संग्रहालयशास्त्राचा ज्ञानकोश हरपला

विवेक मराठी    20-Jul-2019
Total Views |

भारताच्या इतिहासाची जपणूक करण्यात हयात घालवणारे, लेखक, कला समीक्षक, संग्रहालयतज्ज्ञ पद्मश्री सदाशिवराव गोरक्षकर यांचे शनिवार, 13 जुलै 2019 रोजी निधन झाले. त्यांच्या विषयी जागवलेल्या आठवणी.


 

पद्मश्री सदाशिव गोरक्षकर यांच्या निधनाची वार्ता काहीशी अनपेक्षित होती. पांढरीशुभ्र दाढी, काहीसे किरकोळ दिसणारे पण काटक होते. आपल्या साधनेचे तेज त्यांच्या चेहर्यावर दिसायचे. 86व्या वर्षी ते 13 जुलै 2019 रोजी अनपेक्षितपणे गेले. अधूनमधून प्रकृतीची कुरकुर असली, तरी ज्ञानलालसेचे सातत्य होते. अत्यंत काटेकोरपणा, तत्त्वनिष्ठा काहीसे अबोल व्यक्तिमत्त्व, संग्रहालयशास्त्रातील त्यांचे योगदान कार्यामुळे त्यांना पद्मश्री हा सन्मान दिला गेला. याआधी त्यांनी महाराष्ट्रातील राजभवनचा इतिहास पूर्ण केला होता. त्यांच्या आयुष्यामध्ये प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियममधील त्यांचे योगदान असाधारण असे होते. 1964 ते 1974 गॅलरी असिस्टंट म्हणून त्यांनी काम केले 1974 ते 1994पर्यंत जवळपास 21 वर्षे संचालक म्हणून त्यांनी काम केले. जागतिक प्रतिष्ठा लाभल्यानंतरसुद्धा सर्वसामान्यांना बरोबर घेऊन जाण्याची त्यांची क्षमता विलक्षण होती. त्यांना राष्ट्रीय सन्मान असलेली टागोर फेलोशिप प्राप्त झाली होती. त्यांचे आतापर्यंतचे काम लक्षात घेऊन ती त्यांना देण्यात आली होती.

निवृत्तीनंतर त्यांनी वाशिम येथे नदीच्या किनार्यावर एका लहानशा घरामध्ये आयुष्यातील उर्वरित वर्षे काढली. एका तपस्व्याने नदीकाठी साधना करावी तसे हे गंधकुटीत राहिले. मी कंधार येथील राष्ट्रकूटकालीन शिल्पवैभव या प्रकल्पाच्या वेळी त्यांच्याशी जाणीवपूर्वक संपर्क साधला. डॉ. .. जामखेडकर यांच्यामुळे आणि गॅझेटिअरचा डायरेक्टर म्हणून मी त्यांच्या संपर्कात होतो. या वेळी त्यांच्या कामाचे विविध पैलू मला प्रत्यक्षपणे समजून घेता आले. त्यांना 2017मध्ये चतुरंग पुरस्कार मिळाला, त्या वेळी प्रकाशित झालेल्या गौरवग्रंथात अनेकांनी त्यांच्यावर लिहिले आहे. पण एकूण मूर्तिशास्त्र, संग्रहालयशास्त्र, त्याविषयीचे भारतीय जागतिक पातळीवरील प्रवाह याविषयी त्यांचे आकलन आणि जाणीव विशेषत्वाने लक्षात राहिली. एकूण संस्कृती, ऐतिहासिक वारसा यांच्यासंबंधात त्यांचे चिंतन या क्षेत्रात काम करणार्या सर्वच व्यक्तींसाठी कायमस्वरूपाचे मार्गदर्शक तत्त्व म्हणून लक्षात राहील.

कंधार येथील मी नोंदविलेल्या राष्ट्रकूटकालीन मूर्तिशिल्पांचे त्यांनी अवलोकन केले येथील अर्धनारीनटेश्वराचे शिल्प कसे मौलिक आहे, या शिल्पातील वैशिष्ट्य, भारतातील पल्लव लेण्यांतील शिल्पाव्यतिरिक्त अन्यत्र कोठेही आढळत नाही हे त्यांनी अगदी सहज नमूद केले. कल्याण येथे मिळालेली 5व्या शतकातील विष्णुमूर्ती हे पूर्णाकार मूर्तिशिल्प माझ्या लक्षात आल्यावर कल्याणचे डॉ. श्रीनिवास साठे मला ठरवून गोरक्षकरांकडे घेऊन गेले त्यांनी कल्याण येथील मूर्तिशिल्पाचे अवलोकन केल्यावर माझे निरीक्षण अचूक असल्याचे स्पष्ट केले होते. कुठल्याही नवीन अभ्यासकाबरोबर आपले विचार मुक्तपणे मांडताना त्यांच्यातील उत्साह आणि विचारांची स्पष्टता शेवटपर्यंत टिकून होती. संग्रहालयाच्या संदर्भात त्यांनी स्वतः लेखन केले होते. वस्तुसंग्रहालय त्यांचा उगम दुर्मीळ अमूल्य वस्तूंच्या संग्रहाच्या हव्यासातून झाला हे खरे असले, तरी कुठलेही संग्रहालय वस्तुकेंद्री संग्रहालय राहू नये, ते सांस्कृतिक प्रवाहाचे वाहक असले पाहिजे, लोकसहभाग लोकप्रशिक्षण हाच वस्तुसंग्रहालयाचा मुख्य हेतू असावा ही त्यांची धारणा होती.

संग्रहालय म्हणजे गतसंस्कृतीचे गाठोडे, कालानुक्रमिक त्याचे मानलेले रूप असे त्याचे रूप राहता संस्कृती, गतिशास्त्र सर्वसमावेशकता या बाबी समोर ठेवून व्यवस्थापनातील धोरणात परिवर्तन यायला हवे. शतकानुशतके झिरपणारा, श्रद्धा, प्रथा ज्ञानवारसा, तर्क त्याचा अर्थबोध घडवून देणारी संस्कृती याचे समाजमनाला दर्शन झाले पाहिजे असा इतिहास, संग्रहालयशास्त्र यांचा अंतिम हेतू असावा, असे ते म्हणत. वस्तुसंग्रहालयविषयक जागतिक पातळीवरच्या नवनवीन संकल्पना स्पष्ट करताना वस्तूऐवजी कल्पनेभोवती उभारलेले आजचे संग्रहालय ही संग्रहालयाची संकल्पना अधिक सर्वस्पर्शी करतात, असे ते मानत.

ते प्रिन्स ऑफ वेल्समध्ये असताना आंतरराष्ट्रीय प्रदर्शनामध्ये मॅरिटाइम हेरिटेज हे प्रदर्शन त्यांनी मॉरिशस येथे 1984 साली, लावण्या-दर्पण हे स्वीडनमध्ये 1987 साली, तर मृग हे जपानमध्ये 1988 साली भरविले. या प्रदर्शनामुळे गोरक्षकरांच्या चोखंदळपणाचा तर सगळ्यांना प्रत्यय आलाच, शिवाय भारतीय संस्कृतीच्या सौंदर्यप्रियतेचा प्रत्ययही परदेशी चोखंदळ रसिकांना आला. गोरक्षकरांनी यासारखी विविध प्रदर्शने आयोजित केली. भारत सरकारतर्फे ॅनिमल इन इंडियन आर्ट, नेव्ही (नाविक) - मॅरिटाइम इंडिया, क्लासिकल इंडियन आर्ट इत्यादी...

निवृत्तीनंतर त्यांनी जी महत्त्वाची वस्तुसंग्रहालये उघडली, त्यात जछॠउचे ऑइल म्युझियम डेहराडून, तसेच ॅक्वर्थ लेप्रसी म्युझियम, मुंबई - कुष्ठरोगविषयक माहिती देणारे संग्रहालय. कुठल्याही वस्तुसंग्रहालयाची उभारणी करताना त्यामागील संकल्पना, त्याची सर्वसमावेशकता, त्या संकल्पनेचा उदय विकास आणि उपयुक्तता ते तपासून पाहत त्यातून दिला जाणारा संदेश अचूक ठरण्यासाठी मूळ अभिलेख संदर्भग्रंथ पाहून त्याची योग्य वर्गवारी करत त्यानंतर त्या त्या दालनांची स्वतंत्रपणे मांडणी करण्याविषयी सल्ला देत. संकल्पनेचा मथितार्थ सादर करण्यासाठी अभ्यासकाला त्याविषयीची अधिक माहिती घेण्याची प्रेरणा व्हावी, यासाठी त्यांचे प्रयत्न उपयुक्त ठरले. गोरक्षकरांनी उभारलेली वस्तुसंग्रहालयातील वस्तू प्रत्यक्षात काही शिकवत नाही, पण त्याविषयीच्या ज्ञानासंबंधी जिज्ञासा अभ्यासकाच्या मनात निश्चितच निर्माण करतात. भारतीय नाविक डॉकयार्डला 250 वर्षे झाली, तेव्हा गोरक्षकरांनी असाच एक प्रयोग केला. त्यातून भारतीय नौदलाचे स्वातंत्र्योत्तर घोषवाक्यशं नो वरुण:’ याबद्दलची माहिती कळवताना, भारताचे पहिले गव्हर्नर जनरल प्रकांडपंडित चक्रवर्ती राजगोपालाचारी यांनी आपल्या हस्ताक्षरात 18 मार्च 1952 रोजी लिहिलेल्या आंतरदेशीय टपालावर हे नामकरण नोंदविले होते, हे स्पष्ट झाले.

गोरक्षकर हे धातुमूर्तीचे जाणकार होते. या संदर्भात त्यांचे निरीक्षण कायम महत्त्वाचे मानले गेले. एकूण गोरक्षकरांच्या जाण्यामुळे धातुविज्ञान, मूर्तिशास्त्र, संग्रहालयशास्त्र या संदर्भात अधिकृतता असलेला ज्ञानकोश आम्ही गमावला. याशिवाय उत्कृष्ट संघटक, सर्व स्तरात हवा असलेला पण अलिप्त राहणारा अभ्यासकही आम्ही गमावला. असे असले, तरी संग्रहालयशास्त्राची उपयुक्तता, त्यातील विविध आयाम, संकल्पनेचे सादरीकरण यासाठी त्यांनी केलेले काम हे कायम दिशा देणारे ठरणार आहे.

डॉ. .शं. पाठक

9619046069