऊ नकोस असं सांगितलं ते केवळ माझ्या शिक्षकांच्या जिवावर असणार!

शाळेतून बाहेर पडताना नेहमीचे 6 विषय सोडून आणखी खूप काही जमवून, साठवून मी बाहेर पडले. साहित्य, संगीत, खेळ याविषयी माहिती, उत्सुकता आणि आदर! सगळंच.

अगदी आजही शाळा सोडून 20 वर्षांनंतरही मला माझे शिक्षक आणि त्यांचे तास आठवतात. कडक शिस्त हवीहवीशी वाटावी असे ते गुरू!

इंजीनिअरिंगला प्रवेश घेतला, तेव्हा खरे सांगायचे तर शाळेसारखे शिक्षक मिळतील की नाही अशी शंका होती, पण इथेही नशीब अगदी जोरात होते. समरसून शिकविणारे आणि कठीण विषयाचा अजिबात बाऊ न करणारे. पण सगळयात महत्त्वाचा होता तो त्यांचा पाठिंबा! नाटक, नाच, खेळ, स्पर्धा परीक्षा, हे सगळे आम्ही करावे, त्यात नैपुण्य मिळवावे यासाठी केलेले अविरत प्रयत्न!

माझ्या दागिन्यांच्या दुकानात परत परत येणारे माझे शाळा कॉलेजातले शिक्षक आणि त्यांच्या डोळयांत माझ्या सध्याच्या कामाविषयीचे कौतुक आणि कुतूहल हे माझ्यासाठी फार महत्त्वाचे आहे.

शिक्षण संपल्यावर गुरू भेटत नाहीत का? माझे उत्तर आहे, नाही! प्रत्येक टप्प्यावर, प्रत्येक वळणावर गुरू भेटत असतो. तुम्हाला मार्ग दाखवत असतो. मात्र आपला गुरू जे सांगतो, ते ऐकण्यासाठी कान, डोळे आणि डोके सगळे उघड असायला हवे.

मी नोकरीत असताना 10 वर्षांत नोकरी आणि आयुष्य याविषयी ज्ञान देणारे इतके गुरू आहेत. नावे लिहीत बसले, तर एका लेखात खरेच फक्त नाव येतील.

गेली 6 वर्षे मी दागिने बनविते. यात माझा गुरू कोण? भेटलेला प्रत्येक कारागीर. धंदा कसा करावा आणि कसा करू नये हे मनापासून शिकविणारे माझे सप्लायर्स! 50,000 रुपयांच्या भांडवलावर चालू केलेला बिझनेस. घर चालते. मला हे सगळे शिकविणारा माझा नवरा! तोही माझा गुरूच आहे.

शेवटी एक गोष्ट नक्की लिहिणार आहे. परिस्थितीएवढा मोठा गुरू संपूर्ण जगात नाही. Situation is really the best teacher. मी सगळयात जास्त मोठे धडे घेतले ते माझ्यावर ओढवलेल्या परिस्थितीतून. कठीण वेळी शस्त्र टाकून निराशा जवळ करणे सगळयात सोपा उपाय आहे. पण परिस्थितीप्रमाणे स्वत:मध्ये बदल करून त्यातून मार्ग शोधणे हा पर्याय निवडायला मलाच परिस्थितीने शिकविले.

वाढत्या वयाबरोबरच शिकायची इच्छा कमी होत जाते असे सतत बोलले जाते. पण दर क्षणाला आजूबाजूला भेटणारे गुरू ओळखता आले, तर जीवन खरेच समृध्द होईल.

- सायली मराठे