रैना बीती जाये...

विवेक मराठी    03-Jul-2019
Total Views |

 'रैना बीती जाये, शाम न आये'  या गीताच्या सुरावटीला प्रत्यक्ष आयुष्यातसुध्दा चुकवून जाता येणार नाही. या गीतात थोडी काळजी, थोडी असूया, विरहाचे दुःख दिसते.

 शाळेत असेन. मुनारला आले होते. इथे येण्याआधी अर्धे केरळ चार दिवसांत चार चाकांवर पालथे घातले असल्याने सगळेच थकून हॉटेलमध्येच गप्पा मारत होते.

पाय मोकळे करण्यासाठी मी एकटीच बाहेर पडले. हिल स्टेशनचे एक बरे असते. कोणत्याही दिशेने जा, बाहेर पडले की भुलवणारा सोहळा नजरेला पडतो. फार वर्दळ नव्हती. रस्ता तसा निर्जन होता. सगळया बाजूने उंचच उंच डोंगर, झोंबणारा वारा आणि त्यातच पावसाची रिपरिप. सर्व परिसर मात्र चहाच्या सुगंधाने न्हालेला. वरती एक दगडी चर्च होते. त्यातल्या माय-लेकालासुध्दा त्रास देणारे कोणी नव्हते. जवळच एका मोठया दगडाच्या आडोशाला टेकले. हळूहळू प्रकाशाची सत्ता संपायला सुरुवात झाली. उन्हातील ठाशीव आकृत्यांची जागा आता सावलीने घेतली. एवढयात वाऱ्यावरून तरंगत स्वर आले...

रैना बीती जाये, शाम न आये

माझ्यासारखाच एक प्रवासी असावा. रेडिओ ऐकत, सूर्यास्त पाहत स्वरांमध्ये रमला होता. तेव्हा सिनेमा पहायची परवानगी नव्हतीच, पण राग तोडी आणि खमाजमध्ये बांधलेल्या या गीताने आर.डी. बर्मन या नावाची ओळख झाली.

नंतर कधीतरी अमर प्रेम हा चित्रपट दूरदर्शनवर पाहिला.

अमर प्रेम ही तिघांची गोष्ट आहे. असे तिघे, ज्यांच्यात रक्ताचे नाते नाही. त्यांच्या एकत्र असण्याला समाजाची मान्यता नाही. प्रेम, विश्वास आणि श्रध्दा ह्या अदृश्य धाग्यांनी त्यांना बांधलेले आहे.

कथेची नायिका आहे पुष्पा (शर्मिला टागोर). मूल होत नाही म्हणून नवऱ्याने टाकलेली आणि समाजाने लाथाडलेली एक दुर्दैवी स्त्री. फसवणुकीने कोठयावर विकली जाते. आता बाहेर पडणे शक्य नसते. जगाची दारे तिच्यासाठी कधीच बंद झालेली असतात. उदरनिर्वाहासाठी ती गाण्याचा आधार घेते. तिच्या स्वर्गीय आवाजाची कीर्ती हळूहळू गिऱ्हाइकांना कोठयाकडे आकर्षित करते.

आनंद (राजेश खन्ना) हा असाच एक रसिक तिच्या आवाजाने मोहित होतो. आनंदबाबूकडे जगातील सर्व सुखे आहेत. ऐशआरामाचे आयुष्य आहे, पण प्रेमाची साथ देणारे कुणीही नाही. पत्नी तिच्या जगात रमलेली आहे. पार्टी, मित्र-मैत्रिणी ह्यात आनंदला रस नाही आणि तिच्या आयुष्यात आनंदला जागा नाही. जीवनातील एकाकीपण त्याने दारूच्या नशेत बुडवून टाकले आहे.

अशाच एका रात्री, नशेत झिंगलेला आनंदबाबू आपले लडखळणारे पाय सावरत परत चालला असतानाच जवळच्याच कोठयावरून सारंगीचे आर्त सूर त्याच्या कानावर येतात. दुर्लक्ष करून घोडागाडीत चढताना सारंगीची जागा तोडी रागात बांधलेला आलाप घेतो. हा आवाज काळजाला छेडणारा. आता मात्र तो स्वतःला थांबवू शकत नाही. त्या सुरांच्या दिशेने त्याची पावले कोठयाच्या पायऱ्या चढू लागतात. आलापाची जागा आता संतूर घेते आणि नंतर गिटारबरोबर तबल्याचा

मेळ जमतो.

सिनेमाचं कशाला, प्रत्यक्ष आयुष्यातसुध्दा या सुरावटीला चुकवून जाता येणार नाही, एवढे ताकदीचे गीत आर.डी.ने दिले आहे.

शाम को भुला, शाम का वादा

संग दिये के जागी राधा

 निंदिया न आये

रैना बीती जाये,

शाम ना आए

 

रैना बीती जाये ही विरहिणी आहे, राधेची तक्रार आहे. तिचा श्याम संध्याकाळी परत येण्याचे वचन देऊन निघून गेला आहे. आता सूर्यसुध्दा अस्ताला गेला आहे. संध्याकाळ पुढे जात जात रात्रीत मिसळून गेली आहे. वाट पाहून तिचे डोळे जरी थकले, तरी झोपेने मात्र कधीच दडी मारली आहे.

रात्र उलटून गेली, तरी कृष्णाच्या पावलांचे दर्शन होत नाही, तेव्हा मात्र तिची तहान, तगमग, कासाविशी वाढते. मनात नाही नाही ते विचार येतात. कृष्ण झाला म्हणून तरी काय झाले? शेवटी पुरुषाची जात. तो कुठे अडकला तर नाही? हा संशय मनात ठाण मांडतो. त्याला नजर तर लागली नसेल ना? ही भीतीही मनात साकळते.

 

किस सौतन ने रोकी डगरिया

किस बैरन से लगी नज़रिया

निंदिया न आये रैना बीती जाये

 

थोडी काळजी, थोडी असूया, विरहाचे दुःख आणि कोणा सवतीचा मत्सरसुध्दा या गीतात दिसतो.

पुष्पा कलावंतीण आहे. तरीही गीत आहे राधेचे. राधेच्या नावाचा उच्चारही मनाला निरामय, विशुध्द आनंदाचा प्रत्यय देतो. लता मंगेशकरांच्या आवाजातसुध्दा ते पावित्र्य आहे. उगाच नाही, गीत संपते तेव्हा या दैवी आवाजाने मंत्रमुग्ध झालेला आनंद उद्गारतो, ''तुम्हारा नाम पुष्पा है, मीरा होना चाहिये था।''

एका कोठयावरचे गीत असताना राधेचे प्रतीक का वापरले असावे?

अमर प्रेम कथेची मूळ थीम आहे निरपेक्ष प्रेम. राधा आणि कृष्ण हे तर निरपेक्ष प्रेमाचे दुसरे नाव आहे. भक्ती, प्रणय आणि सख्य या तिन्ही भावनांचा संयोग या प्रेमात आहे.

व्यासपर्व मध्ये दुर्गा भागवत म्हणतात - भारतीय पातिव्रत्याच्या कडकडीत सोवळेपणाला कायमचे आव्हान देत राधेने एकनिष्ठ प्रीतीचे, पूर्ण सौंदर्य उघडे केले. प्रीतीचा लालभडक रंग राधेमुळे सौम्य निळा झाला, रुपेरी झाला. अनयाची पत्नी, कृष्णाची सखी ही राधेची ओळख नाहीच. ती आहे, स्वतःच्या प्रेमाचे अर्ध्य देऊन कृष्णाचे पूर्ण पुरुषात रूपांतर करणारी त्याची प्रेरणाशक्ती. कृष्ण युगपुरुष असेलही, पण सगळयांना सगळे देऊनही जिच्यासाठी सर्वच उरले आहे आणि कधीही सरणार नाही असे प्रेम कृष्णाने राधेला दिले आहे..

अमर प्रेममधील आनंद आणि पुष्पा यांचे प्रेम असेच शाश्वत आहे. स्वतःच्या लोकांकडून दुर्लक्षित राहिलेले, प्रेमापासून वंचित असलेले आनंद आणि पुष्पा हे दोन जीव एकमेकांच्या सुख-दुःखात समरस होतात. एकमेकांच्या सोबतीत स्वतःचे जग वसवतात. हा सुखाचा काळ मात्र टिकत नाही.

आपल्यामुळे आनंदच्या संसारात विघ्न नको म्हणून पुष्पा त्याच्यापासून लांब जाते. शरीराने एकमेकांपासून लांब गेले, तरी एखाद्याच्या स्मृतीत आत्ममग्न असणे हा चिरंतर चालणारा प्रवास आहे. त्यातून मिळणारा आनंदसुध्दा अलौकिक, म्हणून ते प्रेमही अमर होते. त्याला स्थळ, काळ आणि स्पर्श यांची सीमा राहत नाही.

एक कलावंतीण आणि एक विवाहित पुरुष यांच्यातील हे अनवट नाते चित्रपटाच्या इतिहासात आगळे ठरले. एक आईवेगळा मुलगा आणि पुष्पा, यांच्यातील निरपेक्ष बंध हा आणखी एक कोन या चित्रपटात आहे. त्याही नात्याला रक्ताची मान्यता नाही, जशी यशोदा आणि कृष्ण यांच्या नात्यालासुध्दा रक्ताची गरज नाही.

हा चित्रपट नायिकाप्रधान असूनही नायिकेच्या वाटयाला केवळ दोन गीते आहेत. 'बडा नटखट है रे कृष्ण कन्हैया, का करे यशोदा मैया' हे गीतही नायिकेच्या व्यक्तिमत्त्वाला, त्यातील दिव्यत्वाला, अधोरेखित करते.

आयुष्याच्या कोणत्याही वळणावर, कल्पना नसताना प्रेम तुमच्या जीवनात डोकावते आणि सारे आयुष्यच सुगंधी करून जाते, हा प्रत्यय अमर प्रेम हा चित्रपट देतो.