‘ज्येष्ठपर्व’चे शैशवात पदार्पण

विवेक मराठी    03-Jul-2019
Total Views |

 ‘ज्येष्ठपर्व’ हे नाव कितीही आकर्षक असले तरीही आजचा कार्यक्रम पाहून ते ‘युवापर्व’च वाटले. ज्या उत्साहाने आणि तडफदारपणे येथे स्पर्धकांनी सादरीकरण केले ते खरोखरच अभिनंदनीय अशा अर्थाने आहे की इतरांसाठी तो एक वेगळाच दृष्टीकोन आहे असे मी मानतो. ज्ञानेश्‍वरांनी भावार्थदिपिकेतून सांगितलेला कर्मयोग ज्येष्ठांनी आचरणात आणला आहे त्यापासून इतरांनी प्रेरणा घेतले पाहिजे. त्यामुळे भावार्थदिपिकेचा पुढचा भाग प्रत्यक्षात आचरणे म्हणजे आजचे ‘ज्येष्ठपर्व’ होय. असे भावनोउत्कट उद्गार नामवंत अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी काढले. ते पुण्यातील औंध येथील भारतरत्न पं. भीमसेन जोशी कलामंदिर येथे रविवार, दि. 30 जून 2019 रोजी सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आलेल्या ‘सन्मान ज्येष्ठत्वाचा-2019’ या उपक्रमाच्या महाअंतिम फेरी आणि पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते.

खरे म्हणजे ‘ज्येष्ठपर्व’ची त्रैमासिक अशीच ओळख आहे. पण बारा वर्षाची तपपूर्ती केल्यानंतर तेरावे वर्ष संपून चौदाव्या वर्षात पदार्पण करतांना ‘ज्येष्ठपर्व’ने मासिकाचे रूप धारण केले आहे आणि आता दर महिन्याला ते वाचकांच्या भेटीला येणार आहे. हे पदार्पण करतानाच आपल्याकडे सर्वांचे लक्ष ‘ज्येष्ठपर्व’ने वेधून घेतले ते ‘उत्सव कलागुणांचा, सन्मान ज्येष्ठत्वाचा-2019’ या ज्येष्ठांच्या विविध कलागुणदर्शनाच्या महास्पर्धेमुळे. गेल्या सहा महिन्यांपासून पुणे, सोलापूर आणि सातारा या तिन्ही जिल्ह्यांमध्ये याची नुसती धूम उडाली होती. सुमारे दीड हजार स्पर्धकांचा अंतर्भाव, पाऊणशेहून अधिक यजमान संघांचा सहभाग असलेल्या या महास्पर्धेचे मासिक ज्येष्ठपर्वच्या बरोबरीने महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ, (फेस्कॉम), मध्यवर्ती ज्येष्ठ नागरिक संघटना, पुणे (अ‍ॅस्कॉप) आणि ज्येष्ठ नागरिक महासंघ, पिंपरी-चिंचवड शहर या संस्था-संघटनांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. पितांबरी प्रॉडक्टस प्रा. लि., सुरेंद्र हिअरिंग क्लिनिक आणि ठाणे जनता सहकारी बँक यांच्या प्रायोजकत्वाखाली हा उपक्रम यशस्वी झाला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठपर्वचे संपादक दीपक जेवणे म्हणाले की, ज्या ज्येष्ठांनी बारा वर्षाच्या कालावधीत ज्येष्ठपर्वला मनापासून साथसोबत दिली, आधार आणि प्रेम दिले त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या एकाकी जीवनात आनंद फुलवण्यासाठी या महास्पर्धेचा घाट आम्ही घातला आहे.

आपले मनोमत व्यक्त करतांना प्रसिद्ध अभिनेते योगेश सोमण म्हणाले की, “नाचताना त्यांचा एखादा बीट चुकलाही असेल आणि कोणाला खुदकन हसू आले असेल. मलासुद्धा आले असले. त्यांचा एखादा पदन्यास चुकला असेल पण सादरीकरण संपल्यानंतर त्या थोड्याशा दमलेल्या असून विंगेत परतत होत्या तेव्हा त्यांच्या चेहर्‍यावर जो आनंद झळकत होता. तो पाहून माझ्या डोळ्यात पटकन पाणी तरळले की त्या नाचत असताना त्यांचे थोडेसे चुकले असेल तरीही मी का बरे हसलो? त्यांनी गाण्यावर नृत्य करून छान आनंद घेतला. पर्यटन व्यवसायाला चालना देण्याचे काम जर कोणी केले असेल तर ते ज्येष्ठांनी केले आहे. कलेच्या संबंधी किंवा पर्यटनाविषयीसंबंधीच्या जी स्वप्ने तरूण वयात अपूर्ण राहिली होती. ती स्वप्ने ते आता ज्येष्ठ झाल्यावर मनसोक्तपणे पूर्ण करत आहेत. पुढच्या पिढीची चिंता करायला पुढची पिढी आहे.”  


 श्रीकृष्ण कुलकर्णी, जयंत दिवे, चंद्रशेखर गर्गे, उल्हास भानू यांनी गायलेल्या सुस्वर नांदीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन चंद्रशेखर जोशी यांनी केले. या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत आणि लेखक गिरीश प्रभुणे, विवेक समूहाचे प्रबंध संपादक दिलीप करंबेळकर, पितांबरी प्रोडक्ट्चे डॉ. संदीप माळी, सुरेंद्र हिअरिंग क्लिनिकचे डॉ. सुरेंद्र, टीजेएसबी बँकेचे कैलास सिनलकर, अरूण रोडे (अध्यक्ष, फेस्कॉम, महाराष्ट्र), डॉ. आर. टी. वझरकर (अध्यक्ष, अ‍ॅस्कॉप, पुणे), दिलीप पवार (कार्याध्यक्ष, अ‍ॅस्कॉप, पुणे), चंद्रकांत महामुनी (अध्यक्ष, फेस्कॉम, पुणे प्रादेशिक विभाग) इत्यादी मान्यवर मंडळी उपस्थित होती.

या महाअंतिम फेरीत विजयी झालेल्या विनया विद्वांस - एकपात्री अभिनय ( वाकेश्‍वर ज्ये. ना. संघ), अर्चना ठोके - वक्तृत्व (लोकमान्य ज्ये. ना. संघ), ज्योस्त्ना टिळक - गायन (औंध ज्ये. ना. संघ), रत्नाकर लोणकर - गायन (सोलापूर ज्ये. ना. संघ), चंदा मानकर - नर्तन (वाकेश्‍वर ज्ये. ना. संघ), रोहिणी शेवाळे - वेशभूषा (विश्रांतवाडी ज्ये. ना. संघ) या स्पर्धकांचा सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे रांगोळी स्पर्धा  (1. अर्चना गोर्‍हे, 2. नीलिमा कलावंत, 3. सुभद्रा रणखांबे), निबंधलेखन स्पर्धा (1. जगदीशदत्त लाटे, 2. नंदिनी सातारकर, 3. श्याम रावते), आणि काव्यलेखन स्पर्धा (1. सुभाष सरदेशमुख, 2. जे. एम. शर्मा, 3. जोसेफ साकरे) यातील विजेत्यांचाही सत्कार करण्यात आला. महाअंतिम फेरीचे परीक्षण मिलिंद जोशी, धनंजय तडवळकर आणि अशोक भांबुरे या तज्ज्ञ परीक्षकांनी केले. या स्पर्धेच्या आयोजनात मोलाची भूमिका बजावून सहकार्य करणार्‍या निवडक यजमान संघाचा यावेळी सत्कार करण्यात आला. दिलीप पवार विश्रांतवाडी ज्ये. ना. संघ), कमलिनीताई जगताप (साई अबोली महिला ज्ये. ना. संघ), संजीवनी उन्हाळे (संजीवनी ज्ये. ना. संघ), मालती डुंबरे (ओतूर ज्ये. ना. संघ) यांनी आपल्या संघाच्या वतीने सत्कार स्वीकारला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हनुमंत कुंभार (सचिव फेस्कॉम, पुणे प्रा. विभाग प्रतिनिधी), दिलीप टोमके (स्वानंद कलामंच, पंढरपूर) यांचे विशेष सहकार्य लाभले. विवेक व्यासपीठाचे कार्यवाह महेश पोहनेरकर यांनी आभारप्रदर्शन केले.

- उत्कर्षा सुमित