नाकारलेल्या एकलव्यांचे गुरुपूजन

विवेक मराठी    20-Jul-2019
Total Views |

चिंचवड येथील पुनरुत्थान गुरुकुलममध्ये गुरुपूजनाचा उत्सव झाला. व्यवस्थेने नाकारलेल्या समाज गटातील मुले-मुली येथे शिक्षण घेतात. या मुलांमध्ये झालेले परिवर्तन आणि गुरुकुलमची दिशा स्पष्ट करणारा लेख.


 

गुरुपौर्णिमा... भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा उत्सव. या उत्सवाची सुरुवात कधी झाली हे शोधणे तसे खूपच अवघड आहे. कारण आपल्या देशात प्राचीन काळापासून गुरुशिष्य परंपरा आहे. आजही संगीत, गायन क्षेत्रात ही परंपरा टिकून असल्याचे आपण पाहतो. गुरुपरंपरा शिक्षणापुरतीच नसून आध्यात्मिक क्षेत्रातही ही परंपरा दिसून येते. आपल्या जीवनाचे उत्थान करण्यासाठी जे जे आवश्यक गुण आहेत, ते ते घ्यावेत आणि ज्याच्याकडून घेतले त्याला आपले गुरू मानावे, अशी इथली रीत आहे. भगवान दत्तात्रेयांनी चोवीस गुरू केले होते. आधुनिक वाल्मिकी म्हणून ज्यांना ओळखले जाते, त्या ग.दि. माडगूळकरांनी 'बिनभिंतीची शाळा इथली, लाखो इथले गुरू' हे नितांतसुंदर गीत लिहिले आहे. आपण आपल्या जीवनात कोणाला गुरू केले पाहिजे आणि त्यांच्यापासून काय शिकले पाहिजे, हे त्या गीतातून सांगितले आहे. आपल्या समाजात धार्मिक, आध्यात्मिक, सामाजिक पातळीवर गुरुपूजनाचे कार्यक्रम होत असतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुख सहा उत्सवांतही गुरुपौर्णिमेला स्थान असून संघाने गुरुस्थानी मानलेल्या परमपवित्र भगव्या ध्वजासमोर स्वयंसेवक तन-मन-धनाचे समर्पण करून भारतमातेला परमवैभव प्राप्त करून देण्याच्या संकल्पाची उजळणी करत पुढचा संकल्प करत असतात. संकल्प असतो भारतमातेच्या उत्थानाचा, सर्व भारतीयांना आपले बांधव मानून त्याच्या सुखदु:खाशी समरस होत त्यांना आपल्या समकक्ष करण्याचा. सन्मान, न्याय आणि बंधुता या सूत्राच्या आधाराने हे मार्गक्रमण होत असते. संघविचाराला अधिष्ठान मानून ही संकल्पसिध्दी करण्यासाठी कार्यरत असणारी संस्था म्हणजे चिंचवड येथील क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचालित 'पुनरुत्थान समरसता गुरुकुलम' होय.

संघविचारविश्वात हजारो संस्था, संघटना आज कार्य करत आहेत. प्रत्येकाचे कार्यक्षेत्र वेगवेगळे, कार्यपध्दती वेगळी असते. 'पुनरुत्थान गुरुकुलम'चेही खास वेगळेपण आहे. शतकानुशतके नाकारल्या गेलेल्या, वंचना-उपेक्षा यांची शिकार झालेल्या भटक्या विमुक्त समाजगटांना मुख्य प्रवाहात आण्याचे काम ही संस्था करते आणि त्यासाठी शिक्षण, स्वावलंबन, कारागिरी यांच्या माध्यमातून या समाजात परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातो. इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतचे शालेय शिक्षण देतानाच या समाजातील मुलामुलींच्या अंगभूत कलागुणांचा विकास करताना त्यांच्या पारंपरिक कलाकौशल्याला आधुनिकतेची जोड देण्याचा प्रयत्न येथे केला जातो. संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि सुप्रसिध्द लेखक गिरीश प्रभुणे यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारे हे गुरुकुलम म्हणजे नाकारलेल्या एकलव्यांचा आश्रम आहे. या गुरुकुलात व्यक्तिनिर्माणाबरोबरच राष्ट्रनिर्माणाचे कामही अविरत चालू आहे. शालेय शिक्षणाबरोबरच मातीकाम, धातुकाम, वैद्यकशास्त्र इत्यादी बाबींवर लक्ष केंद्रित करून मुलांची जडणघडण केली जाते.

या वर्षी गुरुकुलममध्ये गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा झाला. इ. पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. या कार्यक्रमाला सागर देशपांडे (संपादक, जडणघडण) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शालेय शिक्षणाबरोबरच जीवनोपयोगी विविध कौशल्ये विकसित करणाऱ्या या बिनभिंतीच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी गुरूविषयी वाटणारा आपला श्रध्दाभाव व्यक्त केला, तर सागर देशपांडे यांनी विविध कथांच्या माध्यमातून गुरुपरंपरेचे आणि सामाजिक एकात्मतेचे महत्त्व विशद केले. व्यवस्थेकडून नाकारलेल्या एकलव्याचे वंशज या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने बोलते झाले आणि गुरूमुळे, गुरुकुलामुळे आपल्या जीवनात, विचारात झालेले परिवर्तन त्यांनी मनोगताच्या माध्यमातून मांडले.

ही मनोगते केवळ शाब्दिक नाहीत, तर दृश्यरूपात दिसणारी आहेत. संस्कृत म्हणजे एका विशिष्ट समाजाची मक्तेदारी, अशी इतकी वर्षे जनभावना होती. पण कल्पना बिचुकले या गुरुकुलातील धनगरकन्येने ही मक्तेदारी मोडून काढली. दहावीला तिला संस्कृत भाषेत 95गुण मिळाले. कल्पनाला हे घवघवीत यश मिळाले, कारण तिच्या पाठीशी गुरुकुलम ठामपणे उभे राहिले. तिला फुलण्यास, तिच्या क्षमता विकसित होण्यास गुरुकुलम साह्यभूत ठरले, म्हणूनच हे शक्य झाले. असेच आणखी एक उदाहरण म्हणजे समीर काळे. समीर पारधी समाजात जन्मला. गिरीश प्रभुणे आणि समरसता गुरुकुलम यांच्या छत्रछायेत वाढला. शालेय शिक्षण पूर्ण करून त्याने अभियांत्रिकी शाखेत प्रवेश केला. ते शिक्षण घेत असताना संघशिक्षा वर्गही पूर्ण केला. अभियंता झालेल्या समीरने या वर्षी द्वितीय वर्ष संघशिक्षा वर्ग पूर्ण केला आणि आता प्रचारक जीवनास सुरुवात केली आहे. परिवर्तनाची अशी असंख्य पदचिन्हे समरसता गुरुकुलमच्या प्रांगणात उमटली आहेत.

गुरुकुलात साजरी होणारी गुरुपौर्णिमा म्हणजे नाकारल्या गेलेल्या एकलव्यांनी या आधुनिक आश्रमात स्वत:ला सिध्द केले आहे. या एकलव्यांनी गुरुकुलात एका नव्या विकासगंगेला प्रवाहित केले आहे. तेच उद्याचे वंचित, उपेक्षित समाजाला आकार देणारे भगीरथ ठरणार आहेत. या मुलांच्या क्षमता, योग्यता, वारसा लक्षात घेऊन गुरुकुलम त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देत असताना गुरुदक्षिणा म्हणून काय मागितले जात असेल? आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याचा पूर्ण विकास व्हावा आणि तो क्षमतावान होताना आपला समाज आणि राष्ट्र यांच्या उत्थानाची प्रेरणा त्यांच्या मनात कायम जागृत राहावी, हीच गुरुकुलमची अपेक्षा असते. आणि म्हणूनच येथील एकलव्य दर वर्षी गुरुपूजन करतात.