'गंधकुटी'तील ज्ञानसाधक

विवेक मराठी    15-Jul-2019
Total Views |

प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम आणि सदाशिवराव गोरक्षकर या एकाच नाण्याच्या दोन बाजू असाव्यातइतकी ही दोन नावं आजही एकमेकांपासून अभिन्न आहेत. खरं तर प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम हे आता छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय म्हणून ओळखलं जातं आणि गोरक्षकर तिथून निवृत्त होऊन सतरा वर्षं उलटली आहेततरीही हे समीकरण अतूट आहे. एखाद्या संस्थेसाठी एखादी व्यक्ती किती भरीव योगदान देतेत्याचं हे एक मूर्तिमंत उदाहरण.


संग्रहालयाकडे पाहण्याच्या पारंपरिक दृष्टिकोनात त्यांच्यामुळे बदल झाला. संग्रहालयशास्त्रातले आणि धातुमूर्ती शास्त्रातले तज्ज्ञ असलेल्या गोरक्षकरांनी प्रिन्स ऑफ वेल्सला आपल्या अपूर्व योगदानाने केवळ देशात नव्हे, तर जगातही प्रतिष्ठा मिळवून दिली. या कार्याची दखल घेत भारत सरकारनेही त्यांना पद्मश्री किताबाने गौरवलं. गोरक्षकर हे अगदी बालवयापासून संघ स्वयंसेवक. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ही बाजूदेखील तितकीच ठळक. त्या ओळखीचा आपल्या कारकिर्दीवर काही विपरीत परिणाम होईल, याची तमाही न बाळगता अगदी ऐन बहराच्या कालखंडातही त्यांनी ही ओळख नुसती जपली नाही, तर तिचा अभिमान बाळगला. वयाची 80 वर्षे उलटून गेलेले गोरक्षकर आजही पूर्वीच्याच उत्साहात त्यांच्या निवासस्थानी - गंधकुटीत ज्ञानसाधनेत मग्न आहेत. हा लेख म्हणजे या असाधारण व्यक्तिमत्त्वाला, त्याच्या अजोड कार्याला साप्ताहिक विवेकने केलेलं विनम्र अभिवादन आहे.


 
 

सदाशिव गोरक्षकर हे पाठारे प्रभू. मुंबईच्या मूळ ज्ञातींपैकी एक ज्ञाती. पाठारे प्रभू खरे तर गिरगावकर पण गोरक्षकरांचं घर सांताक्रूझला होतं. त्यांच्या जन्माच्याही आधी 1925च्या सुमारास आलेल्या इन्फ्लुएंझाच्या साथीमुळे वडिलांनी सांताक्रूझला स्थलांतर केलं. (आज आपण ज्याच्याकडे साधा 'फ्ल्यू' म्हणून पाहतो, तो त्या वेळचा जीवघेणा 'इन्फ्लुएंझा'!) त्यामुळे सदाशिवरावांचं जन्मगावच सांताक्रूझ. शालेय शिक्षणही तिथेच आणि संघाचं कार्यक्षेत्रही तेच. घरात संघाची पार्श्वभूमी नसतानाही, शाळेतल्या मित्रामुळे वयाच्या 11व्या वर्षी त्यांचं संघाशी नातं जुळलं ते आजतागायत.

 

महाविद्यालयात असताना, कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी नोकरी करत करत त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. इतिहास विषयाच्या आवडीमुळे त्यात बी.ए. केलं आणि मग एम.ए. करताना प्राचीन भारतीय संस्कृतीचा अधिक खोलात जाऊन अभ्यास केला. दरम्यान एलएल.बी.ही पूर्ण केलं होतं. त्याच वेळी, इतिहास विषयातली त्यांची आवड आणि गती लक्षात घेऊन इतिहासाच्या प्राध्यापकांनी बडोदा इथं असलेला म्युझिऑलॉजीचा दोन वर्षांचा पदवी अभ्याक्रम करण्याविषयी त्यांना सांगितलं. आणि केवळ बहिणीच्या आर्थिक पाठिंब्यामुळे गोरक्षकर बडोद्याला गेले. पदवी घेतल्यानंतर त्याच कॉलेजमध्ये एक वर्ष अध्यापनही केलं. मात्र त्यानंतर मुंबईत परतल्यावर म्युझियममध्ये नोकरी मिळेपर्यंत अर्थार्जनासाठी पुन्हा कारकुनी करण्याऐवजी, काळा कोट घालून कोर्टात उभं राहणं त्यांनी स्वीकारलं. जेमतेम वर्षभरच वकिली केली, पण तेवढया अल्पावधीतही 'जनसंघाचा वकील' अशी त्यांची ओळख तयार झाली. 1964मध्ये ते काळा कोट उतरवून प्रिन्स ऑफ वेल्समध्ये असिस्टंट म्हणून रुजू झाले आणि पुढची बत्तीस वर्षं तिथेच रमले.

 

त्या वेळी समाजाला म्युझियमविषयी फारशी आस्था, माहिती नव्हती. आणि आपण मांडलेला वस्तुसंग्रह पाहायला लोकांनी यावं, असं तिथल्या लोकांनाही फारसं वाटत नसे. एकूण या संदर्भात आत आणि बाहेर उदासीनताच जास्त होती. याविषयी बोलताना गोरक्षकर म्हणाले, ''आपल्याकडे पारंपरिक पध्दतीने वर्षानुवर्षं म्युझियम मांडून ठेवली जातात. त्यातील वस्तूंची योग्य निगा राखणं, त्यांच्या मांडणीत नवा दृष्टिकोन येणं हे जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत म्युझियमकडे लोक आकर्षित होणार नाहीत असं माझं पहिल्यापासून स्पष्ट मत आहे. जास्तीत जास्त लोकांना म्युझियमकडे आकर्षित करणं हे माझं पहिल्यापासून उद्दिष्ट होतं. तुमच्याकडे वस्तुरूपातला जो ज्ञानसाठा आहे, तो तुम्ही सर्वसामान्यांसाठी खुला करायलाच हवा याबाबत मी आग्रही होतो.''

 

केवळ हौसेपोटी केलेला आवडत्या वस्तूंचा संग्रह म्हणजे संग्रहालय नव्हे. जेव्हा त्याचा शास्त्र म्हणून विचार होतो, तेव्हा त्यात अभ्यास, शिस्त आणि सौंदर्यपूर्ण मांडणी या गोष्टींचा मिलाफ अपेक्षित असतो. तसंच ही मांडणी स्वान्तसुखाय नसून प्रेक्षकांसाठी आहे, याचं भानही मांडणी करणाऱ्यांनी बाळगायला लागतं. Collection, Preservation and Display या त्रिसूत्रीभोवती म्युझियम उभं राहतं. त्यातही display महत्त्वाचा. लोकांना थांबून पाहावंसं वाटेल, माहिती वाचावीशी वाटेल अशा आकर्षक पध्दतीने वस्तू मांडायला हव्यात. तर ते संवादाचं (कम्युनिकेशनचं), अनौपचारिक शिक्षणाचं एक प्रभावी माध्यम ठरतं. संग्रहालयातील दुर्मीळ वस्तूंमुळे तर त्याचं मोल आहेच, पण प्रामुख्याने ते माहितीचं संवाहक आहे, म्हणूनही त्याचं महत्त्व आहे. आपण केलेल्या वस्तूंच्या मांडणीतून भेट देणाऱ्या व्यक्तींच्या मनात अधिक माहिती मिळवण्याची जिज्ञासा जागी करणं, हे संग्रहालयाचं एक प्रमुख उद्दिष्ट असलं पाहिजे. गोरक्षकरांनी प्रिन्स ऑफ वेल्समधील आपल्या सहकाऱ्यांमध्ये हा विचार रुजवला, चेअरमनसह सर्व विश्वस्तांना पटवला. आणि त्यामुळेच स्थापनेनंतर पन्नास वर्षांनी या म्युझियमने कात टाकली. त्यानंतर केवळ प्रेक्षकच नव्हे, तर या विषयातील तज्ज्ञही म्युझियमची स्तुती करू लागले.

 

म्युझियममध्ये आल्यावर दोनच वर्षात गोरक्षकरांना रॉकफेलर फाउंडेशनची शिष्यवृत्ती मिळाली. यामुळे युरोपातील व विशेषत: अमेरिकेतील उत्तमोत्तम संग्रहालयं पाहता आली. या अनुभवामुळे त्यांचा दृष्टिकोन अधिक व्यापक झाला.

 

'क्युरेटर' हे वस्तुसंग्रहालयातील अतिशय जबाबदारीचं पद. पण आपण सर्वसामान्य माणसं याबाबत पूर्णपणे अनभिज्ञ असतो. क्युरेटरच्या कामाचं स्वरूप सांगताना गोरक्षकर म्हणतात, ''क्युरेटरच्या कामाचे अनेक पैलू आहेत. अगदी अग्रक्रमाने करायचं काम म्हणजे म्युझियममधल्या वस्तूंची काळजी घेणं. आपल्या संग्रहासाठी पारखी नजरेने वस्तू जमवणं. त्यासाठी त्याचा जनसंपर्कही चांगला असावा लागतो. संग्रहालयाला भेट देणाऱ्यांविषयी त्याच्या मनात जिव्हाळा असावा लागतो. थोडक्यात, हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व असावं लागतं. त्याला मार्केटिंगचं कौशल्यही अवगत असायला हवं. त्याच्यासाठी 'प्रॉडक्ट' म्हणजे त्याची गॅलरी, त्या माध्यमातून तो प्रेक्षकाला - म्हणजे 'ग्राहका'ला किती ज्ञान देऊ शकतो ते महत्त्वाचं. हे सांस्कृतिक क्षेत्र असं आहे की ते स्वयंपूर्ण असूच शकत नाही. त्याला मदतीचा हात लागतो, तो क्युरेटरला देता आला पाहिजे.

 

मी जेव्हा प्रिन्स ऑफ वेल्समध्ये आलो, तेव्हा मला कॉन्झर्वेशन केमिस्ट्री शिकवलीच गेली नव्हती. आम्ही जे नॅफ्थॅलिन बॉल्स वापरतो, त्याच्या फ्यूम्स म्हणजे वाफा खालच्या दिशेने येतात. म्हणून हे बॉल्स वर टांगायचे असतात, त्यामुळे त्याचा योग्य परिणाम साधला जातो. मात्र तेव्हा या बॉलच्या पिशव्या म्युझियममध्ये खाली ठेवलेल्या असायच्या. मी त्यात बदल करून त्या वर टांगायला सुरुवात केली. खरं तर हे अगदी प्राथमिक स्वरूपाचं काम होतं. मात्र ही चुकीची पध्दत आहे असं म्हणत जुन्या लोकांनी नाकं मुरडली. मी या विरोधाला जुमानलं नाही. त्याचा उपयोग होतोय हे लक्षात आल्यावर विरोधाची धार बोथट झाली. नंतरच्या तीस वर्षांत तर आम्ही एकूण मांडणीतही अनेक बदल केले.''

 

केवळ संग्रहातल्या वस्तूंची विषयानुरूप पारंपरिक मांडणी, इतकंच संग्रहालयाचं स्वरूप मर्यादित न ठेवता गोरक्षकरांनी नवनव्या विषयांवर, संकल्पनांवर आधारित दालनं उभी केली. सर्वसामान्यांपर्यंत त्यांची माहिती पोहोचवण्याची व्यवस्था केली. त्यामुळे आजपर्यंत या दिशेने न वळलेल्यांची पावलंही इकडे वळायला लागली. संग्रहालय खऱ्या अर्थाने नावारूपाला येऊ लागलं.

 

'शब्दांविण संवाद' साधण्याची प्रत्येक वस्तूची स्वत:ची अशी एक क्षमता असते. ती वस्तू कशी पाहायची, याचं ज्ञान असेल तर संवाद प्रभावी होतो. त्याला आणखी निवेदनाची जोड मिळाली तर लोकांचं पटकन लक्ष वेधलं जातं. हे लक्षात घेऊनच गोरक्षकरांनी म्युझियममध्ये आधीपासून असलेल्या 'ऍकॉस्टिक गाईड्स' या सुविधेत सुधारणा केल्या, म्युझियममधल्या शिक्षण विभागाला प्रोत्साहन दिलं. सिंधू संस्कृतीचं प्रदर्शन पाहण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना आधी स्लाईड शो दाखवला जात असे. तेथील शिक्षण अधिकारी ही जबाबदारी सांभाळत. तो शो पाहिल्यावर त्याविषयी मांडलेल्या प्रदर्शनाबद्दल अधिक उत्सुकता निर्माण होई आणि विषय अधिक परिणामकारकपणे पोहोचे.

 

अणीबाणीचा कालखंड आणि बढतीचा योग

 

गोरक्षकर हे निष्ठावान संघ स्वयंसेवक आहेत, याची त्यांच्या वरिष्ठांना पहिल्यापासूनच कल्पना होती. तरी ही बाब म्युझियममधल्या त्यांच्या उत्कर्षाच्या कधी आड आली नाही हे विशेष. हाती घेतलेलं काम जीव ओतून आणि प्रभावीपणे करण्यामुळे अवघ्या दहा वर्षांतच त्यांची म्युझियमच्या संचालकपदी नेमणूक झाली, तो कालखंड ऐन अणीबाणीचा. या काळात संघाचे जे काही मोजके कार्यकर्ते बाहेर होते, त्यात गोरक्षकर होते. मात्र म्युझियमच्या कामामुळे पोलिसांशी चांगले संबंध होते. त्यांच्या मनात गोरक्षकरांबद्दल आदराची भावना होती. त्याचा या काळात उपयोग झाला. याबद्दलची एक आठवण सांगताना गोरक्षकर म्हणाले, ''संघाच्या बैठकांसाठी माझं घर ही हक्काची जागा होती. अणीबाणीच्या काळात एका कार्यकर्त्याच्या घरात अशा आशयाची चिठ्ठी सापडली. जे मला ओळखत नव्हते अशा पोलिसांनी वरिष्ठांना ती चिठ्ठी दाखवली. त्यावर ते वरिष्ठ म्हणाले, 'गोरक्षकर का? चिठ्ठी फाडून टाक.'

'

मात्र, याच संघाच्या-जनसंघाच्या पार्श्वभूमीमुळे दिल्लीच्या नॅशनल म्युझियमचे संचालक होण्याची संधी गोरक्षकरांच्या हातून निसटली. त्यामागचं 'हे' एकमेव कारण आहे हे कळल्यावर ते म्हणाले, ''त्यामुळे पद मिळालं नसलं तरी हरकत नाही. मी जनसंघाचा आहे, याचा मला अभिमान आहे.''

 

प्रदर्शनांमधलं विषयवैविध्य

 

संग्रहालयात वस्तूंचा संग्रह खूप असला तरी दालनामध्ये वस्तू मांडण्यावर, त्याच्या संख्येवर मर्यादा येतात. बहुतेक वेळा दालनात एक विशिष्ट संकल्पना/विषय घेऊन प्रदर्शन न मांडता ऐतिहासिक कालानुक्रमे प्रदर्शन मांडण्यात येतं. मात्र त्यानंतरही लोकांनी आवर्जून पाहाव्यात अशा बऱ्याच वस्तूंचा संग्रह शिल्लक राहतो. त्यातही काही वस्तू तर अशा असतात की त्या वेगवेगळया वर्गवारीत मोडतात. एखादी मूर्ती अशी असते की ती क्रोनोलॉजीमध्येही येते, आयकॉनोग्राफीमध्येही येते आणि प्रादेशिक वैविध्यामध्येही तिला स्थान असतं. प्रदर्शनाचा विषय कोणता निवडता, यावर वस्तूंची निवड अवलंबून असते.

 

म्युझियमला भेट देणारा प्रेक्षक हा बरेचदा स्थानिक असतो. सुट्टीच्या दिवशी तो म्युझियमला येतो. अशा प्रेक्षकांना काही नवीन बघायला मिळालं पाहिजे, या हेतूने गोरक्षकरांनी विविध प्रदर्शनं सुरू केली. आज त्यांच्यानंतरही ती परंपरा अव्याहत चालू आहे. आजच्या संचालकांनी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आपल्या योगदानाने संग्रहालयाचा लौकिक वाढवला आहे, याचं गोरक्षकरांना विलक्षण कौतुक आणि अभिमान आहे.

 

'भारतीय कलापरंपरेतील प्राण्यांचं स्थान', 'भारतीय साहित्यातून दिसणारा कृष्ण', राजस्थानातील स्थापत्यशैलीवर प्रकाश टाकणारं 'हवेली', महाराष्ट्रातील संस्कृतीच्या प्रवासाचा वेध घेणारं 'डॉन ऑफ सिव्हिलायझेशन इन महाराष्ट्र' अशी अनेक यशस्वी प्रदर्शनं सांगता येतील.

 

याव्यतिरिक्त गोरक्षकरांनी म्युझियमच्या बाहेरही अनेक विषयांवर संस्मरणीय ठरतील अशी प्रदर्शनं उभी करून दिली. मुंबई उच्च न्यायालयाच्या शतकपूर्तीनिमित्त न्यायालयाच्या आवारात सेंट्रल कोर्टमध्ये प्रदर्शन उभं करून दिलं. ते प्रदर्शनही खूप गाजलं.

 

व्ही.के. सराफ मुंबईचे पोलीस आयुक्त असताना मुंबई पोलिसांचा सव्वाशे वर्षांचा इतिहास उलगडून दाखवणारं म्युझियम त्यांच्या मुख्यालयात उभं करून दिलं. त्या वेळची आठवण मुद्दाम नमूद करण्याजोगी. त्या हॉलमध्ये असलेला गालिचा हलक्या दर्जाचा होता. चोखंदळ गोरक्षकरांनी ते पसंत नव्हतं. मात्र तो बदलण्यासाठी मांडलेलं सगळं प्रदर्शन तुम्हाला उचलावं लागेल असं गोरक्षकरांना सांगण्यात आलं. तेव्हा उद्घाटनाला फक्त चोवीस तास बाकी होते. तरीही दर्जाबाबत कोणतीही तडजोड करायची नाही, या आग्रहासाठी गोरक्षकरांनी मांडलेलं सगळं प्रदर्शन उतरवायची तयारी दर्शवली. सराफ जेव्हा आदल्या दिवशी सकाळी पाहणी करायला आले, तेव्हा तिथे फक्त नवीन गलिचा घातलेला होता. त्याबद्दल कसलीही नाराजी व्यक्त न करता सराफांनी विचारलं, ''Is all under control?'' गोरक्षकरांनीही तेवढयाच तत्परतेने सांगितलं, ''Yes. absolutely.'' त्यावर सराफ म्हणाले, ''ठीक आहे. मी रात्री परत येतो.'' गोरक्षकर म्हणाले, ''जरूर या. खरं तर याच, असं मी म्हणेन.'' आणि गोरक्षकरांच्या लौकिकाला शोभेलसं प्रदर्शन नंतरच्या सर्व दिवसभरात पुन्हा उभं राहिलं. रात्री सराफ पुन्हा आले आणि ते दृश्य पाहून थक्कच झाले. म्हणाले, ''सकाळी मला हार्ट ऍटॅकच येणार होता. उद्या प्रेसिडेंट येणार, त्यांना काय दाखवायचं याची चिंता लागली होती. पण तुम्ही एका दिवसात पुन्हा सगळं उभं केलंत.'' ते प्रदर्शन अतिशय यशस्वी ठरलं.

 

तिबेटवरचं प्रदर्शन तयार करताना, जगण्यासाठी अतिशय खडतर असं भौगोलिक वातावरण असतानाही तिथे आयुष्य व्यतित करणाऱ्या आणि संस्कृती जपणाऱ्या तिबेटी माणसाचं दर्शन घडविण्यासाठी त्यांनी सखोल अभ्यास केला. तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी आवर्जून आले. त्यांनी या सादरीकरणाची खूप प्रशंसा केली.

 

येणारा प्रेक्षक वेगवेगळया स्तरांतून, भिन्न पार्श्वभूमीतून येतो. थेट शिकवणं हा संग्रहालयाचा उद्देश नाही, तर तिथे शिकण्याची, काही करण्याची प्रेरणा मिळणं महत्त्वाचं. गुजराती समाजातले लोक जेव्हा त्यांच्याकडचे भरतकामाचे नमुने म्युझियममध्ये पाहतात तेव्हा 'अरे, हे तर आपलं आहे!' असे त्यांच्या तोंडून उद्गार निघतात. आपण ज्याची निर्मिती केली आहे ते जतन करून ठेवण्याजोगं आहे, हा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचतो. त्यातून आपली कला टिकवण्याची, ती वाढवण्याची प्रेरणा मिळते.

 

असं असलं तरी आजही आपल्याकडे पुस्तकी अभ्यासाला अनौपचारिक शिक्षणाचं एक प्रभावी माध्यम म्हणून वस्तुसंग्रहालयाची जोड देण्याची पध्दत म्हणावी तितकी रुजलेली नाही, याची खंत गोरक्षकरांच्या बोलण्यातून जाणवते.

 

परळची शिवमूर्ती - एक अजोड योगदान

 

गोरक्षकरांच्या कार्यकाळात अनेक दुर्मीळ, वैशिष्टयपूर्ण वस्तूंचा खजिना म्युझियममध्ये आला. त्यातही घारापुरीच्या लेण्यांशी नातं सांगणाऱ्या शिवमूर्तीचा गोरक्षकरांना लागलेला शोध हा त्यांच्या कारकिर्दीतला एक मानाचा तुरा आहे. याविषयी बोलताना गोरक्षकर म्हणाले, ''मुंबईत परळ इथं असलेल्या हाफकिन इन्स्टिटयूटच्या मागे बारा देवींचं देऊळ आहे. त्या प्रकारची हिंदुस्थानातली ती एकमेव मूर्ती. त्या मंदिराचे ट्रस्टी एकदा मला भेटायला आले, म्हणाले, ती मूर्ती एवढी वर्षं आम्ही तेलानं माखून ठेवली आहे. तिच्यावरची तेलाची पुटं साफ करायची आहेत. म्युझियमची मदत मिळेल का? मी माझ्या सहकाऱ्यांना घेऊन तिथे पोहोचलो. ती मूर्ती आम्ही स्वत: धुतली. ते काम झाल्यावर ट्रस्टी म्हणाले, आमच्या गावातली बाकीची देवळं बघायला येता का?

 

तेव्हा पहिल्याच मंदिरात कोपऱ्यातल्या मूर्तीवर काही बायका दूध-पाणी घालताना पाहिल्या. त्या शिवमूर्तीच्या धोतराच्या सोग्याची ठेवण पाहून मी चमकलो. त्या काळात पश्चिम भारतातल्या मूर्तींवर अंगावरच्या वस्त्राची ठेवण अशी असायची. माझ्या मनातलं कुतूहल चाळवलं गेलंच, पण माझा जो टेक्निकल असिस्टंट होता त्याचीही नजर तयार होती. त्याने मला पटकन विचारलं, 'साहेब, घारापुरी?'

 

आमच्याकडे घारापुरीच्या मूर्ती असल्याने वस्त्राची ती विशिष्ट ठेवण पाहिल्यावर त्याच्याही ती गोष्ट लक्षात आली. मलाही घारापुरीची मूर्ती वाटल्याने मी जवळून पाहिली. पुढे ती सहाव्या शतकातली मूर्ती असल्याचं सिध्द झालं. त्याच वेळी मी जे लेखन करत होतो, त्याला या शिवमूर्तीमुळे पुष्टी मिळाली. मंदिराच्या मालकीणबाई केशरबाई परळकर यांनी ती मूर्ती म्युझियमला भेट दिली, तेव्हा मी या क्षेत्रातल्या तज्ज्ञांना मुद्दाम बोलावलं. मूर्ती पाहून सगळेच माझ्यासारखे चकित झाले. वेगवेगळया शैलीचा प्रभाव कुठवर पोहोचतो, शैलीसंस्कार कसे दूरवर झिरपत जातात त्याचं ही मूर्ती म्हणजे एक प्रतीक आहे. आमच्या दृष्टीने ही एक महत्त्वाची उपलब्धी होती. म्हणूनच त्या मंदिराला भरीव देणगी द्यावी असं आमच्या विश्वस्तांना वाटलं. मात्र केशरबाईंनी ती नाकारली. म्हणाल्या, 'हा स्मशानातला योगी! त्याला पैसे कशाला?' त्यांनी फक्त एकच सांगितलं, 'पूजेतला शंकर तुम्ही नेताय. दर सोमवारी त्याच्यासमोर एक नारळ ठेवा.' म्युझियमने आजपर्यंत त्यांच्या या इच्छेचा मान ठेवलाय.''

 

जवळजवळ बत्तीस वर्षं गोरक्षकर आणि म्युझियम हे अद्वैत होतं. या काळात त्यांनी म्युझिऑलॉजी या विषयातील अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांत देशाचं प्रतिनिधित्व केलं. विविध विषयांवरचे संशोधनात्मक प्रबंध सादर केले. स्वीडन, जपान, मॉरिशस, बल्गेरिया या चार देशांमध्ये भारत सरकारतर्फे प्रदर्शन मांडण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. अतिशय नावीन्यपूर्ण विषयावरील दालनांनी त्यांनी म्युझियम समृध्द केलं. ज्यांनी ज्यांनी मार्गदर्शनाची, सक्रिय मदतीची अपेक्षा केली त्यांच्यासाठी त्यांनी कायम वेळ काढला. या कामाच्या बरोबरीने संघकार्यातही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. ते या सगळया पसाऱ्यात काया-वाचा-मनाने इतके गुंतले होते की या कामापासून दूर झाल्यावर आपण जगू शकू का,असा प्रश्न त्यांना नेहमी पडत असे. पण निवृत्तीनंतर दुसऱ्याच दिवशी म्युझियमपासूनच नाही, तर त्यांच्या लाडक्या मुंबईपासून दूर असलेल्या वासिंद इथं उभारलेल्या 'गंधकुटी'त राहायला आले आणि वाटलं नव्हतं इतक्या सहजपणे ते या हव्याहव्याशा पाशातून मुक्त झाले. (गौतम बुध्दाचं वास्तव्य जिथे असे, त्या गुहेला गंधकुटी म्हणत असत. म्हणून घर बांधलं की त्याला 'गंधकुटी' नाव द्यायचं हे त्यांचं खूप वर्षांपासून ठरलं होतं) मात्र आपल्या ध्यास विषयापासून दूर गेले नाहीत. संग्रहालयशास्त्रातला त्यांचा अधिकार लक्षात घेऊन अनेकांनी त्यांना आपली प्रदर्शनं उभी करायची विनंती केली. आणि निवृत्तीनंतरही, नव्याने काही विषय शिकण्याची संधी म्हणून त्यांनी या कामांमध्ये स्वत:ला झोकून दिलं. तत्कालीन केंद्रीय पेट्रोलियम मंत्री राम नाईक यांनी सुचवल्यामुळे ओ.एन.जी.सी.साठी उभारून दिलेलं संग्रहालय, मुंबईत वडाळा इथे उभारलेलं कुष्ठरोगावरचं म्युझियम. वानगीदाखल ही दोन उदाहरणंही त्यांचा कामातलं वैविध्य दाखवण्यासाठी पुरेशी आहेत.

 

2011मध्ये अतिशय मानाची अशी 'टागोर फेलोशिप' जाहीर झाली, तेव्हा 80च्या उंबरठयावर असलेल्या या ज्ञानसाधकाने पूर्वीच्याच उत्साहाने आणि शिस्तीने दिल्लीच्या नॅशनल म्युझियममधील धातुमूर्तींचा अभ्यास सुरू केला. अगदी नुकतंच हे काम हातावेगळं झालं असून निवृत्तीनंतर आता सतरा वर्षांनी खऱ्या अर्थाने ते थोडे निवांत झाले आहेत.

 

आपल्या समृध्द ऐतिहासिक, सांस्कृतिक वारशाचं निगुतीनं जतन करून पुढील पिढयांपर्यंत त्याचं महत्त्व पोहोचवण्यासाठी गोरक्षकरांनी शब्दश: आपलं आयुष्य वेचलं. तीही कोणत्याही प्रसिध्दीची अभिलाषा न बाळगता. त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी नाही, तर त्यांचं योगदान समाजाला कळावं यासाठी हा लेखनप्रपंच!

 

इंदिरा गांधींची म्युझियम भेट

 

इंदिरा गांधी या एकमेव पंतप्रधान होत्या, ज्यांनी म्युझियमला एकदा नव्हे, तर दोनदा भेट दिली होती. त्यांची आठवण सांगताना गोरक्षकर म्हणाले, ''त्यांनी एकदा देशातल्या महत्त्वाच्या चार म्युझियमच्या डायरेक्टरना मिटिंगला बोलावलं होतं. सलारजंग, कलकत्त्याचं इंडियन म्युझियम, दिल्लीचं नॅशनल म्युझियम आणि दिल्लीचीच मॉडर्न आर्ट गॅलरी. आमच्या कामाचा आवाका, आमचा दृष्टिकोन यामुळे आमचं म्युझियमही त्या दर्जाचं असल्याने मलाही त्या मिटिंगला आवर्जून निमंत्रण होतं. 

 
या बैठकीत म्युझियमच्या कामकाजावर पुपुल जयकरांनी कडाडून टीका केली. म्युझियमधल्या वस्तूंची नीट काळजी घेतली जात नाही, तिथे कोळयांचं साम्राज्य असतं, अशा बेशिस्त कारभार करणाऱ्यांना तुम्ही मिटिंगला का बोलावता, असा सवालही त्यांनी इंदिराजींना केला. यावर इंदिराजींनी हलकंसं स्मित करत मला विचारलं, 'यावर तुम्हाला काही बोलायचंय?' मी म्हटलं, 'पुपुल जयकरांनी म्युझियमसंदर्भात जे उद्गार काढले ते अतिशय चुकीचे आहेत आणि ते आम्हांला मान्य नाहीत.' त्या वेळी कलकत्त्याचे ज्येष्ठ प्राध्यापक निहाररंजन रे हे राज्यसभेवर खासदार होते. ते पं. नेहरूंचे मित्र असल्याने इंदिराजी त्यांचा शब्द खूप मानत असत. ते या मिटिंगला उपस्थित होते. निहारबाबूंशी माझी चांगली ओळख होती. त्यांनी आमचं म्युझियमही पाहिलं होतं. 'पुपुल जयकरांनी केलेली टीका आमच्या म्युझियमला लागू होत नाही. निहारबाबू याला साक्ष आहेत', असं उपस्थित सर्व राजकीय नेत्यांसमोर मी स्पष्ट सांगितलं. निहारबाबूंनीही लगेच मान डोलावली. मी इंदिराजींना म्हटलं, 'आपल्याला माझी एक विनंती आहे. तुमच्या सोयीने आमच्या म्युझियमला भेट द्या. आणि जयकरांनी केलेल्या टीकेतला एक जरी मुद्दा म्युझियमला लागू होतो असं तुम्हाला वाटलं, तर मी राजीनामा देईन.'
 

या मिटिंगनंतर महिन्याभरातच त्यांचा मुंबई दौरा होता. म्हणून मी त्यांना पत्र लिहिलं, 'तुम्ही येताय असं कळलं. या दौऱ्यात माझ्या म्युझियमला भेट देण्यासाठी थोडा वेळ काढू शकाल का?' त्यांनी होकार दिला, पण राज्याच्या राजशिष्टाचार विभागाने हरकत घेतली. 'तुम्ही थेट पंतप्रधानांना कसं पत्र लिहिलंत? त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे नियम असतात' अशा शब्दांत अधिकाऱ्यांनी मला सुनावलं. मी म्हटलं, 'मी तुमचा नोकर नाही. या देशाचा एक नागरिक म्हणून त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मला तुमच्या मध्यस्थीची आवश्यकता नाही.' तरीही, 'त्या 5 मिनिटांहून अधिक वेळ थांबू शकणार नाहीत,' असं त्यांनी सांगितलं. त्यावर, 'दॅट इज नन ऑफ युवर बिझनेस. लेट हर डिसाईड' असं मी उत्तर दिलं. आणि त्या चक्क 50 मिनिटं थांबल्या. त्यांनी उत्सुकतेने सगळी दालनं बघितली.

 

त्यानंतर आमचं 'कृष्ण' प्रदर्शन होतं. 'Krishna in Indian Culture, Art and Thought' या विषयाभोवती प्रदर्शनाची मांडणी केली होती. माझ्याबरोबर फक्त डायरेक्टर असतील असं इंदिराजींनी कळवलं होतं. त्यामुळे स्वाभाविकच माझ्यावरची जबाबदारी वाढली होती. अतिशय अनौपचारिक भेट होती ही. या वेळीही राजशिष्टाचार विभागाने पाच मिनिटाचा वेळ दिला होता, पण इंदिराजी चक्क तासभर थांबल्या. त्यांना भारतीय संस्कृतीचा विलक्षण अभिमान होता, प्रेम होतं. त्यामुळेच आमचे राजकीय विचार भिन्न असले तरी ते कधी आमच्या संवादाच्या आड आले नाहीत. ज्या वेळेस इंदिराजी आल्या, तेव्हा आपल्याच काही लोकांना ते आवडलं नाही. पण ज्या आपल्या देशाच्या पंतप्रधान आहेत, त्यांचं स्वागत करणं हे माझं कर्तव्य आहे, असं मला वाटलं. त्यांच्या मनात आमच्या म्युझियमबद्दल एक आपलेपणाची भावना निर्माण झाली होती, ही गोष्ट महत्त्वाची वाटते.''

 

इंदिराजींसारखे अनेक मान्यवर म्युझियम पाहायला येऊन त्याची प्रशंसा करून गेले. त्यामध्ये जपानचे राजपुत्र नारोहितो, तिबेटी धर्मगुरू दलाई लामा, पक्षितज्ज्ञ सलीम अली, इंग्लंडचे प्रिन्स चार्ल्स (प्रिन्स चार्ल्स हे म्युझियमला भेट देणारे पहिलेच प्रिन्स ऑफ वेल्स...तेच अखेरचेही! कारण त्यांच्या पहिल्या भेटीनंतर काही काळातच छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय असं म्युझियमचं नामकरण झालं.)